इंडियानापोलिस : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इंडियाना राज्याची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ७,४४,६२४ (१९७०). हे व्हाइट नदीकाठी असून शिकागोच्या आग्नेयीस २८२ किमी. आहे. व्यापार, उद्योग, दळणवळण व शिक्षण यांचे हे केंद्र समजले जाते. येथे रेल्वे वर्कशॉप, पिठाच्या गिरण्या तसेच होजिअरी, छपाई, औषधे, विजेची उपकरणे, विमानांचे भाग, मोटारींचे सांगाडे व सुटे भाग, तयार कपडे, अन्नपदार्थ, धातूंच्या वस्तू इत्यादींचे अनेक लहानमोठे कारखाने असून बटलर विद्यापीठ, इंडियाना विद्यापीठ, महाविद्यालये, विविध शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. अमेरिकन कवी रायली याचे हे जन्मस्थान व अमेरिकेचा अध्यक्ष बेंझामिन हॅरिसन याची ही कार्यभूमी होय.

शाह, र. रू.