फ्रेंच पॉलिनीशिया: दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांदरम्यानच्या पॅसिफिक महासागरातील ⇨ ओशिॲनियामधील बेटे. ७° द. ते २९° द. अक्षांश व १३२° प. ते १५६° प. रेखांश यांदरम्यान असलेली ही बेटे फ्रेंचांच्या मालकीची आहेत. या सु. १२० बेटांत प्रामुख्याने सोसायटी, मार्केझास, टूआमोटू आणि ॲस्ट्रॉल (टूबूआई) या ज्वालामुखीजन्य द्वीपसमूहांचा समावेश होत असून क्लिपर्टन हे कंकणद्वीपदेखील फ्रेंच आधिपत्याखाली आहे. या भूभागाचे एकूण क्षेत्रफळ सु. ४,२०० चौ. किमी. असून लोकसंख्या १,३७,३८२ (१९७७) आहे. सोसायटी द्वीपसमूहातील ⇨ ताहिती बेटावरील पपीटी ही फ्रेंच पॉलिनीशियाची राजधानी (लोकसंख्या ६२,७३५-१९७७), मोठे बंदर आणि पर्यटन केंद्र आहे.

सोळावे ते एकोणिसावे शतक यांदरम्यान यूरोपीयांनी या बेटांचा शोध लावला. १५९५ मध्ये आल्व्हारो दे मेनदान्या ह्याने मार्केझास बेटाचा शोध लावला, तर पेद्रो दे कीरॉश याने १६०६ मध्ये टूआमोटू बेटाच्या काही भागाचा शोध लावला. डच संशोधक याकॉप राग्वाँन ह्याने १७२२ मध्ये माकाटेया, बोरा-बोरा आणि माउपीटे ही बेटे शोधून काढली. १७६७ मध्ये कॅ. सॅम्युएल वॉलिस या इंग्रज समन्वेषकाने (१७२८-९५) ताहिती, मूरा आणि टूबूआई ही बेटे संशोधिली. कॅ. कुकने सोसायटी बेटांचा शोध लावून ‘रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटन’ या संस्थेच्या स्मरणार्थ बेटांना ‘सोसायटी’ हे नाव दिले. त्याच वेळी कुकने हूआहीने, राइआटेया, टाहाया, रूरूटू ह्या टूबूआई द्वीपसमूहातील बेटांचा शोध लावला. टूबूआईचा शोधदेखील कुकनेच लावला होता. यानंतर १७९१ मध्ये जॉर्ज व्हँकूव्हर (१७५७-९८) या इंग्रज समन्वेषकाने रापा बेटाचा शोध लावला. जवळजवळ १८ व्या शतकापासून फ्रेंचाच्या संरक्षणाखाली असलेली ही बेटे १८८० पासून फ्रेंच साम्राज्यातच समाविष्ट करण्यात आली.

‘फ्रेंच कॉलनी’ (फ्रेंच ओशिॲनिया) म्हणून ही प्रदेश १९०३ ते १९४६ या काळात ओळखला जात होता. १९४६ नंतर हा फ्रेंचांचा सागरपार प्रांत म्हणून जाहीर करण्यात आला व १९५७ मध्ये त्याला ‘फ्रेंच पॉलिनीशिया’ हे नाव देण्यात आले. या प्रदेशाच्या कारभारा वर आठ सभासद असलेल्या शासकीय मंडळाचे नियंत्रण असते व फ्रेंच सरकारने नेमलेला उच्चायुक्त हा त्याचा प्रमुख असतो. शिवाय ३० सभासदांचे लोकप्रतिनिधी मंडळ असते. या सभासदांची निवड सार्वत्रिक मतदान पद्धतीने दर ५ वर्षांनी केली जाते. याप्रदेशातून ‘फ्रेंच नॅशनल असेंब्ली’ वर दोन, ‘फ्रेंच सीनेट’ वर एक व‘इकॉनॉमिक ॲन्ड कौन्सिल’ वर एक असे चार प्रतिनिधी पाठविले जातात.

मे १९७५ पासून या प्रदेशाच्या प्रतिनिधी मंडळात स्वायत्ततेची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली व त्यामुळे या मंडळात अनेक तट पडले. त्यांतील लढाऊ वृत्तीच्या गटाने या मंडळाला कारभारविषयक जास्त सवलती मिळेपर्यंत फ्रेंच सत्तेला विरोध करण्यास सुरुवात केली व जून १९७६ मध्ये या प्रदेशाच्या प्रतिनिधी मंडळाच्या इमारतीचा ताबा घेतला. अखेर फ्रेंच सरकारने हे प्रतिनिधी मंडळ बरखास्त करून नवीन मंडळ स्थापन करण्याचे जाहीर केले. १९७७ मध्ये नवीन मंडळ निर्माण झाले. फ्रेंच सरकारने केलेल्या अधिकारविषयक सुधारित ठरावास या मंडळाने मान्यता दिली. या ठरावान्वये फ्रेंच सरकारने संरक्षण, परकीय घडामोडी, वित्तविषयक बाबी, न्याय इ. अधिकार आपल्याकडे ठेवले. मात्र मंडळाच्या अधिकारांत आणि येथील उपाध्यक्षाच्या अधिकारांतही वाढ केली. शिवाय सागरी भागात या प्रदेशाचे आर्थिक क्षेत्र किनाऱ्यापासून ३७० किमी. पर्यंत वाढवून दिले. तरीही स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या गटाचा असंतोष कायमच राहिला. १९७७ च्या अखेरीस त्याने हिंसक प्रकारांचा अवलंब केला व पपीटी येथील दूरध्वनी केंद्रावर बाँब टाकून ते उद्ध्वस्त केले तसेच एका फ्रेंच व्यापाऱ्याचा खूनही केला. स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या गटाने नूटानिया तुरुंगात १९७८ च्या प्रारंभी दंगल उडवून दिली.

सोसायटी बेटे : फ्रेंच पॉलिनीशियातील ही पश्चिमेकडील बेटे आहेत. एकूण क्षेत्रफळाच्या ४० टक्के जमीन या बेटांनी व्यापली असून ८० टक्के लोक येथे राहतात. काही छोटी कंकणद्वीपे सोडल्यास ही बेटे पर्वतमय असून येथे जलांतर्गत ज्वालामुखी आढळतात. भूगर्भीय हालचालींमुळे येथे उंच सुळके आणि दऱ्या यांची निर्मिती होऊन खारकच्छेही तयार झालेली आढळतात. सोसायटी, ताहिती व मूरा ही बेटे दाट लोकवस्तीची असून मूरा हे बेट पर्वतमय प्रदेश आणि पांढरी शुभ्र रेती यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच ताहितीशी सडकांनी व जलमार्गाने जोडलेले असून पर्यटन केंद्र म्हणून याचा विकास होत आहे. ताहितीच्या पश्चिमेस सु. १४४ किमी. वरील लीवर्ड बेटे ही प्रवाळांची कंकणद्वीपे आहेत. राइआटेया हे यांपैकी मोठे व दाट लोकवस्तीचे बेट असून तेथे नारळाचे उत्पन्न वाढत आहे. पूर्वी मात्र येथील सर्वाधिक उत्पन्न व्हॅनिलाचे होते. याचे बंदर उटूरोया असून हे शहर फ्रेंच पॉलिनीशियातील दुसऱ्या क्रमांकाचे होय. ते राइआटेया बेटाच्या पूर्वेस असून त्याचे उथळ समुद्र व बेट असे दोन भाग झालेले आहेत. येथील रमणीय निसर्गामुळे पर्यटन व्यवसायास अधिक वाव आहे. राइआटेयाच्या पश्चिमेस निसर्गसुंदर बोरा-बोरा बेट असून ते ज्वालामुखी शिखरच आहे. फ्रेंच पॉलिनीशियातील ही मध्यवर्ती ठिकाणे असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. १९७६ मध्ये फ्रेंचपॉलिनीशियास ९१,९९३ पर्यटकांनीभेटदिली.

मार्केझास बेटे : यांत १४ बेटांचा समावेश असून ही ताहितीच्या ईशान्येस १,४४८ किमी. आहेत. सोसायटी बेटांप्रमाणे यांना उपयुक्त किनारा न लाभल्याने येथील लोक दऱ्याखोऱ्यांत राहून शेतीवर उपजीविका करतात. 

टूआमोटू बेटे : सोसायटी बेटांच्या पूर्वेस सु. ८४२ चौ. किमी. क्षेत्रफळ आणि ७,७०० वस्ती असलेल्या या द्वीपसमूहात सु. ८० बेटे आहेत. यांत प्रवाळांची कंकणद्वीपे, खारकच्छे यांचाही समावेश होतो. येथे नारळाच्या उत्पन्नाखेरीज इतर महत्त्वाचे उत्पन्न नाही. खारकच्छांत मासे, मोती, शिंपले सापडतात. रांगीरोया येथे विमानतळ असून तेथून ताहितीशी संपर्क ठेवला जातो. मुरूरोया आणि फांगाटू ही बेटे जवळच असून हाऊ येथे विमानांसाठी धावपट्टी केलेली असली, तरी ती फक्त सैनिकी विमानांसाठी वापरली जाते.

 ॲस्ट्रॉल(टूबूआई) बेटे : ताहितीच्या दक्षिणेस ही सु. ७२४ किमी. असून या चार बेटांची साखळी आणि आग्नेयीस असलेले रापा बेट यांसह त्यांचे क्षेत्रफळ सु. १४० चौ. किमी. व लोकसंख्या सु. ५,००० आहे. येथील लोकजीवन शेतीवर अवलंबून असून मुख्यतः तारो, कंदमुळे, केवडा,  भाजीपाला यांचे प्रमुख उत्पन्न येते.

  एकंदरीत फ्रेंच पॉलिनीशियाचे हवामान उष्ण कटिबंधीय आहे. नोव्हेंबर ते एप्रिल या काळात बेटांवर उन्हाळा असतो. त्या मानाने मे ते ऑक्टोबरमध्ये थंड व कोरडी हवा असते. सरासरी तपमान २९·४° से. असते. पावसाचे प्रमाण १७५ ते २५० सेंमी. असून तो बहुधा उन्हाळ्यात पडतो. वारे,   समुद्रसानिध्य व उंची यांमुळे हवामान सुसह्य असते.


फ्रेंच पॉलिनीशियात डुकरे, गुरे, शेळ्या, कोंबड्या यांचीही पैदास होते. १९७७ साली (आकडे मे. टनांत) नारळ १,६५,००० खोबरे २३,००० कंदमुळे आणि कंदफळे १७,००० (त्यांत कसावा ६,०००) लिंबू जातीची फळे २,००० अशी निर्यात झाली. पशुधन १९७७ च्या अंदाजानुसार पुढीलप्रमाणे होते : गुरे १३,००० घोडे २,००० डुकरे १७,००० शेळ्या ४,००० मेंढ्या ३,००० आणि कोबंड्या २,३७,००० होत्या. १९७६ मध्ये २,८२६ मे. टन मासे पकडण्यात आले. मोत्यांच्या शिंपल्यांचे वार्षिक सरासरी १०० मे. टन उत्पादन घेतले जाते, तसेच बीरचेही ६४,००० हेलि. उत्पादन होते.

 सीएफ्‌पी अथवा पॅसिफिक फ्रँक हे फ्रेंच पॉलिनीशियाचे अधिकृत चलन असून १ सीएफ्‌पी = १ फ्रेंच फ्रँक असा दर आहे. ५० सेंटिमची तसेच १, २, ५, १०, २० व ५० पॅसिफिक फ्रँकची नाणी आणि १००, ५००, १,००० व ५,००० पॅसिफिक फ्रँकच्या नोटा प्रचारात आहेत.विदेश विनिमय दर १,०००  पॅसिफिक फ्रँक =  ६·५० स्टर्लिंग पौंड = १२·९९ अमेरिकी डॉलर असा होता (१९७९).

 खोबरे ही येथील प्रमुख निर्यात असून १९६६ मध्ये सोसायटी बेटावरील माकाटेया येथे फॉस्फेटचा शोध लागल्यापासून त्याचीही निर्यात केली जाते. व्हॅनिला, मोत्यांचे शिंपले, ब्रेडफ्रूट, याम, केळी, हस्तकला वस्तू, कॉफी, तारो यांचे उत्पादन महत्त्वाचे आहे.

 फ्रेंच पॉलिनीशीयात २१५ किमी. लांबीचे डांबरी व ३६८ किमी. लांबीचे दगडी पृष्ठभागाचे रस्ते होते (१९७८). पपीटी हे प्रमुख बंदर, असून ‘एअर पॉलिनीशीया’ ही आंतरद्विपीय, तर ‘एअर ताहिती’ ही विमान कंपनी ताहिती, मूरा आणि आसपासची बेटे यांदरम्यान विमान वाहतूकसेवा उपलब्ध करते. चार आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कंपन्यांद्वारे वाहतूकसेवा उपलब्ध केली जाते.

 फ्रेंच पॉलिनीशीयातील बव्हंशी लोक पॉलिनीशियन (सु. ८५%) असून ते पॉलिनीशियन भाषा बोलतात. यांशिवाय चिनी ११ टक्के तर युरोपीय आणि अमेरिकन मिळून ३ टक्के आहे. डेमिस लोक हे पॉलिनीशियन व युरोपीय अशा मिश्र वंशाचे असून जवळजवळ सर्व आर्थिक व्यवहार आणि राजकारण त्यांच्याच हातात आहे. लोकसंख्येपैकी ६० टक्के प्रॉटेस्टंट, ३० टक्के रोमन कॅथलिक आणि उरलेले इतर ख्रिस्ती धर्मपंथांतील आहेत. येथील शैक्षणिक संस्थांमध्ये प्राथमिक ३७,२७५ माध्यमिक ७,७०७ आणि तांत्रिक १,९०३ इतके विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९७६). पपीटी येथून चार दैनिके, एक साप्तहिक व एक पाक्षिक प्रकाशित होते.

फ्रेंच पॉलिनीशीयातील मूळ संस्कृती हळूहळू लोप पावत चालली असून पाश्चिमात्य संस्कृतीचा-विशेषतः फ्रेंच संस्कृतीचा-प्रभाव वाढत आहे. 

कापडी, सुलभा