श्रीलंका : (डेमोक्रॅटिक सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंका. सिंहली  श्रीलंका प्रजातांत्रिक समाजवादी जनराजय). दक्षिण आशियातील एक द्वीपप्रजासत्ताक. भारताच्या आग्नेय किनाऱ्यालगत असलेल्या या देशाचा विस्तार ५º ५५’ ते ९° ५१’ उत्तर अक्षांश व ७९° ४१’ ते ८१° ५३’ पूर्व रेखांश यांदरम्यान असून क्षेत्रफळ ६५,६१० चौ. किमी. आहे. देशाला १,२०४ किमी. लांबीचा किनारा लाभला आहे. लोकसंख्या २,००,६४,७७६ (२००५ अंदाज). नासपती (पेअर) फळासारखा आकार असलेल्या या देशाची उत्तर-दक्षिण कमाल लांबी ४३२ किमी. व पूर्व-पश्चिम कमाल रूंदी २२४ किमी. आहे. उत्तरेला व पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला मानारचे आखात व पाल्क सामुद्रधुनी यांनी हा देश वेढलेला आहे. देशाची श्री जयवर्धनपूर कोट्टे (लोकसंख्या १,१५,८००-२००१) ही प्रशासकीय व कोलंबो (६,४२,१६३) ही व्यापारी राजधानी आहे.

देशाला लाभलेल्या नैसर्गिक वनश्रीमुळे ‘ पाचूचे बेट ’ म्हणून त्याला संबोधले जाते. मौल्यवान खडे, चहा, जलवनस्पती व प्राणी, किनाऱ्यावरील सुंदर पुळणी व थाटामाटात साजरे केले जाणारे धार्मिक उत्सव या येथील विशेष महत्त्वाच्या बाबी आहेत. मौल्यवान खडे व मसाल्याच्या पदार्थांसाठी प्राचीन काळापासून हे बेट प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कालखंडांत हे बेट सिंहलद्वीप, ताप्रोबाना, सेरेंदिप, सीलोन या नावांनी ओळखले जाई. मे १९७२ मध्ये सीलोन ऐवजी ‘ श्रीलंका ’ हे या प्रजासत्ताकाने नाव स्वीकारले आहे. पाल्कच्या सामुद्रधुनीतून भारताच्या किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत एक लहानशी, वालुकामय व अर्धवट निमज्जन स्वरूपातील प्रवाळशैल मालिका असून तो भाग ‘ रामाचा सेतू’ (ॲडम्स ब्रिज) या नावाने ओळखला जातो. येथेच भारत  श्रीलंका यांदरम्यानचे अंतर फक्त ३२ किमी. आहे. या प्रवाळशैल मालिकेमुळे दक्षिणोत्तर किनारी जलवाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. भारत व श्रीलंका यांदरम्यानच्या पाल्कच्या सामुद्रधुनीतील सरहद्दीची पुन्हा आखणी २८ जून १९७४ रोजी करण्यात आली त्यावेळी तीमधील करटीव्ह् बेट श्रीलंकेला देण्यात आले.

भूवर्णन : भौगोलिकदृष्ट्या श्रीलंका हे बेट पूर्वी भारताचाच म्हणजे दक्षिण भारतीय पठाराचाच एक भाग असावा, असे भूशास्त्रज्ञांचे मत आहे. बेटाचा दक्षिणमध्य भाग पर्वतीय असून तेथून समुद्रकिनाऱ्याकडे उंची कमीकमी होत जाते. किनाऱ्यापासून अंतर्गत भागातील भूप्रदेशाचे ० ते १२० मी., ५०० ते ६०० मी. व ६०० ते १,२०० मी. असे उंचीनुसार वर्गीकरण केले जाते. कमाकमाने उंचावत जाणारा हा भाग पायऱ्या-पायऱ्यांसारखा दिसतो. देशाची सु. चार पंचमांश भूमी सपाट किंवा मंद उताराची आहे. प्राकृतिकदृष्ट्या श्रीलंकेचे प्रमुख चार विभाग पडतात : (१) दक्षिण-मध्यवर्ती उच्चभूमी, (२) नैऋर्त्य विभाग, (३) पूर्व विभाग, (४) उत्तरेकडील सखल प्रदेश.

(१) दक्षिण  मध्यवर्ती उच्च्भूमीची सस.पासूनची उंची २,१०० ते २,४०० मी.च्या दरम्यान किंवा त्यापेक्षा अधिक आहे. उंच पर्वतपठारे, अरूंद घळ्या, वेगाने वाहणाऱ्या नदया, त्यांवरील प्रपात, नदयांच्या खोल दृया व सुपीक खोरी इ. वैविध्यपूर्ण भूमिस्वरूपे व सृष्टिसौंदर्याने नटलेला असा हा मध्यवर्ती पर्वतीय प्रदेश आहे. त्याच्या साधारण मध्यभागी पिदरूतलागला किंवा मौंट पेद्रो (उंची २,५२४ मी.) हे बेटावरील सर्वोच्च शिखर आहे. आदम (ॲडम्स पीक) किंवा श्री पद (२,२४३ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर या प्रदेशात आहे. (२) नैऋर्त्य विभागही पर्वतीय असून मध्यवर्ती उच्च्भूमी प्रदेशातील पर्वतश्रेणीचाच हा विस्तारित भाग आहे. (३) पूर्वेकडील विभाग उंचसखल मैदानी स्वरूपाचा असून त्यात अधूनमधून एकाकी टेकड्या आढळतात. (४) उत्तरेकडील सखल प्रदेश विस्तृत व सुपीक आहे. त्यात अधूनमधून नदयांची खोरी व कटक आढळतात. श्रीलंका बेटाच्या सभोवतालचा भाग प्रवाळ कीटकांना अनुकूल असल्याने तेथे प्रवाळ खडकांची वाढ झालेली दिसते. नैऋर्त्य भाग सोडल्यास इतरत्र अपतट वाळूचे दांडे, जिह्वा-भूशिरे (स्पिट) व टोंबोलो हे भूविशेष आढळतात. बेटाचा किनारा वालुकामय पुळणींनी वेढलेला आहे. पूर्वेकडील किनार-पट्टीवर अनेक टेकडय आहेत. जाफना द्वीपकल्पाजवळ काही छोटी छोटी बेटे आढळतात.

श्रीलंकेच्या दक्षिणमध्य भागातील पर्वतीय प्रदेशाकडून सभोवताली उंची कमी कमी होत जाते. येथील बहुतेक नदया या पर्वतीय प्रदेशात उगम पावून सर्व दिशांना वाहत जातात. त्यामुळे केंद्रोत्सारी नदीप्रणाली निर्माण झाली आहे. बहुतेक नदया कमी लांबीच्या व वेगाने वाहणाऱ्या असून प्रवाहमार्गात धबधबे असल्याने जलवाहतुकीस निरूपयोगी परंतु जलसिंचन व जलविद्युत् निर्मितीस उपयुक्त ठरल्या आहेत. महावेली गंगा ही देशातील सर्वांत लांब (३३२ किमी.) नदी दक्षिण  मध्य उच्च्भूमी प्रदेशाच्या उत्तर भागातील हॅटन पठारावर उगम पावून ईशान्येस वाहत जाते. ती पोलोन्नरूव या प्राचीन राजधानीच्या ठिकाणापासून वाहत गेल्यावर त्रिंकोमालीच्या दक्षिणेस कोड्डियार उपसागराला मिळते. आरूव्ही आरू (लांबी १६७ किमी.) ही दुसरी प्रमुख नदी अनुराधपुर या जुन्या राजधानीच्या ठिकाणाजवळून वाहत जाते. काला ओया, मदुरू ओया, केलानी गंगा, वालावे गंगा या इतर प्रमुख नदया आहेत.

हवामान : श्रीलंकेचे स्थान विषुववृत्ताजवळ (सु. ८०४ किमी. अंतरावर) असले तरी समुद्रसान्निध्य आणि विशिष्ट ऋतूमध्ये वाहणारे मोसमी वारे यांमुळे येथील विषुववृत्तीय हवामानात बदल झालेला दिसून येतो. तापमानकक्षा कमी आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील व सखल प्रदेशातील हवामान वर्षभर उबदार व आर्द्र असते तर पर्वतीय प्रदेशात ते शीत, आल्हाददायक असते. सखल भागातील वार्षिक सरासरी तापमान २७° ते २८° से. असून ते क्वचित ३२° से.पेक्षा अधिक वाढते. उंच पर्वतीय प्रदेशातील सरासरी तापमान १६° से. असते. सापेक्ष आर्द्रता दिवसा ७० तर रात्री ९० पर्यंत असते. देशातील पर्जन्याचे वितरण असमान आहे. नैऋर्त्य मोसमी वारे मे ते सप्टेंबर या कालावधीत तर ईशान्य मोसमी वारे ऑक्टोबरच्या अखेरीपासून ते फेबुवारी अखेरपर्यंत वाहतात. या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून श्रीलंकेला पर्जन्य मिळतो. नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या काळातील पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. या काळात समुद्र खवळलेला असतो. उत्तर भाग मात्र पर्जन्यासाठी प्रामुख्याने ईशान्य मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असतो. दोन मॉन्सूनच्या दरम्यानच्या काळात मंद वारे वाहतात. परंतु दुपारच्या वेळी काही प्रमाणात पावसाच्या सरीही येतात. नैऋर्त्य मॉन्सूनपूर्वीचे मार्च व एप्रिल हे सर्वाधिक उष्ण महिने असतात. उत्तरेकडील व पूर्वेकडील कोरडया प्रदेशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०० सेंमी. पेक्षाही कमी असून पर्वतीय प्रदेशाच्या पूर्व व नैऋर्त्य उतारावरील पर्जन्यमान ५०८ सेंमी.पेक्षाही अधिक आहे.

श्रीलंकेतील खडक हे जगातील सर्वांत जुन्या खडकांपैकी आहेत. नैऋर्त्येकडील आर्द्र प्रदेशात जांभी मृदा आढळते. शुष्क प्रदेशातील मृदा अधिक सुपिक आहे. विविध प्रकारचे मौल्यवान खडे वगळता अन्य खनिजे येथे विशेष आढळत नाहीत.


 वनस्पती व प्राणी : एकेकाळी श्रीलंकेतील आर्द्र उच्च्भूमी प्रदेशात तसेच सखल भागात घनदाट उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये होती. सांप्रत त्यातील बरीच भूमी शेतीखाली आणली आहे. काही भागात दाट गवत तसेच नेचे यांचे आच्छादन आढळते. नैसर्गिक वनस्पतींमध्ये विविधता आहे. पर्वतीय प्रदेशात उष्णकटिबंधीय अरण्ये आढळतात तर शुष्क सखल भागात प्रामुख्याने साग, एबनी, आयर्नवुड, कुंती (सॅटिनवुड) हे उपयुक्त वृक्ष दिसून येतात. ईशान्येकडील प्रदेशात शुष्क, मिश्र सदाहरित वनस्पती आहेत. एबनी, कुंती, साग, फणस इत्यादींशिवाय ३,००० पेक्षा अधिक जातींची फुलझाडे व नेचे या देशात दिसून येतात. वायव्य व आग्नेयीकडील प्रदेशांत काटेरी झुडुपे तर पूर्वेकडील प्रदेशात सॅव्हानासदृश गवताळ प्रदेश आहेत. कँडीजवळील पेरादीनिया व नूवाराएलीयाजवळील हकगॅली उद्यानांमध्ये श्रीलंकेतील वैविध्यपूर्ण वनस्पती आढळतात. खेड्यांमध्ये तसेच रस्त्यांच्या कडेने सर्वत्र केळी, पपया, फणस, आंबे, नारळ आणि पोफळीची झाडे पहावयास मिळतात.

पूर्वीच्या तुलनेत वन्य प्राण्यांची संख्या घटलेली असली तरी अजूनही येथे विपुल प्राणी आढळतात. येथील जंगलांत हत्ती, चित्ता, अस्वल, रानडुक्कर, रानरेडा, विविध प्रकारचे मृग, सांबर, विविध प्रकारची माकडे इ. प्राणी पहावयास मिळतात. नदया व जंगलांतील तळ्यांमध्ये सुसरी व मगरी आहेत. मोठमोठे सरडे व घोरपडी सर्वत्र आढळतात. जंगलांत काही प्रमाणात अजगर, कोबा व व्हायपर इ. सर्प आहेत. देशात चारशेपेक्षा अधिक जातींचे पक्षी आढळत असून त्यांपैकी सु. ४० जातींचे पक्षी येथील जंगलांत दिसून येतात. सभोवतालच्या सागरी प्रदेशात विविध प्रकारचे मासे आढळतात. मानारच्या आखातातून मोती मिळविले जातात. प्राणी व वनसंवर्धनासाठी शासनाकडून कडक उपाययोजना आखल्या जात आहेत.

चौधरी, वसंत

इतिहास : श्रीलंकेमध्ये प्रागितिहास व आद्य इतिहासकालीन खात्रीलायक अवशेष अद्याप ज्ञात झाले नाहीत. परंतु महाकाव्ये (विशेषत: रामायण) आणि बौद्ध वाङ्‌मय यांतून अनेक समाजांची माहिती आली आहे. त्रिकूट (तीन शिखरे) पर्वतावर विश्वकर्म्याने निर्माण केलेली लंका नगरी, कुबेराचे तेथील वास्तव्य आणि रावणाने त्याच्याकडून हिरावून घेतलेली लंकेची सत्ता, त्यानंतरचे राम-रावण युद्ध इ. कथांचा या द्वीपाशी परंपरेने संबंध दर्शविला जातो. या कथांची सविस्तर वर्णने ⇨रामायण या महाकाव्यामध्ये आढळतात. श्रीलंकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपर्यंत मागे जाते. या बेटावरील पहिले ज्ञात वसाहतकार प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड वंशसमूहातील आदिवासी टोळ्या असून त्यांचे दक्षिण भारतातील द्रविडपूर्व पर्वतीय आदिवासींशी साधर्म्य असावे, असे काही मानवशास्त्रज्ञ म्हणतात. पुढे इ. स. पू. पाचव्या शतकात त्यांचे मागे उरलेले काही वंशज हे भारतातून आलेल्या इंडो-आर्यन लोकांत मिसळून गेले आणि त्यांतूनच सिंहली लोकांची संस्कृती विकसित झाली. त्यानंतर इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून इ. स. बाराव्या शतकापर्यंत दक्षिण भारतातून तमिळ लोक श्रीलंकेत येऊन स्थायिक झाले. पुढे एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत त्यांचे प्राबल्य वाढले.

श्रीलंकेची सलग ऐतिहासिक परंपरा बौद्ध वृत्तांतात लिखित स्वरूपात आढळते. ती मुख्यत्वे महावंस आणि चूलवंस यांत असून त्यांत राजकीय घडामोडी आणि बौद्ध धर्माचा प्रसार यांविषयी माहिती आहे. महावंस या बौद्ध गंथातील एका उल्लेखानुसार व परंपरागत कथेनुसार उत्तर भारतातील विजय राजा आपल्या ७०० अनुयायांना घेऊन भारतातून श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील पुट्टलम्जवळ इ. स. पू. पाचव्या शतकात आला. जेव्हा विजयने या बेटावर प्रवेश केला त्यावेळी तेथे यक्षांची वस्ती होती. त्यांचा पराभव करून विजयने त्यांना अंतर्भागात पळवून लावले. त्याने येथील यक्ष राजकन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्यास दोन मुले झाली. पुढे त्याने त्यांना सोडून दिले व पांड्य राजकन्येबरोबर विवाह केला आणि स्वत:स राज्याभिषेक करून काही वर्षे राज्य केले. त्याला वारस नव्हता म्हणून त्याने आपला पुतण्या पांडुवासुदेव यास मदुराई येथून पाचारण केले. तो काही लोकांना घेऊन पूर्व किनाऱ्यावरील गोकण्ण (विद्यमान त्रिंकोमाली) येथे आला. उपतिस्सगम येथे त्यास गादीवर बसविण्यात आले. त्याने विजय राजवंशाची गादी पुढे चालविली. इंडो-आर्यन वसाहतवादयांच्या या पारंपरिक कथांत ऐतिहासिक तथ्यांश असावा, फक्त मूलस्थानाविषयी मतभिन्नता आढळते. श्रीलंकेतील पहिले इंडो-आर्यन लोक भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडून आले असावेत, याविषयी मोठया प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत.

सिंहली परंपरेनुसार श्रीलंकेत प्रथम बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मौर्य समाट अशोक (इ. स. पू. २६९-२३२) याने आपला मुलगा महेंद्र याच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ धाडले. त्यावेळी सिंहली राजा तिस्स याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या शिष्टमंडळाचा मुक्काम महामेघ गावाच्या उद्यानात बांधलेल्या महाविहारात होता. हे श्रीलंकेतील बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र बनले. संघमित्रा या महेंद्रच्या बहिणीने बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेल्या गया येथील बोधिवृक्षाची फांदी सोबत आणली होती. ती शहरात लावली. संघमित्राने बौद्ध भिक्षुणींचा संघ स्थापन केला तर राजाने थूपाराम डागोबा स्थापन केला. त्यानंतर अनेक बौद्धधर्मीय संस्था अस्तित्वात येऊन बौद्ध धर्म हा सिंहलींचा व देशाचा प्रमुख धर्म बनला.

अभिजात काळ (इ. स. पू. २०० ते इ. स. १२००) : बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच अनुराधपुरच्या राज्याचे श्रीलंकेतील अन्यत्र भागावर वर्चस्व प्रस्थापित झाले. या राजकीय केंद्रीकरणास दुत्थगामनी अभय (इ. स. पू. दुसरे शतक) याच्या राजवटीने प्रारंभ झाला. त्याने अनेक स्तूप, राजप्रासाद, कृत्रिम सरोवरे, तलाव बांधले अनुराधपुरचा प्रसिद्ध डागोबा त्याने बांधला. विजय वंशातील राजांनी मध्यंतरीचा अल्पकाळ सोडता इ. स. ६५ पर्यंत सत्ता उपभोगली. त्यानंतर लंबकण्ण घराण्याने सु. चारशे वर्षे राज्य केले. त्यांतील प्रसिद्ध राजा महासेन (कार. सु. २७६-३०३) याने अनेक सिंचनाच्या योजना अंमलात आणल्या आणि बौद्ध धर्मातील काही तांत्रिक संप्रदायांना राजाश्रय दिला. दक्षिण भारतातील पांड्य राजांनी त्याच्यावर आक्रमण करून काही वर्षे (४३२ पर्यंत) त्यावर सत्ता मिळविली आणि या राजवंशाची सत्ता नष्ट केली. पुढे सिंहली राजा धातुसेन (कार. ४६०-४७८) याने पांडयंचा पराभव करून तेथे सिंहली मोरिया राजवंशाची सत्ता प्रस्थापित केली. त्याचा मुलगा पहिला काश्यप (कार. ४७८-४९५) याने राजधानी अनुराधपुराहून सिगिरिया येथील शैल किल्ल्यात हलविली. काश्यपाच्या पदभष्टानंतर राजधानी पुन्हा अनुराधपुर येथे नेण्यात आली.


 इ. स. सातव्या शतकापासून श्रीलंकेच्या राजकीय घडामोडींवर दक्षिण भारतातील सत्तांचा प्रभाव वाढला. तमिळांच्या भाडोत्री सैन्याने राजधानी परिसरातील मानवम्म या सिंहली शाही घराण्यातील एका पळून जाणाऱ्या राजपुत्रास इ. स. ६८४ मध्ये पल्ल्व राजांच्या मदतीने गादीवर बसविले. त्याने लंबकण्ण या दुसऱ्या वंशशाखेची स्थापना करून या घराण्याने सु. ४०० वर्षे अनुराधपुरवर राज्य केले. या घराण्यात अनेक कर्तबगार राजे झाले. त्यांनी सिंहली सत्तेचे दृढीकरण करून राज्यविस्तार केला. या काळात सिंहलींची दक्षिण हिंदुस्थानशी अधिक जवळीक निर्माण झाली. त्यामुळे दक्षिण हिंदुस्थानातील चोल, पल्लव व पांड्य घराण्यांच्या अंतस्थ राजकारणात आणि परस्परांच्या लढायांतही ते ओढले गेले. दक्षिण हिंदुस्थानातून श्रीलंकेवर या घराण्यांची वारंवार आक्रमणे होत. त्याला प्रत्युत्तरही तेथील राजांकडून दिले जाई. दहाव्या शतकात येथील राजेशाही व लष्करी सत्ता दुर्बल झाली आणि प्रादेशिक सत्तांत संघर्ष उद्‌भवला. सिंहलींनी पांड्य सत्तेशी मैत्री केल्यामुळे चोलांनी श्रीलंकेवर हल्ले केले आणि इ. स. ९९३ मध्ये लंकेतील राजरात प्रांत पादाकांत करून तो आपल्या राज्याला जोडला. दक्षिणेकडील रूहुना हा प्रांत इ. स. १०१७ मध्ये हस्तगत करून त्यांचे हे आक्रमण अखेर थांबले. चोलांच्या आधिपत्याखाली श्रीलंका इ. स. १०७० पर्यंत होती. विजयबाहू या राजाने ती स्वतंत्र केली आणि त्याने राजधानी पोलोन्नरूव या संरक्षित स्थळी हलविली. त्या वेळेपासून पोलोन्नरूव काळाला सुरूवात झाली. या स्थळामुळे रूहुनाच्या मार्गावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. या काळातील व एकूण सिंहली इतिहासातील प्रसिद्ध व कर्तृत्ववान राजा म्हणजे पहिला पराकमबाहू (कार. ११५३-८६) होय. त्याच्या कारकीर्दीत राज्यात भरभराट होऊन श्रीलंकेला राजकीय स्थैर्य लाभले. तसेच त्याने कणखर परराष्ट्र धोरण अवलंबून ब्रह्मदेश (म्यान्‌मार) आणि दक्षिण भारतातील पांड्य राज्य यांवर आरमारी स्वाऱ्या केल्या पण त्यात त्याला कायमस्वरूपी विजय प्राप्त झाला नाही. पराकमबाहूनंतर श्रीलंकेची सत्ता त्याच्या सासुरवाडीच्या कलिंग घराण्याच्या आधिपत्याखाली गेली आणि पुन्हा दक्षिण हिंदुस्थानचे वर्चस्व वाढले. या घराण्यातील निस्संकमल्ल (कार. ११८६-११९६) हा राजा पराकमबाहूचा मेहुणा (राणीचा भाऊ) होता. त्याच्या मृत्यूनंतर पोलोन्नरूव राज्य कमकुवत झाले आणि सिंहलींचा प्रभाव कमी होऊन कलिंग व पांड्य वंशाचे प्राबल्य वाढले. पोलोन्नरूव काळातील शेवटचा राजा माघ (कार. १२१४-१२५५) हा दक्षिण हिंदुस्थानातील एक धाडसी व शूरवीर होता. त्याने पारंपरिक अधिसत्तेला न जुमानता कठोरपणे आपले निर्णय जनतेवर लादले. माघानंतर दक्षिण भारतातील राजांची तिथे सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली.

पोलोन्नरूव काळात बौद्ध धर्माचा सर्वत्र प्रसार होऊन तो राजधर्मच झाला. त्यामुळे राजांनी अनेक स्तूप, मठ आणि मंदिरे बांधली. त्यांच्या प्रतिपालासाठी देणग्या दिल्या. तसेच सरदार आणि सामान्य जनतेनेही ह्यास हातभार लावला. राजाला प्रशासकीय व्यवस्थापनात त्याच्या कुटुंबातील मंडळी तसेच सरदार-दरकदार मदत करीत. युवराज म्हणजे भावी वारस. त्याच्याकडे अतिशय महत्त्वाचे व जबाबदारीचे केंद्र देण्यात येई. लष्कर व त्यातही आरमार हे महत्त्वाचे अंग असून सेनापती हा राजाचा प्रमुख सल्लागार-मार्गदर्शक असे. तत्कालीन समाज जातिनिहाय विभागलेला होता. त्या त्या जाती परंपरागत व्यवसाय करीत असत. यांपैकी गोवी म्हणजे शेती करणारा शेतकरी समाज महत्त्वाचा होता. त्यातूनच प्रशासकीय अधिकारी वर्ग निवडला जाई. जे शेती करीत नसत त्यांना हिना म्हणत. त्यांच्याकडे महत्त्वाची खाती नसत. सिंहलींची संस्कृती जलप्रेरित (मुख्यत्वे पाणीसाठा आणि त्याचा उपयोग) यांवर आधारित होती. श्रीलंकेतील सुरूवातीचे इंडो-आर्यन वसाहतकार प्रामुख्याने भातशेती करीत आणि नदीकाठाने राहत असत. पुढे राजेशाही प्रस्थापित झाल्यानंतर शेतीसाठी बंधारे, तलाव यांच्या बांधकामास सुरूवात झाली आणि वसभ राजाच्या कारकीर्दीत (इ. स. ६५-११०) बारमाही वाहणाऱ्या नदयांना बंधारे घालण्यात आले आणि मातीची मोठी धरणे बांधण्यात आली. त्यांचे पाणी कालव्यांनी दूरवर शेतीसाठी नेण्यात आले. राजधानीत भुयारी गटारांव्दारे पाणी आणले होते. या काळातील पाटबंधाऱ्यांच्या तांत्रिक बांधकामात आधुनिकता दृग्गोचर होते. महासेन राजाच्या कारकीर्दीत या शास्त्रात अधिक प्रगती झालेली आढळते. त्याकाळी अनेक धरणे, पाटबंधारे, कालवे आणि कृत्रिम तलाव बांधण्यात आले. त्यांपैकी मिन्नेरिया तलाव आणि त्याला पाणीपुरवठा करणारे कालवे, हे फार उच्च्प्रतीचे कल्पक प्रकल्प होते. एकूण तत्कालीन सर्व राजे शेतीसाठी पाटबंधारे खात्यावर लक्ष केंद्रित करीत असत. त्यामुळे उत्तर श्रीलंका आणि उत्तरमध्य श्रीलंकेतील पठारावर अशा प्रकारचे अनेक कालवे, तलाव आणि पाटबंधारे बांधलेले आढळतात. या सर्वांमध्ये पोलोन्नरूव येथील अत्यंत भव्य आणि मोठा पराक्रम समुद्र हा पराक्रमबाहूच्या कारकीर्दीतील बांधलेला प्रकल्प अद्वितीय होय. ह्या प्रकल्पात सु. ५,००० एकर जमिनीवर पाणी साठविलेले होते आणि त्यामुळे १८,००० एकर जमीन ओलिताखाली आलेली होती. या सर्व प्रकल्पांच्या बांधकामासाठी तत्कालीन राजांनी धान्यकर, पाणीपट्टी आणि व्यापारी कर बसविले होते. त्यांतून महसूल गोळा करण्यात येई व लष्कर आणि आरमाराचा खर्च भागविण्यात येई.


 पोलोन्नरूवावरील मध्यवर्ती नियंत्रण कमी झाल्यानंतर परकीय सत्तेला शह देण्यासाठी किंवा दक्खिणदेश वा मायारट यावर आधिपत्य प्रस्थापित करून सिंहली सत्तेचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न दंबदेणीय राज्याने केला. त्याने पोलोन्नरूवच्या नैऋर्त्येस सु. ११० किमी.वर राजधानी केली. तिसरा विजयबाहू (कार. १२३२-१२३६) आणि त्याचे तीन वंशज यांनी तेथून राज्य केले. त्यांनी प्रसंगोपात्त कलिंगांच्या राजरातमध्ये घुसखोरी केली आणि तमिळ राजांवर यशस्वी स्वाऱ्या केल्या परंतु त्यांना पोलोन्नरूव पादाकांत करता आले नाही. दुसऱ्या पराक्रमबाहूच्या कारकीर्दीत (१२३६-१२७०) दंबदेणीय राज्याने बऱ्यापैकी सत्ता मिळविली. त्यांना पांड्यांच्या सहकार्याने कलिंगांना श्रीलंकेतून हाकलून लावण्यात आणि मलाया-द्वीपकल्पाचा हल्ल परतवून लावण्यात यश आले. पहिला भुवनैकबाहू (कार. १२७२-१२८४) याने राजधानी उत्तरेकडे यापहुवा या एकाकी खडकाळ डोंगरावर हलविली आणि तिला तटबंदी व खंदक खणून सुरक्षित केले मात्र त्याच्या वंशजांनी ती पुन्हा दक्षिणेकडे कुरूनेगल या ठिकाणी नेली व पुढे १३४४ मध्ये मध्यवर्ती पठारी भागात गम्पोला या स्थळी नेली. या सुमारास अलगकोनार नामक बलशाली सिंहली घराण्याने पश्चिम किनाऱ्याजवळ रायिगम येथे सत्ता स्थापन केली. इब्न बतूता याने १३४४ मध्ये श्रीलंकेला भेट दिली, तेव्हा त्याला अलगकोनार घराण्यातील अल्कोनार नावाचा सुलतान राज्य करीत असल्याचे आढळले. चौथ्या पराकमबाहूने (कार. १४१२-१४६७) राजधानी विद्यमान कोलंबोपासून जवळच असलेल्या कोट्टे या ठिकाणी नेली. कोट्टे राज्याने जवळ- जवळ सर्व लंकेवर आधिपत्य प्रस्थापित केले होते. प्रत्यक्षात सिंहली राजांचा अंमल इ. स. १२०० ते १५०५ पर्यंतच्या काळात त्यांच्या राजधानीचा परिसर सोडता अन्यत्र फारसा नव्हता. चौदाव्या शतकात दक्षिण भारतातील आर्य चकवर्ती नावाच्या वंशाने उत्तर श्रीलंकेवर वर्चस्व मिळविले. त्यांनी तमिळ राज्य स्थापन करून राजधानी जाफना द्वीपकल्पातील नल्लूर येथे केली. अल्पावधीतच जाफनापटनम् ह्या राज्याचा दक्षिणेकडे विस्तार झाला आणि त्यांचा सिंहलींबरोबर संघर्ष उद्भवला. त्या सुमारास राजरात हा प्रदेश उभयरोधक (बफर) म्हणूनच अस्तित्वात होता. या काळातील या छोट्या राज्यांच्या राजकीय दुर्बलतेची भुरळ आपातत: परकीय सत्तांना पडली आणि दुसऱ्या पांड्य साम्राज्यातील राजांनी श्रीलंकेवर आक्रमणे करून तेथील राज्यातील परस्परांतील शत्रूत्वाचा फायदा उठविला आणि जबर खंडण्या वसूल केल्या. मलायाच्या चंद्रभानू राजाने १२४७ व १२५८ मध्ये या बेटावर स्वाऱ्या केल्या होत्या. त्यानंतर विजयानगरच्या राजाच्या सैन्यानेही पंधराव्या शतकात आक्रमणे केली. काही काळ जाफनाचे राज्य हे त्यांचे खंडणी देणारे मांडलिक राज्य होते. चिनी मिंग (तिसरा) समाटाच्या चेंग हो या सेनापतीने हिंदी महासागराच्या मोहिमा केल्या. त्याने श्रीलंकेत प्रवेश करून तेथील राजा वीर अलकेश्वर याचा पराभव केला (१४११) आणि राजाला त्याच्या मंत्र्यांसह कैद करून चीनला नेले.

या अस्थिर राजकीय परिस्थितीत शेतीचे फार नुकसान झाले कारण पोलोन्नरूव काळातील राजांनी बांधलेले तलाव, धरणे, पाटबंधारे यांची मोडतोड झाली. तसेच करांपासून मिळणारे उत्पन्न कमी झाले. सिंहली सरदारांची घराणी राजरात प्रदेश सोडून सिंहली नेत्यांनी अन्य प्रदेशात जेथे वास्तव्य केले होते, तिकडे गेली. याचा परिणाम परदेशी व्यापारावरही झाला. उत्तर श्रीलंकेत जाफना राज्यात हिंदू धर्माचे प्रस्थ वाढले. मंदिरे बांधण्यात आली तसेच तमिळ भाषेचा वापर होऊ लागला. उत्तरेकडे तमिळांचा प्रभाव व राज्य आणि दक्षिणेकडे, विशेषत: नैऋर्त्येकडे, सिंहलींचे वर्चस्व अशी श्रीलंकेची विभागणी झाली. जाफना ही तमिळ राज्याची राजधानी तमिळ हिंदू संस्कृतीचे केंद्र बनली. शेती करणारे जमीनदार किंवा वेल्लळ हे तत्कालीन समाजरचनेचे, राजकीय व आर्थिक उलाढालीचे प्रमुख बनले.

पोर्तुगीज सत्तेचा काल ( १५०५ – १६५८) : पोर्तुगीजांचा आरमारी अधिकारी द आल्मेईदा १५०५ मध्ये ससैन्य कोलंबोत शिरला. कोट्टेचा राजा वीर पराकमबाहू याने त्याचे स्वागत केले. त्यानंतर पोर्तुगीजांनी कोट्टेशी संपर्क वाढविला. राजाने त्यांना १५१८ मध्ये किल्ल बांधण्यास परवानगी दिली आणि व्यापारी सवलतीही दिल्या. कोट्टेच्या विजयबाहू ह्या तत्कालीन राजाच्या तीन मुलांनी वडिलांचा खून करून राज्याची तिन्ही भावांत विभागणी केली. ज्येष्ठ मुलाने (भुवनैकबाहू) कोट्टेचे राज्य घेतले आणि उर्वरित मुलांनी अनुकमे सीतावके व रायिगम ही दोन स्वतंत्र राज्ये निर्मिली. सीतावकेचा राजा मायादुन्नी महत्त्वाकांक्षी होता. त्याने राज्यविस्ताराचे धोरण अंगीकारले, तेव्हा कोट्टेच्या राजाने पोर्तुगीजांचे सहकार्य घेतले आणि सीतावकेच्या राजापासून कोट्टेचा बचाव केला. पुढे भुवनैकचा नातू धर्मपाल गादीवर आला. तो पोर्तुगीजांवरच भिस्त ठेवून होता. भुवनैकबाहूने १५४३ मध्येच पोर्तुगीजांशी नातवाच्या संरक्षणार्थ एक करार केला होता आणि त्याबदल्यात पोर्तुगीजांना मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या आणि अन्य हक्कांच्या सवलती दिल्या होत्या. पुढे पोर्तुगीजांनी त्यास ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली, तेव्हा तर तो पूर्णत: त्यांच्या अंकित झाला. पुढे पोर्तुगीजांनी पूर्वाश्रमीचे बहुतेक सर्व कोट्टे राज्याच्या आधिपत्याखालील प्रदेश पादाकांत करून (१५९७) तत्कालीन राजांकडून औपचारिक करारपत्रे करून घेतली.

तत्पूर्वीच त्यांनी जाफना राज्याविरूद्ध १५६० व १५९१ अशा दोन मोहिमा आखल्यापण त्यांना फारसे यश मिळाले नाही.अखेर १६१९ च्या स्वारीत त्यांनी जाफना राज्य जिंकून पोर्तुगीज सत्तेखाली आणले. या सुमारास श्रीलंकेतील मध्यवर्ती उच्च्भूमी आणि पूर्व किनारपट्टी प्रदेश सोडता उर्वरित प्रदेशावर पोर्तुगीजांचे नियंत्रण होते आणि राहिलेला भूप्रदेश पादाकांत करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यातून त्यांनी पूर्वेकडील त्रिंकोमाली व बट्टिकलोआ ही बंदरे काबीज केली. पोर्तुगीजांनी प्रशासकीय स्वरूप पूर्वापार पद्धतीचे ठेवले मात्र व्यवस्थापनासाठी पोर्तुगीज सत्तेखालील श्रीलंकेचे चार प्रांतांत विभाजन केले. त्या प्रत्येकावर एक प्रमुख (दिस्साव) नेमला मात्र स्थानिक उपविभागांवर पोर्तुगीजांशी निष्ठा ठेवणाऱ्या सिंहली सरदारांची नेमणूक केली. ख्रिस्ती मिशनृयांनी आपल्या धर्माचा प्रचार सुरू केला आणि असंख्य हिंदू व बौद्ध लोकांना ख्रिस्ती केले. त्यांनी अनेक चर्चे बांधली. काही मंदिरे व विहार पाडून तेथेच आपली चर्च आणि भुईकोट किल्ले बांधले मात्र त्यांना अखेरपर्यंत कँडी राज्यावर वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. मध्यंतरी त्यांनी १५९४ मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या एका डोना कॅथरिन या सिंहली सरदारिणीस लष्करी सामर्थ्याच्या जोरावर कँडीत गादीवर बसविले. त्यावेळी लोकमत प्रक्षुब्ध झाले. त्याचा फायदा घेऊन विमल धर्मसूर्य या मूळ राजाने गनिमीयुद्धाव्दारे पोर्तुगीजांचा पराभव करून डोना कॅथरिनला पकडले. तिला आपली राणी केले आणि आपली सत्ता दृढमूल केली. पुढे त्यास हे लक्षात आले की, आरमारी सामर्थ्याशिवाय पोर्तुगीजांना श्रीलंकेतून हाकलून देणे शक्य नाही. म्हणून त्याने डचांच्या प्रवेशाची संधी साधून त्यांच्या मदतीने हा प्रयत्न करण्याचे ठरविले. धर्मसूर्याच्या मृत्यूनंतर सेनारत गादीवर आला (१६०४). त्याने डचांच्या लष्कराच्या मदतीच्या अपेक्षेने अनेक व्यापारी करार केले. कालांतराने डचांनी पोर्तुगीजांचा पराभव केला (१६५८) आणि मानार व जाफना ही महत्त्वाची ठाणी काबीज करून श्रीलंकेवर स्वामित्व प्रस्थापित केले. डचांनी १६५८ ते १७९६ असे सु. १३८ वर्षे राज्य केले.


 डचांनी धर्माच्या बाबतीत अधिक कडवे धोरण अंगीकारून हिंदू , बौद्ध, मुस्लिम यांच्याप्रमाणेच रोमन कॅथलिक ख्रिस्ती लोकांना आपापल्या धर्माचे पालन करण्यास बंदी केली व त्यांचा छळ केला. डच ईस्ट इंडिया कंपनीने सुरूवातीस फक्त किनारी प्रदेशावर नियंत्रण ठेवले आणि हळूहळू दक्षिण, नैऋर्त्य आणि पश्चिमेकडील प्रदेश व्यापला. १६६५ मध्ये त्यांनी पूर्व किनारा ताब्यात घेऊन मुख्यत्वे दालचिनीचा सुपीक प्रदेश पादाकांत केला. त्यांचा प्रशासकीय कार्यकारी मुख्य गव्हर्नर कोलंबोत राहत असे. त्याच्या मदतीला उच्च अधिकाऱ्यांचे एक मंडळ असून देशाची कोलंबो, गाल व जाफना अशा तीन प्रशासकीय विभागांत विभागणी केलेली होती. त्यांचेही उपविभाग पाडलेले असत. त्या प्रत्येकावर एक डच अधिकारी असे. डचांनी दालचिनीचा सगळा व्यापार हस्तगत केला. त्यांची न्यायपद्धती अत्यंत संघटित होती. कोलंबो, जाफना आणि गाल यांमध्ये प्रमुख न्यायालये होती. अठराव्या शतकात ‘रोमन-डच लॉ ’ अस्तित्वात आला. अपिलासाठी उच्च न्यायालय कोलंबो येथे होते. स्थानिक दाव्यांच्या संदर्भातील खटले पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत कायद्यानुसार चालत मात्र डच कायद्याचा त्यासाठी काही प्रमाणात आधार घेत असत. १७०७ मध्ये जाफनातील तमिळ कायद्यात काही फेरफार करण्यात आले. डचांनी १७३९ मध्ये कोलंबो येथे एक छापखाना सुरू केला तसेच सिंहली व तमिळ अक्षरांचे छाप तयार केले आणि त्यातून बायबल च्या नव्या कराराचे अनुवाद छापून प्रसिद्ध केले. या काळात कँडीचे मध्यवर्ती राज्य स्वतंत्र होते आणि हिंदू धर्माला पूर्ण स्वातंत्र्य होते. कँडीचा राजा पहिला राजसिंह (कार. १५८२-१५९२) याने शैव धर्माला राजाश्रय दिला आणि बौद्ध भिक्षूंचा छळ केला. कँडीचे मध्यवर्ती राज्य १८ १५ पर्यंत विजयानगरच्या नायक राजांच्या अंमलाखाली स्वतंत्र होते.

इंग्रजी अंमल ( १७९६ – १९४८) : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने त्रिंकोमाली घेतले (१७९५) आणि हळूहळू मानारपर्यंत जाऊन श्रीलंकेच्या किनाऱ्यावरील डचांचे भुईकोट किल्ले काबीज केले. डचांनी प्रारंभी थोडा प्रतिकार केला पण नंतर कोलंबो शहर कंपनीच्या हवाली केले (फेबुवारी १७९६). नंतर हा वासाहतिक प्रदेश १८०२ मध्ये ब्रिटिश शासनाच्या आधिपत्याखाली आला व तेथे गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली. ब्रिटिश या बेटाला सीलोन म्हणत. ब्रिटिशांना आपल्या या नव्या वसाहतीच्या विकासास सुरूवात करताना कँडी राज्याची धास्ती वाटू लागली. कँडी राज्याने परकीयांशी गनिमी काव्याने लढून सु. ३०० वर्षे आपली सत्ता अबाधित ठेवली होती. परंतु १८१५ मध्ये ब्रिटिशांनी शेवटच्या कँडीच्या राजाला पकडून त्याला भारतात पाठविले आणि कँडी राज्य ताब्यात घेतले. १८१७ मध्ये कँडीच्या प्रमुख नेत्यांनी ब्रिटिशांविरूद्ध बंड केले. मात्र ब्रिटिशांनी ते बंड मोडून काढले. १८२३ च्या कोलबुक सुधारणा योजनेनुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत तसेच मुलकी न्यायदान व समाजव्यवस्थेत बरेच बदल घडून आले. ब्रिटिशांनी येथे चहा, कॉफी, नारळ व रबराच्या मळ्यांची विस्तृत प्रमाणावर लागवड केली. त्यासाठी त्यांनी तमिळ मजूर आणले. १८३० पासून कॉफीच्या मळ्यांची लागवड यशस्वी झाल्यामुळे श्रीलंकेच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला, परंतु पुढे कॉफी मळ्यांवर पडलेल्या किडीमुळे मळ्यांचे खूप नुकसान झाले (१८७०). त्यामुळे कॉफीचे मळे काढून तेथे चहाच्या मळ्यांची लागवड करण्यात आली. १८८० च्या दशकात चहाच्या लागवडीला चांगलेच यश आले. मसाल्याचे पदार्थ (विशेषत: दालचिनी), कोको व भात ही उत्पादने पूर्वीप्रमाणेच घेण्याचे चालू ठेवण्यात आले.

ब्रिटिशांनी रस्ते बांधले, उच्च्भूमी प्रदेशातील चहा-कॉफी मळ्यांपर्यंत लोहमार्ग काढले. कृषिविकास घडवून आणला. वेठबिगारी नष्ट केली. शाळा उघडल्या, कायदाविषयक व राजकीय सुधारणा केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा धार्मिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या विकास होऊ लागला. १९१५ च्या सुरूवातीला वसाहतवादाविरूद्ध निदर्शने झाली. त्यामुळे काही नेत्यांना तुरूंगात जावे लागले. १९१९ मध्ये सीलोन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. या काँग्रेसने सिंहली व तमिळ गटांना एकत्र आणले. देशातील जबाबदार मध्यमवर्गीयांनी शासनामध्ये स्थानिक लोकांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली कारण सर्व प्रमुख अधिकारी यूरोपीय होते. शैक्षणिक प्रसाराबरोबर राष्ट्रीयत्वाची भावना जोर धरू लागल्यामुळे ब्रिटिश नाराज होते. १९३१ पर्यंत येथील लोकांना शासनात पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते. १९३१ मधील नवीन संविधानानुसार सार्वत्रिक मताधिकार असणारा हा आशियातील पहिला देश बनला तरीही या संविधानात अनेक असमाधानकारक घटक राहिले होतेच. सॉलबरी कमिशनने स्वयंशासनाची शिफारस केली (१९४५). १९४७ च्या संविधानानुसार येथे प्रातिनिधिक संसदीय शासनपद्धती अंमलात आली. याचवर्षी ब्रिटिशांनी या वसाहतीला अंतर्गत स्वायत्तता दिली व ४ फेबुवारी १९४८ रोजी श्रीलंकेला (सीलोनला) स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्यानंतर युनायटेड नॅशनल पार्टी (यूएन्पी) चे अध्यक्ष डॉन स्टीफन सेनानायके हे श्रीलंकेचे पहिले पंतप्रधान बनले (कार. १९४८-१९५२). सेनानायके यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा डडले सेनानायके हे पंतप्रधानपदावर आले (१९५२-१९५३), परंतु त्यांनी थोड्याच कालावधीत राजीनामा दिला. त्यानंतर याच पक्षाचे सर जॉन कोटलावेला हे पंतप्रधान झाले ( १९५३-१९५६). देशाची संमिश्र लोकसंख्या, वांशिक व धार्मिक विविधता,  सिंहली-तमिळ संघर्ष, भाषिक प्रश्न, कामगार समस्या, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीतील चढउतार, कम्युनिस्ट-प्रभाव, राजकीय अस्थिरता या श्रीलंकेतील स्वातंत्र्यानंतरच्या गंभीर समस्या होत्या. १९५६ पर्यंत यूएन्पी पक्षाची सत्ता राहिली. १९५६ मध्ये प्रामुख्याने सिंहली व बौद्धांचे वर्चस्व असलेल्या श्रीलंका फीडम पार्टी (एस्एल्एफ्‌पी) ने सॉलोमन बंदरनायके यांच्या नेतृत्वाखाली इतर लोकशाहीवादी पक्षांशी युती करून यूएन्‌पीचा पराभव केला आणि सॉलोमन बंदरनायके पंतप्रधान झाले (१९५६-१९५९).  १९५८ च्या सुरूवातीसच नवीन शासनाने इंग्रजीच्या जागी सिंहली ही एकच अधिकृत भाषा करून बौद्ध धर्मियांना पाठिंबा जाहीर केला. तमिळांना अचानक मिळालेल्या या धक्क्यामुळे तमिळ डिवचले गेले. सप्टेंबर १९५९ मध्ये बंदरनायके यांचा खून झाला. त्यानंतर अल्पकालीन दोन पंतप्रधानांच्या नियुक्तीनंतर जुलै १९६० मध्ये बंदरनायके यांची पत्नी सिरिमाओ बंदरनायके पंतप्रधान झाल्या. जगातील ही पहिली महिला पंतप्रधान होय. १९६० ते ६५ तसेच १९७०-१९७७ व १९९४-२००० या कालावधीत त्यांनी पंतप्रधानपद भूषविले. सिरिमाओ बंदरनायके यांनी अर्थव्यवस्था बरीच काबूत आणली. त्यांनीही सिंहली  बौद्ध यांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला उत्तेजन देणे चालूच ठेवले. ख्रिश्चन शाळांचे राष्ट्रीयीकरण करून त्यांचे शत्रूत्व ओढवून घेतले. एस्एल्एफ्‌पीच्या धोरणांना तमिळांनी तीव्र विरोध केला. १९६४-६५ मध्ये आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे १९६५ मध्ये बंदरनायके शासन कोसळले. त्यानंतर डडले सेनानायके यांच्या यूएन्‌पी पक्षाने प्रमुख तमिळ पक्षांशी युती करून पुन्हा सत्ता हस्तगत केली. १९७० च्या निवडणुकीत एस्एल्एफ्‌पीने वेगवेगळ्या मार्क्सवादी पक्षांशी युती करून पुन्हा निसटता विजय मिळविला. सिरिमाओ बंदरनायके यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीने १९७२ मध्ये प्रजासत्ताक पद्धतीचे संविधान स्वीकारले. २२ मे १९७२ रोजी देशाचे ‘ रिपब्लिक ऑफ श्रीलंका ’ असे नामांतर करण्यात आले. या संविधानानुसार पूर्वीप्रमाणेच कार्यकारी अधिकार पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे ठेवण्यात आले. परंतु संसदेला कायदे करण्याचे असलेले अधिकार काढून घेतले गेले. बंदरनायके शासनाने विदेशी मालकीच्या चहा व रबराच्या मळ्यांचे व व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून कारखाने आणि व्यापारातील शासनाची मालकी वाढविली (१९७५). त्यांची सत्ता स्वामित्वप्रधान बनली. लोकप्रिय कल्याणकारी योजना बारगळल्याने अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. त्यामुळे असंतुष्ट व्यक्ती व पूर्वीच्या युतीतील गट यांना शासनविरोधात आयते भांडवल मिळाले. परिणामत: संयुक्त आघाडीचे शासन कोसळले व एस्एल्एफ्‌पीला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले. यूएन्पी पक्षाने ज्युनिअस आर्. जयवर्धने यांच्या नेतृत्वाखाली जुलै १९७७ मध्ये पुन्हा सत्ता मिळविली. तमिळ युनायटेड लिबरेशन फंट (टीयूएल्एफ्) हा संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला. टीयूएल्एफ्‌ने श्रीलंकेच्या उत्तर व पूर्व भागात ‘ तमिळ ईलम ’ या स्वतंत्र, स्वायत्त व स्वयंनिर्णयाचा हक्क असलेल्या राज्याची मागणी केली. जयवर्धने शासनाने १९७८ मध्ये देशात अध्यक्षीय शासनपद्धती असलेले नवीन संविधान स्वीकारले. देशाचे पुन्हा ‘डेमोक्रॅटिक सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंका ’ असे नामांतर करण्यात आले (सप्टेंबर १९७८). पंतप्रधान व यूएन्पीचे नेते जे. आर्. जयवर्धने हे श्रीलंकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. बंदरनायके यांच्या काळात हिरावून घेतले गेलेले लोकशाही अधिकार जयवर्धने शासनाने जनतेला पुन्हा मिळवून दिले. तसेच पहिल्यांदा सर्व तमिळांना संपूर्ण नागरिकत्व दिले. तमिळ भाषेला राष्ट्रीय दर्जा दिला परंतु सिंहली हीच अधिकृत भाषा ठेवली. यूएन्‌पीने ढासळती अर्थव्यवस्था सावरली. एकीकडे वेगाने आर्थिक विकास घडून येत असतानाच देशांतर्गत बंडखोरीही वाढत राहिली.


 ब्रिटिशांनी श्रीलंकेत मळ्याच्या शेतीची लागवड सुरू केल्यानंतर त्यात काम करण्यासाठी असंख्य तमिळ लोकांना कामगार म्हणून श्रीलंकेत नेले होते. त्यांच्या पिढ्यान् पिढ्या तेथे राहिलेल्या आहेत. तरीही त्यांना त्या देशाचे नागरिकत्व दिले गेले नव्हते. त्यामुळे सिंहली-तमिळ असा वांशिक संघर्ष सुरू झाला. स्वातंत्र्योत्तर काळात तर हा संघर्ष म्हणजे देशाची प्रमुख समस्या बनली. १९६४ मध्ये झालेल्या एका करारानुसार भारताने श्रीलंकेतील जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिक तमिळांना (सु. ५,००,०००) स्वीकारण्याचे मान्य केले होते. वंशवादाचा प्रश्न अनेक वर्षे अनिर्णित राहिल्याने विभक्तवादी तमिळ अधिक आक्रमक बनले. १९८१ मध्ये या वंशवादाने पुन्हा अचानक उग स्वरूप धारण केले. १९८३ नंतर लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमसारखे (एल्‌टीटीई) जहालमतवादी गट अधिक सकिय व प्रबळ बनले. १९८३ मध्ये तमिळ युनायटेड लिबरेशन फंट (टीयूएल्एफ्) च्या संसद सदस्यांनी संसदेत तमिळ बहुसंख्य असलेल्या बेटाच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील भूप्रदेशांत स्वतंत्र तमिळ राज्याची मागणी केली परंतु ती मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे तमिळ नेत्यांनी संसद सदस्यत्वाचे राजीनामे दिले. तमिळ दहशतवादयांनी लष्करी उठावास सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी दहशतवादी व गनिमी युद्धतंत्राचा मार्ग अवलंबिला. बदल्यात श्रीलंकेच्या लष्कराने दहशतवादयांना पाठिंबा देत असल्याचा संशय घेऊन तमिळ नागरिकांविरूद्ध कारवाई सुरू केली. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. त्यातूनच यादवी युद्ध भडकले. १९८६ मध्ये भारत व श्रीलंका या दोन्ही देशांनी मिळून १९६४ च्या कराराची अंमलबजावणी करण्याचे ठरविले. त्यानुसार सु. ५,००,००० अनिवासी भारतीय तमिळांना भारताचे नागरिक म्हणून तर सु. ६,००,००० श्रीलंकेचे देशबांधव म्हणून स्वीकारण्याचे ठरविले. श्रीलंकेतील वंशवाद संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राष्ट्राध्यक्ष जयवर्धने व भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यात वाटाघाटी होऊन शेवटी तडजोड म्हणून २९ जुलै १९८७ रोजी एक करार झाला. त्यात श्रीलंकेतील तमिळ बहुसंख्य असलेल्या प्रदेशाला अधिक राजकीय स्वायत्तता देण्याच्या व तमिळ भाषेला देशाची एक अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याच्या अटींचा समावेश होता. त्याशिवाय युद्धविराम, गनिमी सैन्याने आपली शस्त्रे खाली ठेवणे, राजकीय गुन्हेगारांना सरसकट माफी देणे आणि याच्या अंमलबजावणीसाठी श्रीलंकेने मागणी केल्यास भारतीय लष्कराच्या मदतीची हमी देणे, या अटींचा त्या करारात समावेश होता. परंतु हा करार तमिळ योद्घ्यांनी व सिंहली राष्ट्रवादयांनी फेटाळला. करारातील तरतुदींनुसार भारतीय शांती सेना (आय्‌पीकेएफ्) श्रीलंकेकडे पाठविल्या गेल्या. त्यामुळे कोधभावना कमालीची वाढून या ऐतिहासिक कराराच्या संपूर्ण अंमलबजावणीची फार मोठी साशंकता निर्माण झाली. दीर्घकाळपर्यंतच्या रक्तरंजित युद्धानंतर २० सप्टेंबर १९८९ पासून आय्‌पीकेएफ्‌ने आपल्या फौजा काढून घेण्यास सुरूवात केली. १ १ जानेवारी १९८९ रोजी देशातील आणीबाणी संपुष्टात आली. परंतु हिंसाचार चालूच राहिला.

राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदासा यांचा १ मे १९९३ रोजी खून झाला. १९ ऑगस्ट १९९४ रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे चंद्रिका कुमारतुंगा यांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीव्दारे चंद्रिका कुमारतुंगा ह्या राष्ट्राध्यक्ष बनल्या, तर त्यांची आई सिरिमाओ बंदरनायके पंतप्रधानपदी आल्या ( १९९४-२०००). ३ जानेवारी १९९५ रोजी युद्धविराम करारावर सह्या झाल्या. परंतु एप्रिलमध्ये पुन्हा लढाईचा भडका उडाला. डिसेंबर १९९५ मध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमचा बालेकिल्ला असलेल्या बेटाच्या उत्तरेकडील जाफना प्रदेशाचा ताबा श्रीलंकेच्या लष्करी फौजांनी घेतला. १९९७ च्या मध्यात हा प्रदेश शासनाच्या ताब्यात आला. एप्रिल २००० मध्ये जाफना व उर्वरित श्रीलंका यांना जोडणाऱ्या ‘ एलिफंट पास ’ या संयोगभूमीवर तमिळ टायगरांनी लष्करी फौजांना आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे तमिळ टायगर जाफना द्वीपकल्पाचा पुन्हा ताबा घेतात की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. तमिळ टायगर बंडखोरांनी आपल्या स्वतंत्र मातृभूमीच्या प्राप्तीसाठी सुरू केलेल्या लढाईत इ. स. २००० पर्यंत सु. ६ १,००० लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. अजूनही तमिळांचा हा प्रश्न अनिर्णितच राहिला आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड प्रत्यक्ष मतदानाने ६ वर्षांसाठी होते. संसद एकगृही आहे. संसदेत २२५ सदस्य असतात. त्यांपैकी १९६ सदस्य निर्वाचित व २९ सदस्य राष्ट्रीय यादीतून निवडलेले असतात. सार्वत्रिक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडणूक होते. १८ वर्षे वयावरील व्यक्तींना सार्वत्रिक मताधिकार आहे. संसदेची मुदत ६ वर्षांची असते. पंतप्रधान व इतर मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. पंतप्रधान व मंत्र्यांची निवड राष्ट्राध्यक्ष करतात. डिसेंबर १९९९मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. चंद्रिका कुमारतुंगा या ५ १. १% मताने दुसऱ्यांदा निवडून आल्या. संसदेची निवडणूक ऑक्टोबर २००० मध्ये झाली. येथील न्यायदान-विषयक कायदे रोमन  डच, ब्रिटिश, तेसावालामाई, इस्लामी व कँडियन पद्धतीचे आहेत. सुप्रिम कोर्ट व कोर्ट ऑफ अपिल ही सर्वोच्च न्यायालये आहेत. देशातील भूदलात १,१८,००० नौदलात २०,६०० व हवाई दलात १९,३०० सैनिक होते (२००२). त्रिंकोमाली येथे प्रमुख नाविक तळ आहे.


 आर्थिक स्थिती : श्रीलंका हा एक कृषिप्रधान देश असून छोटे निर्मिती व्यवसाय व सेवाव्यवसाय हे अर्थव्यवस्थेचे इतर प्रमुख आधार आहेत. एकूण कामकरी लोकसंख्येपैकी ३३.८५% कृषी, वनविदया व मासेमारी व्यवसायांत १६.४२% निर्मिती व्यवसायात व १२.३ १% लोक व्यापार उदयोगांत गुंतले होते (२००३). एकूण भूक्षेत्रापैकी सु. एक-तृतीयांश क्षेत्र लागवडी योग्य आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात कृषिउत्पादनांचा वाटा सु. एकतृतीयांश आहे. देशाच्या एकूण निर्यातीपैकी ९०% निर्यात कृषी उत्पादनांची असते. जलसिंचनासाठी मोठमोठे तलाव व कालवे काढण्याची श्रीलंकेची एक हजार वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे. महावेली गंगा जलसिंचन प्रकल्पामुळे एकूण ३,५४,००० हे. क्षेत्र जलसिंचनाखाली आले आहे (२००१).

श्रीलंकेची अर्थव्यवस्था प्रामुख्याने चहा, रबर व नारळ या तीन प्रमुख कृषिउत्पादनांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण निर्यात किंमतीपैकी निम्मी या तीन पिकांची असते तसेच देशातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी सु. तीनचतुर्थांश जमीन या तीन पिकांखाली आहे. मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशात चहाचे मळे आहेत, तर सखल प्रदेशातून रबर व नारळाचे उत्पादन घेतले जाते. एकूण कामकरी लोकसंख्येपैकी सु. एकचतुर्थांश मनुष्यबळ या तीन पिकांच्या उत्पादनात व वितरणात गुंतले आहे परंतु १९५० च्या दशकापासून या उत्पादनांच्या किंमतीत सतत चढउतार होत गेल्याने देशाला मोठया अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चहा उत्पादनोत श्रीलंकेचा भारत व चीन खालोखाल तिसरा कमांक लागतो. श्रीलंकेचे चहाचे उत्पादन ३,०८,००० मे.टन होते (२००४).सुमारे ४,००,०००हे. क्षेत्रावर रबराची लागवड असून याच वर्षी देशाच्या एकूण निर्यात उत्पन्नापैकी सु. १२.८% उत्पन्न रबराच्या निर्यातीपासून मिळाले होते. नारळाच्या बागा सर्वत्र असून दोनपंचमांश  नारळ-उत्पादन स्थानिक उपयोगासाठी वापरले जाते. नारळाच्या झाडांपासून विविध उत्पादने घेतली जातात. त्यांपैकी खोबरे व खोबरेलतेल यांची निर्यात केली जाते.

तांदूळ हे प्रमुख अन्नधान्याचे पीक आहे. तांदूळ उत्पादनात हा देश जवळजवळ स्वयंपूर्ण बनला आहे. याशिवाय कसाव्हा, रताळी, मका, सोयाबीन, तंबाखू , मिरची, कांदा, उष्ण कटिबंधीय फळे, कोको, कॉफी ही इतर कृषिउत्पादने आहेत. वेलदोडे, तमाल, दालचिनी, लवंग, आले, जायफळ, मिरी इ. मसाल्याच्या पदार्थांच्या पिकांखाली अल्प क्षेत्र असले तरी ही उत्पादनेही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. कोको, कॉफी, तंबाखू व मसाल्याचे पदार्थ ही निर्यातीसाठी तर तांदूळ, फळे व भाजीपाला ही उत्पादने स्थानिक उपभोगासाठी घेतली जातात. श्रीलंकेची २००४ मधील प्रमुख कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे होती : (उत्पादन १,००० मे. टनांत). भात २,६२८ नारळ १,९५० ऊस ९९० केळी ६०० चहा ३०८ कसाव्हा २२ १ रबर ९९ आंबे ९२ याच वर्षी पशुधन पुढीलप्रमाणे होते : गुरे १ १,६ १,००० डुकरे ७९,००० म्हशी व रेडे ३,०२,००० शेळ्या ४,०५,००० कोंबड्या १ १० लक्ष. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३०% क्षेत्र अरण्यांखाली होते (२०००). तरीही आर्थिकदृष्ट्या लाकूड उत्पादन विशेष महत्त्वाचे नाही. देशाचा मासेमारी व्यवसाय वाढत आहे. २००३ मध्ये सु. २,७९, १०० मे. टन मासे पकडण्यात आले. त्यांपैकी ८९% सागरी होते. किनारी भागात मॅकरेल, बोनिटो, सी पर्च या जातींचे मासे पकडले जातात. खारकच्छांतून क्रेफिश, लॉबस्टर, कोळंबी व खेकडे पकडले जातात.

ग्रॅफाइट व विविध प्रकारचे मौल्यवान खडे (दगड) वगळता अन्य खनिजसंपत्ती विशेष आढळत नाही. एकेकाळी श्रीलंका उच्च प्रतीच्या अस्फटिकी ग्रॅफाइट उत्पादनात जगात अगेसर होता ( १९७०). परंतु मागणी कमी झाल्यामुळे त्याचे निर्यातीसाठीचे उत्पादन पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. देशाच्या एकूण निर्यात मूल्यापैकी सु. ३% निर्यातमूल्य मौल्यवान खड्यांचे असते. मौल्यवान खड्यांमध्ये इंद्रनील मणी, ॲक्वामरीन, माणिक, किसोबेरील यांचा तर निम मौल्यवान खड्यांमध्ये पुष्कराज, स्पिनेल, गार्नेट, झिर्कॉन, टूर्मलीन, चंद्रकांत या खड्यांचा समावेश होतो. मौल्यवान खडयंचे उत्पादन प्रामुख्याने नैऋर्त्य भागातील रत्नपूर शहराजवळच्या प्रदेशातून होते. अभक, खनिजवाळू , मृद्खनिज, चुनखडी तसेच पुळण प्रदेशातून रेतीचे उत्पादन घेतले जाते. लोहखनिजाचे साठे मर्यादित, हलक्या प्रतीचे व विखुरलेले आहेत. त्यामुळे व्यापारीदृष्ट्या उत्पादन महत्त्वाचे नाही. देशातील काही प्रमुख खनिजांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले : (उत्पादन टनांत). गॅफाइट ४,८९५ (२०० १) इल्मेनाइट ३४, ११८ रूटाइल १,९३० ( १९९८). मीठनिर्मिती हा जुनाच उदयोग असून २००१ मध्ये १,३०,२७२ टन मिठाचे उत्पादन झाले. देशाच्या दक्षिण भागातील हंबंटोटा येथील खनिज तेल शुद्धीकरण कारखाना १९९९ मध्ये सुरू झाला आहे.

यंत्रसामगीच्या खरेदीसाठी भांडवलाचा तुटवडा, मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्ती व खाजगी परकीय गुंतवणूकदारांना दूर ठेवणारे शासकीय धोरण, हे देशाच्या औदयोगिक विकासातील प्रमुख अडथळे ठरले आहेत. १९७१ पासून अनेक उदयोगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व जपान यांच्या महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीने श्रीलंका आपला आर्थिक विकास घडवून आणत आहे. याशिवाय नेदर्लंड्स, जर्मनी व चीन हे देशही श्रीलंकेला मोठया प्रमाणावर मदत पुरवितात. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी सु. एकपंचमांश उत्पादन कारखानदारी व्यवसायातून मिळते. एकूण कामकरी लोकांपैकी सु. एकदशांश लोक कारखानदारी व्यवसायात गुंतले आहेत. चहा, रबर, नारळ, तंबाखू या कृषिउत्पादनांवरील प्रकिया उदयोग महत्त्वाचे आहेत. वस्त्रोद्योग, चामडी वस्तू , मृत्तिकाशिल्प, वनस्पती तेले, खते, रसायने, कागद, प्लास्टिक, सिमेंट, प्लायवुड, रबरी वस्तू , खनिज तेल शुद्घीकरण, पोलाद लाटण, यांत्रिक हत्यारे, लोखंडी सामान निर्मिती हे महत्त्वाचे उदयोग आहेत. सामान्यपणे अवजड उदयोग शासकीय मालकीचे, तर छोटे उदयोग खाजगी मालकीचे आहेत. विदेशी खाजगी उद्योजकांना आकर्षित करून घेण्यासाठी शासनाने कोलंबोजवळ गुंतवणूक संस्थापना क्षेत्र (इन्‌व्हेस्मेंट प्रमोशन झोन) स्थापन केले आहे. या क्षेत्रातील गुंतवणूकदार कापड, इलेक्ट्रॉनिकी साहित्य यांचे उत्पादन घेण्यासाठी त्यांच्या निर्मिती व जुळणीसाठी आवश्यक साहित्य व कच्चा माल कोणत्याही जकातीशिवाय (शुल्क) आयात करू शकतात. कुटिरोद्योगांतून मृत्पात्री, खेळणी व दोर ही उत्पादने घेतली जातात. देशातील एकूण कामगार संख्या ७६,५३,७१६ होती. त्यांपैकी ६७% पुरूष कामगार होते. बेरोजगारीचे प्रमाण ८.४% होते (२००३).


 स्वातंत्र्योत्तर काळात महावेली गंगा विकास कार्यकम हाती घेण्यात आला. या कार्यकमांतर्गत महावेली गंगा नदीवरील पाच बहुउद्देशीय धरण योजना हाती घेण्यात आल्या. त्यांमुळे जलविद्युत्‌शक्तीत वाढ होऊन जलसिंचनाखालील क्षेत्रातही वाढ झाली. देशातील विजेच्या एकूण उत्पादनापैकी ९५% जलविद्युत्शक्ती आहे. कोलंबोपासून आग्नेयीस ७० किमी. अंतरावर कुकूली गंगा नदीवर ८० मेवॉ. जलविद्युत् निर्माण क्षमता असलेले वीज केंद्र स्वीस-जर्मनी यांच्या मदतीने उभारण्यात येत आहे. देशात विजेचा दरडोई वापर ३५४ किवॉ. तास होता (२०००).

श्रीलंकेच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील सर्वाधिक हिस्सा सेवा व्यवसायांचा असतो. १९७९ पासून विदेशी बँकांना आपल्या शाखा श्रीलंकेत स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली. सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका ही मध्यवर्ती बँक असून दोन राज्य व्यापारी बँका, बँक ऑफ सीलोन व पीपल्स बँक या प्रमुख आहेत. यांशिवाय खाजगी व विदेशी बँकाही आहेत. कोलंबो येथे शेअरबाजार आहे. श्रीलंकन रूपया हे श्रीलंकेचे अधिकृत चलन असून १०० सेंटचा १ श्रीलंकन रूपया होतो. १ अमेरिकी डॉलर = १०२.१२ श्रीलंकन रूपये असा विनिमय दर होता (२००५). देशात मेट्रिक मापनपद्धती प्रचलित आहे.

श्रीलंकेने भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेला आहे (डिसेंबर १९९८). श्रीलंकेची एकूण आयात ६०,०४८ लक्ष डॉलर किंमतीची व निर्यात ५१,३३२ लक्ष डॉलर किंमतीची होती (२००३). चहा, रबर, रबरी उत्पादने, खोबरे, खोबरेल तेल, मसाल्याचे पदार्थ, कापड, तयार कपडे, विविध मौल्यवान खडे, दागदागिने, खनिज तेल उत्पादने यांची निर्यात तर खनिज तेल, यंत्रसामगी, वाहने, गहू , साखर यांची आयात केली जाते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, जपान, जर्मनी, बेल्जियम-लक्सेंबर्ग या देशांशी निर्यात व्यापार तर भारत, जपान, हाँगकाँग, सौदी अरेबिया, ग्रेट ब्रिटन, कोरिया व सिंगापूर यांच्याशी आयात व्यापार चालतो. विदेशात नोकरी-धंदा करणाऱ्या श्रीलंकन नागरिकांकडून बरेच विदेशी चलन प्राप्त होते.

वाहतूक व दळणवळण : देशातील भूमार्ग वाहतूक सुव्यवस्थित आहे. अगदी एकाकी खेडयपर्यंतही रस्ते काढण्यात आले आहेत. देशात एकूण ७४,८२८ किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी ११,४६२ किमी. लांबीचे राष्ट्रीय मार्ग होते (२००० अंदाज). लोहमार्ग वाहतूक शासनाच्या अधि-कारात असून त्याव्दारे अंतर्गत प्रदेश किनारी प्रदेशातील बंदरांशी जोडलेले आहेत. लोहमार्गांची लांबी १,४४९ किमी. होती (२००३). कोलंबो (बंदरनायके) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कोलंबो हे एक आशियातील प्रसिद्ध आधुनिक सागरी बंदर तसेच जगातील मोठया कृत्रिम बंदरांपैकी एक आहे. इंधन भरण्यासाठी तसेच दुरूस्तीसाठी व्यापारी जहाजे येथे थांबतात. देशाचा सु. ८०% सागरी व्यापार या बंदरातून चालतो. गाल हे दुसरे प्रमुख नैसर्गिक बंदर आहे. पूर्व किनाऱ्यावरील कोड्डियार उपसागरावरील त्रिंकोमाली हे एकमेव मोठे नैसर्गिक बंदर आहे. देशात ४,६८० डाकगृहे होती (२००३). याशिवाय १८,१४,७०० दूरध्वनी संच ९,३१,६०० भ्रमणध्वनी यंत्रधारक २,००,००० महाजालक वापरणारे तसेच २४,००० फॅक्स यंत्रे होती (२००२). सिंहली, तमिळ व इंग्रजी भाषांतून वृत्तपत्रे काढली जातात. श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनद्वारा राष्ट्रीय व्यापारविषयक व शैक्षणिक सेवा पुरविल्या जातात.

लोक व समाजजीवन : श्रीलंकेची १९५० नंतर लोकसंख्या वेगाने वाढू लागली. वाढत्या लोकसंख्येमुळे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागल्याने १९७० च्या दशकात शासनाने प्रसूतिमान कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्या. २००३ मध्ये हजारी जन्मदर १८.९, मृत्युदर ५.९ व बालमृत्युमान १६.५ होते. याच वर्षी सरासरी आयुर्मान पुरूषांच्या बाबतीत ६८ व स्त्रियांच्या बाबतीत ७५ वर्षे होते. आरोग्यसुविधा वाढविण्याचा, विशेषत: प्रसूतिकाळातील मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. लोकसंख्येची घनता दर चौ.किमी.ला २९३.८ होती (२००३).

सिंहली हा श्रीलंकेतील प्रभावी व प्रमुख वांशिक गट आहे. एकूण लोकसंख्येत ७४% सिंहली व १८% तमिळ होते (१९९८). बहुसंख्य सिंहली हीनयान बौद्ध धर्मीय तर तमिळ हिंदू धर्मीय आहेत. देशातील १८ जिल्ह्यांत ७६.७% लोक बौद्ध, ७.९% हिंदू , ८.५% मुस्लिम व ६.९% ख्रिश्चन धर्मीय होते (२००१). सिंहली लोक स्वत:ला श्रीलंकेतील मूळ रहिवासी समजतात. उत्तरेकडील शुष्क जाफना प्रदेश व पूर्व किनाऱ्यावरील काही भाग वगळता, सर्वत्र सिंहलींची वस्ती आहे. त्यांची भाषा सिंहली असून ती इंडो-यूरोपियन गटातील आहे.

तमिळांचे भारतीय तमिळ व श्रीलंकन तमिळ असे दोन स्वतंत्र गट आहेत. त्यांपैकी छोटा गट भारतीय तमिळांचा असून ते प्रामुख्याने कामगार आहेत. त्यांचे पूर्वज १८३० नंतर दक्षिण भारतातून येथे आले आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांतील बरेचसे भारतात परतले. उरलेले बहुसंख्य निरक्षर व असुरक्षित अल्पसंख्य आहेत. ते मळ्याच्या शेतीत काबाडकष्ट करत असतात. श्रीलंकन तमिळ लोकांची वस्ती बेटाच्या उत्तर व पूर्व भागांत केंद्रित झाली आहे. त्यांच्या पूर्वजांनी अगदी सुरूवातीच्या काळात या प्रदेशावर स्वारी केली होती. काही शतके ते सिंहली लोकांशीही लढले. परंतु पंधराव्या व सोळाव्या शतकांनंतर ते १९५८ पर्यंत सिंहलींशी कमी-अधिक प्रमाणात सलोख्याचे व शांततेचे संबंध ठेवून राहिले. १९५८ पासून मात्र प्रबळ सिंहली लोकांकडून तमिळ लोकांना सापत्नभावाची वागणूक मिळू लागल्याने तमिळ-सिंहली संघर्ष तीव बनला. तमिळ लोक द्राविडी भाषा बोलतात. सिंहली भाषेपेक्षा या भाषेची मुळाक्षरे, शब्दसंग्रह व व्याकरण वेगळे आहे. श्रीलंकन तमिळ प्रामुख्याने धंद्यांमध्ये आणि व्यवसायांमध्ये गुंतले आहेत.

श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येपैकी सु. ७% मूर (इतर मुस्लिम धरून) आहेत. इ. स. आठव्या शतकापासून पुढे सु. ८०० वर्षांपर्यंत मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी आलेल्या अरब व्यापाऱ्यांचे हे वंशज आहेत. त्यांनी स्थानिक स्त्रियांशी विवाह केले व त्यातूनच ही मुस्लिम लोकसंख्या निर्माण झाली. हे लोक पूर्व किनाऱ्यावर केंद्रित झाले असून त्यांतील बरेच लोक तेथील शहरांत व्यापारी आहेत. ते सिंहली प्रदेशात असले, तरी तमिळ भाषा बोलतात व मुस्लिम रीतिरिवाज पाळतात. इतर मुस्लिमांमध्ये मलायी, अफगाण, बलुची व पाकिस्तानी आहेत. बर्गर लोकांची संख्या ०.६% असून डच ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी असलेल्या डच व इतर यूरोपीयांचे ते वंशज आहेत. त्यांनीही सिंहली स्त्रियांशी विवाह केले. सांस्कृतिकदृष्ट्या बर्गर स्वत:ला यूरोपीय समजतात, इंग्रजी भाषा बोलतात व पाश्चिमात्य पद्धतीचा पेहराव करतात. इतर वांशिक गटांपासून ते अलिप्त राहतात. वेद्दा हे येथील मूळ रहिवासी आहेत. जे काही वेद्दा उरले आहेत, ते श्रीलंकेच्या पूर्व भागातील जंगलांत आढळतात. ते जडप्राणवादी आहेत. इतर अल्पसंख्याकांमध्ये यूरोपीय, भारतीय (गोवेकर, पारशी, तेलुगू), काही चिनी यांचा समावेश होतो.


 सिंहली व तमिळ यांच्यातील वेगळेपणा ओळखणे अवघड असते. एकमेकांत असलेल्या वैवाहिक संबंधांतून त्यांची निर्मिती झाली आहे. नावांवरून मात्र ह्या दोन गटांचे वेगळेपण ओळखता येते. अनेक सिंहली नावे पोर्तुगीज पद्धतीची आहेत. कँडियनांचे मात्र वेगळे अस्तित्व जाणवते. बहुसंख्य सिंहली व अल्पसंख्य तमिळ यांच्यातील तणावपूर्ण संबंध ही देशातील प्रमुख समस्या आहे. तमिळांना देशात दुय्यम स्थान दिले गेले आहे. १९८० च्या दशकाच्या मध्यापासून १९९७ पर्यंत सु. ३ लक्ष तमिळ लोकांनी श्रीलंकेतून स्थलांतर केले आहे. त्यांपैकी एक तृतीयांश निर्वासित म्हणून भारतात आले व दोन तृतीयांश लोकांनी पश्चिमेकडे राजकीय आश्रय घेतला.

सिंहली व तमिळ ह्या येथील अधिकृत भाषा आहेत. इंग्रजी भाषाही येथे बोलली जाते. ब्रिटिशांनी येथील शिक्षणाचा पाया घातला. चांगल्या शाळा व अनुकूल राष्ट्रीय धोरण यांमुळे जगातील उच्च साक्षरता प्रमाण असणाऱ्या विकसनशील देशांपैकी श्रीलंका हा एक देश आहे. साक्षरतेचे सरासरी प्रमाण ९१.९% असून ते पुरूषांमध्ये ९४.५% व स्त्रियांमध्ये ८९.३% होते (२००१). शिक्षणव्यवस्था ब्रिटिश पद्धतीची आहे. ५ ते १४ वयोगटातील सर्वांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. १९९५ मध्ये देशातील ९,६५७ प्राथमिक शाळांत ७०,५३७ शिक्षक, १९ लक्ष विदयार्थी होते. माध्यमिक विदयालयांत १,०३,५७२ शिक्षक व २३ लक्ष विदयार्थी तर उच्च शिक्षण विभागात २,६३६ शिक्षक व ६३,३६० विदयार्थी होते. त्याच वर्षी देशात ९ विदयापीठे, १ मुक्त विदयापीठ आणि १ बौद्ध व पाली विदयापीठ होते.

श्रीलंकेच्या समाजकल्याण कार्यकमांतर्गत बेरोजगार, वृद्ध, अपंग इत्यादींना आर्थिक मदत दिली जाते. शासकीय रूग्णालयांतील आरोग्यसुविधा मोफत आहे. क्षयरोग, मलेरिया, हत्तीरोग यांच्या समस्या गंभीर आहेत. अपपोषण मोठया प्रमाणावर आहे. समाजसेवा विभागामार्फत क्षयरोग, कुष्ठरोग व कर्करोग पीडितांना आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते. पूर, अवर्षण व चकिवादळे इ. नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांनाही मदत मिळते. शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंगांना व इतर गरजू व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे मदत देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. २००२ साली देशात ५७६ रूग्णालये व ४११ केंद्रीय दवाखाने तसेच रूग्णालयांतील खाटांची संख्या ५९,१४४ होती.

श्रीलंकेचा सांस्कृतिक वारसा समृद्ध व फार जुना म्हणजे क्रिस्तपूर्व सु. तिसऱ्या शतकापासूनचा आहे. परंपरागत कलाकेंद्रे प्रामुख्याने बौद्ध व हिंदू धर्मातील कला व नृत्य-नाट्य प्रकारांशी निगडित आहेत. सिंहलीपेक्षा तमिळ संगीत परंपरेचा प्रभाव अधिक आढळतो. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार तरूण स्त्रियांमध्ये विशेष प्रिय आहे. कोलम, डेव्हिल व कँडी हे श्रीलंकेतील तीन प्रमुख नृत्य-नाट्य प्रकार आहेत. त्यांपैकी कोलम हा मुखवटा घालून केला जाणारा नृत्य-नाट्य प्रकार आहे. आजारपण व संकटापासून मुक्ती मिळावी, म्हणून भूत-पिशाचाला साकडे घालण्यासाठी केला जाणारा डेव्हिल हा प्रकार आहे. कँडी हा सर्वांत महत्त्वाचा राष्ट्रीय नृत्यप्रकार असून पौराणिक कथा, ऐतिहासिक व निसर्गविज्ञान विषयांशी हा नृत्यप्रकार निगडित असतो.

देशातील प्राचीन अवशेषांमधून परंपरागत शिल्पकला, चित्रकला व वास्तुकलेचे नमुने पहावयास मिळतात. यांत प्रामुख्याने भव्य बुद्धमूर्ती, कँडी सभोवतालची मंदिरे व मंदिरांवरील चित्रकलांचा समावेश होतो. हस्तिदंतावरील नक्षीकाम, धातुकाम, लाखकाम, काष्ठकाम व बुरूडकाम हे इतर पारंपरिक कलाप्रकार अद्याप टिकून आहेत.

महत्त्वाची स्थळे : कोलंबो व श्री जयवर्धनपूर कोट्टे या राजधानीच्या ठिकाणांशिवाय देहीवाला मौंट लाव्हिनीया (लोकसंख्या २,०९,८००  २००१), मोराटुवा ( १,७७,२००), जाफना (१,४५,६००), निगॉम्बो (१,२१,९००), कँडी (१,१०,०००), कलमुनाई (९४,५००), गाल (९०,९००), त्रिंकोमाली (७६,००० १९९४) ही श्रीलंकेतील प्रमुख शहरे आहेत. अनुराधपुर हे एक प्राचीन राजधानीचे ठिकाण असून प्राचीन बौद्ध अवशेषांकरिता व भिक्षूंचे यात्रास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तलाईमानार या भारताच्या जवळ असणाऱ्या ठिकाणी मोती काढण्याचा व्यवसाय चालतो. नूवाराएलिया हे मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशातील थंड हवेचे ठिकाण आहे.

चौधरी, वसंत


श्रीलंका
कँडी : देशातील निसर्गसुंदर पर्यटन स्थळ व थंड हवेचे ठिकाण. कोलंबो : देशाची व्यापारी राजधानी व जगातील एक मोठे कृत्रिम बंदर.

नारळ : देशातील एक प्रमुख नगदी पीक. कोलंबो येथील प्रसिद्ध हिंदू मंदिर
दलद मलिगव : बुद्धाचा पवित्र दात असलेले मंदिर, कँडी, देशाच्या पारंपरिक 'सैतान नृत्य' प्रकारातील वेशभूषा.