पंचगंगा :कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागातून पूर्वेकडे वाहणारी कृष्णेची एक प्रमुख उपनदी. जलवाहन क्षेत्र सु. २,०७२ चौ. किमी. कोल्हापूरच्या वायव्येस सहा किमी.वरील प्रयाग या पवित्र ठिकाणापासून वाहणाऱ्या पाच नद्यांच्या [कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त नदी)] संयुक्त प्रवाहास पंचगंगा म्हणतात. ती प्रयागपासून पूर्वेस सु. ६४ किमी. वाहत जाऊन नरसोबाची वाडी या तीर्थक्षेत्राजवळ कृष्णेस मिळते. हिच्या शीर्षप्रवाहांतील पाच नद्यापैकी कासारी व भोगावती या प्रमुख नद्या आहेत. कासारी नदी शाहूवाडी तालुक्यात उत्तरेकडील विशाळगड व दक्षिणेकडील वाघजाई यांदरम्यानच्या त्रिकोणाकृती प्रदेशात उगम पावून एकूण ५६ किमी. वाहत जाऊन प्रयागजवळ पंचगंगेस मिळते. भोगावती नदी सह्याद्री पर्वतरांगेत, फोंडाघाटापासून काही अंतरावर उगम पावून सु. ४० किमी. ईशान्येस व उत्तरेस वाहत जाते व बीडजवळ तुळशी नदीला मिळाल्यानंतर यांचा संयुक्त प्रवाह कुंभी व धामणी यांच्या संयुक्त प्रवाहासह पंचगंगेला मिळतो. या सर्व नद्यांची खोरी मिळून पंचगंगा खोऱ्याचे पश्चिम खोरे (कोल्हापूरपर्यंत) व पूर्व खोरे (कोल्हापूर ते नरसोबाची वाडी) असे दोन भाग होतात.

पंचगंगा खोऱ्यातील दोन प्रमुख प्रकल्पांपैकी राधानगरी येथे भोगावती नदीवर बांधलेल्या धरणाने लक्ष्मी तलाव निर्माण झाला आहे. या धरणाचा उपयोग जलसिंचन आणि विद्युत्‌निर्मिती यांसाठी केला जातो. राधानगरी तालुक्यातील बुंबाली गावाजवळ तुळशी नदीवर सु. ६४५.६१ लाख रु. खर्चाचे, ४८.६ मी. उंचीचे व सु. ९७.९६ द.ल.घ.मी. पाण्याचा साठा करू शकणाऱ्या धरणाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार असून, त्यामुळे ३,४२१ हे. जमीन ओलिताखाली येईल.

नागमोडी वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या काठी ठिकठिकाणी गाळाची मैदाने तयार झाली आहेत. या नदीवरील बऱ्याच उपसा जलसिंचन योजनांमुळे करवीर, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांतील बरीच शोती पाण्याखाली आली आहे. पंचगंगेच्या खोऱ्याचा पश्चिम भाग बव्हंशी विरळ वस्तीचा, तर पूर्व भाग दाट लोकवस्तीचा आहे. खोऱ्यातील काळ्या व कसदार जमिनीतून ऊस, कापूस, तंबाखू, विड्याची पाने, भाजीपाला, हळद, गहू, ज्वारी, कडधान्ये ही पिके घेतली जातात. कोल्हापूर, रुकडी, इचलकरंजी व कुरुंदवाड ही या नदीतीरावरील प्रमुख शहरे होत. नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध दत्तस्थानही कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर आहे.

चौंडे, मा. ल.