एरोड : तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या १,०५,१११ (१९७१). हे कोईमतूरच्या ईशान्येस सु. १०० किमी., दक्षिण रेल्वेवरील प्रस्थानक असून कावेरीच्या उजव्या तीरापासून जवळ आहे. हैदरअल्लीच्या वेळी भरभराटीस असलेले हे शहर मराठे, टिपू व इंग्रज यांच्यामधील लढायांत नष्टप्राय झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेची छावणी काही दिवस येथे होती. १८७७ मध्ये येथील किल्ला दुष्काळकामात जमीनदोस्त करण्यात आला. आसमंतातील शेतमालाची ही बाजारपेठ असून येथे कापसाच्या गिरण्या आहेत. गावात औद्योगिक शाळा व महाविद्यालय आहे. येथील बैलगाड्या या भागात प्रसिद्ध आहेत. गावातील दोन प्राचीन देवळांत तमिळ व संस्कृत शिलालेख आहेत.

ओक, शा. नि.