सायडन : (साइड, सैदा). लेबाननमधील एक प्राचीन पुरातत्त्वीय नगर व बंदर. लोकसंख्या २,६६,००० (२०१०). लेबाननच्या पश्चिम भागात, भूमध्य समुद्र किनाऱ्यावर सायडन वसले असून ते बेरूतच्या दक्षिणेस ४० किमी. तर टायर (सूर) च्या उत्तरेस ३५ किमी. वर आहे. सांप्रत दक्षिण लेबानन प्रांताचे ते प्रशासकीय केंद्र असून सर्वांत जुन्या फिनिशियन नगरांपैकी एक आहे.

इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकात सायडनची स्थापना करण्यात आली. इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकात फिनिशियाचे एक व्यापारी बंदर म्हणून याचे महत्त्व वाढले. त्या काळी तिथे जांभळी रंजके आणि उत्कृष्ट काचपात्रांची निर्मिती होत असे. या नगरावर ॲसिरिया, बॅबिलोनिया, ईजिप्त, इराण, ग्रीक, रोमन वगैरेंनी आधिपत्य गाजविले. दुसरा आशुर नाझिर-पाल (कार. इ. स. पू. ८८४–८५९) याने इ. स. पू. ८६८ मध्ये सायडनकडून खंडणी वसूल केली. चौथा शॅल्मानीझर याने केलेला हल्ला सायडन-टायर यांनी शिताफीने परतविला. पुढे सेनॅकरिब (कार. इ. स. पू. ७०४–६८१) याविरुद्घ सायडनने बंड केले. यातून सायडन व टायर या दोन नगर राज्यातीलमैत्री संपुष्टात येऊन दुही माजली. सायडनने पुन्हा बंड केले, तेव्हा एसार-हॅडन याने हे नगरच बेचिराख केले (इ. स. पू. ६७९) पण लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. यानंतर सु. २०० वर्षे सायडन ॲसिरियाच्या वर्चस्वाखाली होते. ॲसिरियाच्या अधःपतनानंतर सायरस द ग्रेट याने सर्व इराणी साम्राज्य जिंकले. यावेळी टायरचे महत्त्व कमी होऊन सायडनचे व्यापारी महत्त्व वाढले. तिथे जहाजबांधणी उद्योगास चालना मिळून इतर नगरांचाही विकास झाला. ग्रीस-इराण युद्घात (इ. स. पू. ४९८–४७९) फिनिशियन आरमाराने सायडनच्या राजाच्या मदतीने प्रशंसनीय कामगिरी केली. तत्संबंधी हीरॉडोटस हा ग्रीक इतिहासकार लिहितो, ‘सायडनचा राजा इराणच्या झर्क्सीझनंतर दुसरा नेता म्हणून चमकत होता’. अलेक्झांडर द ग्रेट (इ. स. पू. ३३६–३२३) याने इराणच्या तिसऱ्या डरायसचा पराभव करून सायडनसह फिनिशिया पादाक्रांत केला. त्याच्यानंतर टॉलेमी राजे व पुढे इ. स. पू. ६४ मध्ये रोमनांनी सायडनवर सत्ता मिळविली. त्यांनी व्यापाराबरोबरच सायडन येथे विधिविद्यालय स्थापून ते विद्येचे केंद्र बनविले. पहिला हेरॉड द ग्रेट याने सायडनचे सुशोभिकरण केले. येशू ख्रिस्त व सेंट पॉल यांनी या नगराला भेट दिल्याचे म्हटले जाते. धर्मयुद्घाच्या काळात सायडनने कोणा एका पक्षाची बाजू घेतली नाही. परिणामतः त्याचा नाश केला गेला (१२२९). त्यानंतर त्याची पुनर्बांधणी केली परंतु पुन्हा १२६० मध्ये मंगोलांनी त्याचा विध्वंस केला. ऑटोमन साम्राज्यकाळात (१५१७–१८३७) दुसरा फक्र-अद्-दीन या अमीराच्या काळात शहराचा विकास झाला. फ्रेंच दर्यावर्दी व्यापाऱ्यांनी बंदराची डागडुजी करून त्याचे महत्त्व वाढविले (१७९१) परंतु लेबाननचा ऑटोमन राज्यपाल अहमद अल् जझार याने फ्रेंच व्यापाऱ्यांना हाकून लावले. ह्यामुळे तेथील व्यापारावर परिणाम झाला. १८३७ मधील भूकंपात शहराचे नुकसान झाले परंतु त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. एकोणिसाव्या शतकात हे शहर ईजिप्तने काबीज केले परंतु इंग्लंड व फ्रान्सने तुर्कांना त्याचा पुन्हा ताबा घेण्यासाठी मदत केली. इ. स. १९१८ मध्ये ते ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतले. १९२० मध्ये ते फ्रेंचांचे संरक्षित शहर बनले.

ग्रीक कवी होमर याच्या साहित्यात तसेच हिब्रू बायबल (ओल्ड टेस्टामेंट) मध्येही सायडनसंबंधीचा उल्लेख वारंवार आलेला आहे. येथील उत्खननांत अनेक प्राचीन अवशेष उपलब्ध झाले. त्यांवरून सायडन येथे मोठी स्मशानभूमी असल्याचे निदर्शनास आले. तीत अनेक कोरीव अश्मशवपेटिका उपलब्ध झाल्या असून त्यांतील दोन इशमुनझर व टेनिस या सायडनच्या राजांच्या आणि एक अलेक्झांडरची आहे. त्यांवर युद्घातील प्रसंगांची तसेच शिकारीची दृश्ये कोरलेली आहेत. सांप्रत ह्या अश्मशवपेटिका इस्तंबूल येथे आहेत. इतर अवशेषांत दोन धर्मयुद्घकालीन कोट आणि एशमन या फिनिशियन देवतेचे मंदिर उल्लेखनीय आहे. नगरात दगडांमध्ये बांधलेल्या जाड भिंतींच्या अनेक वास्तू आढळतात. शहराच्या जवळपास धर्मयुद्घांच्या काळातील किल्ल्याचे भग्नावशेष आढळतात.

सायडन हे मासेमारी, व्यापार आणि कृषी पृष्ठप्रदेशातील महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र आहे. सौदी अरेबियातून सुरू झालेल्या सु. १७२० किमी. लांबीच्या तेलवाहिनीचे भूमध्य समुद्र भागातील हे शेवटचे ठिकाण असून तेथे मोठमोठ्या तेल साठवणूक टाक्या आहेत. महामार्ग व लोहमार्गाने हे बेरूतशी जोडले आहे. जुन्या बंदरात बराच गाळ साचल्याने त्याचा वापर लहान किनारी जहाजांच्या वाहतुकीसाठी केला जातो.

देशपांडे, सु. र.