न्यामे : पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशाच्या राजधानीचे ठिकाण व एक महत्त्वाचे दळणवळण आणि व्यापारी केंद्र. लोकसंख्या १,५०,००० (१९७२ अंदाज). हे लागोसच्या उत्तर वायव्येस सु. ८०० किमी. नायजर नदीकाठी वसले असून, नायजर नदीवरील हे एक महत्त्वाचे अंतर्गत बंदर असून १९२६ पासून राजधानीचे ठिकाण आहे. अटलांटिक महासागरातून नायजर नदीद्वारे थेट न्यामेपर्यंत आगबोटी येऊ शकतात. वायव्येकडील तीलाबेरीशी हे लोहमार्गाने जोडले आहे. येथून कांदे, चामडी, हाडे, गाई, शेळ्या, मेंढ्या, चटया, काथ्याचे दोर वगैरेंची निर्यात होत असून, सर्व प्रकारचा पक्का माल आयात केला जातो. शहरात कातडी कमावणे, काच, विटा व चिनी मातीची भांडी तयार करणे वगैरे उद्योग चालतात. याच्या आसमंतात धान्य, बटाटे, खरबूज, तांदूळ, भाजीपाला इ. उत्पन्ने होतात. येथील वातावरणविज्ञान केंद्र, लससंशोधन प्रयोगशाळा व राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय महत्त्वाची आहेत.

लिमये, दि. ह.