पोलंड : यूरोप खंडातील एक प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ ३,१२,६८३ चौ. किमी. लोकसंख्या ३,५०,४०,००० (१९७८ अंदाज). विस्तार ४९° उ. ते ५४° ५५’ उ. आणि १४° १०’ पू. ते २४° १०’ पू. यांदरम्यान. याच्या पूर्वेस रशिया, दक्षिणेस चेकोस्लोव्हाकिया, पश्चिमेस पूर्व जर्मनी व उत्तरेस बाल्टिक समुद्र आहे. वॉर्सा ही देशाची राजधानी असून तिची लोकसंख्या १५,३२,१०० (१९७७) आहे.

भूवर्णन : पोलंडचा भूभाग बहुतांशी सखल असून त्याची सरासरी उंची केवळ १७३ मी. आहे. देशाचा फक्त ३% प्रदेश ५०० मी.पेक्षा अधिक उंच आहे, तर ७०% प्रदेशाची उंची २०० मी. पेक्षा कमी आहे. कार्पेथियन व आल्प्स हे पर्वत निर्माण करणाऱ्या भूहालचालींचा तसेच हिमयुगामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे विस्तारलेल्या हिमस्तरांचा परिणाम पोलंडच्या भूरचनेवर झालेला आढळून येतो. परिणामतःदेशाचे सहा स्वाभाविक विभाग पूर्व-पश्चिम विस्तारलेले आढळून येतात : (१) देशाच्या दक्षिण सीमेवर पश्चिमेकडे असणारा सुडेटन पर्वतराजीचा भाग हा बोहीमियन गिरिपिंडाचाच भाग आहे. हा पुरातन व दीर्घकालीन झीज होत आलेल्या खडकांचा बनलेला असून त्याची सरासरी उंची इतर स्वाभाविक विभागांच्या तुलनेने कमी आहे. याच्या रीझांगाबिर्गा पर्वतात या भागातील सर्वांत उंच शिखर स्न्येश्का (१,६०३ मी.) आहे. हा विभाग खनिजांनी– विशेषतः दगडी कोळशासारख्या – समृद्ध आहे. लोकसंख्येची घनता जास्त असून व्हाल्ब्‌झिक हे या विभागातील औद्योगिक केंद्र होय. (२) देशाच्या दक्षिण सीमेवर मोरेव्हियन गेटपासून पूर्वेकडे कार्पेथियन पर्वतरांगा पसरल्या आहेत. यांची निर्मिती तृतीयक (टर्शरी) काळात झाली. तात्रा आणि बेस्किड्झ या दोन शाखा पोलंडमध्ये आहेत. बेस्किड्झ या रांगेचा समावेश बाह्य पश्चिम कार्पेथियनमध्ये होत असून बाब्यागूरा हे तीमधील सर्वोच्च शिखर (१,७२५ मी.) आहे. तसेच डूक्ला ही त्यातील खिंड उल्लेखनीय आहे. तात्रा या रांगेचा कार्पेथियनच्या मध्य रांगेत समावेश होत असून तिच्यात पोलंडमधील रिसी हे सर्वोच्च शिखर (२,४९९ मी.) आहे. पर्वतशिखरे, तीव्र उतार असणाऱ्या टेकड्या, कडे इ. आल्प्स पर्वतात आढळणारी वैशिष्ट्ये तात्रा रांगेत आढळतात. तसेच याच रांगेच्या पायथ्याशी झाकॉपाने हे पर्यटनस्थळ आहे. (३) पर्वतराजीच्या पायथ्याच्या प्रदेशाचा या विभागात समावेश होतो. यामध्ये वरच्या डोंगराळ भागात नद्यांची अरुंद खोरी आहेत. त्यांचे दोन उपविभाग पडतात. : (अ) पश्चिमेकडील सायलीशिया खोरे हे वायव्येकडे वाहणाऱ्या ओडर नदीचे असून त्यात कोळसा व लोखंड यांचे भरपूर साठे आहेत. (आ) कार्पेथियनच्या पायथ्याशी असलेली खोरी अंतर्गत भूहालचालींमुळे निर्माण झालेली असून त्यांच्या आग्नेयीकडील भागात लोएस या विशेष प्रकारच्या मातीचे साठे आढळतात. व्हिश्चला नदीच्या पूर्वेला असलेला लूब्लीनचा पठारी भाग सुपीक आहे. या विभागात श्‌फ्येतॉकझिस्की पर्वत असून त्याची कमाल उंची ६१२ मी. आहे. तेथे शेतीबरोबरच खनिज संपत्तीच्या विपुलतेमुळे विविध उद्योगांचा विकास झाला आहे. काटोव्हीत्से, क्रेको, क्येल्त्से, लूब्लीन ही या विभागातील महत्त्वाची शहरे आहेत. (४) पोलंडचा मध्यभाग हा बहुतांशी हिमनद्यांनी तयार केलेल्या भूस्वरूपांचा असून तो उत्तर यूरोपीय पठाराचा भाग आहे. हिमयुगाच्या अखेरीस दक्षिण भागातील बर्फ वितळल्यामुळे हिमस्तर जसजसे उत्तरेकडे सरकू लागले, तसतसे त्यांच्या दक्षिणेकडील कडेला साचलेल्या गाळाने नद्यांच्या दक्षिणोत्तर मार्गात अडथळे उत्पन्न झाले. त्यामुळे त्यांचे पाणी पूर्व-पश्चिम वळविले गेले. परिणामी या भागात पूर्व-पश्चिम पसरलेले खोलगट भूभाग व त्यांतून वाहणाऱ्या नद्या ही ठळक वैशिष्ट्ये आढळून येतात. बग, व्हिश्चला, वार्ता, ओडर या नद्यांचे प्रवाह या भागात अचानक पूर्व-पश्चिम झालेले आढळतात. या नद्यांच्या खोऱ्यांत सुपीक मैदाने आहेत. पोलंडचा हा प्रदेश ऊर्मिल स्वरूपाचा असून तेथील मृदा नद्या व हिमनद्या यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झाल्या आहेत. हा भाग देशाचे मर्मस्थान समजले जाते. याच भागात शेती व उद्योगधंदे यांचा फार मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून वॉर्सा हे राजधानीचे शहर याच विभागात आहे. (५) मैदानी प्रदेशाच्या उत्तरेकडे व्हिश्चला आणि ओडर या नद्यांच्या खालच्या पात्रांनी विभाजित झालेला बाल्टिक समुद्रालगतचा सरोवरांचा प्रदेश. हा हिमोढांनी बनलेला भूभाग असून माजी, रेती, दगड यांच्या टेकड्या व त्यांमध्ये तयार झालेली सरोवरे व तळी ही या विभागाची वैशिष्ट्ये आहेत. या टेकड्यांची उंची काही ठिकाणी ३०० मी. पर्यंतही आढळते. नद्यांच्या खोऱ्यांमुळे या विभागाचे ठळक असे तीन भाग पडतात : (अ) लोअर व्हिश्चला, लोअर ओडर, वार्ता आणि नॉटेच या नद्यांच्या दरम्यानचा पॉमरेनीयन सरोवर प्रदेश, (आ) लोअर व्हिश्चलाच्या पूर्वेकडील माझुरीयन सरोवर प्रदेश. यामध्ये श्न्यार्ड्‌व्ही व माम्री ही मोठी सरोवरे आहेत, (इ) मध्य ओडर व मध्य व्हिश्चला यांदरम्यानचा ग्रेटर पोलंडचा सरोवर प्रदेश. हा प्रदेश जंगलव्याप्त असून विरळ लोकवस्तीचा आहे. मात्र ग्रेटर पोलंड सरोवराच्या पूर्वेकडील भाग शेतीच्या दृष्टीने चांगला आहे. पॉझनान, बिडगॉश, ऑल्श्‌टिन यांसारखी फारच थोडी प्रगत शहरे या विभागात आहेत. (६) पोलंडच्या उत्तर भागात बाल्टिक समुद्रकिनाऱ्यालगत पूर्व जर्मनी ते रशियाच्या सरहद्दीपर्यंत किनारी मैदाने आहेत. त्यांपैकी श्टेटीनचा मैदानी भाग आणि व्हिश्चला नदीचा त्रिभुज प्रदेश शेतीसाठी उपयोगी आहे. या किनारी भागात वाळूचे दांडे, खारकच्छ विपुल असून वाळूच्या टेकड्याही आढळतात. देशाच्या उथळ सागरकिनाऱ्यावर श्टेटीन खारकच्छ, डॅन्झिग आखात, व्हिश्चला खारकच्छ आणि पॉमरेनीयन उपसागर असून किनारी भागात फारच थोडी बंदरे आहेत. त्यांमध्ये श्टेटीन, डॅन्झिग, गदिनीआ ही बंदरे महत्त्वाची आहेत. किनारी भागाचा मध्यभाग मासेमारीसाठी उपयोगी असून कॉवॉब्झेक हे महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे.

ओडर व व्हिश्चला या पोलंडमधील प्रमुख नद्या होत. ओडर नदी (लांबी ९०० किमी.) चेकोस्लोव्हाकियात उगम पावून मोरेव्हियन गेटमधून पोलंडमध्ये प्रवेशते आणि सायलीशिया खोऱ्यातून वायव्येकडे वाहते. नंतर ती उत्तरेकडे वळून बाल्टिक समुद्रास मिळते. वार्ता ही तिची प्रमुख उपनदी होय. व्हिश्चला (लांबी १,०६० किमी.) कार्पेथियन पर्वताच्या बेस्किड्झ रांगेत उगम पावून आग्नेय, मध्य आणि उत्तर पोलंडमधून वाहत जाऊन बाल्टिक समुद्रास मिळते. बग, सान, पीलीत्सा आणि व्ह्येप्श या हिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत.

पूरनियंत्रणासाठी मोठ्या नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत. पोलंडमधील नदीपात्रांतून नौवहन अल्प प्रमाणातच होते. देशात सु. एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापणारी ९,३०० सरोवरे आहेत. सरोवरांनी ३,२०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे.

मृदा : देशातील मृदा प्रदेशपरत्वे वेगवेगळ्या प्रकारची आहे. उत्तर भागात पडझोल प्रकारची मृदा असून ती रेताड स्वरूपात आढळते.  तीत सेंद्रिय द्रव्यांचा अभाव असून रासायनिक खते घालून ती कसदार बनविण्याचा प्रयत्न केला आहे. नद्यांच्या खोऱ्यांतील मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक आहे. सायलीशिया खोऱ्यात आढळणारी लोएस प्रकारची मृदा सर्वोत्कृष्ट आहे. डोंगरभागातील मृदा निकृष्ट आहे.

हवामान : देशाचे हवामान सर्वसाधारणपणे खंडीय प्रकारचे आहे. देशातील बहुतेक भाग मैदानी असल्याने हवामानात खूपच सारखेपणा आढळतो. मात्र समुद्रसान्निध्य व समुद्रसपाटीपासून उंची यांमुळे त्यात प्रदेशविशिष्ट फरक होतो. हिवाळ्यात पूर्व यूरोपकडून येणाऱ्या ध्रुवीय वाऱ्यांमुळे देशाच्या पूर्व भागात हिवाळा कडक असतो. मात्र वायव्य भागातील समुद्रसान्निध्य व उष्ण समुद्रप्रवाह यांमुळे पश्चिम भागातील हिवाळा तेवढा कडक नसतो. प्रतिदिवशीच्या हवामानात फरक होतो. देशाच्या सर्व भागांत हिवाळ्यात तपमान गोठणबिंदूच्याही खाली जाते. पूर्व भागातील व्हिश्चला व पश्चिम भागातील ओडर या नद्यांचे प्रवाह काही भागांत अनुक्रमे सु. १०० व ८० दिवस गोठलेले असतात. या मानाने देशात उन्हाळे कडक असतात व त्यांची तीव्रता उंचीनुसार दक्षिण भागाकडे वाढत जाते. देशातील हवामान ऋतुपरत्वे बदलते व म्हणून उत्साहवर्धक असते. देशाच्या आग्नेय भागातील वार्षिक सरासरी तपमान ८° से., तर ईशान्येकडील थंड भागात ६° से. असते. जुलैमधील सरासरी तपमान उत्तर भागात १६° से., तर आग्नेय भागात २१° से. आढळते. जानेवारीतील सरासरी तपमान पूर्व भागात –७° से. व ईशान्य भागात –१° से. असते. सर्वसाधारणपणे हिवाळ्यात तीन महिने जमीन बर्फाच्छादित असते. देशात पावसाचे प्रमाण बेताचेच आढळते. प्रतिवर्षी सरासरी ६० सेंमी. वृष्टी होते. भूरचनेच्या फरकानुसार हवामानाप्रमाणेच पर्जन्यमानातही फरक आढळतो. द. भागातील डोंगराळ प्रदेशात पाऊस अधिक (सु. ७५ ते १२० सेंमी.) पडतो. ईशान्य भागात पावसाचे प्रमाण कमी म्हणजे ५३ सेंमी. पर्यंत असून, दक्षिणेकडील सुडेटन पर्वतरांगेत ते प्रमाण २०३ सेंमी.पर्यंत असते. उत्तर पोलंडमध्ये पाऊस प्रामुख्याने उन्हाळ्यात पडतो व तो आरोह प्रकारचा असतो. दक्षिण भागात हिवाळ्यातच अधिक पाऊस पडतो व तो बहुधा हिमवृष्टीच्या स्वरूपात असतो.

वनस्पती व प्राणी : पोलंडची नैसर्गिक वनस्पतिसृष्टी गेल्या १०,००० वर्षांतील असून त्यापूर्वीच्या वनस्पती हिमयुगामध्ये नष्ट झाल्या. पूर्वी पोलंडचा बराचसा भाग जंगलव्याप्त होता परंतु जंगलतोडीमुळे देशातील वनस्पतिसृष्टी फारशी समृद्ध नाही. एकूण क्षेत्राच्या सु. २७% क्षेत्र जंगलव्याप्त आहे. हा देश सर्वसाधारणपणे मिश्र प्रकारच्या जंगल विभागात मोडतो. देशाच्या ईशान्य भागातील जंगल नैसर्गिक आढळते. अन्य भागातील जंगले नवीन वाढीमुळे किंवा मुद्दाम लागवड केल्यामुळे तयार झाली आहेत. देशाच्या ईशान्येकडील थंड प्रदेशात ओक, बीच, फर, ॲश, एल्म, बर्च, पॉप्लर यांसारखे रुंदपर्णी व पानझडी वृक्ष आढळतात. डोंगराळ प्रदेशात टंड्रा प्रकारच्या वनस्पती राखीव म्हणून टिकवून ठेवल्या आहेत. यांशिवाय पर्वतीय प्रदेशात हवामानातील फरकाप्रमाणेच उंचीनुसार वनस्पतीही वेगवेगळ्या प्रकारच्या आढळतात. लागवड केलेली जंगले मात्र बहुतांशी सूचिपर्णी वृक्षांची आहेत. हिमनद्यांनी वाहून आणलेल्या रेतीने बनलेल्या टेकड्यांमधील निकृष्ट जमिनीत जंगले मोठ्या प्रमाणात आढळतात. सुपीक मृदा असलेल्या भागात शेतीसाठी जंगलतोड केलेली आहे. देशातील ११ राष्ट्रीय उद्यानांमुळे व ५०० नैसर्गिक राखीव क्षेत्रांमुळे बरीच वनसंपत्ती सुरक्षित आहे.

देशात पृष्ठवंशी प्राण्यांच्या लहानमोठ्या ४०० जाती आढळतात. त्यांपैकी ८३ सस्तन प्राणी व २१२ प्रकारचे स्थानिक पक्षी आहेत. देशातील पानझडी वृक्षांच्या जंगलांत रो हरिण, रेड हरिण, मुख्यत्वे रानडुक्कर इ. प्राणी पहावयास मिळतात तर उंच डोंगराळ प्रदेशातील व उत्तरेकडील सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलांत नट क्रॅकर, ब्लॅक ग्राउस इ. पक्षी व कार्पेथियन पर्वतात शॅम्वा, माँर्मांट इ. प्राणी तसेच दक्षिणेकडील सपाट माळरानाच्या भागात खार, हॅम्स्टर यांसारखे प्राणी आढळतात. यांशिवाय सूचिपर्णी वृक्षांच्या प्रदेशातील एल्क, बिआलोवेझा या राखीव जंगलांतील ‘झुब्र’ नावाचा यूरोपियन गवा हे प्राणीही उल्लेखनीय आहेत.

फडके, वि. शं.

  


इतिहास : पोलिश लोक मूळ स्लाव्ह वंशाचे असून त्यांची भाषा पश्चिम स्लाव्ह भाषासमूहातील आहे. ‘पोलनी’ असा त्यांच्या जमातीचा पहिला  निर्देश नवव्या शतकात आढळतो. हे लोक ओडर व व्हिश्चला नद्यांच्या दुआबात राहत होते. दहाव्या शतकात प्यास्ट घराण्याचा राजा पहिला म्येश्कॉ (कार. ९६३/६४–९९२) पोलंडच्या काही भागावर राज्य करीत होता. ९६६ मध्ये म्येश्कॉने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याने सायलीशिया व क्रेको हे प्रदेश जिंकून तत्कालीन जर्मन सम्राटाशी सलोखा राखूनही आपली स्वायत्तता कायम राखली. म्येश्कॉचा मुलगा पहिला बॉलेस्लाफ (कार. ९९२– १०२५) याच्या वेळी राज्याचा पुष्कळ विस्तार झाला. याला पोलंडचा पहिला अभिषिक्त राजा म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर दुसरा म्येश्कॉ (कार. १०२५–३४) गादीवर आला पण या सुमारास सरदारवर्ग प्रबळ होऊन राजसत्तेचा वचक कमी झाला होता. पोलंडला काही प्रदेश गमवावा लागला. पहिल्या कॅझिमिरने (कार. १०३४–५८) पुन्हा स्थैर्य प्रस्थापित करून राजधानी गिझ्नोहून क्रेकोला हलविली. दुसऱ्या बॉलेस्लाफने (कार. १०५८–८१) पोप सातवा ग्रेगरी यास चौथ्या हेन्‍रीविरुद्ध मदत केली. त्यामुळे त्यास १०७६ मध्ये राजा म्हणून पोपने मान्यता दिली परंतु त्याने क्रेकोच्या स्टानीस्लाफ या धर्मगुरूस शिक्षा दिल्यामुळे त्यास पोलंड सोडून जावे लागले. तिसऱ्या बॉलेस्लॉफच्या (कार. ११०२–३८) वेळी ही स्थिती काहीशी पालटली पण त्याने आपले राज्य आपल्या तीन मुलांत विभागल्यामुळे फुटीर प्रवृत्तींना उत्तेजन मिळाले आणि पुढे शे-दीडशे वर्षे अंतर्गत कटकटी निर्माण झाल्या. याचा फायदा तार्तर लिथ्युएनियन, मंगोल व रशियन आक्रमकांना मिळाला. वरील आक्रमकांचा बंदोबस्त करण्यासाठी मसोव्हिआचा ड्यूक कोनराट याने धर्मरक्षणार्थ लढणाऱ्या ‘ट्यूटॉनिक ऑर्डर’ या जर्मन संघटनेचे साहाय्य मिळविले आणि आक्रमकांना हुसकावून लावले पण संघटनेचा नेता हेर्मान फॉन झाल्टसा (कार. १२१०–३९) याने पोलंडच्या उत्तर भागावर (प्रशियावर) आपला अंमल बसविला व जर्मन सम्राट दुसरा फ्रीड्रिख याने या नव्या राज्यास मान्यताही दिली.

तार्तरादी आक्रमकांना तोंड देण्यासाठी सर्व पोलिश लोकांना संघटित करण्याचे काम पहिला लॅडिस्लास याने केले आणि १३२० मध्ये तो पोलंडचा राजा झाला. त्याने हंगेरीचा राजा पहिला चार्ल्‌स यास आपली मुलगी देऊन व लिथ्युएनियाची राजकन्या आपल्या मुलालाकरून पोलंड निर्वैर करण्याचा प्रयत्न केला. लॅडिस्लासचा मुलगा कॅझिमिर द ग्रेट (कार. १३३३–७०) हा दूरदृष्टी असलेला कुशल प्रशासक होता. विविध शासकीय सुधारणा, कायद्याचे संहितीकरण, क्रेको विद्यापीठाची स्थापना यांसारख्या त्याच्या विधायक कार्यामुळे पोलंडमध्ये खरेखुरे ऐक्य स्थापन झाले. तसेच त्याच्या वास्तववादी परराष्ट्रीय धोरणामुळे पोलंडची गणना यूरोपातील प्रमुख राष्ट्रांत होऊ लागली.

कॅझिमिर निपुत्रिक असल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर प्यास्ट वंश संपुष्टात आला आणि पोलंडचे राज्य त्याचा पुतण्या हंगेरीचा राजा आंझूचा ल्वी (कार. १३७०–८२) याला मिळाले. त्यालाही पुत्र नव्हता, म्हणून त्याने आपल्या जावयाला म्हणजे यागेलो याला दुसरा लॅडिस्लास (कार. १३८४–१४३४) हे नाव देऊन पोलंडच्या गादीवर बसवले. त्याचे प्रशियाच्या ट्यूटन सरदारांच्या सेनेचा ⇨टॅननबर्गच्या लढाईत (१५ जुलै १४१०) पराभव केला आणि ट्यूटनांचे पोलंडवरील वर्चस्व नष्ट केले. यागेलन घराण्याची सत्ता पोलंडवर १३८६ ते १५७२ या काळात टिकून होती. या कालखंडात पोलंड-लिथ्युएनियाचे जोडराज्य अस्तित्वात आले पण हंगेरी, रशिया, तुर्कस्तान वगैरे देशांशी अनेक युद्धे झाली व पोलंड-लिथ्युएनियाचे राज्य बाल्टिक समुद्रापासून काळ्या समुद्रापर्यंत पसरले. पश्चिमी प्रबोधनाच्या या कालखंडात देशातील विद्या-कलांना गती मिळाली. हे मिकॉलाय रे, यान कोकानोव्हस्की इ. साहित्यिकांच्या व निकोलेअस कोपर्निकससारख्या वैज्ञानिकांच्या कार्यावरून स्पष्ट होते. याच सुमारास चौथा कॅझिमिर (कार. १४४५–९२) याने अमीर उमरावांचे संविधानात्मक हक्क वाढविले आणि द्विगृही संसदेची (सेम) स्थापना केली. पुढे क्रेको विद्यापीठातील विद्वानांनी जुन्या कॅथलिक पक्षाचाच पुरस्कार चालू ठेवल्याने पोलंडमध्ये मार्टिन ल्यूथर, जॉन कॅल्व्हिन इ. धर्मसुधारकांच्या विचारांना विशेष उत्तेजन मिळाले नाही. बहुसंख्य पोलिश जनता कॅथलिक पंथालाच चिकटून राहिली परंतु युक्रेन व बायलो-रशियातील सनातनी ख्रिस्ती पंथीयांचे व राज्यकर्त्या रोमन कॅथलिकांचे संबंध सामन्यतः प्रतिकूल असल्याने त्यांतून अनेक संघर्ष निर्माण झाले. पोलंडमधील सरंजामी सत्ता कॅझिमिरने उमरावांना दिलेल्या खास हक्कांमुळे वाढली. विधिमंडळात सरंजामदारांचे प्राबल्य होते व पुढे राजाची निवड करण्याच्या सरंजामदारांच्या हक्काचा दुरुपयोग होऊ लागला. राजाच्या मृत्यूनंतर त्याच राजघराण्यातील योग्य वंशजाला निवडण्याची परंपरा मागे पडून सरदारवर्ग नवा राजा निवडू लागला त्यामुळे कारस्थाने व भांडणे निर्माण होऊन अनिष्ट प्रथा रूढ झाल्या.

सोळाव्या शतकात यागेलन घराण्याची सत्ता संपुष्टात येऊन वैकल्पिक राजेशाहीस प्रारंभ झाला आणि राष्ट्रीय अधिवेशनाने नवीन संविधान अंगीकारले. त्यानुसार राजाच्या अधिकारांवर निर्बंध लादण्यात आले. या शतकाच्या उत्तरार्धात व सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात हंगेरीच्या स्टीव्हन बाटोरी (कार. १५७५–८६) व स्वीडनच्या व्हासा घराण्यातील तिसरा झीगिसमुंट (कार. १५८७–१६३२) व त्याचे वंशज यांनी पोलंडवर राज्य केले. या कालखंडात रशिया, स्वीडन, तुर्कस्तान आदींशी अनेक झगडे होऊन देशाची आर्थिक स्थिती अतिशय खालावली. व्हासा घराण्यातील शेवटचा राजा दुसरा जॉन कॅझिमिर (कार. १६४८–६८) मृत्यू पावल्यावर एका लष्करी अधिकाऱ्याची तिसरा जॉन सॉब्येस्की (कार. १६७४–९६) म्हणून गादीवर निवड झाली. त्याने ऑस्ट्रियन सेनेच्या मदतीने १६८३ मध्ये तुर्कांच्या व्हिएन्नाच्या युद्धात पराभव करून मध्य यूरोपवरील मोठे संकट टाळले. साहजिकच पोलंडचे महत्त्व वाढले. परंतु सॉब्येस्कीनंतर पोलंडमधील वाढत्या अंतर्गत यादवीचा फायदा रशिया, प्रशिया व ऑस्ट्रिया या देशांनी घेतला. सॉब्येस्कीनंतर पोलंड सॅक्सन घराण्यातील राजांच्या ताब्यात गेला (१६९७–१७६३). त्यांना पोलिश लोकांबद्दल फारशी आस्था नव्हती, शिवाय त्यांच्यात राष्ट्रीय भावना नव्हती. १७६४ मध्ये स्टानीस्लाफ दुसरा आउगूस्टची (कार. १७६४–९५) राजा म्हणून निवड झाली. तो कार्यक्षम असून विद्या व कला यांचा चाहता होता. त्याला १७७२ चे विभाजन वाचविता आले नाही. यामुळे यादवीतून १७७२, १७९३ व १७९५ असे तीन वेळा पोलंडचे विभाजन झाले आणि रशिया, प्रशिया व ऑस्ट्रिया यांनी सर्व देश आपापसांत वाटून घेतला. पुढे पहिल्या नेपोलियनने ऑस्ट्रिया, प्रशिया इ. देशांना शह देण्यासाठी आपल्या तंत्राने चालणारे ग्रँड डची ऑफ वॉर्सा हे पोलंडचे राज्य स्थापन केले पण नेपोलियनच्या पराभवाबरोबरच ते लुप्त होऊन व्हिएन्ना काँग्रेसने या राज्याचा बराच भाग रशियाला बहाल केला (१८१५).

 देशाच्या विच्छेदनाने संतप्त झालेल्या पोलिश जनतेत राष्ट्रवादाचे बी सहज रुजले व गमावलेले स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी १८३०, १८४६, १८४८, १८६३ व १९०७ मध्ये लोकांची बंडे झाली पण ती अयशस्वी झाली. मात्र पोलिश देशभक्तांनी इटलीमधील फ्रेंचांच्या सहकार्याने आपला लढा चालूच ठेवला. पहिल्या महायुद्धकाळात १९१५ मध्ये रशियाव्याप्त पोलंड जर्मनांनी जिंकून घेतला व १९१६ मध्ये त्यांना अनुकूल ठरणाऱ्या स्वतंत्र पोलंडची घोषणा करण्यात आली पण जर्मनीच्या अंतिम पराजयाने हे राज्यही संपुष्टात आले व ९ नोव्हेंबर १९१८ रोजी जनरल ⇨यूझेफ पिलसूतस्कीच्या नेतृत्वाखाली पोलंडच्या स्वतंत्र राज्याची स्थापना करण्यात आली. व्हर्सायच्या तहाने पोलंडला पॉझनान आणि बाल्टिक समुद्र यांवर आधिपत्य प्राप्त झाले. १९२० मध्ये घेतलेल्या सार्वमतानुसार सायलीशियाचा काही भागही पोलंडला मिळाला परंतु पॅरिसच्या तहानुसार ठरविलेली पोलंड–रशियामधील कर्झन रेषेची सरहद्द पोलंडने मान्य केली नाही उलट १७७२ पूर्वीच्या म्हणजे देशाच्या पहिल्या विभाजनाच्या वेळच्या सरहद्दीचा आग्रह धरला. या वादातून शेवटी रशियाशी युध्द उद्‌भवले व त्यात रशियाचा पराभव होऊन १९२१ च्या रीगाच्या तहानुसार पोलंडची मागणी बव्हंशी मान्य करण्यात आली. व्हर्सायचा तह व नंतरच्या घडामोडींमुळे जर्मन, बायलो-रशिया, युक्रेनियन, लिथ्युएनियन, चेक, ज्यू इ. अल्पसंख्य लोक नव्या पोलिश राज्यात सामील झाले. पोलंडने नवीन लोकशाही संविधान स्वीकारले तथापि पिलसूतस्की हाच सर्वसत्ताधारी झाला.


  

नवीन संविधानानुसार देशात लोकशाही शासन अस्तित्वात होते आणि शेतीसुधारणा, औद्योगिकीकरण यांसारख्या आर्थिक पुनर्रचनेचा मोठा कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. पिलसूतस्कीच्या निधनानंतर (१९३५) एडव्हार्ट स्मीग्ली-रिट्स सर्वाधिकारी झाला. त्याने पूर्वीचे संविधान रद्द केले व नव्या संविधानानुसार निवडून आलेले विधिमंडळ लष्करी मंडळाच्या तंत्रानुसार वागू लागले. सुरुवातीला पोलंडचे परराष्ट्रीय धोरण फ्रान्स-रूमानियादी देशांच्या मैत्रीसंबंधावर आधारलेले होते पण १९३५ नंतर परराष्ट्रमंत्री कर्नल यूझेफ बेकच्या सल्ल्यानुसार पोलंडने जर्मनी-इटलीशी स्नेहसंबंध जोडले. त्याचा काहीच उपयोग न होता हिटलरने व्हर्सायचा तह रद्द समजून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेखालील डॅन्झिग बंदर जर्मनीला परत मिळावे डॅन्झिग-पोलंडला जोडणारा जर्मनीचा पट्टा पुन्हा जर्मनीला मिळावा इ. मागण्या केल्या. जर्मनीशी बिघडणारे संबंध व त्यांतील धोका लक्षात घेऊन पोलंडने इंग्लंड-फ्रान्सशी संरक्षक तह केले परंतु त्यांची पर्वा न करता १ सप्टेंबर १९३९ रोजी युद्ध न पुकारताच जर्मनीने पोलंडवर स्वारी केली व अवघ्या पंधरा दिवसांत पोलंडला शरणागती पतकरावी लागली. जर्मनी व रशिया यांच्यातील तहामुळे पोलंड देश त्या दोघांत विभागला गेला. पुढे १९४१ मध्ये जर्मनी-रशिया युद्ध सुरू होताच रशियाव्याप्त पोलिश मुलूखही जर्मनीच्या ताब्यात गेला.

 दुसऱ्या महायुद्धाच्या सहा वर्षांच्या काळात हद्दपारीत रॅक्झीविच व्ह्‌लाडिस्लाफ या राष्ट्राध्यक्षाच्या जागी ईग्नाट्सी मॉशचीट्सकी अध्यक्ष झाला आणि फ्रान्समध्ये असलेला व्ह्‌लाडिस्लाफ सीकॉरस्की हा पंतप्रधान झाला. महायुद्धात साठ लक्ष पोलिश नागरिक ठार झाले, पंचवीस लक्ष वेठबिगारीसाठी जर्मनीत पाठविण्यात आले. एकूण सु. ३१ लक्ष ज्यूंपैकी केवळ एक लक्ष ज्यू कसेबसे वाचले व ३८,७०० कोटी रुपयांची आर्थिक हानी पोलंडला सोसावी लागली. निर्घृण जर्मन अत्याचारांना न घाबरता पोलिश भूमिगतांनी जर्मन लष्कराला त्रस्त केले. सुरुवातीस फ्रान्समध्ये व नंतर इंग्लंडमध्ये परागंदा पोलिश सरकारची स्थापना करण्यात आली.

रशियन लष्कराने १९४४ मध्ये पोलंडमधील जर्मनांना हुसकावून लावले व हद्दपारीत लंडन येथे असलेल्या पोलिश शासनाला शह देण्यासाठी लूब्लीन येथे रशियानुकूल पोलिश शासनाची स्थापना करण्यात आली. रशिया व पोलंड यांत वीस वर्षांचा मैत्रीचा तह झाला. पुढे १९४५ मध्ये याल्टा परिषदेच्या निर्णयानुसार लूब्लीन येथील पोलिश सरकारात लंडन शासनातील स्टानीस्लाफ मिकॉलायचिक याचा समावेश करण्यात आला. या नव्या पोलिश शासनाला इंग्लंड–अमेरिकेची मान्यता मिळाली. याल्टा परिषदेने पूर्वीची कर्झन रेषा हीच पोलंडची पूर्व सरहद्द ठरविली व पोलंडने गमावलेल्या मुलूखाच्या बदल्यात नीस व ओडर नद्यांच्या पूर्वेकडील जर्मनव्याप्त मुलूख पोलंडला देण्यात आला.

सीकॉरस्कीच्या मृत्यूनंतर (१९४३) एडव्हार्ट ओसोब्‌का-मोराव्हस्की पंतप्रधान झाला. त्याच्या हाताखाली मिकॉलायचिक आणि व्ह्‌लाडिस्लाफ गोमुल्का यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. पोलिश मंत्रिमंडळात हळूहळू कम्युनिस्टांनी पोलंडमधील विरोधी राष्ट्रीय पक्षाचा, तसेच मिकॉलायचिकच्या शेतकरी पक्षाचा विरोध हाणून पाडला व १९४७ च्या संसदीय निवडणुकीत कम्युनिस्टांना बहुमत मिळाले. परिणामतः मिकॉलायचिकने राजीनाम दिला काही पक्षांनी भूमिगत राहून कम्युनिस्टविरोधी चळवळ चालविली पण सरकारने सर्व राजकीय विरोधकांना क्षमा करण्याचे जाहीर आश्वासन दिल्याने विरोधकांची चळवळ थंडावली. यानंतर सोव्हिएट रशियाच्या धर्तीवर पोलंडचे शासन सुरू झाले. पोलंडच्या संसदेने १९५२ मध्ये नव्या संविधानास मान्यता दिली. या संविधानात रशियाचा आदर्श विशद केला असून त्यानुसार प्रशासनव्यवस्था असावी व सरकारनियुक्त सदस्यांनीच निवडणूक लढवावी, अशी तरतूद करण्यात आली. पोलिश प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षाचे पद रद्द करण्यात येऊन त्याऐवजी कौन्सिल ऑफ स्टेटची स्थापना करण्यात आली व तिचा अध्यक्ष म्हणून अलेक्सांडेर झावाड्स्की याची नेमणूक झाली. बॉलेस्लाफ बायरूट हा पंतप्रधान झाला परंतु लवकरच बायरूटची पोलिश युनायटेड वर्कर्स (कम्युनिस्ट) पक्षाचा मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली व यूझेफ सिरांक्येव्हिच याला पंतप्रधान करण्यात आले. मात्र कम्युनिस्ट पक्षातील विविध गटांत मुद्रणस्वातंत्र्य, धर्मसंस्थेचे अधिकार, आर्थिक नियोजन, सामुदायिक शेती, परराष्ट्रीय धोरण इ. बाबतींत तीव्र मतभेद होऊन त्यांतून अंतर्गत संघर्ष उद्‌भवला. या संघर्षात गोमुल्का, जनरल मेरिअन स्पायचाल्‌स्की इत्यादींचा उदारमतवादी गट मागे पडून सर्व सत्ता स्टालिनवादी नेत्यांच्या हाती गेली. त्यांनी कॅथलिक धर्मगुरूंविरुद्ध कडक धोरण स्वीकारून कार्डिनल स्टेफान व्हिझिंस्की यास तुरुंगात टाकले. स्टालिनवाद्यांच्या दोनतीन वर्षांच्या कारकीर्दीत जनता त्रस्त झाली. हळूहळू लोकक्षोभ वाढून जून १९५६ मध्ये पॉझनान, श्टेटीन इ. शहरांत भीषण दंगली उद्‌भवल्या. शासनकर्त्या गटाला या दंगलींची दखल घेणे भाग पडले व परिणामतः पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्यात येऊन सर्व गटांना मान्य असलेल्या गोमुल्काची पक्षसचिव म्हणून पुन्हा निवड झाली. परंतु गोमुल्का व त्याचे समर्थक एड्व्हार्ट ओकॅब व यूझेफ सिरांक्येव्हिच हे पक्षाची नव्याने बांधणी करीत असतानाच ख्रुश्चॉव्ह व इतर रशियन नेते आणि पोलिश पुढारी यांच्यात विचारविनिमय होऊन पोलंडमधील एकूण परिस्थितीस ख्रुश्चॉव्हने मान्यता दिली व गोमुल्काच्या धोरणास पाठिंबा दिला. गोमुल्काने पूर्वीचे दहशतवादी धोरण बदलून वृत्तपत्रावरील निर्बंध सैल केले, कॅथलिक धर्मगुरूंची मुक्तता केली, शिक्षणसंस्थांतून ऐच्छिक धर्मशिक्षणास मान्यता दिली व सामुदायिक शेतीचे उद्दिष्ट न सोडता, शेतकऱ्यांना वैयक्तिक मालकीच्या जमिनी ठेवण्यास परवानगी दिली.


पोलंडची गणना रशियाच्या अंकित राष्ट्रांत होत असल्याने, पोलंडचे परराष्ट्रीय धोरण सामान्यतः रशियाच्या तंत्राने ठरते. पोलिश जनतेत अधूनमधून रशियाविरोधी वातावरण निर्माण होते तथापि वॉर्सा करारातील संरक्षणविषयक धोरण पोलंडला पूर्णतः मान्य आहे. त्यामुळे १९६८ मध्ये रशियाबरोबर पोलंडनेही चेकोस्लोव्हाकियावरील आक्रमणात भाग घेतला. पोलंडचा सु. दोन तृतीयांश आयातनिर्यात व्यापार कम्युनिस्ट देशांशी चालतो. गोमुल्काच्या नेतृत्वाखाली शासनाला १९५६ च्या दंगलीत स्थिरस्थावर करण्यास अपयश आल्यामुळे साहजिकच पक्षांतर्गत काही बदल अपरिहार्य झाले. १९६४ नंतर ही परिस्थिती काहीशी बदलली. पोलंड-रशियाचे संबंध. मार्क्सवाद इ. विषयांवरील वृत्तपत्रीय लिखाणावर असलेली कडक नियंत्रणे अनेकांना जाचक वाटू लागली. गोमुल्काचे कॅथलिकांविषयीचे उदार धोरणही कित्येक कम्युनिस्टांना मान्य नसल्याने पक्षात त्याबद्दल असंतोष धुमसत होता. अशा अनेक कारणांनी वाढत गेलेल्या जनतेतील असंतोषाचे पर्यवसान १९६८च्या विद्यार्थ्यांच्या दंगलीत झाले पण त्याच वेळी चेकोस्लोव्हाकियातही प्रक्षोभक घडामोडी होत असल्याने रशियन पुढाऱ्यांनी पोलंडमध्ये ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे धोरण अवलंबिले. देशाची आर्थिक स्थिती बिघडतच गेली व सरकारने अन्नपदार्थांच्या किंमतीत तीस टक्के वाढ केल्याच्या सबबीवर डिसेंबर १९७० मध्ये अनेक शहरांत भीषण दंगली उसळल्या व या दंगलींचे पर्यवसान गोमुल्काच्या सत्तात्यागात झाले. त्याच्या जागी एडव्हार्ट ग्येरेकची पक्षसचिव म्हणून नेमणूक झाली व पक्षाच्या कार्यकरिणीतही महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्याने १९७२ ची अस्थिर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अन्नपदार्थांचे भाव खाली आणले. त्यानंतर चार वर्षांनी १९७६मध्ये विधिमंडळाच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यांत युनायटेड वर्कर्स पक्षाला बहुमत मिळून ग्येरेकच पंतप्रधान व पक्षसचिव म्हणुन् सत्तेवर राहिला. खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवाव्यात अशी शासनाची भूमिका होती पण जनप्रक्षोभाची शक्यता ओळखून किंमती स्थिर राखण्यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले, त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक आयोगही नेमण्यात आला.

ओक, द.ह.

राजकीय स्थिती : १९५२ च्या संविधानानुसार पोलंड हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. त्याची सार्वभौम सत्ता या संविधानाने एकसदनी संसद या सर्वोच्च निर्वाचित संस्थेस दिलेली आहे. या संसदेत एकूण ४६० सदस्य असून त्यांची निवडणूक गुप्त मतदानाने होते. संसदेची मुदत चार वर्षांची असून अठरा वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क आहे. संविधानानुसार निवडलेल्या प्रतिनिधीला परत बोलावण्याचा म्हणजे प्रत्यावाहनाचा अधिकार मतदारांना आहे. संसद सदस्यांपैकी सतरा सभासदांचे कौन्सिल ऑफ स्टेट हे मंडळ सर्वसत्ताधारी असते. या मंडळाचा एक अध्यक्ष व एक सचिव असतो. हे मंडळच पंतप्रधान, उपपंतप्रधान व इतर मंत्री यांची निवड करते व मंत्रिमंडळ बनविते. या मंत्रिमंडळावर देशाची शासकीय व प्रशासकीय जबाबदारी असते. मंत्रिमंडळ पूर्णतः कौन्सिल ऑफ स्टेट व संसदेला जबाबदार असते.

संसदेतील बहुसंख्य सभासद हे पोलिश युनायटेड वर्कर्स पार्टी (पोयुवपा) या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून पक्षाच्या पॉलिटब्युरोतर्फे सार्वत्रिक निवडणुकांवर नियंत्रण ठेवले जाते. फेब्रुवारी १९७६ मध्ये १९५२ च्या संविधानातही दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यानुसार पोलिश प्रजासत्ताकाचा उल्लेख स्पष्टपणे समाजवादी राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. सर्व सत्ता पक्ष-काँग्रेस या प्रमुख अंतर्गत समितीकडे असून तिचे दर पाच वर्षांनी अधिवेशन भरते. याशिवाय मध्यवर्ती समिती व पॉलिटब्यूरो हे त्याचे आणखी दोन महत्त्वाचे घटक होत. काँग्रेस मध्यवर्ती समिती निवडते आणि ही समिती पक्षाचे ध्येयधोरण ठरविण्यासाठी पॉलिटब्यूरोची निवड करते. तीत चौदा सभासद व तीन बदली सभासद असतात.

स्थानिक प्रशासनासाठी देशाचे ४९ प्रांतांत विभाजन केले आहे. प्रत्येक प्रांताचे स्थानिक प्रशासन निर्वाचित मंडळातर्फे (पीपल्स कौन्सिल) चालते. या मंडळाच्या निवडणुका दर चार वर्षांनी संसदेबरोबरच होतात. प्रांतांशिवाय लहान शहरे व ग्रामीण भाग (ग्रोमाडा) यांकरिता छोटी मंडळे आहेत. ही मंडळे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांपुरती या प्रदेशांची व्यवस्था पाहतात. या सर्वांवर कौन्सिल ऑफ स्टेटचे नियंत्रण असते आणि त्यांचे अध्यक्ष मंत्रीमंडळाला जबाबदार असतात.

न्यायव्यवस्था : पोलंडमध्ये न्यायदानाच्या सोयीसाठी उच्चत्तम न्यायालय, विशेष न्यायालय, लष्करी न्यायाधिकरण आणि इतर प्रांतिक व विभागीय (जिल्हा) न्यायालये आहेत. उच्चतम न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती कौन्सिल ऑफ स्टेट पाच वर्षांकरिता करते. विभागीय न्यायालयात एक दंडाधिकारी असून, त्याच्या मदतीस दोन सामान्य सभासद असतात. त्यांच्याकडील खटले प्रांतिक न्यायालयात पुढील अपीलासाठी दाखल करतात. सरकारी महाभियोक्त्याची नियुक्ती कौन्सिल ऑफ स्टेट करते. त्याच्याकडे इतर गोष्टींबरोबरच राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असते.

संरक्षणव्यवस्था : पोलंड हे वार्सो कराराने रशिया व इतर पूर्व यूरोपीय देश यांच्याशी संरक्षणदृष्ट्या बांधले गेले आहे. त्यामुळे येथील संरक्षणव्यवस्था व सैनिकी प्रशिक्षण रशियन पद्धतीवर आधारलेले आहे. भूसेना, अंतर्गत सुरक्षा दल आणि हवाई दल यांत प्रत्येक नागरिकाला दोन वर्ष सक्तीची सैनिकी सेवा करावी लागते, तर नौदलात ती तीन वर्ष करावी लागते. १९७८ मध्ये तिन्ही दलांची सैन्यसंख्या ३,०६,५०० होती. त्यांपैकी भूसेना २,२२,००० नौदल २२,५०० व हवाई दल ६२,००० होते. संरक्षक दल व अंतर्गत सीमा सुरक्षा दल यांत ९५,००० सैनिकांचा समावेश होता. १९७८च्या अर्थसंकल्पात सैन्यावर ६·४१ टक्के खर्च करण्यात आला.

देशपांडे, सु.र.

आर्थिक स्थिती : दुसऱ्या महायुद्धानंतर विद्यमान पोलंड देश अस्तित्वात आला. या नव्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर तीन गोष्टीचा परिणाम तेव्हापासून दिसून येतो. एक म्हणजे पूर्वेकडील सु. ४५% कृषियोग्य जमीन, युद्धोत्तर प्रादेशिक पुनर्रचनेनुसार या देशाला गमवावी लागली तर पश्चिमेकडील कोळसा, लिग्नाइट इ. खनिजांनी समृद्ध असा सायलीशियाचा प्रदेश त्यास प्राप्त झाला. दुसरे म्हणजे महायुद्धात झालेली प्रचंड हानी व युद्धोत्तर पुनर्रचनेची तातडी. तिसरी गोष्ट म्हणजे पोलंड सोव्हिएट युनियनच्या प्रभावाखाली आल्याने त्याच्या आर्थिक धोरणाचा पडलेला प्रभाव. या तीनही कारणांमुळे पोलंडच्या अर्थव्यवस्थेला नवे वळण लागले. महायुद्धोत्तर काळात सोव्हियट युनियनच्या धर्तीवर उद्योगधंद्याचे व शेतजमिनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. सामुदायिक शेतीचा प्रयोग करण्यात आला. तथापि अर्थव्यवस्था, विशेषतः कृषी-उत्पादन, झटपट सुधारण्याचा हा प्रयोग यशस्वी न झाल्याने १९५७ पासून सोडून द्यावा लागला. तथापि केंद्रीय नियोजन व नियंत्रण आणि उत्पादन साधनांची राष्ट्रीय  मालकी या दोन प्रमुख गोष्टी पोलिश अर्थव्यवस्थेत पायाभूत आहेत.


देशात खाणकाम आणि कारखानदारी यांत प्रचंड वाढ झाली असून शेती उत्पादन मात्र तितकेसे वाढलेले नाही. राष्ट्रीय उत्पादनात युद्धोत्तर काळात प्रतिवर्षी ५ टक्क्यांनी वाढ होत असून त्यांपैकी दोनतृतीयांश वाढ औद्योगिक उत्पादनातून होत आहे. महायुद्धोत्तर काळात आर्थिक विकास झपाट्याने झालेला दिसला, तरीदेखील साधनसंपत्ती योग्य तऱ्हेने वापरली न गेल्यामुळे खूपच नासाडी झाली. गुंतवणुकीचे उच्च प्रमाण कायम ठेवण्यासाठी व्यक्तिगत उपभोग कमी करणे, हेच अर्थव्यवस्थेचे मुख्य सूत्र राहिले. एकूण उत्पादनापैकी ५४% उत्पादन उद्योगधंद्यापासून, तर केवळ १९% शेती मधून येते.

शेती : १९७७ च्या आकडेवारीनुसार पोलंडच्या ३०३·७८ लक्ष हे भूमिक्षेत्रापैकी १४७·०३९ लक्ष हे. जमीन कृषीयोग्य होती फळबागांखाली २·७९ लक्ष हे. कुरणांसाठी २५·४६ लक्ष हे. चराऊ कुरणांकरिता १५·४६ लक्ष हे. जंगलांखाली ८६·४० लक्ष हे. आणि इतर कारणांसाठी २६·२६ लक्ष हे. जमीन असे स्वरूप होते. १९७७ मधील महत्त्वाची पिके, त्यांचे लागवडक्षेत्र व उत्पादन यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती (आकडे अनुक्रमे लक्ष हेक्टरांत व मे. टनांत) : गहू १८·३३९, ५३·०८  राय ३१·१५७, ६२·५  बार्ली १२·३५४, ३३·९६  ओट १०·९६६, २५·५२ संयुक्त धान्ये ६·२५, १६·२५ बटाटे २४·३६६, ४११·४८ बीट ५·३२, १५६·४० शिरसू ३·९९, ७·०८ कोबी ०·५४, १४·६७ टोमॅटो ०·२७, १८·९१ तंबाखू ०·५४, ०·८७ अळशी व फ्लॅक्स तंतू ०·६२, १·०२. फळफळावळ (आकडे लक्ष मे.टनांत): सफरचंदे ९·११ नासपती १·३७ स्ट्रॉबेरी १·८२ बेदाणे-मनुका १·३०. पोलंडच्या उत्तर व मध्य भागांतील निकृष्ट जमिनीत राय आणि बटाटे ही मुख्य पिके असून गहू हे अतिशय दुय्यम दर्जाचे पीक ठरते. या भागातील कुरणांमुळे वराहपालन व दुग्धव्यवसाय हे येथील इतर महत्त्वाचे व्यवसाय होत. व्हिश्चला त्रिभुज प्रदेशापासून सायलीशियाच्या वरच्या भागापर्यंतचा प्रदेश सुपीक असून त्यात गहू, बीट, फळे व भाज्या तसेच ओट, बटाटे यांचे उत्पादन होते. सायलीशियाच्या खालच्या भागात गहू व बीट यांचे खूप पीक येते. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढत असला, तरी खाजगी शेतांवर घोडा हे महत्त्वाचे शक्तिसाधन आहे. ट्रॅक्टरची संख्या १९५० मध्ये जवळजवळ शून्य तर १९६९ मध्ये १·१२ लक्ष होती. सरकारी क्षेत्रात ट्रॅक्टरची संख्या ६५,००० होती.

सायलीशियाच्या भागात दुग्धव्यवसाय आढळतो. लूब्लीन पठार व कार्पेथियनच्या पायथ्याच्या भागात कुरणे असल्याने त्यात पशुपालनाचा व्यवसाय चालतो. यांशिवाय गहू आणि बटाटे ही मुख्य पिकेदेखील काढली जातात. १९६०–७० या दशकात पोलंड हा पूर्व यूरोपमधील अन्नधान्य उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश होता. बटाटे व राय यांच्या उत्पादनात जगात त्याचा दुसरा क्रमांक आणि बीट उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. सर्वसाधारणपणे पिकांचा उतारा पश्चिम भागात जास्त, तर पूर्व भागात कमी आढळतो. धान्योत्पादन वाढूनही सु. २ दशलक्ष मे. टन धान्य आयात करणे भाग पडते. जनावराची संख्या हळूहळू वाढत आहे. १९७७ मधील पशुधनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती  (आकडे लक्षांत): घोडे २०·६२ गुरे १३०·१९ डुकरे २००·५१ मेंढ्या ३९·३३७ कोंबड्या ७६२·९९ बदके ४४·३६ हंसपक्षी २३·४९ टर्कीपक्षी ६·२३. पशुधन पदार्थांचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे.टनात): डुकराचे मांस १५·४८ कोंबड्यांचे मांस ३·२० मेंढ्यांचे दूध ०·५० गोमांस ६·९८ लोणी २·४४ चीज ३·४५ दूधपावडर १·३२ मध ०·१० कातडी ०·६५ गाईचे दूध १,६४२ कोटी लिटर अंडी ८४९·४० कोटी टन.

एकूण क्षेत्राच्या २७ टक्के जमीन जंगलाखाली असून त्यातील ८१ टक्के क्षेत्र सरकारी मालकीचे आहे. सरकारी जंगलांपासून ९७ टक्के उत्पन्न येते. या जंगलात ८२% क्षेत्र सूचिपर्णी वृक्षांखाली आहे. देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये इमारती लाकडांचा दुसरा क्रम लागतो. पाइन, लार्च, स्प्रूस व फर हे येथील सर्वांत महत्त्वाचे वृक्षप्रकार होत. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सरहद्द-बदलांमुळे पोलंडला सु. १६·१९ लक्ष हे. वनक्षेत्र गमवावे लागले. शासनाने त्यानंतर वनरोपणाचा जोरदार कार्यक्रम हाती घेतला. १९७७ मध्ये मऊ लाकडाच्या वृक्षांपासून १७९·४७ लक्ष घ. मी. तोडीव लाकूड व ६६·६४ लक्ष घ. मी. कापीव लाकूड, तर रुंदपर्णी कठीण वृक्षांपासून ४१·५९ लक्ष घ. मी. तोडीव लाकूड व ११·४८ लक्ष घ.मी. कापीव लाकूड मिळाले होते.

बंदरे व धक्के यांच्यामध्ये करण्यात आलेली सुधारणा व आधुनिक मासेमारी बोटींच्या संख्येतील वाढ यांमुळे मत्स्योद्योग हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. कॉड, हेक, हेरिंग, पिल्चर्ड यांसारख्या सागरी माशांचे १९७७ मधील उत्पादन ६·६८ लक्ष मे.टन होते, तर गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन सु. ३४,५०० मे. टन झाले.

खनिज संपत्ती : नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत पोलंड संपन्न आहे. दगडी कोळसा हे देशाचे प्रमुख खनिज असून १९७० पासून त्याचे उत्पादन प्रतिवर्षी सु. १४ कोटी टन होऊ लागले कोळशाचे बहुतेक सर्व उत्पादन अपर सायलीशियन खाणींतून येते उर्वरीत उत्पादन लोअर सायलीशियाच्या नोव्हारूडा व व्हाल्ब्‌झिक या भागांतून काढले जाते. तपकिरी कोळसा व लिग्नाइट यांचे उत्पादन प्रतिवर्षी सु. ३ कोटी टनांवर होत असून ते नैर्ॠत्य पोलंडमधील कॉनिक–तूरेक व त्यूरोस्‌झो या भागांतून काढले जाते. बॉखन्या सानॉक व क्रॉस्नॉ या दक्षिणेकडील भागांत अल्प प्रमाणात तेल मिळते, तर नैसर्गिक वायूचे साठे लूबाचूफ्का, नोव्हा सूल, चेब्नीत्सा, ऑस्ट्रूफ व्ह्येल्कॉपॉल्स्की, झामॉश इ. शहरांच्या आसमंतात आढळून येतात. गंधक हे पोलंडचे दुसरे महत्त्वाचे खनिज. पोलंडमधील गंधकाचे साठे सबंध जगात सर्वांत मोठे असून ते व्हिश्चिला नदीच्या दोन्ही बाजूंना टारनॉब्झेक या शहराच्या आसमंतात आढळतात. इतर महत्त्वाच्या अधातवी खनिजांमध्ये मीठ, केओलीन, चुनखडक, चॉक, जिप्सम, संगमरवर इत्यादींचा समावेश होतो. सैंधवाचे उत्पादन प्रतिवर्षी सु. ३० लक्ष टन होते. याचे साठे विखुरलेले असून ते सु. ४३ कोटी टन असावेत. पोटॅशियम व मॅग्नेशियम, लवणसाठे, क्वॉदाव्हा, सुडेटन इ. भागांत आढळतात. यांचे साठे सु. ५०,००० कोटी टन असल्याचा अंदाज आहे. तथापि व्यापारी प्रमाणावर त्यांचे उत्पादन अद्यापि चालू झाले नाही. केओलीन हे लोअर सायलीशिया तसेच श्व्हीद्‌नीत्सा  विभागात सापडते. धातवी खनिजांपैकी जस्त हे सर्वांत महत्त्वाचे असून जस्त व शिसे यांचे सर्वाधिक साठे पोलंडमध्ये असल्याचे मानतात. हे साठे बिटॉम, झाव्ह्यर्चे–ऑल्कूश प्रदेशांत आढळतात. अशोधित जस्त व शिसे यांचे उत्पादन १९७० च्या सुमारास प्रतिवर्षी ३५ लक्ष टनांवर असून जस्त उत्पादनात पोलंडचा युरोपात दुसरा क्रमांक लागतो. देशात तांब्याचेही विपुल साठे असून ते लेग्नीत्सा- ग्वॉगूफ आणि बॉलेस्वाव्ह्येत्स- झ्वॉटॉरिया या विभागांत आहेत. लोहधातुकाचेही थोडेफार साठे सापडतात. ह्याशिवाय निकेल, व्हॅनॅडियम, कोबाल्ट, चांदी यांचेही थोड्याफार प्रमाणात उत्पादन होते. १९७७ मधील खनिजोत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे लक्ष मे. टनांत): दगडी कोळसा १,८६१ लिग्नाइट ४०७·६ लोहधातुक ६·५९ अशुद्ध खनिज तेल ३·६४ सैंधव १५·६२  गंधक ४७·६५ नैसर्गिक वायू ७२,९५९ घ. मी.

विद्युत् उत्पादन यंत्रणा सरकारच्या मालकीची असून बव्हंशी औष्णिक विद्युत्‌निर्मिती होते. कोळसा, लिग्नाइट व पीट ही वीज निर्मितीची प्रमुख साधने. जलविद्युत्‌निर्मितीचे प्रमाण केवळ २ टक्केच आहे. ‘ईव्ह’ हा पोलंडचा पहिला आण्विक अभिकारक १९५८ मध्ये कार्यान्वित झाला. तो वॉर्साच्या उत्तरेस ३२ किमी.वर व्हिश्चला नदीवर उभारण्यात आला आहे. १९७७ मध्ये विइजौत्पादन १०,९३६·४ कोटी किवॊ. ता तर निर्मित वायूचे उत्पादन ७८१·१० कोटी घ. मी. झाले.


उद्योग : युद्धोत्तर काळातील योजनांमध्ये भांडवल गुंतवणुकीचे धोरण उद्योगधंद्यांना अनुकूल होते. विशेषतः धातुउद्योग, यंत्रमाल आणि रसायन उत्पादन यांना सरकारी धोरण फार उत्तेजक ठरले. यामुळेच औद्योगिक उत्पादन दरसाल ८·४ टक्के या प्रमाणात वाढले. औद्योगिक प्रगती पू. जर्मनी अगर चेकोस्लोव्हाकिया यांच्याइतकी झाली नसली, तरीदेखील पोलाद, सिंमेट, ट्रॅक्टर, रेल्वे वाघिणी, ट्रॅक यासारख्या उत्पादनात हा देश यूरोपमध्ये अग्रेसर आहे. अशा प्रकारचे अवजड उत्पादन हाच पोलंडच्या उद्योगधंद्यांचा कणा आहे. सत्ताधारी पक्षाच्या धोरणानुसार औद्योगिक विकास हा सार्वजनिक क्षेत्रात असून खाजगी क्षेत्रातील उत्पादनक्षमता फारच कमी आहे. लघुउद्योगांचे प्रमाणदेखील घटत आहे. १९६९ मध्ये खाजगी उद्योगधंद्यांतील कामगारांचे प्रमाण केवळ ४·८% होते.

पोलंडच्या उद्योगधंद्यांत विविधता असून भौगोलिक दृष्ट्या बरेचसे विकेंद्रीकरण झालेले आढळते. परंतु महत्त्वाच्या उद्योगधंद्याचे ठराविक भागांत केंद्रीकरण झालेले आढळते. खाद्यपदार्थनिर्मिती, कापड, यंत्रनिर्मिती हे महत्त्वाचे उद्योग असून त्यांत बरेच लोक गुंतलेले आहेत. सायलीशिया भागात प्रामुख्याने धातुउद्योग विकसित झालेले आढळतात. अशा प्रकारचे उद्योग येथे असण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्चा माल व कोळसा यांची उपलब्धता, हे होय. येथे अलोहित धातू, यंत्रसामग्री व धातुमाल यांचेदेखील  उत्पादन होते. लूज शहर आणि आसपासच्या प्रदेशात कापडउद्योगाचा विकास झाला असून या धंद्यातील ४२% लोक येथे कामात गुंतले आहेत. वॉर्सो शहराभोवतालच्या प्रदेशात वीज-उपकरणे व तत्सबंधित उद्योगधंदे आढळतात. डॅन्झिग व श्टेटीन या शहरात (बंदरांत) जहाजे बांधण्याचे कारखाने आहेत. रासायनिक उद्योग बऱ्याच भागात आढळत असला, तरी काटोव्हीत्से भागात त्याचे विशेष केंद्रीकरण आढळते.

पोलंडमधील ७० टक्क्यांहून अधिक लोकांचा चरितार्थ औद्योगिक व कृषिबाह्य व्यवसाय यांवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधील ५०% वर वाटा औद्योगिक उत्पादनाचा आहे. तांबे व गंधक यांच्या साठ्यांबाबत पोलंड हे जगातील सर्वांत संपन्न असणाऱ्या राष्ट्रांपैकी एक समजले जाते. जहाजबांधणी करणाऱ्या जगातील आघाडीच्या दहा देशांमध्ये पोलंडचा समावेश होत असून ते जगातील चौथ्या क्रमांकाचे जहाजनिर्यातक राष्ट्र म्हणून ओळखले जाते. पोलंडमधील इतर महत्त्वाचे उद्योग म्हणजे कापड व वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पोलाद, सिमेंट, रसायने व खाद्यपदार्थ यांचे निर्मितीउद्योग हे होत.

प्रमुख उद्योगांचे १९७७ मधील उत्पादन पुढीलप्रमणे झाले (आकडे लक्ष मे. टनांत): साखर १६·६८ मार्गरीन १·८५ मद्ये ३०·१ बीर १२१ सिगारेटी ८,९५९·७ कोटी सुती धागा २·१९ सुती कापड ९,४८५ रासायनिक लाकूड लगदा ५·८८ वृत्तपत्री कागद ०·८४  इतर प्रकारचा कागद ९·९४ पेपरबोर्ड २·७० रबर टायर ५४·२५ गंधकाम्ल ३२·९३ कॉस्टिक सोडा ४·५८ नायट्रोजनी उर्वरके १५·२९ फॉस्फेटी उर्वरके ९·६५ प्लॅस्टिके व संश्लिष्ट रेझिने ४·६३ पेट्रोल ३३·५५ इंधन तेले ५०·९८ सिमेंट २१३ कच्चे लोखंड १००·७९ अशोधित पोलाद १७८·४० वेल्लीत पोलाद उत्पादने ११९·४९ ॲल्युमिनियम १·०४ तांबे ३·०७ जस्त २·२८ रेडिओ संच ८३·४८ दूरचित्रवाणी संच ७१·७० व्यापारी जहाजे-स्थूल नोंदणीकृत टनभार २७·६८ मोटारी १५·७७ ट्रक ५·०९ मोटारसायकली व स्कूटर १८·९५ घरगुती धुलाई यंत्रे ७·२४ घरगुती प्रशीतक ८·२१ घरे २·७५९ (वरील आकडे लाखांत). विद्युत् उत्पादन १०,९३६·४० कोटी किवॉ. ता. निर्मित वायू ७८१·१० कोटी घ. मी .

देशातील १९७६ मधील एकूण कामावर असलेल्यांची संख्या १७६·३३ लक्ष होती. या श्रमबलाचे विभाजन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत): शेती, जंगले व मत्स्योद्योग ५४·१६ खाणकाम ४·९२ निर्मितीउद्योग ४५·४४ वीज, वायू व पाणीपुरवठा १·६ बांधकाम १५·०१ व्यापार , हॉटेले व रेस्टॉरंट १३·०९ वाहतूक साठवण व संदेशवहन १२·०७ अर्थकारण, विमा, मालमत्ता व व्यवसायसेवा १·४८ सामाजिक व व्यक्तिगत सेवा २७·७५ इतर ०·८२. १२३ कामगार शासननियंत्रित क्षेत्रात असून ५० लक्ष स्त्रियाही या क्षेत्रात काम करीत होत्या. ‘सेन्ट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स’ ही मध्यवर्ती कामगार संघटना असून ती ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन’ शी संलग्न आहे. तिचे १९७७ मध्ये १३०·६७७ लक्ष सभासद होते. देशात उद्योगनिहाय २३ कामगार संघटना असून त्यांची सदस्यसंख्या एकूण १०० लक्षांहून अधिक आहे. व्यापार, धातुउद्योग, बांधकाम व खाणकाम या उद्योगांतील संघटना सर्वांत प्रभावी आहेत. आठ तासाचा कामाचा दिवस आणि ४८ तासांचा कामाचा आठवडा असतो. ‘सेन्ट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स’ या मध्यवर्ती कामगार महासंघाशी या संघटना सबद्ध असून दर चार वर्षांनी त्यांची निवडणूक होते. या संघटना कामगार कल्याण, त्यांचे प्रशिक्षण तसेच कारखाना- व्यवस्थापनात सहभाग इ. मार्गांनी समाजवादी अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य करतात. ‘सेन्ट्रल युनियन्स ऑफ ॲग्रिकल्चरल सर्कल्स’ ही कृषीउद्योगामधील कामगार संघटना होय. तिची १९५७ मध्ये स्थापना झाली असून तिचे २६,५७,९०० सदस्य आहेत.

पोलंडमध्ये आर्थिक नियोजनास १९४७ पासून प्रारंभ झाला. पहिल्या त्रिवार्षिक योजनेमध्ये (१९४७–४९) दुसऱ्या महायुद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेचे तसेच उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन करण्यावर भर देण्यात आला. परदेशी मदत मिळूनही या योजनेचे फलित अर्थव्यवस्थेत असंतुलन निर्माण होण्यात झाले. अशीच परिस्थिती १९५०–५५ च्या दुसऱ्या षट्‌वर्षीय  योजनाकालात चालू राहिली. उत्पादकाच्या वस्तुउद्योगांचा विकास करण्यावर भर देण्यात आला. याचा उद्देश पुढे होणाऱ्या औद्योगिक विकासाचा पाया तयार करणे, तसेच अन्नधान्योत्पादनात स्वयंपूर्णता आणणे हा होता. अवजड उद्योगांच्या विकासावर भर दिला गेल्याने घरे, वाहतूकसाधने व सामग्री, कृषी, उपभोग वस्तुउद्योग यांसारख्या उद्योगांकडे दुर्लक्ष झाले व साहजिकच ते मागे पडले. १९५६–६० च्या पंचवर्षीय योजनेत सुधारणा करण्यात येऊन औद्योगिक विकासावर थोडा कमी भर देण्यात आला व कृषिउत्पादन, गृहनिवसन, उपभोग्य वस्तुउद्योग व सामाजिक सेवा यांच्या विकासावर अधिक भर दिला गेला. तीन पंचवर्षीय योजनांचा समावेश असलेल्या १९६१–७५ या परिप्रेक्ष्य (पर्स्पेक्टिव्ह) योजनेमध्ये अर्थव्यवस्थेच्या सर्व विभागांमध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट व्यक्त करण्यात आले होते. यांमधील पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये देशातील औद्योगिक कच्च्या मालाचा पाया विस्तारणे व विशेषतः गंधक, तांबे, व लिग्नाइट यांच्या सापडलेल्या साठ्यांबाबत गुंतवणूक करणे जलद वाढणाऱ्या कामकरी वयोगटातील लोकांकरिता सेवारोजगार उपलब्ध करुन देणे आणि देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापारशेष सुधारणे ही तीन महत्त्वाची उद्दिष्टे होती. १९६१–६५ ची योजना औद्योगिक लक्ष्ये गाठू शकली, तथापि शेती व उपभोग्य वस्तुउद्योग यांच्या बाबतीत मात्र तिला अपयश आले. १९६६–७० च्या योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पादन ३४ टक्क्यांनी तर सर्वक्षेत्रीय उत्पादन ४३ टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते रसायनउद्योग व विद्युत् अभियांत्रिकी उद्योग या दोहोंमध्ये सर्वाधिक उत्पादनाचे लक्ष्य ठरविण्यात आले.

पोलंडच्या १९७१–७५ च्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट औद्योगिकीकरणावर भर देऊन निर्यात वाढविणे आणि त्याचबरोबर देशांतर्गत मागणीचीही पूर्तता करणे हे होते. या काळात एकूण कृषिउत्पादन २७ टक्क्यांनी, तर औद्योगिक उत्पादन ७३ ट्क्क्यांनी वाढले. राष्ट्रीय उत्पन्न ६२ टक्क्यांनी, तर विनियोग (गुंतवणुक) प्रमाण ९० टक्क्यांनी वाढले.


देशापुढे १९७५ पासूनच गंभीर आर्थिक समस्या ठाकल्या. एकामागून एक आलेले वाईट पिकांचे हंगाम, यांमुळे करावी लागलेली धान्य आणि वैरण यांची मोठ्या प्रमाणावरील आयात अनेक महत्त्वाच्या वस्तूंचा, विशेषतः मासांचा, अत्यल्प पुरवठा वीज व कच्चा माल यांच्या अनुपलब्धतेमुळे उद्योगधंद्यांवर आलेले संकट, ही त्यांची कारणे होत.

१९७६–८०च्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य औद्योगिक व कृषिक उत्पादनांत अनुक्रमे ५०% (यांत्रिक अभियांत्रिकी, विद्युत् व रसायन उद्योगांवर अधिक भर) व १६% वाढ असे आहे. या काळात राष्ट्रीय उत्पन्नांत ५५ टक्क्यांनी, गुंतवणुकीत ४० टक्क्यांनी आणि निर्यातीमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.

अर्थकारण : झ्लॉटी हे पोलंडचे चलन परिमाण असून ते १०० ग्रॉझींमध्ये विभागलेले आहे. १, २, ५, १०, २० व  ५० ग्रॉझींची आणि १, २, ५, १० व २० झ्लॉटींची नाणी असून ५०, १००, २००, ५००, १००० व २००० झ्लॉटींच्या कागदी नोटा वापरात आहेत. विदेश विनियम दर (१९७८): १०० झ्लॉल्टी =२२·५० रुबल = १६·०१ पौंड= ३१·६३ डॉलर.

‘नॅशनल बँक ऑफ पोलंड’ (१९४५) ही मध्यवर्ती बँक असून तिचे देशातील पतनिर्मिती, पतपुरवठा व पतव्यवहार या सर्वांवर नियंत्रण असते. राष्ट्रीय आर्थिक नियोजनाच्या कार्यवाहीची वित्तीय जबाबदारीही तिच्यावर असते. १ जानेवारी १९७० रोजी पूर्वीची विनियोग बँक नॅशनल बँकेमध्ये विलीन झाल्याने तिलाच गुंतवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वित्तपुरवठ्यावर नियंत्रण ठेवावे लागते. ‘कृषि बँके’ द्वारा शेतीसाठी अल्पकालीन व गुंतवणूक कर्जे पुरविली जातात. ’जनरल सेव्हिंग्ज बँक’ ही बचत व कामगारांच्या सहकारी बँकांचे व्यवहार यांवर देखरेख ठेवते. यांशिवाय विदेश विनियम व्यवहार करणाऱ्या बँकांमध्ये ‘बँक फॉर द नॅशनल इकॉनॉमी’, ‘द पोलिश वेल्फेअर बँक’ व ‘कमर्शियल बँक ऑफ वॉर्सो’ यांचा समावेश होतो. पोलंडमध्ये शेअरबाजार नाही. आयुर्विमाविषयक कार्य ‘पोलिश नॅशनल इन्शुअरन्स कंपनी’ कडे (स्था. १८०३) असून अन्य विमाविषयक व्यवहार १९२० मध्ये स्थापना झालेली  ‘वार्ता इन्शुअरन्स अँन्ड रिइन्शुअरन्स कंपनी’ पाहते.

देशाचा अर्थसंकल्प प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये संसदेला (सेम) सादर करण्यात येतो. वित्तीय वर्ष १ जानेवारीपासून सुरू होते. उद्योगधंदे व सेवाव्यवसाय यांवर आकारण्यात येणाऱ्या पण्यावर्त (उलाढाल) कराचे प्रमाण ३१·५% असून नफा, उत्पन्न, स्थावरसंपदा, जमीन यांवर आकारण्यात येणाऱ्या करांचे तसेच व्यवसाय परवाना शुल्काचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेतनावरील कर उद्‌गामी असून कराचे प्रमाण १% ते २३% पर्यंत असते. साहित्यविषयक, कलात्मक व शास्त्रीय व्यासंगांतून मिळणाऱ्या उत्पन्नांवरील करआकारणी सौम्य असते. सांस्कृतिक व शास्त्रीय व्यवसायांपासून मिळणारे स्वामित्वधन, हस्तोद्योग व्यवसायांपासून मिळणारा नफा, व्यवसायविषयक शुल्क, तसेच स्थावरसंपदा आणि गुंतवणूक यांपासून मिळणारे उत्पन्न यांवर सर्वसाधारण उत्पन्न व नफ़ा कर आकारला जातो. व त्याचा दर ६५% पर्यंत असतो. महसुली उत्पन्नाचे साधन म्हणून सीमाशुल्कांना फारसे महत्त्व नाही. पोलंडच्या विदेश व्यापार संघटनामार्फत केल्या जाणाऱ्या आयात-निर्याती सीमाशुल्कविरहित असतात. १९७७ च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न व खर्च अनुक्रमे ९९,३९४·८ कोटी झ्लॊटी व ८८,७५९·९ कोटी झ्लॊटी होते. उत्पन्नाच्या बाबींमध्ये पण्यावर्त कर व सरकारी उद्योगांचे अर्थसंकल्पीय वाढावे ३५,२४४·८ कोटी झ्लॉटी (३०·०%), सरकारी उद्योगधंद्यांचा प्राप्तिकर अणि नफा यांमधील सहभाग १२,६८७·१ कोटी (सु. ८%), वित्तविभागाचा वाढावा १२,३०५·८ कोटी झ्लॉटी (सु. ८%), सामाजिक विमाहप्त्यांची रक्कम ४,८३७·२ कोटी झ्लॉटी (२·५%), खाजगी क्षेत्राकडून मिळालेली करांची रक्कम ४,३४९·२ कोटी झ्लॉटी (सु. २·२५%) इत्यादींचा अंतर्भाव होतो. खर्चाच्या बाबी पुढीलप्रमाणे (कोटी झ्लॉटींमध्ये): राष्ट्रीय अर्थव्यवस्था ४४,२६५·३ (सु.५६%) शिक्षण ५,९१७·५ (६·५%) आरोग्य ५,८२९·६ (६·४%) संरक्षण ५,७६७·८ (६.२५%) सामाजिक विमा ३,९०८·१ (सु.५%) सार्वजनिक प्रशासन अधिकारिता ३,९७४·१ (सु.५·१%).

व्यापार : अंतर्गत व्यापाराचे जवळजवळ राष्ट्रीयीकरण झाले असून मालाचे विणपन व वितरण तसेच मूल्यनिर्धारण या गोष्टी अंतर्गत व्यापार मंत्रालय व राज्य किंमत मंडळ यांच्यामार्फत निश्चित केल्या जातात. सहकारी संस्थांचाही वितरण व्यवस्थेस थोडाफार हातभार लागतो. पॉझनान येथे प्रतिवर्षी जूनमध्ये भरविण्यात येणारा ‘पॉझनान आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा’ हा व्यापार व उद्योगधंदे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. परदेशांमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारजत्रांत व प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यास पोलिश उद्योगधंदे व व्यापारसंस्था यांना उदारपणे सक्रिय प्रोत्साहन देण्यात येते.

विदेश व्यापार ही राज्याची मक्तेदारी असून त्याची कार्यवाही विदेश व्यापार मंत्रालयाद्वारा केली जाते. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून पोलंडच्या विदेश व्यापाराचा कल पश्चिम व मध्य यूरोपीय देशांपासून तसेच अमेरिकेपासून पूर्व यूरोपीय देशांकडे  झुकला असल्याचे आढळते. युद्धानंतर रशियाच्या प्रभावामुळे पोलंडचा ७०% विदेश व्यापार कम्युनिस्ट राष्ट्रांशी चालत होता. सोव्हिएट रशियाचा यामध्ये साहजिकच प्रथम क्रमांक होता. १९५६ पासून मात्र पश्चिमी देशांबरोबर नव्यानव्या व्यापार संधी आणि करार करण्यास सुरुवात झाली आहे. यांमुळे कम्युनिस्ट राष्ट्रांशी असलेल्या पोलंडच्या विदेश व्यापाराचे प्रमाण ६५% पर्यंत घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलंडबरोबर व्यापार करणारी महत्तवाची राष्ट्रे पुढीलप्रमाणे (१९७७ मधील आकडेवारी आयात निर्यात कोटी झॉल्टींमध्ये): सोव्हिएट रशिया १,४१०·७२, १,२९०·० पूर्व जर्मनी ३६८·८२, ३७९·४० पश्चिम जर्मनी ३५१·७, २५७·९६ चेकोस्लोव्हाकिया २९६·९२, ३०८·६७ ऑस्ट्रिया १८२·४५, ५१·१५ फ्रान्स १८९·९०, १३३·९१ ग्रेट ब्रिटन २७४·१५, ११४·३३ अमेरिकेची संयुक्त संस्थाने १८१·१७, १२१·४३ स्वित्झर्लंड १६५·४०, ४६·३८ हंगेरी १३६·७०, १५५·२६ इटली १२६·२३, ९८·०४ भारत ४१·१२, १७·७५. एकूण आयात व निर्यात अनुक्रमे ४,८५५·८४ व ४,०७४·७८.

पोलंडच्या १९६९ मधील एकूण आयात व्यापारात इंधन तेले, कच्चा माल व अर्धोत्पादित वस्तू यांचे प्रमाण ४७%, तर यंत्रे, अवजारे व उपकरणे, वाहतुक सामग्री यांचे प्रमाण ३६·९% होते. शेतमाल व खाद्यपदार्थ आणि यंत्रसामग्री उपभोग्य वस्तू यांचे प्रमाण अनुक्रमे १०·४% व ५·७% होते. महत्त्वाच्या आयात वस्तूंत खनिज तेल व तज्जन्य पदार्थ, लोह खनिज, संश्लिष्ट उर्वरके, गहू, कापूस व पादत्राणे यांचा समावेश होतो.आयात व्यापार रचनेमध्ये फारसा बद्ल झाला नसला, तरी निर्यात व्यापार रचनेमध्ये लक्षणीय बदल घडून आले. १९५६ मधील इंधने, कच्चा माल व अर्धोत्पादित वस्तू यांचे एकूण निर्यातीतील ६३·८% प्रमाण १९६९ मध्ये ३३% वर आले. त्याच काळात यंत्रे, औद्योगिक व वाहतूक उपकरणे यांच्या निर्यातीचे प्रमाण १५·६% वरून ३९·२% वर म्हणजे दुपटीवर वाढले. वस्त्रे आणि गृहोपयोगी उपकरणे यांसारख्या यंत्रनिर्मित उपभोग्य वस्तूंचे प्रमाण १५·७% वर गेले. शेतमाल व खाद्यपदार्थांचे प्रमाण ११·७% वरून १२·१% वर आले. कोळसा व कोक यांच्या निर्यातीत लक्षणीय घट (१९५९ मधील ५०% वरून १९६९ मध्ये ११·५% वर) दिसून आली. १९७०–७५ या काळात पोलंडच्या एकूण निर्यात व्यापारातील ३३% च्या वर हिस्सा यंत्रे, अवजारे व उपकरणे, संपूर्ण संयंत्रे, शक्तिनिर्मितीयंत्रे आणि जहाजे यांचा आढळून येतो. यांपैकी बरीच जहाजे कम्युनिस्ट, अर्धविकसित व विकसनशील राष्ट्रे यांना निर्यात केली जातात. सुमारे ३३% निर्यात वस्तूंमध्ये इंधने, लोखंड व पोलाद यांचा अंतर्भाव होत असून उर्वरित हिश्शांमध्ये उपभोग्य वस्तू व खाद्यपदार्थ येतात.


वाहतूक व संदेशवहन : दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात देशातील लोहमार्ग, त्यांवरील स्थानके इत्यादींची सर्वागीण सुधारणा करण्यात आली. कमाल वापर असलेल्या लोहमार्गांचे जलद विद्युतीकरण करुन इतरत्र बाष्पएंजिनांऐवजी डीझेल एंजिनांचा वापर सुरू करण्यात आला. अपर सायलीशियन औद्योगिकक्षेत्रातील लोहमार्ग, वॉर्साला जाणारा व क्रेकोवरुन रशियन सीमेवर जाणारे तसेच चेकोस्लोव्हाकियामधील प्रागकडे जाणारे लोहमार्ग यांचे विद्युतीकरण झपाट्याने झाले. १९७० पर्यंत सु. १५% लोहमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. पोलिश स्टेट रेल्वे ही देशातील प्रमुख रेल्वे होय. १९७७ अखेर २६,८३२ किमी. लोहमार्गांपैकी ६,३०८ किमी. मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. त्याच वर्षी पोलिश स्टेट रेल्वेने ११५·१७ कोटी उतारूंची व ४८·१०५ कोटी टन मालाची वाहतूक केली. मालवाहतूक व उतारूवाहतूक यांच्या संदर्भात पोलिश रेल्वेचा यूरोपमध्ये अनुक्रमे दुसरा (रशियानंतर) व चौथा (रशिया, फ्रान्स व प. जर्मनी यांच्यानंतर) क्रमांक लागतो. कोमेकॉन समूहामधील मालवाहतूकीच्या संदर्भात पोलिश रेल्वेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर रस्त्यांचाही विकास करण्यात आला. १९४५–७० या काळात सु. ३७,००० किमी. नवे रस्ते बांधण्यात आले आणि सु. ५६,००० किमी. रस्त्यांचे पृष्ठभाग सुधारण्यात आले. १९७७ मध्ये देशात कठीण पृष्ठभागाचे १,४४,२७२ किमी. रस्ते होते. त्यांपैकी १,०७,०८८ किमी. प्रमुख रस्ते होते. ‘पोलिश मोटर कम्युनिकेशन्स’ (१९४५) ही सरकारी मोटरवाहतूक संस्था आहे. १,०३,६८२ किमी. अंतरापर्यंत बसवाहतूक सेवा उपलब्ध आहे. ‘इंटरनॅशनल रोड कंपनी’ (१९५८) या वाहतूक संस्थेतर्फे पर्यटनपरिक्रमांची (टूरिस्ट-सर्किट्स) तसेच मालवाहतुकीची व्यवस्था पाहिली जाते. १९७७ मध्ये २३,२७,७२९ उतारूंची वाहतूक व ९,३०,८४० कोटी टन-किमी. मालवाहतूक झाली. त्याच वर्षी देशात १५,४७,२७७ मोटरगाड्या ५,०९,४६५ ट्रक ५९,४८७ बसगाड्या आणि १८,९५,५७२ मोटारसायकली व स्कूटर ही वाहने होती. ६,८५० किमी. अंतर्गत जलमार्गांपैकी ३,९८३ किमी. जलमार्ग नौवहनयोग्य आहेत. प्रमुख नद्यांमध्ये व्हिश्चला (१,०४७ किमी.), ओडर (८५४ किमी.), बग (७७२ किमी.), वार्ता (८०८ किमी.), सान, नारेफ (४४२ किमी.), नॉटेच (४३९ किमी), पीलीत्सा (३१३ किमी.), व्ह्येप्श (३१२ किमी.) व डूनायेत्स (२०६ किमी.) या आहेत. पोलंडमधील सु. ५,००० सरोवरांपैकी श्न्यार्ड्व्ही, माम्री, डोब्ये, म्येड्व्ह्ये ही सर्वांत मोठी सरोवरे होत. यांशिवाय देशात १,२१५ किमी. कालव्यांचे जाळे पसरलेले आहे. १९७७ मध्ये अंतर्गत जलमार्गांतून ९१·२८ लक्ष उतारू व १९१·४२ लक्ष टन माल यांची वाहतूक करण्यात आली. पोलंडला गदिनीआ, डॅन्झिग (गदान्यस्क) व श्टेटीन ही तीन मोठी बंदरे लाभली आहेत. १९७७ च्या अखेरीस, पोलंडच्या व्यापारी जहाजांच्या ताफ्यात ३२३ जहाजे (स्थूल नोंदलेला टनभार २७,६८,३००) होती. एक लक्ष भारवस्तू टनांची जहाजे सामावून घेऊ शकेल असे पोर्ट पॉलनॉक्नी नावाचे एक नवीन बंदर डॅन्झिगजवळ बांधले जात आहे. ‘पोलिश ओशन लाइन्स’ व ‘पोलिश स्टीमशिप कंपनी’ या महत्त्वाच्या सागरी जहाजकंपन्या आहेत. वॉर्सा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देशातील बहुतेक मोठी शहरे अंतर्गत हवाई मार्गांनी जोडलेली आहेत. ‘लोट’ (एल्‌ओटी) ही पोलिश हवाई वाहतूक कंपनी (स्था. १९२९) अंतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकींची व्यवस्था पाहते. कंपनीजवळ ४४ विमानांचा ताफा आहे. १९७७ मध्ये १७·५५ लक्ष उतारू  व १८,००० मे. टन माल यांची वाहतूक करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर पोलिश नभोवाणीची नव्याने उभारणी करण्यात आली. ‘नॅशनल कमिटी ऑफ पोलिश रेडिओ अँन्ड टेलिव्हिझन’ या शासकीय संस्थेच्या अखत्यारीत २९ नभोवाणी केंद्रे आणि दूरचित्रवाणीची १७१ प्रसारकेंद्रे आहेत. १९७७ मध्ये देशात ८३·४८ लक्ष रेडिओ संच व ७१·७० लक्ष दूरचित्रवाणी संच होते. ८,०८८ डाक कार्यालये (१९७६) व २९,२५,५०० दूरध्वनी (१९७७) होते.

लोक व समाजजीवन : पोलिश लोक स्लाव्ह वंशाच्या पश्चिमी शाखेतील असून चेक व स्लोव्हाक यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. मानवशास्त्रदृष्ट्या नॉर्डिक, बाल्टिक, दिनारिक व अल्पाइन वंशांचा संकर त्यांमध्ये आढळून येतो. बहुतेक पोलिश हे मध्यम उंचीचे, गौरवर्णीय असून त्यांचे केस साधारण–पिंगट किंवा मध्यम–काळेभोर व डोळे करडे किंवा निळे असतात. १९६० पूर्वी लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दरवर्षी १·६ टक्के होती परंतु त्यानंतर या वाढीची गती रोखण्यात सरकारला यश आले. १९७७ मध्ये जन्म व मृत्यू यांचे प्रमाण अनुक्रमे दरहजारी १९·१ व ९·० असे होते. सरासरी आयुर्मान पुरुष ६८·२ वर्षे व स्त्रिया ७५·६ वर्षे असे होते. दुसऱ्या महायुद्धाचा एक परिणाम म्हणून अजूनही स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे आढळून येते. १९७० मध्ये सर्वसाधारणपणे १,००० पुरुषांमागे १,०६३ स्त्रिया असे प्रमाण होते. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली राष्ट्रीय सरहद्दीची पुनर्रचना आणि लोकवस्तीचे स्थलांतर यांची पोलिश समाजरचनेवर फार चांगला परिणाम घडून आला. सध्याचा पोलंड सांस्कृतिक दृष्ट्या अधिक एकजिनसी असून ९८ टक्के लोक पोलिश आहेत. यांपैकी ९४ टक्के पोलिश रोमन कॅथलिक आहेत. अल्पसंख्याकांचे १९६३ मधील प्रमाण पुढील प्रमाणे होते: पूर्व भागात आढळणारे सु. १,६५,००० गौरकाय रशियन, उत्तर भागात विखुरलेले सु. १,८०,००० युक्रेनियन, नागरी भागात आढळणारे काही हजार ज्यू, रशियाच्या लिथ्थुएनियालगतच्या सीमाप्रदेशात आढळणारे सु. १०,००० लिथ्थुएनियन, २१,००० स्लोव्हाक आणि अल्पसंख्य जर्मन, चेक. १९७७ साली पोलंडमध्ये १०,००० ज्यू होते. मार्च १९७६ च्या एका करारानुसार १९८० पर्यंत पोलंडने १,२५,००० जर्मनांना मायदेशी पाठविण्याचे व त्यानंतर उर्वरीत १,५५,००० जर्मनांकरिता बहिर्गमन परवाने देण्याचे मान्य केले. १९६९ च्या सुमारास १०३·३ लक्ष पोल परदेशी राहत होते. त्यांपैकी ६५ लक्ष अमेरिकेची संयुक्त संस्थाने, १४ लक्ष सोव्हिएट रशिया, १·५ लक्ष ग्रेट ब्रिटन या देशांत होते. १९७७ मध्ये आप्रवासी व उत्प्रवासी यांची संख्या अनुक्रमे १,६०० आणि २८,९०० होती. समाजात कामाच्या स्वरूपानुसार सर्वसाधारणपणे चार वर्ग आढळतात : (१) पक्ष, सरकार आणि सैन्य यांतील अधिकाऱ्यांचा अल्पसंख्य पण प्रभावी गट. (२) कलावंत, लेखक, शिक्षक यांसारखे बुद्धिवादी आणि व्यवस्थापनात गुंतलेले लोक यांचा पांढरपेशा वर्ग. (३) उद्योगधंद्यात गुंतलेला कामगार वर्ग आणि (४) शेतकरी वर्ग. परंतु अशी वर्गवारी ही केवळ सोयीसाठीच आढळते. या चार वर्गांमधील संबंध फार सलोख्याचे आहेत. नवीन व्यवस्थापक हे शेतकरी-कामकरी लोकांतूनच उदयाला येतात. उद्योगधंद्यामधील कामगारदेखील शेतकरी कुटुंबांतच जन्माला येतो.


धर्म : सुमारे ९३% लोकसंख्या रोमन कॅथलिक आहे. पोलंडच्या इतिहासात दहाव्या शतकापासून रोमन कॅथलिक चर्चने बहुमोल कार्य केल्याचे आढळते आणि आजही पोलिश समाजावरील चर्चचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो. चर्च व शासनसंस्था यांचे परस्परसंबंध १९५०, १९५६, व १९७२ च्या करारांन्वये नियंत्रित केले जातात. लूब्लीन येथील विद्यापीठ (कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ लूब्लीन), अकॅडेमी ऑफ कॅथलिक थिऑलॉजी आणि प्रत्येक बिशपच्या विभागातील एक पाठशाला (डायसिस) चर्चमार्फत चालविण्यात येतात. पोलंडमध्ये सु. १ लक्ष प्रॉटेस्टंटपंथीय व अल्पसंख्य ज्यू आहेत.

शिक्षण : युद्धोत्तर काळात साम्यवादी सरकार आल्यानंतर सर्व खाजगी शिक्षणसंस्था बंद करण्यात आल्या. पाठ्यपुस्तकांवर कडक नियंत्रणे आली व ठराविक शिक्षणपद्धती देशभर जारी करण्यात आली. सर्व प्रकारच्या व सर्व पातळ्यांवरील शाळांमधील शिक्षण मोफत आहे. सर्वत्र समान शालेय पद्धती, आठ वर्षापर्यंत प्राथमिक शालेय शिक्षण व वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंतचे पूरक शिक्षण सक्तीचे आहे. सात ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांमुलींना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. शालेय शिक्षणाचा काळ अकरा वर्षांचा आहे. पहिली सात वर्षे प्राथमिक शिक्षण व नंतरची चार वर्षे माध्यमिक शिक्षण दिले जाते. माध्यमिक शिक्षणामध्ये साधारण व तंत्रविद्याविषयक असे दोन शिक्षणक्रम असतात. व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांकडे विशेष लक्ष पुरविले जाते. १९७७–७८ या वर्षी प्राथमिक शाळा १४,७४७, शिक्षक १,८८,६०० आणि विद्यार्थी ४२,५६,८००  माध्यमिक शाळा १,२९४, शिक्षक २५,४०० व विद्यार्थी ५,३७,९०० तांत्रिक कला व व्यावसायिक शाळा व महाविद्यालये १०,७२९, शिक्षक व अध्यापक ७५,४०० आणि विद्यार्थी २०,४६,४०० उच्च शिक्षणसंस्था ८९, शिक्षक व अध्यापक ५१,४०० आणि विद्यार्थी ४,९१,४०० अशी शैक्षणिक आकडेवारी होती. गदान्यस्क विद्यापीठ, क्रेको येथील यागेलोनियन विद्यापीठ, लूज विद्यापीठ, लूब्लीन येथील कॅथलिक विद्यापीठ व मारी क्यूरी- स्क्लॉडॉफ्स्का विद्यापीठ, पॉझनान येथील आडाम मीट्सक्येव्हिच विद्यापीठ, टॉरून्य येथील निकोलेअस कोपर्निकस विद्यापीठ, काटोव्हीत्से येथील सायलीशियन विद्यापीठ, वॉर्सा विद्यापीठ आणि व्र्हॉट्स्लाफ येथील बॉलेस्लाफ बायरूट विद्यापीठ अशी दहा विद्यापीठे असून त्यांमधील विद्यार्थी व प्राध्यापक यांची संख्या अनुक्रमे १,५१,७५४ व १३,२६५ आहे.

आरोग्य : पोलंडमधील आरोग्यव्यस्थेबाबतचे धोरण व नियमन सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. नोकरभरती, मार्गदर्शन, इमारती व वैद्यकीय उपकरणे या सर्वांची जबाबादारी या मंत्रालयाकडेच असते. १९५२ पासून देशाचे वैद्यकीय क्षेत्र, प्रदेश व जिल्हे असे विभाजन करण्यात आले आहे. आरोग्यसेवा ही चिकित्सालये, रुग्णालये, आरोग्यधामे, रुग्णवाहिका सेवा आणि राष्ट्रीय आरोग्यविषयक निरीक्षणसेवा मिळून बनलेली आहे. सामाजिक विमा योजनेमुळे सरकारी उद्योगधंद्यातील सर्व कर्मचारी-कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना पूर्णतया वैद्यकीय उपचार व औषधे पुरविली जातात. इन्फ्ल्यूएंझा, क्षय यांसारख्या रोगांचे प्रमाण अद्यापही मोठे आहे. माता व मुले यांची काळजी अधिकाधिक प्रमाणात घेतली जात असल्याने १९५०-५१ पासून बालमृत्युमानात ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे  आढळते. १९७६ मध्ये हे प्रमाण दरहजारी २४ होते. १९७०-७५ या काळात दर दहा हजार लोकांमागे ६२ खाटा व १५ डॉक्टर असे प्रमाण होते. हे प्रमाण अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वित्झर्लंड, पश्चिम व पूर्व जर्मनी आणि बेल्जियम या देशांमधील प्रमाणाएवढेच होते फ्रान्स, नेदर्लंड्स, स्वीडन, नॉर्वे, कॅनडा व जपान या देशांच्या मानाने पोलंडामधील प्रमाण मोठे होते. १९७६ मध्ये देशात ६३७ रुग्णालये (यांतच ३६ मनोरुग्णालये समाविष्ट) व २,२९,५०० खाटा ५,८२८ दवाखाने व ३,१३० आरोग्यकेंद्रे ६०,००० डॉक्टर आणि १६,४०० दंतवैद्य होते.

पोलिश सामाजिक कल्याण व्यवस्थेचे नियमन आरोग्य व समाजकल्याण मंत्रालयाद्वारे केले जाते. सर्व कामगार आणि ग्रामीण लोक यांना मोफत वैद्यकीय सेवा उपल्ब्ध केली जाते. बालके, स्त्रिया व शाळेत जाणारी मुले यांच्याकरिता विशेष प्रकारचे दवाखाने असून सर्वस्पर्शी औद्योगिक आरोग्यसेवा कार्यवाहीत आहे, सामाजिक विमा व्यवस्था देशाच्या सर्व भागांत पोहोचलेली आढळते. वार्धक्य, विकलांगता आणि उत्तरजीवी यांची निवृत्तिवेतने, त्याचप्रमाणे कौटुंबिक भत्ते, बेकारी भरपाई, आजार-लाभ व प्रसूति-लाभ पुरविले जातात. धोक्याच्या, अनारोग्याकारक उद्योगधंद्यांमध्ये पुरुष व स्त्रिया यांचे सेवानिवृत्तीचे वय अनुक्रमे ६० व ५५, तर इतर ते अनुक्रमे ६५ व ६० असते. सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांतर्गत विशेष कौटुंबिक भत्ते देण्यात येतात. देशात निवृत्तिवेतनधारी, कायम आजारी असलेले, मनोदुर्बल व मतिमंद लोकांची काळजी वाहणारी सु. ५०० गृहे असून त्यांमधून सु. ५०,००० लोकांची सोय केली जाते.


गृहनिवसन : दुसऱ्या महायुद्धामुळे देशातील गृहनिवसन कार्यावर अतिशय गंभीर परिणाम झाले. नगरपालिकीय व गृहनिवसन अधिकाऱ्यांपुढे गृहनिर्माण टंचाईची जटिल समस्या उभी राहिली. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाणाऱ्या लोकसंख्येच्या ओघामुळे तसेच औद्योगिकीकरणावर अधिक प्रमाणात भर दिल्यामुळे गृहनिर्माणासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक निधीवरही ताण पडल्याने ही समस्या अद्यापपावेतो सुटलेली नाही. मोठ्या नागरी भागांमध्ये घरांचा मोठा तुटवडा आहे १९७०च्या सुमारास गृहनिवसनाचे राष्ट्रीय प्रमाण १·४ नागरिकास १ खोली असे होते. इतर यूरोपीय देशांमधील प्रमाणापेक्षा हे प्रमाण फारच खालच्या पातळीचे होते. नागरी भागात गृहनिवसन कार्य राष्ट्रीय परिषद व गृहरचनासंस्था, तर ग्रामीण भागांत खाजगी संस्था यांच्या हाती आहे. १९७७ मध्ये २,७५,९०० घरे बांधण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात पोलंडच्या समाजरचनेत फार मोठे बदल घडून आले. उद्योग व व्यापार यांचे राष्ट्रीयीकरण केल्यामुळे जमीनदार वर्ग आणि नागरी भागातील भांडवलदार वर्ग हे दोन्ही नाहीसे झाले. साहजिकच सामाजिक व राजकीय भर कामगारवर्गावर देण्यात आला. महायुद्धपूर्व काळातील शेतकऱ्यांचे आधिक्य युद्धोत्तर काळात कमीकमी होऊ लागले. १९७० च्या सुमारास ते एकूण लोकसंख्येच्या २९% एवढेच राहिले. बुद्धिवंत वर्गामध्येही बदल घडून आला. युद्धपूर्व काळात या वर्गात स्थावरसंपदा व मालमता असणाऱ्यांचाच प्रकर्षाने भरणा होता  युद्धोत्तर काळात मात्र या वर्गात कृषिक व श्रमिक वर्गांची पार्श्वभूमी लाभलेल्या लोकांचाच अधिककरून समावेश होत गेल्याचे आढळते. शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावरील प्रसार हे याचे एक महत्त्वाचे कारण होय. पांढरपेशा लोकांची संख्या तर युद्धपूर्व काळापेक्षा तिपटीने वाढली. थोड्याफार प्रमाणात खाजागी व्यापार-व्यवसाय करणाऱ्या लोकांमुळे देशात अत्यल्प प्रमाणात निम्नस्तरीय मध्यमवर्ग राहिला आहे.

या सामाजिक विभाजनामागील जीवनमान ठरविणारा मूलभूत घटक म्हणजे वेतनपातळी हा होय. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत गुंतलेले कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय हे धरून (कृषिक वर्ग वगळून) एकूण लोकसंख्येच्या ६०% होतात. १९७० च्या सुमारास प्रत्येक मनुष्यामागील सरासरी खर्चप्रमाणाची टक्केवारी पुढीलप्रमाणे होती : अन्न ४१·४ मद्य व तंबाखू ११·४ वस्त्रे व पादत्राणे १३·९ निवसन ७·३ उष्णता व प्रकाश २·५ आरोग्य ७·८ सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षण, खेळ व प्रवास ९·७ आणि वाहतूक व संदेशवहन ४·८.

गद्रे, वि. रा.

भाषा-साहित्य : पोलिश ही मध्य यूरोपातील, पश्चिम स्लाव्हिक गटातील एक महत्त्वाची भाषा. ह्या भाषेतील आज उपलब्ध असलेले सर्वांत प्राचीन साहित्य तेराव्या-चौदाव्या शतकांतील असून ते धार्मिक स्वरूपाचे आहे. सोळावे शतक हे पोलिश साहित्यातील सुवर्णयुग होय. पोलिश भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारा मिकॉलाय रे हा सहित्यिक ह्याच शतकात होऊन गेला. यांत कोकानोव्हस्की ह्या श्रेष्ठ कवीचे कर्तृत्वही ह्याच शतकातले. सतराव्या-अठराव्या शतकांतील उल्लेखनीय साहित्यकृतींत व्हाट्स्लाव्ह पॉटॉट्स्की ह्याच्या ‘चोसीम्स वॉर’ (इं. शी.) ह्या महाकाव्याचा उल्लेख करावा लागेल. ईग्नाट्स्की क्रासीट्स्की, फ्रानट्सीशेक झाब्लॉट्स्की हे ह्या कालखंडातील उल्लेखनीय असे आणखी काही साहित्यिक होत. एकोणिसाव्या शतकाचा आडाम मीट्सक्येव्हिच ह्या कवीने स्लाव्ह जगतात, पोलिश कवितेला सर्वाधिक मानाचे स्थान प्राप्त करून दिले. यूल्यूश स्लॉव्हाट्स्की, झिग्मूंट क्रासीन्यस्की, आलेक्सांडर फ्रेड्रॉ, बॉलेस्लाव्ह प्रूस, एलिस ओरेष्कोव, हेन्‍रीक शेनक्येव्हिच (साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी–१९०५) गाब्रिएला झापॉल्स्का, काझीम्येश टेटमायेर, लेऑपॉल्ट स्टाफ, स्टानीस्लाव्ह व्हिसप्यान्यस्की, स्टेफान झेरॉम्स्की, व्ह्‌लाडिस्लाव्ह रेमाँट ह्यांचाही- अंतर्भाव ह्या शतकातील महत्त्वाच्या साहित्यिकांत होतो. नव्या छंदाची आणि रचनातंत्रांची निर्मिती करणारा कवींचा एक गट स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या (१९१८ नंतरच्या) पोलिश साहित्यात काही काळ प्रभावी ठरला. ‘स्कॅमन्‌ड्राइट्स’ ह्या नावाने तो ओळखला जातो. युल्यान टूव्हीम हा त्यांच्यापैकी सर्वश्रेष्ठ कवी होय. पोलिश कवितेला क्रांतिकारक वळण लावण्याचा प्रयत्न ‘व्हॅन्‌‍गार्ड ग्रुप’ (इं.शी.) ह्या नावाने पुढे आलेल्या काही कवींनीही केला. यूल्यान प्शिबोस हा ह्या गटातील एक विशेष उल्लेखनीय कवी. १९३० नंतरच्या काळात पोलिश गद्य विशेष संपन्न होत गेल्याचे दिसते. झॉफ्या नालकॉफ्‌स्का, मार्या ड्राँन्ब्रॉफ्‌स्का, यूल्यूश काडेन- बानड्रॉफ्‌स्की ह्यांनी कादंबरीलेखनाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. टाडेऊश झेलेन्यस्की ह्याने फ्रेंच साहित्यकृतींचे दर्जेदार पोलिश अनुवाद केले. १९४९ ते १९५५ ह्या काळात पोलिश साहित्यिकांना काही बंधनांना तोंड द्यावे लागले असले, तरी १९५६ पासून मात्र साहित्यिकांना वाङ्‌मयीन अभिव्यक्ती मोकळेपणाने करणे शक्य झाले आहे. साहित्याच्या कार्यासंबंधी एक व्यापक जाणही दाखविली जात आहे. [→पोलिश भाषा  पोलिश साहित्य].


पूर्व यूरोपमध्ये पोलिश वृत्तपत्रसृष्टी ही मोठ्या प्रमाणावर विभिन्न स्वरूपाची मानली जाते. इतर संदेशवहन माध्यमांप्रमाणे पोलिश वृत्तपत्रांचेही १९४६ मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले आजही त्यांच्यावर कडक शासकीय नियंत्रण आहे. बहुतेक वृत्तपत्रे व मासिके यांचे प्रकाशन ‘पोलिश युनायटेड वर्कर्स पार्टी’ या कम्युनिस्ट पक्षाद्वारेच केले जाते. १९५२ च्या संविधानानुसार वृत्तपत्रे स्वातंत्र्याची हमी देऊनही त्यांच्यावर प्रशासकीय संस्थांकरवी सर्वसाधारण नियंत्रण ठेवले जाते. पोलिश वृत्तपत्रांतून काय छापले जावे, याबाबतचे सर्वसामान्य धोरण शासनाने आखून दिलेले असून अद्यापही पक्षाची मतप्रणाली वृत्तपत्रांना अनुसरावी लागते. असे असूनही, पोलंड हा कम्युनिस्ट गटराष्ट्रांमध्ये अधिक वृत्तीचा मानला जातो आणि ही राष्ट्रीय वृत्ती वृत्तपत्रांतून प्रतिबिंबित झालेली आढळते. १९५४ पासूनच राष्ट्राच्या आर्थिक विकासाची समस्या हाच मुळी पोलिश वृत्तपत्रांचा प्रमुख आणि महत्त्वाचा विषय झाल्याचे सूचित होते. यूरोपीय विचारप्रवाहांची दखल राष्ट्रीय दृष्टिकोणातून घेऊन अधिकाधिक पोलिश वृत्तपत्रसंपादकांनी आपले विचार वेळोवेळी व्यक्त केले आहेत. यामुळे इतर सर्व यूरोपीय देशांमधील वृत्तपत्रांपेक्षा पोलंडची वृत्तपत्रे ही अधिक वस्तुनिष्ठ, लोकमताचे अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व करणारी आणि आपल्या वाचकांनी आपल्यावर टाकलेल्या जबाबादारीची अधिक जाणीव असणारी अशी बनली आहेत. या राष्ट्रीय जाणिवेमुळे पूर्व यूरोपीय देशांतील वृत्तपत्रांपेक्षा येथील वृत्तपत्रे अधिक प्रमाणात स्वत्व राखून आहेत. पश्चिमी देशांशी पोलंडचे नेहमीच घनिष्ट संबंध राहिलेले असून पोलंडच्या वृत्तपत्रांवर व नियतकालिकांवर पश्चिमी राष्ट्रांचा मोठा प्रभाव पडला असल्याचे जाणवते. ट्रायब्यूना लुदू (१९४८) हे पोलिश युनायटेड वर्कर्स पार्टीचे दैनिक मुखपत्र असून त्याचा खप ९ लक्ष प्रती आहे.एक्स्‌प्रेस विएक्झॉर्नी (१९४६) या अपक्ष सायंदैनिकाचा खप ५·६० लक्ष प्रती आहे. झायसी वॉर्स्‌झावी (१९४४) या स्वतंत्र बाण्याच्या दैनिकाचा खप ३·६० लक्ष प्रती आहे. या दोन्ही दैनिकांवर पश्चिमी वृत्तपत्रांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. पर्स्पेक्टिवी (खप २·७ लक्ष प्रती) ह्या राजकीय सचित्र साप्ताहिकावरही पश्चिमी प्रभाव आहे. यांशिवाय ग्लॉस प्रासी (१·६० लक्ष प्रती) हेही प्रसिद्ध दैनिक आहे. १९७७ मध्ये देशातील ४४ दैनिकांचा खप ८३·३२ लक्ष प्रती व २,२९७ नियतकालिकांचा एकूण खप ३१८ लक्ष प्रती होता. नियतकालिकांमध्ये एक्रान (१·२ लक्ष प्रती) हे मासिक फोरम (१ लक्ष प्रती)– विदेश वृत्तपत्रसृष्टीचे सर्वेक्षण करणारे मासिक कारुझेला (६ लक्ष प्रती) हे उपहासात्मक पाक्षिक कोबिएता इ झायसी हे स्त्रियांचे साप्ताहिक (६·३ लक्ष प्रती) पॅनोरामा (५ लक्ष प्रती) हे सायलीशियन सचित्र मासिक  आठवड्यातून पाच वेळा प्रसिद्ध होणारे स्पोर्ट (‌२·१ लक्ष प्रती) ही प्रसिद्ध नियतकालिके होत. ‘पोलिश प्रेस एजन्सी’- ‘पॅप’(१९४४) हिच्या पोलिश शहरे व विदेशी राजधान्या यांमधून ७७ शाखा आहेत.

कला व क्रीडा : पोलंडच्या कलेतिहासात प्रागितिहासकालीन मृत्तिकाशिल्पे उल्लेखनीय आहेत. क्रेको येथील मेरियन चर्चमधील फाइट श्टोस (१४४० ? – १५३३) या प्रख्यात जर्मन शिल्पकाराने घडविलेले त्रिपुट काष्ठशिल्प हे रोमनेस्क व गॉथिक शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. उत्तर मध्ययुगीन आणि प्रबोधनकालीन नागरी वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने क्रेकोमध्ये आढळतात. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत नवअभिजाततावादी शैलीच्या अनेक स्मारकवास्तू वॉर्सो येथे उभारण्यात आल्या. उदा. लॅझिएन्की उद्यानातील राजवाडा. स्टानीस्लाफ सॅमोस्ट्रझेल्‌निक (सु. १४८५–१५४१) हा प्रबोधनकाळातील एक श्रेष्ठ चित्रकार होय. अठराव्या शतकत पोलंडने परदेशी चित्रकारांना मोठ्या प्रमाणावर राजाश्रय दिला त्यांमध्ये व्हेनिसचा चित्रकार बेर्नार्दो बेलॉत्तो (१७२०–८०) आणि फ्रेंच चित्रकार झां प्येर नॉर्‌ब्लिन (१७४५–१८३०) हे उल्लेखनीय आहेत.

एकोणिसाव्या शतकात पोलिश कलेला प्रखर राष्ट्रवादाची जोड मिळाली. प्यॉटर मायकेलोफ्‌स्की (१८००–५५), यान माटेईकॉ (१८३८–९३) आणि यान केलमीन्यस्की (१८५१–१९२५) या चित्रकारांची ऐतिहासिक व युद्धविषयक चित्रे या दृष्टीने महत्त्वाची आहेत. फ्रेंच दृक्‌प्रत्ययवादाचाही मोठा प्रभाव या काळातील पोलिश चित्रकृतींवर पडलेला आढळतो. क्रेको येथील ‘यंग पोलंड चळवळी’पासून स्फूर्ती घेतलेल्या चित्रकारांच्या गटात स्टानीस्लाफ व्हिस्प्यान्यस्की (१८६९–१९०७), यान स्टानीस्लाफ्‌स्की (१८६१–१९०७) इत्यादींचा समावेश होतो.

  

विसाव्या शतकातील झिग्‌मूंट व्हॅलिस्झेफ्‌स्कीच्या कलाकृत्तींतून उत्तरदृक्‌प्रत्ययवादाचा प्रत्यय येतो. टायटस चेझेफ्‌स्की (१८८०–१९४५), आंजेई प्रोनॅझ्को (१८८५–१९५८), स्टानीस्लाफ इग्नाट्सी वीत्‌क्येविच (१८८५–१९३८) इत्यादींच्या कलाकृतींतून अप्रतिरूपण व प्रायोगिकता या प्रवृत्तींचे दर्शन होते. १९२० नंतरच्या काळातील व्ह्‌लाडिस्लाफ झेलेन्यस्की (१८३९–१९५२), म्येचिस्लीफ श्‌चूका (१८९८–१९२७) या रचनावादी चित्रकारांची निर्मिती औद्योगिक कलेस साह्यभूत ठरली. इतर काही चित्रकार अतिवास्तववादाकडे व अभिव्यक्तिवादाकडे वळले. याच सुमारास पोलंडच्या पारंपरिक कलाप्रकारांना व लोककलांना उजाळा मिळाल्याचे दिसते. पोलिश ॲप्लाइड आर्ट सोसायटी, क्रेको (१९०१), क्रेको स्ट्युडिओज (१९१३)  आणि वॉर्सा को-ऑपरेटिव्ह लँड (१९२६) ह्या संस्थांनी पोलिश कला व कारागिरी यांना उत्तेजन दिले. विणकाम, धातुकाम, मृत्तिकाशिल्प यांमध्ये व विशेषतः आरेख्यक कलांमध्ये नवनवीन कलापरंपरांचा उदय झाल्याचे आढळते. व्ह्‌लाडिस्लाफ स्कोचिलास (१८८३–१९३४) हा पोलिश काष्ठठशाचा प्रवर्तक मानला जातो. म्येचिस्लाफ वेमन (१९१२–   )हा क्रेको आरेख्यक कलासंप्रदायाचा संस्थापक मानतात. क्रेको येथे आंतरराष्ट्रीय ‘आरेख्यक कला द्विवार्षिक प्रदर्शन’ भरविण्यात येते.


दुसऱ्या महायुद्धामुळे झालेला संहार आणि त्यानंतरचा औद्योगिकीकरणाचा वेग यांमुळे वास्तुकला, नगररचना इत्यादींत नव्या कल्पनांचा उदय झाला. याच कालखंडात चित्रकलेच्या क्षेत्रात जुने आणि नवे यांत संघर्ष उद्‌भवला. यूरोपीय वारसा स्विकारणाऱ्या परंपरावादी चित्रकारांत महत्त्वाचे कलावंत म्हणजे यान सिबिस (१८९७–१९७२), आर्टूर सॅंबोर्स्की (१८९८– ),एऊनीगीउश आयबिश (१८९६– ) हे होत. आंजई व्र्हूब्लेफ्‌स्की (१९२७–५७) या चित्रकाराच्या चित्रनिर्मितीत साधेपणा व शोकात्मता हे गुण जाणवतात.

आधुनिक काळात पोलंडमध्ये दूनिलोफ्‌स्की, व्हिटीग यांसारखे ख्यातनाम शिल्पकार निर्माण झाले आहेत. आनतॉनी केनार (१९०८–५९) यासारख्या कलावंताने तर लोककलाधारित असा अभिव्यक्तिवादी संप्रदाय निर्माण केला. भित्तिपत्रिका व ग्रंथचित्रांच्या कलेने पोलंडला ख्याती मिळवून दिली असून यांमध्ये हेन्‍रीक टॉमाशफ्‌स्की, स्टानीस्लाफ झामेचनिक (१९०९–७१), यूझेव्ह व्हिल्‌कॉन (१९३०– ) इ. कलाकार उल्लेखनीय आहेत. अनेक पोलिश चित्रकार व आरेख्यक कलाकार यांनी परदेशांमध्ये नाव मिळविले आहे.

क्रेको येथील वेव्हेल किल्ल्यामध्ये असलेल्या कलावस्तुसंग्रहालयात १३ ते १६ शतकांतील राजेरजवाड्यांजवळील असलेल्या कलावस्तूंचे काही नमुने पाहावयास मिळतात. या संग्रहालयात डच व इटालियन चित्रसंग्रह तसेच इटालियन फर्निचर, पौर्वात्य गालिचे, तुर्की व इराणी राहुट्या इत्यादींचे अप्रतिम संग्रह पाहावयास मिळतात. पॉझनान येथील राष्ट्रीय संग्रहालयात (स्था. १९०४) पोलिश आणि परदेशी चित्रे, शिल्पे असून वॉर्साच्या राष्ट्रीय संग्रहालयातही पोलिश कलावस्तू प्रकर्षाने आढळतात. ललीत, उपयोजित व आरेख्यक कलांचे विविध नमुनेही पहावयास मिळतात.

संगीत : चौदाव्या व पंधराव्या शतकांतील पोलिश चर्च संगीत हे अप्रतिम समजले जाई. सोळाव्या शतकात तर क्रेको हे मध्य यूरोपातील संगीतकेंद्रच बनले होते. अठराव्या शतकात राष्ट्रीय चळवळ सुरू झाल्यावर पोलिश संगीतकार आपल्या संगीतरचनांमध्ये राष्ट्रभक्तिपर गाणी व नृत्ये अंतर्भूत करू लागले. ‘क्रॅकोव्याक’, ‘कूजाव्हियाक’, ‘मझुर्क’ हे नृत्यप्रकार त्या त्या प्रांताच्या नावावरून ओळखले जाऊ लागले. ‘पोल्क’ व ‘पोलोनेझ’ या नृत्यप्रकारांचेही मूळ पोलंडमधीलच मानतात. के. क्युर्पिन्स्की (१७८५–१८५७), एम्. कामेन्यस्की (१७३४–१८२१) व जे. एल्झ्नेर (१७६९–१८५४) हे आपल्या संगीतरचनांना राष्ट्रीय संगीताचे अधिष्ठान देणारे पहिले संगीतकार होत. एल्झ्नेर हा तर जगप्रसिद्ध व महान पियानोवादक फ्रेदेरीक शॉपॅंचा गुरू होय. शॉपॅं याने राष्ट्रीय संगीत व आंतरराष्ट्रीय परंपरा असलेले संगीत यांचा अत्यंत परिपूर्ण असा मिलाफ घडवून आणला. स्टानीस्लाफ मान्यूश्कॉ (१८१९–७२) याने राष्ट्रीय ऑपेरा उभारला. त्याने ‘हॉल्का’, ‘हाबिना’ ह्यांसारख्या लोकप्रिय संगीतिका निर्माण केल्या. तसेच एक आवाजी गायन प्रकार (सोलो साँग) रूढ केला. कारॉल शिमानॉफ्‌स्की (१८८३–१९३७) हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अतिशय प्रसिद्ध संगीतकार मानतात.पांडेरेट्स्की (१९३३– ) ह्या संगीतकाराने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली. लूटॉस्लाफ्‌स्की (१९१३– )ह्या संगीतकाराने संगीतामधील विविध गुणविशेषांचा सुंदर मिलाफ करून अप्रतिम संगीतरचना तयार केल्या आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात व्हायोलिनवादक, पियानोवादक,संगीतिका संचालक तसेच गायक असे अनेक पोलिश कलावंत जगाच्या रंगभूमीवर आले. त्यांमध्ये ईन्यास पाडेरेफ्‌स्की (१८६०–१९४१) हा पियानोवादक व राजकारणपटू, आर्टूर रुब्यिनस्टाइन (१८८७–  )हा महान पियानोवादक यांचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल. वॉर्सा येथील ‘नॅशनल फिलार्मानिक’, काटोव्हीत्सेचा ‘ग्रेट सिंफानिक ऑर्केस्ट्रा’ इ. वाद्यवृंदांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादिली आहे. पोलंडमध्ये लोकसंगीत व पारंपरिक संगीत यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न अनेक संस्थांमार्फत चालू असतात. अनेक संगीतमहोत्सव व आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा आयोजित करण्यात येत असून दर पाच वर्षांनी भरणारी ‘शॉपॅं पियानो स्पर्धा’ ही जागतिक मान्यता पावली आहे. देशात नऊ संगीतिका केंद्रे व सु. २० वाद्यवृंद असून संगीत विषयाला वाहिलेल्या अनेक संस्था व मासिके आहेत.

रंगभूमी व चित्रपट : नाटक व चित्रपट यांची मुळे पोलंडमध्ये संगीताइतकीच खोल रुजली आहेत. मध्ययुगामध्ये रंगभूमीचे स्वरूप मुख्यतः धार्मिक असून रहस्यनाटके व सदाचार नाटके दाखविली जात. सोळाव्या शतकात दरबारी रंगभूमीचा जन्म झाला आणि स्थानिक नाटके रंगभूमीवर आली. सतराव्या शतकात व अठराव्या शतकाच्या सुरुवातीस परदेशी संगीतिका व बॅले यांचे प्रयोग होत असत पण ते राजेरजवाडे यांच्यासाठीच मर्यादित असत. स्वतंत्र पोलंडमधील पॉन्याटॉफ्‌स्कीया नावाच्या राजघराणातील शेवटचा राजा दुसरा स्टानीस्लाफ आउगूट पॉन्याटॉफ्‌स्की (१७३२–९८) याच्या काळात प्रथम वॉर्सामध्ये आणि नंतर इतर शहरांत नाट्यगृहे स्थापन झाली. याच काळात व्हॉइचेक बॉगूस्लाफ्‌स्की (१७५९–१८२९) हा नट, दिग्दर्शक आणि नाटककार यश मिळवून गेला. त्याला पोलिश रंगभूमीचा जनक मानतात. पोलिश राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर पोलिश रंगभूमीने राष्ट्रीय भाषा आणि राष्ट्रीय भावना रुजविण्याचे व जागृत ठेवण्याचे फार महत्त्वाचे कार्य केले. हेलेना मॉजेयेफ्‌स्का (१८४०–‌१९०९) या नटीला याच काळात जागतिक यश मिळाले. दोन युद्धांमधील काळात पोलिश रंगभूमीने अभिनय आणि नेपथ्य यांमध्ये खूप वरचा दर्जा गाठला. १९६०–७० या काळात व्र्हॉट्‌स्लाफ येथील ‘पोलिश लॅबोरेटरी थिएटर’ (थिएटर ऑफ थर्टिन रोज-स्थापना १९५९) ने कलाकारांना शिक्षण देणे, नाट्यकृती निर्माण करणे या क्षेत्रातील कामाबद्दल जागतिक किर्ती मिळविली. या नाट्यसंस्थेने येझी ग्रॉटॉस्की (१९३३– ) ह्या दिग्दर्शकाच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचा आणि प. यूरोपातील देशांचा दौरा केला. कित्येक टिकाकारांनी या नाट्यसंस्थेचे कलाविषयक सिद्धांत आणि नाट्यप्रयोग यांची वाखाणणी केली. असे प्रयोग म्हणजे नाट्यसृष्टीला लागलेले नवीन वळणच होते. पोलंडमध्ये ७० व्यावसायिक रंगमंदिरे होती (१९७०).


पोलंडमध्ये चित्रपटसृष्टीची सुरुवात पहिल्या महायुद्धापूर्वी झाली. १९०९ मध्ये ‘स्फिंक्स’ नावाची पहिली चित्रपट कंपनी अस्तित्वात आली. युद्धोतर काळातदेखील नव्याने निघालेल्या इतर कंपन्यांबरोबर तिने मोलाची कामगिरी केला. मात्र कलात्मक दृष्ट्या चित्रीकरण निकृष्टच होते. दुसऱ्या महायुद्धानंतर पोलिश चित्रपटांना एकामागून एक असे जागतिक सन्मान मिळत गेले. १९५०–७० या काळात यशाचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला. आंजेई मुंग्क (१९२१–६६) व आंजेई वाज्दा (१९२६– )या दोन दिग्दर्शकांच्या कामगिरीमुळे हे साध्य झाले. पोला नेग्री (१८९७– ) ही एक प्रसिद्ध पोलिश अभिनेत्री मानतात. रॉमान पोलान्स्की (१९३३– ) हा एक प्रतितयश दिग्दर्शक आहे.

पोलंडमध्ये शारीरिक कसरती आणि टेनिस, लांब नावा वल्हविणे (रोइंग), स्कीइंग, हॉकी, सॉकर हे क्रिडाप्रकार लोकप्रिय आहेत.

प्रेक्षणीय स्थळे : पोलंडच्या विविध प्रकारच्या हवामानामुळे व इतिहासकालीन घडामोडींमुळे अनेक स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. देशांमध्ये सु. ३० आरोग्यधामे असून पर्वतराजी, जंगले आणि नद्या यांमुळे मनोहारी सृष्टिसौदर्य व क्रीडासुविधा पर्यटकांना उपलब्ध होऊ शकतात. कार्पेथियन पर्वतश्रेणीमधील तात्रा पर्वताच्या पायथ्याशी असलेले झाकॉपाने (सु. ४०६ मी. उंचीवरील) हे थंड हवेचे ठिकाण व हिवाळी क्रीडास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे १९२९ व १९३९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्कीइंग स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. उत्तर भागात हिमोढांनी तयार झालेल्या प्रदेशात अनेक सरोवरे आगळेच आकर्षण निर्माण करतात, तर किनाऱ्यावरील सौंदर्य मन मोहित करून टाकते. याच भागात श्टेटीन, डॅन्झिग (गदान्यस्क) ही बंदरे आहेत.

वॉर्सा (लोकसंख्या १५,३२,१०० : १९७७) हे पोलंडचे राजधानीचे शहर आणि प्रशासकीय, औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक, धार्मिक व वाहतूकविषयक केंद्र आहे. यूरोपच्या महान ऐतिहासिक शहरांत याची गणना होते. वॉर्साच्या संस्मरणीय इमारतींमध्ये बरोक शैलीतील होली क्रॉस चर्च, पंधराव्या शतकातील सेंट कार्मिलाइट चर्च, लॅझिएन्की राजप्रासादासारखे अनेक रम्य राजप्रासाद, कोपर्निकस व आडाम मिट्सक्येव्हिच स्मारकवास्तू, पोलिश अकादमी ऑफ सायन्सेसची इमारत वगैरेंचा अंतर्भाव होतो. शहरात अनेक ग्रंथालये, ७४ च्या वर संशोधन संस्था, १४ उच्च शिक्षणसंस्था, ३० विशेष वस्तुसंग्रहालये असून देशातील प्रमुख वृत्तपत्रांचे व नियतकालिकांचे प्रकाशन येथेच होते. शहरात पोलिश थिएटर, नॅशनल थिएटर यांसारखी नामवंत रंगमंदिरे, नॅशनल फिलर्मानिक हॉलसारखी वाद्यवृंद संस्था, तीन नभोवाणी केंद्रे व एक दूरचित्रवाणी केंद्रे असून युद्धोत्तर काळात उभारलेल्या इमारतींमध्ये ४० मजली संस्कृती व विज्ञानराजप्रासाद, दशवर्षीय प्रेक्षागार यांचा अंतर्भाव होतो. वॉर्साजवळील झेलाझाव्हा व्हॉला हे जगप्रसिद्ध पियानोवादक शॉपॅं याचे जन्मस्थान. वॉर्साच्या वायव्येकडील ९६ किमी.वरील फ्लॉक या पोलंडमधील सर्वांत जुन्या शहरातील नेबेटो राजवाडा प्रेक्षणीय आहे. येथे बाराव्या शतकातील कॅथीड्रल असून त्यात पोलिश राजांची थडगी आहेत. प्लॉक हे तेलशुद्धीकरणाचे व खनिज तेल रसायनोद्योगाचे मोठे केंद्र समजले जाते.

वॉर्साच्या दक्षिणेला सु, ३०० किमी.वर क्रेको हे अतिशय सुंदर असे मध्ययुगीन शहर आहे. येथील राजवाडा, गॉथिक स्थापत्यातील सेंट मेरी चर्च वैगेरे वास्तू विलोभनीय आहेत. या भागात पोलंडमधील अत्युत्कृष्ट हस्तकौशल्याच्या वस्तू निर्मिल्या जातात. १९७७ मध्ये पोलंडला १०५·४५ लक्ष पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकरिता १ अमेरिकी डॉलर = ३२ झ्लॉटी असा विदेशविनिमय दर ठेवण्यात आला होता. (१९७८).(चित्रपत्रे).

फडके, वि. शं. गद्रे, वि. रा.

संदर्भ: 1. Benes, V. L Pounds, N. J. G. Poland, New York, 1970.

            2. Blit, Lucjan, The Origins of Polish Socialism, Cambridge, 1971.

           3. Bromke, Adam, Polanad’s Politics, Cambridge (Mass), 1967.

           4. Bromke, Adam Strong, J. W. Ed. Gierek’s Poland, New York, 1973.

           5. Davies, Norman, Poland, Past and Present : a Bibliography, 1975.

           6. Groth, A. J. People’s Poland: Government and Politics, San Francisco, 1972.

           7. Kieniewicz, S. et al, A History of Poland, 1968.

           8. Kruszewski, Z. A. The Order- Neisse Boundary and Poland’s Modernisation, New York, 1972.

          9. Lane, D. S. Kolanklewicz, George, Ed. Social Group in Polish Society, New York, 1973.

       10. Polonsky, Antony, Politics In Independent Poland 1921-39, London, 1972.

       11. Reddaway, W. F. &amp others, Ed. The Cambridge History of Poland, 2 Vols., Cambridge, 1971.


पोलंड


संसदभवन, वॉर्सा लॅझिएन्की उद्यानातील इतिहासप्रसिद्ध राजवाडा, वॉर्सा
जहाज-बांधणी कारखान्याचे दृश्य, डॅन्झिग ऊर्सूस उपनगरातील ट्रॅक्टर कारखाना, वॉर्सा
सफरचंदाच्या बागेतील पोलिश संगीत-नृत्य-क्रीडा अशुद्ध खनिज तेलवाहतुकीचा नळमार्ग, डॅन्झिग
महान पियानोवादक शॉर्पचे स्मारक, वॉर्सा. पोलिश प्रबोधनाची नगरी, झामॉश्च : एक दृश्य.
क्रॅकोव्याक : पोलिश लोकनृत्याचे दृश्य