कानो : उत्तर नायजेरियातील प्रमुख व्यापारी शहर. लोकसंख्या ३,५७,०९८ (१९७१ अंदाज). राजधानी लागोस या बंदरापासून हे ८८० किमी. ईशान्येस असून मूळच्या सात हौसा राज्यांपैकी एक आहे. या तटबंदी शहरात हौसा, बिगर हौसा व बिगरअफ्रिकी लोकांचे स्पष्ट वेगळे विभाग असून व्यापारी विभागही वेगळा आहे. कानोच्या इतिहासाची  ९९९ पासूनची नोंद असून, त्यापूर्वीच्या शेकडो वर्षांच्या दंतकथा प्रचलित आहेत. हल्लीचे कानो मात्र दोनतीनशे वर्षांहून अधिक जुने नाही. देशातील सर्व प्रमुख शहरांशी ते महामार्गांनी जोडलेले आहे. लागोस व पोर्ट हारकोर्ट यांच्याशी हे लोहमार्गाने जोडलेले असून कानो येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कानो शेकडो वर्षे आजूबाजूच्या भागाची प्रमुख बाजारपेठ होती परंतु मरूभूमिसदृश प्रदेशात वसलेली असल्यामुळे तिचा बाह्य जगाशी संबंध नव्हता. ब्रिटीशांच्या आगमनामुळे तो आला. तेथील विणलेले व भरतकाम केलेले कापड, जगप्रसिद्ध  `मोरोक्को’ कातड्यांसाठी कमावलेली कातडी व शोभेचे कामडीकाम यांसाठी कानोची प्रसिद्धी होती. त्यात भुईमूगाचे तेल काढून ते शुद्ध करणे, मांस डबाबंद करणे, कातडी कमावणे, विशिष्ट प्रकारचे ड्रिल व कॉर्ड कापड विणणे, काँक्रीटचे ठोकळे व जमिनीसाठी  `हेरॅझो’ टाइल्स, साबण, सुवासिक पदार्थ, कार्बन-डाय ऑक्साईड व कोरडे बर्फ आणि पोलादी फर्निचर यांच्या कारखान्यांची भर पडली. तथापि कानोची मुख्य प्राप्ती भुईमूगाच्या निर्यातीपासून आहे. ती वर्षाला साडेपाच कोटी डॉलरपेक्षा अधिक असते. कातड्यांची निर्यांतही महत्वाची आहे. विसाव्या शतकात येथे मशीद, कौन्सिल चेंबर, कोर्ट इ. नवीन इमारती झाल्या आहेत. कानोच्या वाढत्या महत्वास वेग यावा म्हणून  १९५९ मध्ये कानोचा महोत्सव साजरा करण्यात आला होता.  

कुमठेकर, ज. ब.