डिंडिगल : तमिळनाडू राज्याच्या मदुराई जिल्ह्यातील डिंडिगल तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १,२८,४२९ (१९७१). हे मदुराईच्या वायव्येस ३५ किमी.वर तिरुचिरापल्ली-मदुराई या लोहमार्गावरील प्रस्थानक आहे. पलनी आणि सिरुमलई टेकड्यांदरम्यान २६५ मी. उंचीवर वसलेल्या या गावाची हवा उष्ण, कोरडी पण आरोग्यदायी आहे.

येथील गढी व किल्ला विजयानगर साम्राज्याच्या काळातील असून त्यांचा वापर हिंदू, मुसलमान व इंग्रज यांनी युद्धाच्या वेळी अनेकदा केला होता. सध्या त्यांचे भग्नावशेष पहावयास सापडतात.

सूत काढणे, कापड विणणे, रेशमी कापड, तंबाखू, सिगारेट, कॉफी, वेलदोडे, जडावाचे काम इत्यादींचे उद्योग येथे असून त्यांची ही मोठी बाजारपेठ आहे. डिंडिगल चर्मोद्योगासाठीही प्रसिद्ध आहे. याच्या दक्षिणेस ११ किमी.वर गांधीग्राम आणि आश्रम आहे. येथे ग्रामीण आरोग्य व शिक्षक प्रशिक्षण संस्था आहेत. 

सावंत, प्र. रा.