द्वीपकल्प : भूखंडाचा समुद्रात घुसलेला मोठा भाग. सामान्यतः हा भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असतो. बऱ्याच ठिकाणी द्वीपकल्पाच्या टोकाशी एखादे भूशिर असते. उदा., भारतीय द्वीपकल्पाच्या टोकाशी असलेले कन्याकुमारी. जगातील महत्त्वाच्या द्वीपकल्पांत प्रामुख्याने दक्षिण भारत, मलाया, अरबस्तान, आयबेरिया, स्कँडिनेव्हिया, इंडोचायना, कॅमचॅटका, कोरिया, फ्लॉरिडा यांचा समावेश होतो. पश्चिम यूरोप हेसुद्धा युरेशियाचे द्वीपकल्प मानले जाते. काही द्वीपकल्पे अरुंद संयोग भूमीने खंडांशी जोडलेली असतात. उदा., मलायाचे द्वीपकल्प, मेस्किकोतील यूकातान, रशियातील तैमीर, युरोपातील जटलंड, ऑस्ट्रेलियातील केपयॉर्क ही उत्तरेकडे निमुळती असलेली द्वीपकल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बाकीची बहुतेक द्वीपकल्पे खंडांप्रमाणे दक्षिणेस निमुळती आहेत.

डिसूझा, आ. रे.