मद्रास : भारताच्या तमिळनाडू राज्याची राजधानी आणि देशा- तील कोरोमंडल किनार्‍यावरील (पूर्व) एक महत्त्वाचे कृत्रिम बंदर, लोकसंख्येच्या दृष्टीने कलकत्ता, मुंबई व नवी दिल्ली यांच्यानंतरचे हे चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. लोकसंख्या ३२,६६,०३४ उपनगरां- सह ४२,७६,६३५ (१९८१). क्षेत्रफळ १३० चौ. किमी. मद्रास   हे रुंदमापी व अरुंदमापी लोहमार्ग, रस्ते व हवाईमार्ग यांनी देशातील अन्य भागांशी जोडलेले आहे. त्याचप्रमाणे येथून अंदमान-निकोबार बेटे व पूर्व किनार्‍यावरील काही छोटी बंदरे यांच्या दरम्यान जलमार्गेही वाहतूक होते. भारतातून आग्नेय आशियात जाणारा आंतरराष्ट्रीय हवाईमार्ग मद्रासवरून जातो. दक्षिण भारतातील औद्योगिक व सांस्कृतिक दृष्ट्याही मद्रासचे स्थान महत्त्वाचे आहे.

मद्रास शहर बंगालच्या उपसागरालगतच्या किनारी प्रदेशात साधा-रण १७ किमी. लांब व ३.५ ते ७ किमी. रूंद अशा चिंचोळ्या पट्टीत वसलेले आहे. याचे स्थान जवळजवळ समुद्रसपाटीवर आहे. शहरातून कूम व अड्यार या दोन नद्या वाहतात त्यामुळे शहरांचे तीन भाग पडलेले आहेत. कूम नदी फोर्ट सेंट जॉर्जच्या दक्षिणेला, तर अड्यार नदी शहराच्या दक्षिण सीमेजवळून समुद्राला मिळते. पाव-साळा वगळता अन्य वेळी या नद्यांच्या पात्रात खारकच्छे निर्माण  होतात. ही खारकच्छे समुद्रापासून वाळूच्या दांड्यांमुळे अलग झालेली आहेत. शहरातून उत्तर-दक्षिण बकिंगहॅम कालवा जातो, पण सध्यायातून सांडपाणी वाहते. कूम नदी समुद्राला मिळण्यापूर्वी तिला दोन फाटे फुटतात व त्यांमुळे फोर्ट सेंट जॉर्जच्या नैर्ऋत्येस एक लहान बेट तयार झाले आहे. दक्षिण मद्रासला वाळूच्या पुळणीची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. शहराच्या दक्षिणेस सेंट टॉमस मौंट ही टेकडी   आहे.

मद्रासला वर्षभर हवामान उष्णच असते (सरासरी २८.३ से.). त्यांतल्या त्यात डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांत उष्णतामान   कमी असते (२४.४ से.). मे व जून या महिन्यांत तपमान वाढते (३२ से.) येथे प्रामुख्याने ईशान्य मॉन्सून वार्‍यांमुळे ऑक्टोबर ते  डिसेंबर यांदरम्यान सु. ५५ सेंमी. पाऊस पडतो. नैर्ऋत्य मॉन्सून वार्‍यांमुळे जून ते सप्टेंबर यांमध्ये साधारण ३५ सेंमी. पाऊस पडतो. भारताच्या पूर्व किनार्‍यावरील अनेक ठिकाणांप्रमाणे मद्रासलाही उष्ण कटिबंधीय वादळांचा अधूनमधून तडाखा बसतो. याचा परिणाम  अधिकतर जहाज वाहतुकीवर आणि समुद्रात मासेमारी करावयास जाणार्‍या मचव्यांवर होतो. मरीना बीचवर (पुळणीवर) ढकलेली गेलेली बोट या वादळांच्या जोराची कल्पना देते.

मद्रासमधील काही महत्त्वाची स्थळे : (१) उच्च न्यायालय वास्तू, (२) सुप्रसिद्ध मरीना बीच, (३) व्हिक्टोरीया स्मारक, (४) मध्यवर्ती रेल्वे स्थानक. आजच्या मद्रास शहराची स्थापना १६३९ मध्ये झाली असली, तरी शहरातील मैलापूरसारख्या काही भागाचा इतिहास फार जुना आहे. ⇨ तिरुक्कुरळ हा तमिळ काव्यग्रंथ तिरूवळ्ळुवर (सु. पहिले   शतक) याने मैलापूर येथे रचला, असा एक समज आहे. मैलापूर येथील कपालीश्वर मंदिरही साधारण बाराशे वर्षापूर्वीचे असावे, असा   एक तर्क आहे पण दुसर्‍या मतानुसार हे मंदिर मूळ सेंट टॉमे या मद्रासमधील किनारी भागात असावे व पोर्तुगीजांच्या काळी ते येथे हलविण्यात आले असावे, असे मानले जाते. ट्रिप्लिकेन भागातील पार्थसारथी मंदिर आणि मैलापूरच्या दक्षिणेस ५ किमी. वरचे तिरूवन-मियूर हीदेखील जुनी आहेत. येशू ख्रिस्ताचा एक शिष्य सेंट टॉमस ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ भारतात आला असता त्याचे याच भागात निधन  झाले. तो ज्या टेकडीवर मृत्यू पावला, तेथेच त्याच्या मृत शरीराचे दफन करून थडगे बांधण्यात आले. आता पाण्याखाली   गेलेल्या जुन्या मैलापूर भागात ख्रिस्ती धर्मीयांची वसती होती व तेथे एक चर्चदेखील होते. इंग्लंडच्या अँल्फ्रेड राजाने ८८३ मध्ये आपले  काही दूतही येथे पाठविले होते. त्यानंतरच्या काळात पर्शियामधील  काही नेस्टोरियन ख्रिश्चनांनी सेंट टॉमसच्या थडग्यापाशी एक चॅपेल बांधले आणि सेंट टॉमस मौंट (टेकडी) येथे मठ बांधला. तेराव्या शतकाच्या शेवटी मार्को पोलो येथे येऊन गेला होता. त्यानंतर दोन शतके येथील गावाचा र्‍हास होत गेला. पोर्तुगीज येथे १५२२ मध्ये आल्यानंतर त्यांनी जुने चॅपेल पुन्हा बांधून काढले आणि एक छोटे चर्चही बांधले. हेच चर्च पुढे सेंट टॉमे कॅथीड्रल या नावाने प्रसिध्द झाले.


या प्रदेशात तयार होणाऱ्या तलम सुती वस्त्रामुळे सतराव्या शतकात इंग्रज व्यापारी येथे आकृष्ट झाले. कोरोमंडल व सरकार्स किनाऱ्यांवर इंग्रजांनी आपली एक वखार मच्छलीपटनम् येथे सतराव्या शतकाच्या सुरूवातीस स्थापन केली. हे ठिकाण गोवळकोंड्याच्या हद्दीत येत होते. गोवळकोंड्याच्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून व सुती वस्त्रे बनविणाऱ्या प्रदेशाच्या जवळ येण्याच्या उद्देशाने त्या वखारीचा मुख्य अधिकारी फ्रॅन्सिस डे याने मच्छलीपटनमच्या दक्षिणेला जागा शोधण्यास प्रारंभ केला. चिंगलपुटचे नायक आपल्या जिल्ह्यातील व्यापार वाढविण्यास उत्सुक होते. त्यांनी काही माफक अटींवर आपल्या हद्दीतील मद्रासपटम् हे छोटे बंदर इंग्रजांना देऊ केले व त्यावर किल्लाही बांधावयास परवानगी दिली  (१६३९). इंग्रजांना पोर्तुगीजांनीही आपली सेंट टॉमेची जागा देऊ केली होती पण तो प्रस्ताव नाकारून, इंग्‍लंडहून किल्ला बांधण्याची परवानगी येण्यापूर्वीच डे व अँड्रू गोगॅन यांनी मार्च १६४० मध्ये किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. या किल्ल्याचे नाव ‘फोर्ट सेंट जॉर्ज’ असे ठेवण्यात आले. स्थानिक नायकाचे वडील चेन्नाप्पा यांच्या सन्मानार्थ किल्ल्याजवळच्या वसाहतीला ‘चेन्नापटनम्’ असे नाव ठेवण्यात आले. एका वर्षाच्या आत किल्ल्याजवळ सु. तीनशे ते चारशे कोष्टी कुटुंबे वस्ती करण्यास आली. फोर्ट सेंट जॉर्ज १६४१ मध्ये कोरोमंडल किनारपट्टीवरील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्य ठाणे बनले.

फोर्ट सेंट जॉर्जवर त्यानंतर वारंवार संकटे आली. फ्रेंचांनी १६७२ मध्ये सेंट टॉमेचा कबजा घेतला आणि ट्रिप्लिकेन या शहराच्या भागात छोटा किल्ला उभारला. दोनच वर्षात डचांनी त्यांना हाकलून लावले. औरंगजेबाने १६८७ मध्ये यावर चाल केली आणि त्याचा सरदार दाऊदखान याने १७०२ मध्ये नाकेबंदी केली. मराठ्यांचा धोका प्रथम १७३९ मध्ये जाणवला आणि १७४६ मध्ये फ्रेंचांनी ला वुर्दॅने या आपल्या सेनापतीच्या हस्ते तो जिंकला. या काळात कंपनीची नाराजी पत्करून किल्ल्यावर व त्याच्या जवळच्या वसाहतीभोवतालच्या (ब्‍लॅकटाउन) भिंतीवर खर्च केला जात होता.

फ्रेंचांनी तीन वर्षे फोर्ट सेंट जॉर्ज आपल्या ताब्यात ठेवला. एक्सला-शपेलच्या तहान्वये तो १७४९ मध्ये फ्रेंचांनी पुन्हा इंग्रजांकडे सुपूर्द केला. या काळात किल्ल्याची व ब्‍लॅकटाउनची दुर्दशा झाली. पिगट याने जुन्याची डागडुजी करून नवा किल्ला बांधला. इंग्रजांची ही दूरदृष्टी त्यांच्या उपयोगी पडली. फ्रेंच सेनापती लालीने १७५९ साली जी धडक किल्ल्यावर मारली, तिला इंग्रज पुरून उरले. दोन महिन्यांच्या लढाईनंतर फ्रेंचांनी माघार घेतली. किल्ल्यामधील बराचसा भाग हा १७६३ ते त्या शतकाच्या अखेरपर्यंत बांधण्यात आला. या शतकात, हैदरअलीची १७६९ आणि १७८० ही दोन आक्रमणे वगळता, विशेष काही लढाया झाल्या नाहीत. कंपनीकडे सुरवातीला किल्ला व ब्‍लॅकटाउन (जॉर्जटाउन) यांचाच ताबा होता. रेग्युलेटिंग अँक्ट १७७३ मध्ये अंमलात आल्यानंतर ब्रिटिशांनी आपली राजधानी कलकत्त्याला हलविली व मद्रासच्या राजकीय महत्त्वाला ग्रहण लागले. मद्रास त्याच नावाच्या इलाख्याचे (प्रेसिडेन्सिचे) मुख्य ठाणे बनले. स्वातंत्र्यानंतर मद्रास प्रांताची व भाषिक प्रांत पुनर्रचनेनंतर मद्रास (सांप्रत तमिळनाडू) राज्याची हीच राजधानी राहिली.

मद्रासला व्यापारी महत्त्व हे त्याच्या स्थापनेपासूनच होते. पण १८३३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी कुटुंबांनी याचा फायदा घेऊन स्वतंत्रपणे व्यापारविनिमय सुरू केला. आणि येथूनच मद्रासच्या

औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला, असे म्हणावयास हरकत नाही. टॉमस पॅरी याने येथील चर्मोद्योगाला सुरूवात केली. बिन्नीने बर्किंगहॅम अँड कार् टिक मिल्स दोन भागांत (१८७७ व १८८२) सुरू केली  व ती  दक्षिण भारतातील आद्य गिरणी ठरली. मद्रासची उपयुक्तता वाढावी म्हणून समुद्रात भिंत बांधून कृत्रिम बंदर बांधण्यात आले (१८९६). त्याच वेळी मद्रासला दक्षिण भारतातील इतर भागांना जोडणाऱ्या लोहमार्गांचे जाळे विणले गेले. मद्रासच्या व्यापारी भूमिकेला यामुळे गती मिळाली. मद्रास चेंबर ऑफ कॉमर्स (१८३६), बँक ऑफ मद्रास (१८४३), चार्टर्ड बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया अँड चायना (१८५३) यांसारख्या संस्थांनी व्यापारउदिमाला उत्तेजन दिले.

या शतकाच्या पूर्वार्धात इंडियन बँक (१९०७), इंडियन ओव्हरसीज बँक (१९३७) या दोन संपूर्ण स्वदेशी बँका स्थापन झाल्या. वर्मा शेल स्टोअरेज व डिस्ट्रिब्यूटिंग कंपनी लि. ने खनिज तेल आणि रॉकेल यांच्या वितरणासाठी आपली व्यवस्था अंमलात आणण्याकरिता मद्रासमध्ये तेल आणावयास सुरूवात केली. साउथ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (१९०९), आंध्र चेंबर ऑफ कॉमर्स (१९२७) ही व्यापारमंडळे या सुमारास स्थापन झाली. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक भारतीय व परदेशी कंपन्यांनी दक्षिण भारतातील आपल्या कार्यालयांकरिता मद्रासची निवड केली. मद्रासमधील जॉर्जटाउन व फ्लॉवर बझार या वस्त्यांत अनेक व्यापारी कंपन्यांची कार्यालये आहेत. आर्मेनियन स्ट्रीटवर बँका, तर इव्हनिंग बाजार रोड, नेताजी सुभाष बोस रोड, अण्णासलाई (माउंट रोड) ही  प्रमुख व्यापारउदिमाची केंद्रे आहेत. मुंबईच्या फोर्ट भागाची आठवण व्हावी, असा हा परिसर आहे. यांच्याखेरीज पेरियामेदू (चामड्याच्या वस्तू, लाकूड, कातडी), रिपेरी हाय रोड (कापड), चायना बाजार या काही मोठ्या बाजारपेठा आहेत

मद्रासमधील आधुनिक उद्योगधंद्यांना गेल्या शतकात सुरूवात झाली असली, तरी भारतातील प्रमुख कोळशाच्या साठ्यांपासूनचे असणारे अंतर ही मद्रासच्या औद्योगिकीकरणातील प्रमुख अडचण ठरली. पण जलविद्युत प्रकल्पांद्वारे ऊर्जा मिळू लागल्यावर येथील औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. पेरांबूर (रेल्वेचे डबे), आवडी (संरक्षण साहित्य), अंबात्तूर (सायकली, वाहन साहित्य), मनाली (खते तेलशुध्दीकरण) या प्रसिध्द औद्योगिक वसाहती होत. मद्रासमध्ये कातडी कमाविणे, छोटे-मोठे अभियांत्रिकी उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, विजेची उपकरणे, औषधे तयार करणे इ. उद्योगधंदे आहेत.

मद्रास महापालिका १८८८ मध्ये स्थापन झाली. प्रशासकीय व निर्वाचन विभाग मिळून एकूण १२० विभाग आहेत. शहरात राज्य परिवहन मंडळातर्फे बससेवा चालते. १९५३ सालापर्यंत ट्रामगाड्या होत्या रूंदमापी व मीटरमापी अशा दोन्ही लोहमार्गांवर उपनगरी गाड्या चालतात.

दक्षिण भारतातील एक प्रमुख शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून मद्रासचा निर्देश करता येईल. मद्रास विश्वविद्यालयापूर्वी (१८५७) प्रेसिडेन्सी कॉलेज (१८५५) स्थापन झाले. मद्रास वैद्यक महाविद्यालय १८३५ मध्ये स्थापन झाले. दक्षिण भारतातील या उच्च शिक्षणाच्या काही आद्य संस्था होत. तंत्रविद्या शिक्षणाचीही सोय येथे पूर्वीपासून असून आज ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी ’ ही तंत्रविद्या संस्था उभी आहे. शालेय शिक्षणाचा इतिहासही अगदी जुना आहे. पहिली शाळा रॅल्फ ऑर्ड याने १६७८ मध्ये उघडल्याचा उल्लेख सापडतो. पण खऱ्या अर्थाने पहिली शाळा १७१५ मध्ये सुरू झाली. या सर्व मिशनरी शाळा होत्या. विद्यापीठाच्या माध्यमिक शालेय शिक्षण विभागाची स्थापना १८४१ मध्ये झाल्यावर आधुनिक शालेय शिक्षण पध्दतीचा पाया घातला गेला. याच संस्थेचे पुढे विश्वविद्यालय झाले.


सांस्कृतिक दृष्ट्या मद्रासला मोठा इतिहास आहे. सुप्रसिध्द तमिळ संत तिरूवळ्ळुवर यांचे काही काळ मैलापुर येथे वास्तव्य होते.मैलान्थीयरची तमिळ व्याकरणावरील टीका येथेच लिहिली गेली. कोणत्याही प्रकारचा राजाश्रय नसताना मद्रास हे कर्नाटक संगीताचे प्रमुख केंद्र बनले. भूलोक चापचूरी वोबिली केशवय्या हे प्रसिध्द विद्वान संगीतकार येथे काही काळ राहिले आहेत.पैदला गुरूशास्त्री, वीणा कुपय्यर, तिरूवादी, ताचूर सिंगाराचरलू, पल्लवी शेषय्यर अशा कर्नाटक संगीतातील मातब्बर व्यक्ती येथे होऊन गेल्या आहेत. सध्याच्या पिढीत मंगलमपल्ली, बाला मुरली कृष्णन्, एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी ही काही प्रसिध्द नावे आहेत.

गायन समाज, उत्सव, मंदिरे यांनी कर्नाटक संगीताला उदार आश्रय दिला आहे. दक्षिण भारतातील चित्रपट उद्योगाचे मद्रास हेच प्रमुख केंद्र आहे आणि तेथे हिंदी बोलपटांचीही निर्मिती होते. ए. व्ही. एम्., जेमिनी., एस्. एस्. वासन् हे मातब्बर निर्माते येथलेच. पहिले ग्रंथालय १६६१ साली मद्रासमध्ये निघाल्यावर येथे ग्रंथालय चळवळ विशेष प्रभावी ठरली आहे. ‘कॉनेमारा पब्‍लिक लायब्ररी ’ ही भारतातील राष्ट्रीय ग्रंथालयांपैकी एक आहे. रूक्मिणीदेवी अरूंडेलांची  ‘कलाक्षेत्र’ ही नृत्यशाळा येथलीच. मद्रास येथून द हिंदू, इंडियन एक्स्‍प्रेस, मेल ही इंग्रजी डेली थांती, दिनकरण, दिनमणी, दिनमंडल, अण्णा इ. तमिळ लोकवाणी हे मल्याळम्, मुसलमान हे उर्दू पत्र इ. महत्त्वाची दैनिके निघतात. चंदामामा व चांदोबा ही मुलांसाठी प्रसिध्द असलेली मासिके अनुक्रमे हिंदी, गुजराती,तेलगू, कन्नड, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, असमिया आणि मराठी या भाषांतून येथूनच प्रकाशित होतात. भारतात अनुचित्रप्रेषण तंत्र वापरून एकाच वर्तमानपत्राच्या पाच वेगवेगळ्या गावांहून एकाचवेळी आवृत्त्या काढण्याचा पहिला मान द हिंदू वर्तमानपत्राचा आहे. मद्रासमधील सांस्कृतिक जीवनाचा आढावा अड्यारच्या ‘थिऑसफिकल सोसायटी ’चा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. मद्रासमधील सांस्कृतिक जीवन मुंबई-कलकत्त्यासारखे सर्वदेशीय वा सार्वत्रिक नाही. त्यावर तमिळ छाप मोठ्या प्रमाणात दिसून येते.

भारताच्या दृष्टीने मद्रासचे काही खास महत्त्व आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेद्वारे  देशाचे जे नकाशे काढण्यात आले आहेत, त्यांचा श्रीगणेशा मद्रासमध्ये झाला. माउंट रोडवरील सात मैलांची आधाररेषा ही देशातील आद्य आधाररेषा होय. मद्रास वेधशाळा (स्था. १७९२) ही खगोलीय वेध (निरीक्षणे) करून रेखांश निश्चित करणारी पहिली वेधशाळा आहे. त्यामुळे मद्रासची स्थानिक वेळ भारतीय प्रमाणवेळ म्हणून प्रथम वापरली जाई. ग्रीनिच वेळेच्या ती ५ तास २० मिनिटे ५९.१ सेकंद पुढे होती. (पुढे १९०५ नंतर सोईसाठी उत्तर प्रदेश राज्यातील मीर्झापूर येथील स्थानिक वेळ भारतीय प्रमाणवेळ म्हणून मानली जाऊ लागली). शिक्षण शास्त्रातील ‘मद्रास पध्दती ’चा (शाळेतील वरच्या इयत्तेतील मुलांनी खालच्या इयत्तेतील मुलांना शिकवावयाचे) अवलंब त्या तंत्राचा जनक अँड्रू बेलने येथे केला. दुसऱ्या महायुध्दात ६ एप्रिल १९४२ रोजी विशाखापटनम् व काकिनाडा यांवर जपान्यांनी बाँबवर्षाव केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मद्रास शहरावर शत्रूची विमाने चालून आली होती. मद्रास शहर रिकामे करण्यासंबंधीच्या सूचना सरकारने काढल्या व राज्याचे मंत्रालय उटी चित्तूर येथे हलविण्यातही आले. मद्रास उच्च न्यायालयाने आपली सुट्टी वाढविली, तर कागदपत्रे अनंतपूरला आणि कोईमतूरला हलविण्यात आली. शहरात फक्त आवश्यक तेवढेच नागरिक रहात होते.

मद्रासमध्ये पर्यटकांकरिता अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मरीना बीच ही लांबच लांब पसरलेली पुळण येथे आहे. लांबीनुसार ती होनोलूलूनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची पुळण ठरते. फोर्ट सेंट जॉर्जच्या बराकीत रॉबर्ट क्लाइव्ह राहिला होता, तेथील चर्च ऑफ सेंट मेरी, तेथीलच फोर्ट म्यूझीयम, कपालीश्‍वर मंदिर (मैलापूर), पार्थसारथी मंदिर (ट्रिप्लिकेन), सेंट टॉमस माउंट, सेंट टॉमे कॅथीड्रल, गिंडी पार्क हे राष्ट्रीय उद्यान, सर्पोद्यान, अड्यारच्या थिऑसफिकल सोसायटीच्या परिसरातील वटवृक्ष, शासकीय राष्ट्रीय कलावीथी, शासकीय वस्तुसंग्रहालय वगैरे अनेक प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. मद्रासच्या परिसरात महाबलीपुर (५७ किमी.), पक्षितीर्थ (तिरूक्कळुक्कूनरम्) (सु. ६९ किमी.), कांचीपुरम् (७२ किमी.), वेडंतंगल पक्षी अभयारण्य (७५ किमी.) ही पर्यटन स्थळे आहेत.

संदर्भ : 1 . Madras Tercentenary Celebration Committee, The Madras Tercentenary Commemoration Volume, London, 1939.

            2. Ramaswami, N. S. Founding of Madras. Bombay, 1977.

            3. Seshadri, R. K. Swadeshi Bank From South India-Indian Bank, Madras,1982.

                      

पंडित, अविनाश