गोबी — १ : मध्य आशियातील मरुप्रदेश. सु. ४०° उ. ते ४९° उ. आणि ९५° पू. ते ११४° पू. क्षेत्रफळ सु. ७,७७,००० चौ. किमी. (महाराष्ट्र व मध्य प्रदेश मिळून होणाऱ्या प्रदेशाहून थोडे जास्त). हा जगातील एक मोठ्यापैकी मरुप्रदेश असून याने मंगोलियन पठारावरील मंगोलिया प्रजासत्ताकापैकी व चीनच्या इनर

गोबी वाळवंट : एक दृश्य

  मंगोलिया, कान्सू, निंगशिआ या प्रांतांपैकी मिळून मोठा चंद्रकोरीसारखा भाग व्यापला आहे. सु. ५०० ते १,००० किमी. रुंद १,६०० किमी. पेक्षा लांब व समुद्रसपाटीपासून सरासरी १,२०० मी. उंच असलेल्या या मरुप्रदेशाच्या पश्चिमेस पामीर पर्वतरांगा, दक्षिणेस आस्तिन ता व नानशान, पूर्वेस गान (शिंखिंगन) व उत्तरेस अल्ताई, सायान व याब्लोनाय पर्वतरांगा आहेत. गोबीच्या पश्चिम भागात तारीम खोरे व ताक्लामाकान वाळवंट मोडते. तथापि सिंक्यांग ऊईगुरमधील झुंगेरियन वाळवंट अथवा यिन शानच्या दक्षिणेकडील ऑर्डास वाळवंट यांचा समावेश गोबीमध्ये होत नाही. चिनी भाषेत गोबीला शा मॉ (वाळूचा ओसाड प्रदेश) तसेच हान हाइ (कोरडा समुद्र) असे म्हटले जाते तथापि गोबीचा नैर्ऋत्य भागच संपूर्ण वालुकामय आहे. पश्चिम भागात अल्ताईचे जटिल, वर उचललेले विभंग खडक आढळतात काही ठिकाणी झिजलेल्या रुंद माथ्याच्या घडीच्या टेकड्या आहेत. एरवी गोबीचा बहुतेक भाग लांबवर सरळ मोटार चालविता येईल असा समतल, उघड्या बोडक्या ग्रॅनाईटी व रूपांतरित खडकांचा आहे. यांत अधूनमधून रुंद, उथळ द्रोणीप्रदेश — ज्यांना मंगोल लोक ‘ताल’ म्हणतात ते – आढळतात. येथेच थोडेसे स्टेप गवत, क्वचित वस्ती आढळते.

गोबीचे हवामान खंडांतर्गत स्वरूपाचे आहे. उन्हाळ्यात येथील तपमान ६०° से.पर्यंत जाते, तर थंडीत ते  -४०° से.पर्यंत उतरते. या हवामानात थंडीत बर्फाची वादळे, तर उन्हाळ्यात उष्ण वाळूचे तुफान यांचा

गोबी वाळवंटातील गस्त

गोबीला नेहमीच तडाखा बसतो. ईशान्येकडील आणि आग्नेयीकडील भागांत वार्षिक पर्जन्य १५–२० सेंमी. असून दक्षिणेकडे व पश्चिमेकडे ३–५ सेंमी. आहे. त्यामुळे गोबीमध्ये नद्या जवळजवळ नाहीतच. पूर्वेस केरलेन हाच काय तो मोठा प्रवाह. पावसाळ्यात मोठ्या पुराच्या वेळी तो अमुर नदीच्या वरच्या टप्पाला मिळतो एरवी तो मध्येच लुप्त होतो. अशा लुप्त झालेल्या प्रवाहांमुळे गोबीमध्ये अनेक सरोवरे आढळतात परंतु त्यांतील पाणी मचूळ आहे.

गोबीमध्ये झाडे जवळजवळ नाहीत. शेरणी अथवा निवडुंगासारख्या काही मरुवनस्पती येथे आढळतात. २,७५० मी. उंचीच्या गोबी अल्ताई पर्वतावर व इतर पर्वतांवर स्टेप गवत व पर्वतीय वनश्री आढळते. हरिण, सांबर, खारी त्याचप्रमाणे भटक्या लोकांनी पाळलेल्या शेळ्यामेंढ्या, गाईबैल, घोडे व उंट हीच येथील प्राणिसंपत्ती. आग्नेयीकडील पाणथळ भागात गाईबैल आढळतात, तर रुक्ष भागात दोन मदारी उंट दळणवळणाचे महत्त्वाचे काम पार पाडतात.

फार पूर्वी येथील हवामान आर्द्रतायुक्त असून मानव संस्कृतीचे हे आद्यस्थान असावे, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. ऊलान, ओरोख, बन्‌ त्सागान, लॉप या सध्याच्या सरोवरांच्या मूळ सरहद्दींकाठी समृद्ध संस्कृतींचे अवशेष तसेच पुराणाश्मयुग, नवाश्मयुग, धातुपाषाणयुग यांतील व त्यांपूर्वीचेही अवशेष मिळाले आहेत. बाराव्या शतकात मार्को पोलोने गोबीमधून प्रवास केल्याची वर्णने आहेत. सोळाव्या शतकात काही जेझुइट मिशनरी येथे गेले होते. तथापि गोबीच्या समन्वेषणाचा तपशीलवार वृत्तान्त स्वेन हेडिन (१८६५–१९५२) याच्या प्रवासवर्णनात मिळतो. सर फ्रॅन्सिस यंगहजबंड (१८६३–१९४२) व त्याच्या सहकाऱ्यांस गोबीमध्ये डायनोसॉर या प्राचीन प्राण्याची हाडे आणि अंडी मिळाली. १९५० मध्ये पश्चिम गोबीमध्ये चिन्यांनी तेलखाणीचा शोध लावला, तर मंगोलिया प्रजासत्ताकातील गोबी भागात काही धातूंचे शोध लागले आहेत. चीनने गोबीमधील भटक्या लोकांवर अनेक वेळा आक्रमणे केली आहेत. कम्युनिस्ट राजवटीत मात्र या भटक्या लोकांमध्ये सुधारणा होत आहेत. बलिंग्‌म्याऊ व मंगोलिया प्रजासत्ताकाची राजधानी ऊलान बाटोर अथवा उर्गा हीच काय ती येथील मोठी शहरे होत. 

शाह, र. रू.