डेनहेल्डर : वायव्य नेदर्लंड्समधील उ. हॉलंड कालव्याच्या उत्तर टोकावरील, व्हाडंझी आखातातून उत्तर समुद्रात जाण्यासाठी सोईचे बंदर. लोकसंख्या ६१,१९१ (१९७४ अंदाजे). हे ॲम्स्टरडॅमच्या उत्तरेस ६४ किमी. असून मार्झ्‌दीप सामुद्रधुनीने टेसल बेटापासून वेगळे केलेले आहे. नेपोलियनने या बंदराला तटबंदी केल्याने लष्करी दृष्ट्या ते सुरक्षित झाले. १७९९ मध्ये ब्रिटिश व रशियन सैन्य येथे उतरले होते. दे रॉइटर व व्हॅन ट्रॉम्प यांनी येथील लढाईत ब्रिटिश व फ्रेंच आरमारांचा धुव्वा उडविल्याने ऐतिहासिक दृष्ट्या हे महत्त्वाचे आहे. येथे शासकीय आरमारी विद्यालय, वातावरणविज्ञान व प्राणिविज्ञान यांच्या संस्था आणि वस्तुसंग्रहालय व निसर्ग संरक्षण स्थान आहे. तसेच हे मासेमारी केंद्र असून येथे जहाजबांधणी आणि पर्यटन व्यवसायही चालतो. दहा किमी. लांबीच्या ग्रॅनाइटी भित्तीमुळे बंदराचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण झाले आहे. नेदर्लंड्सचा आरमारी तळ येथे असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

ओक, द. ह. कांबळे, य. रा.