आयंटहोव्हेन : आग्नेय नेदर्लंड्समधील शहर. लोकसंख्या १,८८,८३१ (१९७०). हे दोमेल नदीकाठी असून रॉटरडॅमहून सडकेने १०८ किमी. अंतरावर आहे. डच वीजधंद्याचे हे प्रमुख केंद्र असून फिलिप्सच्या विजेचे दिवे, रेडिओ, दूरचित्रवाणी यंत्रे, क्ष-किरण यंत्रे व अन्य उपकरणांच्या कारखान्यांमुळे याची झपाट्याने वाढ झाली. यांव्यतिरिक्त येथे प्लॅस्टिकचे पदार्थ, मोटारी, दुचाक्या, आगपेट्या, तंबाखू, कापड, काच व कातडी सामान यांचे अनेक कारखाने आहेत. येथे तंत्रविद्यांचे एक विद्यापीठ, नवचित्रकलेचे संग्रहालय व खगोलीय अभ्यासासाठी वेधशाळा असून, हे बेल्जियम व जर्मनी ह्यांना सांधणारे प्रमुख दळणवळण-केंद्र आहे.

ओक, द. ह.