जळगाव जिल्हा : महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील जिल्हा. १९६१ पूर्वीचा पूर्व खानदेश. क्षेत्रफळ ११,७७१ चौ.किमी. लोकसंख्या २१,२३,१२१ (१९७१). विस्तार सु. २०° २२’ उ. ते २१° २३’ उ. व ७४° ५५’ पू. ते ७६°२८’पू. याच्या पूर्वेस बुलढाणा व मध्य प्रदेशाचा खांडवा (पू. निमाड) दक्षिणेस औरंगाबाद, पश्चिमेस धुळे व नासिक आणि उत्तरेस मध्य प्रदेश राज्याचे खांडवा व खरगोण हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचा दक्षिणोत्तर विस्तार सु. १०६ किमी. असून पूर्व-पश्चिम सु. ११९ किमी. आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव, पारोळे, पाचोरा, जामनेर व जळगाव हे ११ तालुके तसेच भडगाव, एदलाबाद हे महाल येतात. जळगाव हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे (लोकसंख्या १,०६,७११) आहे.

 भूवर्णन : स्थूलमानाने याचे सातपुडा पर्वतश्रेणी आणि उपत्यकाव्याप्त (पीडमाँट) तापीच्या उत्तरेचा भाग अजिंठा-चांदोर सातमाळा, आग्नेयीकडील हत्ती डोंगर या अल्पोच्च, विस्कळित डोंगररांगांनी व्याप्त भाग व या दोहोंमधील पूर्व-पश्चिम उताराचा तापी खोऱ्याचा पठारी भाग असे तीन नैसर्गिक विभाग पडतात. सातपुड्याच्या उतारांवर व दक्षिणेकडील डोंगरांजवळ वाळूमिश्रीत, दक्षिण मध्यभागात मळईची, उत्तरभागाच्या जंगल विभागात जंगली, खोल दऱ्यांतून व सखल भागांतून काळी आणि बाकीच्या बहुतेक भागात मध्यम काळी मृदा आहे.

जिल्ह्याची मुख्य नदी तापी ही पश्चिमवाहिनी व सखोल पात्राची असून हिच्या उपनद्या पूर्णा, गिरणा, वाघूर, भोगावती, बोरी व पांझरा या महत्त्वाच्या आहेत. भोकर, सुकी, मोर, रानवती, हडकी, मंकी, गुळी, अनेर इ. उपनद्या व कान, तितूर, अंजनी इ. नद्या असून त्यांवर अनेक छोटेमोठे बंधारे आहेत. त्यांशिवाय हरताळे, म्हसवे, वेल्हाळे व मेहरूण हे चार तलाव आणि बागायतोपयोगी विहिरी आहेत. जामदा बंधारा हा गिरणेवरील मोठा पुनर्रचना प्रकल्प आणि नासिक जिल्ह्यातील पांझण येथील गिरणा प्रकल्प १९७१ पर्यंत जवळजवळ पूर्ण झाले असून त्याखाली जळगाव जिल्ह्यातील ५६,५४,६६० हे. क्षेत्र भिजेल. भुसावळ तालुक्यातील हातनूर येथील अपर तापी प्रकल्प पुरा झाल्यावर त्याखाली ३७,७७४ क्षेत्र भिजेल. त्याशिवाय अनेर, बोरी, सुकी इ. नद्यांवरील बंधाऱ्यांमुळे सु. १२,००० हे. क्षेत्र भिजेल.

 इमारतबांधणीस उपयुक्त दगड, वाळू, चुनखडी ही खनिजे येथे सापडतात.

 एकंदरीत जिल्ह्यातील हवा कोरडी, आरोग्यदायी पण विषम असून अत्यंत कडक उन्हाळ्यासाठी जळगाव शहर व जिल्हा प्रसिद्ध आहे. उन्हाळा दक्षिणेस कमी आणि सातपुड्यापर्यंत वाढता कडक आहे. नोव्हेंबर-डिसेंबर ते फेब्रुवारी तीव्र थंडी, मार्च ते मे कडक उन्हाळा (जळगाव येथे डिसेंबरमध्ये १०° से. व एप्रिलमध्ये ४२·५° से. तपमान असते). जून ते सप्टेंबर आल्हाददायक पावसाळा असतो. ऑक्टोबरची उष्णता जाणवते. उन्हाळ्यात धुळीचे लोट उठतात. मेघगर्जनेसह वादळ–संभव उन्हाळा–पावसाळा अखेर जास्त असतो. पावसाची वार्षिक सरासरी ७४ सेंमी. व त्यातही तापी खोऱ्यात ७६ ते ८१ सेंमी. असून एकंदरीत पर्जन्यमान जास्त निश्चित स्वरूपाचे आहे.

 आर्थिक स्थिती : कृषी जिल्ह्यात ७३% लोकांचे निर्वाहसाधन शेती असून अन्नधान्यासाठी ६३% व धान्येतर उत्पन्नासाठी ३७% लागवडीखालील क्षेत्र वापरले जाते. १९७०–७१ मध्ये एकूण ६६,४०० हे. ओलीत क्षेत्रापैकी १२,५०६ हे. कालव्यांनी व ५३,४३५ हे. विहिरींनी भिजत होते. पिकांखालील क्षेत्रापैकी ८·२७ क्षेत्रास जलसिंचन मिळत होते. दुबार हंगामात ज्वारी ५७%, बाजरी ३०%, गहू ११% क्षेत्रात होतात. हा डाळी पिकविणारा महत्त्वाचा जिल्हा अन्नपिकांच्या सु. २५% डाळी पिकवतो. महाराष्ट्रातील तेलबिया पिकवणारा हा अग्रेसर जिल्हा असून एकूण क्षेत्राच्या १६% क्षेत्रात पिकणारे भुईमूग हे परदेशी चलन मिळवून देणारे पीक चाळीसगाव, जामनेर, पोरोळे, पाचोरा, अमळनेर या भागांत होते. धणे, लसूण, मिरच्या ही उत्पन्ने वाढत्या प्रमाणात, विशेषतः जळगाव तालुक्यात होतात. कपाशीस जिल्हा-अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व असून १९७०–७१ मध्ये प्रत्येकी १८० किग्रॅ.च्या ६१,८०० गाठी उत्पादन झाले. कंबोडिया व लक्ष्मी या जातीचे उत्पन्न हेक्टरी सु. २२४ मे. टन होते. खानदेश कापूस संरक्षित प्रदेशातर्फे कपाशीची शुद्धता व व्यवस्थापन होते. भारतात इतरत्र न होणारे भारतीय केळांचे २५% उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात, विशेषतः शेंदुर्णी. रावेर, सावदे भागांत होते. मोसंबीसाठी एरंडोल, चाळीसगाव, भडगाव लिंबासाठी उत्राण आणि पेरू-बोरांसाठी जळगाव–मेहरूण भारतात तसेच परदेशांतही प्रसिद्ध आहे. द्राक्षे-पपया यांचे उत्पन्न वाढत्या वेगाने होत आहे. त्याचप्रमाणे सर्व तऱ्हेचा उत्तम व विपुल भाजीपाला इतर राज्यांत व आजकाल परदेशीही रवाना होतो.

 जळगाव जिल्ह्यात १४·८५% वनप्रदेश असून त्यात साग, तिवस, धावडा, सलई, सादडा, हळद, शिसव, कळंब, बिब्बा, अंजन, खैर, बाभूळ, बोर, पळस, टेंभुर्णी इ. वृक्ष आढळतात. वाघ, अस्वल, हरिण, सांबर, चितळ, रानडुक्कर, नीलगाय, कोल्हा, खोकड, चिंकरा, ससा इ. वन्यपशूंचा विशेषतः सातपुड्यात मुक्तसंचार असतो. मासे, बगळे व मोर वगैरे पक्षीही विविध आहेत.

गाई, म्हशी, बैल व कोंबड्या यांच्या संवर्धनावर व पैदाशीवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे दूध, अंडी, लोकर, चामडी, वासरे, रेडके यांचे उत्पादन मोठे आहे. चाळीसगाव येथील पाश्चरायझेशन प्लँटचे दूध मुंबईस रवाना होते. चाळीसगाव येथे श्रेष्ठ संकरित मेंढ्या पैदास केंद्र असून खिलार, निमार जातींची पाच पैदास केंद्रे आहेत. जळगाव, सावदे, चोपडा, जामठी, वरणगाव, नेरी, धरणगाव, वरखेडी, रावेर येथे जनावरांचे बाजार पूर्वापार भरत असून परप्रांतांतही गुरांची विक्री चालते. १९६६ मध्ये जिल्ह्यात ६,७६,१७४ गुरे, २,१९,०६०  शेळ्या, २८,५९४ मेंढ्या, १३,७४२ इतर जनावरे आणि १,५९,२०८ कोंबड्या होत्या.

व्यापार : शेतीखालोखाल (११%) व्यापार हे निर्वाहसाधन असून भुसावळ-जळगाव-चाळीसगाव या मुख्य व्यापारपेठा आहेत. ज्वारी, गहू इ. धान्ये, कापूस, भुईमूग व तीळ तेले, केळी, मसाला पदार्थ, शुद्ध वनस्पती तूप, भाजीपाला, कडधान्ये, केळपीठ, सरकी, पेंड, कुक्कुटपालन उत्पादने हा मुख्य निर्यात माल असून कापड, लोखंडी अवजारे, पत्रे, स्टेशनरी, किराणा, तांदूळ, औषधे, प्रसाधने चिनी-माती-काचसामान हा आयात माल आहे.


उद्योगधंदे : गेल्या २० वर्षांत वेगाने वाढणाऱ्या उद्योगधंद्यांत १९७१ मध्ये १२,१६० लोक गुंतलेले असून १७६ नोंदलेले कारखाने आहेत : जळगाव, अमळनेर, चाळीसगाव–प्रत्येकी एक कापडाचा, पिंप्राळे–एक कृत्रिम रेशमाचा, पाचोरे–वनस्पतितूप, शुद्ध तेल व साबण, जळगाव–केळपीठ, दारूकाम व मेवामिठाई, वरणगाव व भुसावळ–युद्धसाहित्य. यांशिवाय जिल्ह्यात ७२ कापूस पिंजण्याचे, ३६ गाठी बांधण्याचे तसेच गूळ, विड्या, शाई, छपाई रीळ इत्यादींचे छोटे कारखाने आहेत. १९३८ पासून आतापर्यंत ८ कामगार संघटना आणि १० कामगार कल्याण केंद्रे असून ती जागृत आणि कार्यक्षम असल्याने उद्योगधंद्याचे भवितव्य उज्जवल आहे.

 जिल्ह्यात हातमाग, यंत्रमाग, सुतारी, चर्मकारी, तेलघाणे, बांबूकाम, कुंभारकाम, लोहारकाम, वीटभट्ट्या, लोकरकाम, गूळ करणे, हातकागद करणे, भांडी घडविणे इ. कुटिरोद्योगांना आणि ग्रामोद्योगांना वाढत्या प्रमाणात उत्तेजन मिळते.

 दळणवळण : लोहमार्ग फार जुने, १८६१ सालापासूनचे असून सध्या जिल्ह्यातील ३५० किमी. लोहमार्गांपैकी २९६ किमी. रुंदमापी व ५४ किमी. अरुंदमापी आहेत. (१) मुंबई–भुसावळ-इटारसी, (२) (मुंबईहून) भुसावळ–नागपूर (कलकत्त्याकडे), (३) चाळीसगाव–धुळे व (४) पाचोरा–जामनेर लघुलोहमार्ग असे चार फाटे असून पश्चिम रेल्वेचा सुरत–भुसावळ जोडणारा ताप्ती व्हॅली मार्ग आहे. पक्के रस्ते–सुरत–धुळे–एदलाबाद–नागपूर हा एकच राष्ट्रमार्ग (क्र. सहा) या जिल्ह्यातून १४९ किमी. जातो. पुढीलप्रमाणे तीन राज्यमार्ग आहेत : (१) मुंबई–चाळीसगाव १९२ किमी. (२) जळगाव–अजिंठा ६१ किमी. (३) रायसिंग–बऱ्हाणपूर ११४ किमी. १९५० पासून १३८ राज्यपरिवहन मार्ग झाले असून त्यांची लांबी ४,०९१ किमी. भरते. जळगाव-धुळे टपाल व तार विभागाची मुख्य कचेरी जळगावी असून १९७१–७२ मध्ये जिल्ह्यात ४४३ टपाल व तार उपकार्यालये तसेच ५७ दूरध्वनी कार्यालये, २,५४९ दूरध्वनी व ४७,७४७ रेडिओ होते.

लोक व समाजजीवन : १,४२३ सुवसित खेडी असलेल्या या जिल्हयात फक्त पंधराच खेडीवजा शहरे असून एक लाखावर वस्तीचे फक्त जळगाव शहर आहे. लोकवस्ती साधारण दाट, दर.चौ. किमी. स १८० असून स्त्रीपुरुष प्रमाण ९४९ : १००० आहे. ८५% लोक मराठी भाषिक, ८% उर्दू भाषिक, ३% गुजराती भाषिक आहेत. जिल्ह्याची बोलीभाषा अहिराणी असून ती विशेषतः पश्चिमेस बोलली जाते. बंजारी, भिल्ल, पावरे (राजपूतवंशीय), तडवी (मुसलमान), गोंड, कोटिल, नहाळ या अनुसूचित जमाती आहेत. जिल्ह्यात बहुसंख्य हिंदू असून ते एकंदरीत पापभीरू, देवभोळे, सुखवस्तू व उत्सवप्रिय आहेत. नागरी जीवन संमिश्र असून वाढता शिक्षणप्रसार, सामाजिक-आर्थिक बदल, सहजसुलभ दळणवळण यांमुळे जुन्या जातिवर्णभेदांचा लोप होत आहे. लेवा-पाटीदार-समाज हिरिरीने आणि ईर्ष्येने आघाडीवर आहे. ३६·६०% कामगार असून साक्षरता ४५·२२% आहे. अत्यंत झपाट्याने शिक्षणप्रसार होत असून एकूण १,४५३ गावांपैकी १,३९५ मधील एकूण १,४०६ शाळांतून प्राथमिक शिक्षण उपलब्ध आहे. प्रशिक्षित शिक्षक ९०·७% असल्यामुळे शिक्षणदर्जा उच्च आहे. माध्यमिक शिक्षणासाठी ९६६ शिक्षक आहेत. उच्च शिक्षणाची सोय पुढीलप्रमाणे आहे : (१) एम्.जे. महाविद्यालय, जळगाव व प्रताप कॉलेज, अमळनेर येथे तिन्ही शाखांची सोय. (२) फैजपूर व (३) अमळनेर येथील कला-विज्ञान महाविद्यालये. शिवाय जळगाव येथे २ प्रशिक्षण महाविद्यालये आणि १ तांत्रिकी महाविद्यालय आहे. जिल्ह्यात १० सरकारमान्य ग्रंथालये असून ४४१ गावांतून ग्रामवाचनालये आहेत. वृत्तपत्रसृष्टीत जिल्हा जितका जुना तितकाच अग्रेसर. प्रबोधचंद्रिका  हे ८१ वर्षांचे जुने वृत्तपत्र आहे. जिल्हा-आरोग्यमान चांगले असून तीन मोठी सुसज्ज रुग्णालये, प्रत्येक तालुक्यात दवाखाना व पशुरुग्णालये आहेत. एकूण २८ कायमची व ७ फिरती चित्रपटगृहे आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण अल्प असून केळीबागांतील एंजिनचे सुटे भाग चोरणे हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुन्हा आहे. त्यासाठी अधूनमधून टास्क फोर्स आहे. होमगार्ड चळवळ विशेषोल्लेखनीय, बक्षिसपात्र ठरली आहे. जिल्ह्यात स्वतंत्र तुरुंग नाही.

पूज्य सानेगुरुजी, बालकवी ठोमरे, माधव जूलिअन्, बहिणाबाई चौधरी, स्वामी कुवलयानंद हे या जिल्ह्याचे आधुनिक काळास देणे, तर सखाराम महाराज समाधीने व तत्त्वज्ञान मंदिराने महाराष्ट्राची पंढरी बनलेले अमळनेर, पर्शियन शिलालेख व पांडववाडा असलेले एकचक्रानगर म्हणजे हल्लीचे एरंडोल, यादवकालीन शिल्प असलेले पाटण, चांगदेव व पारोळे इ. गावे हे या जिल्ह्याचे सांस्कृतिक लेणे आहे. उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव येथे उष्ण झरे व पाल-मनुदेवी ही निसर्गरमणीय स्थाने प्रवासी आकर्षणे आहेत. फैजपूर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पहिले ग्रामीण अधिवेशनस्थळ म्हणून अजरामर, तर वरखेडी बुद्रुक हे केवळ सामान्य जनांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या असामान्य लढ्यासाठी स्मरणीय आहे.

नाईक, शुभदा कुमठेकर, ज. ब.


जळगाव जिल्हा

मुक्‍ताबाई मंदिर, मेहूण. एरंडोलजवळील पद्‌मालय येथील गणेश मंदिरजळगाव शहराचे दृश्य

श्रीकृष्ण मंदिरातील रासक्रीडेचे छतशिल्प, वाघळी, ११ वे शतक.बोरी नदीवरील धरण, तामसवाडी.पांडववाडा, एरंडोल.

हालते मनोरे, फरकांडे.केळी : जिल्ह्यातील महत्त्वाचे उत्पादनगरम पाण्याचे झरे, उनपदेव.