अरुणाचलम् : तमिळनाडू राज्याच्या उत्तर अर्काट जिल्ह्यातील शिवलिंगस्थान आणि टेकडीच्या पायथ्यानजीकच्या रमण महर्षींच्या आश्रमामुळे प्रसिद्ध असलेले पवित्र ठिकाण. दक्षिण रेल्वेच्या कटपाडीविल्लुपुरम् मार्गावर कटपाडीच्या दक्षिणेस ९३ किमी. तिरुवन्नामलई हे स्थानक आहे. त्याच्या पूर्वेस ०·७५ किमी. अंतरावर पूर्व घाटांपैकी, ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून बनलेली, अष्टकोनी आकाराची, शिवाच्या स्वयंभू लिंगापैकी एक मानली गेलेली ही टेकडी समुद्रसपाटीपासून ८२६ मी. उंच आहे. टेकडीच्या पायथ्यानजीकच्या शिवमंदिरात पंचमुखी भवानीशंकराखेरीज पार्वती, ब्रह्मा इ. मूर्ती आहेत.

 

ओक, शा. नि.