वॉलथॅम : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मॅसॅचूसेट्‌स राज्याच्या मिडलसेक्स परगण्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या ५७,८७८ (१९९० अंदाज). हे शहर बॉस्टनच्या वायव्येस १६ किमी. अंतरावर चार्ल्स नदीकाठी वसलेले असून मुख्यतः वॉलथॅम घड्याळनिर्मितीमुळे विशेष प्रसिद्धी पावले. १८५४ मध्ये घड्याळांचे प्रचंड उत्पादन प्रथमच यशस्वी रीत्या करण्यात आलेल्या अमेरिकेतील काही निवडक शहरांमध्ये वॉलथॅमची गणना केली जात होती.

वॉलथॅमची १६३० च्या सुमारास स्थापना झाल्याचे मानतात प्रथम ते वॉटरटाउन शहराचा एक भाग होते, परंतु १७३८ मध्ये ते वेगळे करण्यात आले. त्यास १८८४ मध्ये शहराचा दर्जा देण्यात आला. विपुल जलशक्तीच्या उपलब्धतेमुळे येथे अनेक पीठगिरण्या व कागदकारखाने यांची उभारणी करण्यात आली. हे मिडलसेक्स परगण्याच्या कृषिखात्याचे मुख्यालय असून कृषिसंशोधन व कृषिविषयक माहितीपूरक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

वॉलथॅम येथे फ्रॅन्सिस कॅबट लोवेल (१७७५-१८१७) या अमेरिकन उद्योजकाने एकाच छताखाली कच्च्या धाग्यापासून कापडनिर्मिती करणारी व यंत्रमागांचा वापर करण्यात आलेली देशातील पहिली कापडगिरणी १८१३ मध्ये उभारली. त्यापाठोपाठ औद्योगिकीकरणाने वेग घेतला आणि कापड व लोकर उद्योगांची विशेष वाढ झाली. १८५४ मध्ये स्थापन झालेली ‘अमेरिकन वॉलथॅम वॉच कंपनी’ ही पुढे अनेक वर्षे जगातील सर्वांत मोठ्या घड्याळकंपन्यांपैकी एक म्हणून गणली जाऊ लागली तिने १९५० पर्यंत घड्याळनिर्मितीचा विक्रमी व्यवसाय केला या कंपनीने वॉलथॅम शहराच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलला. येथे देशातील पहिला कागद कारखाना उभारण्यात आला (१७८८). शहरात विविधांगी स्वरूपाचे उद्योग विकसित झाले असून त्यांमधून सूक्ष्म उपकरणे, विद्युत् यंत्रे व त्यांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिकीय घड्याळे, कॅमेरे, इलेक्ट्रॉनिकीय यंत्रे, क्षेपणास्त्रे, धातूंचे जोडकाम, रंग व रोगण, लोखंड ओतकामभट्‌ट्या, प्रक्रियित अन्नपदार्थ, कपडे, अभ्रक इत्यादींचे उत्पादन होते. वॉलथॅम हे इलेक्ट्रॉनिकीय संशोधन व विकास केंद्र म्हणून अग्रेसर मानले जाते. शहराचा सु. सहा किमी. चा अत्यंत रेखीव परिसर विविध भव्य कारखान्यांनी गजबजलेला असून तो ‘गोल्डन सर्कल’ या नावाने ओळखला जातो.

वॉलथॅममध्ये परिचारिका प्रशिक्षण विद्यालय (१८८५), बेंटली महाविद्यालय (१९१७), ब्रँडिस विद्यापीठ (१९४७), मॅसॅचूसेट्‌स विद्यापीठाच्या कृषिविभागाचे एक प्रायोगिक केंद्र अशा विविध शिक्षणसुविधा उपलब्ध करणाऱ्या शैक्षणिक संस्था आहेत. शहरात मतिमंदांसाठी विद्यालय व एक मोठे सैनिकी रुग्णालय आहे. शहरातील ग्रंथालयात विविध प्रकारची दुर्मिळ वॉलथॅम घड्याळे (मनगटी व भिंतीवरील) जतन करण्यात आली आहेत. येथील ‘लायमन हाउस’ (१७९३) तसेच ‘गोअर प्लेस’ हे गव्हर्नर क्रिस्तोफर गोअर यांचे निवासस्थान (१८०५) या दोन्ही वास्तू, परदेशांतून आणलेली फुलझाडे आणि रम्य बगीचे (उपवने) व जुने वृक्ष आणि इंग्लिश विटांतील वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

दळवी, र. कों.