आइसलँड : (लीद्वेल्दिद ईस्लांत). उत्तर अटलांटिकमध्ये यूरोपच्या वायव्येस असलेले बेट व प्रजासत्ताक राष्ट्र. अक्षांश ६३२४’ ते ६६३३’ उ. उत्तरेकडील व दक्षिणेकडील बेटे धरून ६३१९’ उ. ते ६७१०’ उ. व रेखांश १३३०’ ते २४३२’ प. पूर्वपश्चिम लांबी सु. ४८० किमी., दक्षिणोत्तर रुंदी सु. ३०० किमी. क्षेत्रफळ १,०३,१०० चौ.किमी. व लोकसंख्या २,०७,१७४ (१९७१). हे ग्रीनलंडच्या आग्नेयीस सु. १९० किमी. व स्कॉटलंडच्या वायव्येस ८०० किमी. दूर आहे.

भूवर्णन : आइसलँड हे ज्वालामुखीक्रियेने उत्पन्न झालेले बेट असून हिमयुगातील घडामोडींचे अनेक अवशेष येथे आढळतात. नैर्ऋत्य किनाऱ्यालगतचा व काही दऱ्याखोऱ्यांचा थोडासा प्रदेश वगळला, तर बाकीचा सर्व प्रदेश पर्वतमय व पठारी आहे. याची सरासरी उंची ७००—८०० मी. आहे. सु. बारा टक्के भाग हिमनद्या व हिमक्षेत्राने व्याप्त असून आग्नेयीकडील वात्‍नायकूत्ल हिमक्षेत्र सर्वांत मोठे (७,५४७ चौ.किमी. आहे.) ह्‌वानादाल्सह्‌नूकर (२,११९ मी.) हे आइससलँडमधील सर्वांत उंच शिखर येथेच आहे. आइसलँडचा अकरा टक्के प्रदेश लाव्हारसाच्या उद्रेकाने बनलेला असून सध्या येथील जिवंत ज्वालामुखींची संख्या शंभरांवर आहे. १७८३ चा स्काप्तारचा, १९१८ चा कटलाचा (९७० मी.), १९३४ चा ह्‌वानादाल्सह्‌नूंकरचा आणि १९४७ चा व १९७० चा हेक्लाचा (१,४४७ मी.) हे ज्वालामुखी उद्रेक फार विनाशक ठरले. गरम पाण्याचे फवारे व झरे, सरोवरे, लहान मोठे धबधबे अनेक ठिकाणी आढळतात. हिमक्षेत्र आणि अंतर्गत ओसाड पठारी प्रदेश यांमुळे आइसलँडचा ७५% भाग लोकवस्तीस प्रतिकूल आहे. किनारपट्टी सु. ५,९७० किमी., दंतुर पण खडकाळ, अनेक फिओर्डनी व उपसागरांनी युक्त आहे. आइसलँडमधील नद्या लहान, वाहतुकीस निरुपयोगी असल्या तरी त्या विद्युत्‌शक्ति-उत्पादनास उपयुक्त आहेत.

उत्तर ध्रुववृत्ताजवळ असूनही गल्फ प्रवाहामुळे आइसलँडचे तपमान हिवाळ्यातही फार खाली जात नाही. हिवाळा मोठा व उन्हाळा अल्प मुदतीचा असतो ⇨रेक्याव्हीक या राजधानीच्या शहरी तपमान–१से. ते ११से. पर्यंत असते. मात्र आइसलँडचे हवामान एकंदरीत चंचल व नित्य बदलणारे असते. धुके, वारे व पाऊस ही येथील नित्याची बाब आहे परंतु विजांचा कडकडाट येथे फारसा अनुभवास येत नाही किंवा वावटळीही होत नाहीत. वर्षाकाठी सरासरी सु. ८५ सेंमी. पाऊस पडतो. काही भागांत मात्र पाऊस पुष्कळच कमी आहे. इगदी उत्तरेकडील बेटांवर ‘मध्यरात्रीचा सूर्य’ दिसतो.

आइसलँडमध्ये मोठ्या वनस्पतींचे दुर्भिक्षच आहे. शेवाळ, गवत व खुरटी झुडपे ही येथील प्रमुख वनस्पती असून ॲश, ॲस्पेन, बर्च आणि विलो ही झाडे काही ठिकाणी आढळतात. वन्य फुलांच्या सु. ४०० जाती येथे आढळल्या आहेत.

पाळीव जनावरांत मेंढरे व बकऱ्या, घोडे, गायी हे मुख्य प्राणी असून पशुपालन हा येथील सोळा टक्के लोकांचा व्यवसाय आहे. वन्य प्राण्यांत खोकड येथील मूळचा असून १८ व्या शतकापासून रेनडियर येथे आणला गेला आहे. सोनेरी प्लव्हर, कर्ल्यू, बदक, किरा, हंस, गीज हे येथील प्रमुख पक्षी. टार्मिगन व आयडर डक हे पक्षी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. आइसलँडच्या नद्यांत सॅमन व समुद्रात कॉड, हॅडॉक, हॅलिबट, हेरिंग इ. मासे भरपूर आहेत. देवमासाही पुष्कळ आहे.

 इतिहास: प्राचीन काळी ग्रीक व रोमन लोकांना आइसलँडची माहिती असली, तरी नवव्या शतकापर्यंतचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. नॉर्वेचा इंगोल्फर आरनॉरसन याने ८७४ मध्ये रेक्याव्हीक येथे प्रथम वस्ती केली. यानंतर येथे नॉर्वे, स्कॉटलंड, आयर्लंड, ऑर्कनी, शेटलंड व हेब्रिडीझमधून आलेल्या लोकांनी वसाहती केल्या.

व्हायकिंग राजांच्या एकतंत्री अंमलाचा कटू अनुभव घेतलेल्या वसाहतवाल्यांनी ९३० मध्ये आइसलँडमध्ये उमरावशाहीसद्दश लोकशासन स्थापण्याचा प्रयत्‍न केला. त्यांनी सर्व वसाहतींचे ३६ गटांत विभाजन केले व त्यावर, ‘गोडारां’च्या म्हणजे नायकांच्या नेमणुका केल्या.

वर्षातून दोन आठवडे थींगव्हेट्लिर येथे सर्व जमाती-प्रमुखांची परिषद भरे. या मेळाव्याला ‘आल्थिंग’ म्हणत. आजही आइसलँडमधील संसदेला ‘आल्थिंग’ म्हणतात. आल्थिंगला कायदे करण्याचे व न्यायदानाचे अधिकार होते.

याच काळात एरिक द रेडच्या नेतृत्वाखाली ग्रीनलंडची वसाहत व त्याचा मुलगा लेव्ह एरिकसन याने लावलेला अमेरिकेचा शोध ह्या प्रमुख घटना घडल्या. यांचे वर्णन आइसलँडच्या सागा ह्या साहित्यप्रकारांत मिळते.


अकराव्या शतकाच्या प्रारंभी नॉर्वेचा राजा ओलाफ त्रिग्वेंसॉन याच्या प्रयत्‍नाने आइसलँडने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. परंतु तेराव्या शतकापर्यंत येथे जुन्या धर्मसमजुतींचा प्रभाव होता. जुन्या नॉर्स साहित्यात याचे विपुल वर्णन आढळते. गोडारांनी धर्माचे धुरीणत्व स्वत:कडेच ठेवण्याचा कसोशीने प्रयत्‍न केला. कालांतराने धर्मसंस्थेचे महत्त्व वाढून धर्मगुरूंनी नायकांना वाकविण्याचा प्रयत्‍न केल्याने देशात यादवी माजली. पण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण आइसलँड नॉर्वेच्या सत्तेखाली आल्याने नायक–धर्मगुरू संघर्ष थंडावला. नॉर्वेच्या शासनाखाली अवघ्या देशावर अवकळा आलेली असतानाच १३८० मध्ये नॉर्वे व आइसलँड हे डेन्मार्कच्या सत्तेखाली गेले. यानंतरच्या तीनचार शतकात आइसलँडला अनेक आपत्तींना व हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. ज्वालामुखींचे अनेक उद्रेक या काळातच झाले. प्लेगच्या साथीला सु. पन्नास टक्के लोक बळी पडले. मत्स्य-व्यापाराचा मक्ता डेन्मार्ककडे गेल्याने अपरिमित आर्थिक हानी झाली. यूरोपातील धर्म-सुधारणेच्या चळवळीच्या प्रभावाने आइसलँडनेही ल्यूथरच्या तत्त्वांचा स्वीकार केला व कालांतराने धार्मिक क्षेत्रातील प्रभुत्वही डेन्मार्कच्या राजाकडे गेले.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रभावाने व आइसलँडच्या प्राचीन साहित्याच्या अभ्यासाने एकोणिसाव्या शतकात आइसलँडमध्येही राष्ट्रीय वृत्ती फोफावली. योन सिगर्थ्‌सॉन (१८११–७९) याच्या नेतृत्वाखाली आइसलँडच्या स्वातंत्र्यचळवळीला जोर चढला. परिणामत: १८४३ मध्ये डॅनिश राज्यकर्त्यांना जुन्या आल्थिंगचे पुनरुज्जीवन करणे भाग पडले व १८७४ मध्ये आइसलँडला संविधान आणि अंतर्गत शासनाचे स्वातंत्र्य मिळाले. पुढे १९१८ मध्ये आइसलँडच्या पूर्ण स्वातंत्र्यास मान्यता मिळाली व पंचवीस वर्षांसाठी डेन्मार्कच्या राजालाच आइसलँडचे राजपद देण्यात आले.

पहिल्या महायुद्धात आइसलँड तटस्थ राहिला, पण दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने नॉर्वे-डेन्मार्कवर हल्ला करताच इंग्‍लंडने आइसलँडवर सैन्य उतरविले. या कृत्याचा आइसलँडने साहजिकच निषेध केला, पण युद्ध संपताच सैन्य काढून घेण्याचे इंग्‍लंडने वचन दिल्याने वाद फार चिघळला नाही. पुढे १९४१ मध्ये इंग्लिश सैन्याऐवजी अमेरिकन सैन्य आइसलँडमध्ये ठेवण्यात आले.

आइसलँडने स्वतंत्र प्रजासत्ताकाची घोषणा १९१८ च्या तहाची मुदत संपताच केली व १७ जून १९४४ ला थींगव्हेट्लिरच्या आल्थिंगने स्वेन ब्यर्नसॉन याची प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी स्थापना केली. १९५२–६८ पर्यंत आस्गेसंसान व १९६८ मध्ये व नंतर १९७२ मध्ये डॉ. क्रिस्त्यान एल्दयार्न हे अध्यक्ष निवडून आले.

युद्धकाळात व युद्धोत्तर काळात महागाई, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, चलनफुगवटा आदी कारणांनी आइसलँडच्या अर्थव्यवस्थेवर खूपच ताण पडला. युद्धोत्तर काळात आपले हवाई व आरमारी तळ आइसलँडमध्ये असावेत अशी अमेरिकेने मनीषा व्यक्त केली न बऱ्याच वाटाघाटीनंतर केफ्लाव्हिकच्या हवाईतळाची व्यवस्था अमेरिकेकडे सोपविण्यात आली. १९४६ मध्ये आइसलँडला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्व मिळाले व १९४९ मध्ये आइसलँड नाटो संघटनेत सामील झाला. १९५८ मध्ये मच्छीमारी क्षेत्राच्या विस्तारावरून इंग्लंड- आइसलँडमध्ये वातावरण तंग झाले पण आइसलँडच्या निर्णयास इंग्‍लंडने मान्यता दिल्याने प्रकरण सावरले. १ सप्टेंबर १९७२ पासून आइसलँडने मासेमारीसाठी समुद्रसरहद्द ८० किमी. करण्याचा कायदा केला असून त्याबाबत संबंधित राष्ट्रांतर्फे हेग न्यायालयात कारवाई चालू आहे.

राज्यव्यवस्था : आइसलँड प्रजासत्ताक राज्य असून त्याचे शासन १९४४ च्या संविधानानुसार चालते. अध्यक्ष राष्ट्रप्रमुख असतो. त्याची निवडणूक प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वानुसार दर चार वर्षांनी होते. तो पंतप्रधानाची नेमणूक करतो. आल्थिंगची बैठक चालू नसेल तेव्हा तात्पुरते कायदेही करू शकतो. पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाची निवड करतो. शासन मंत्रिमंडळाच्या धोरणानुरूप चालते.

आल्थिंग ही आइसलँडची संसद द्विगृही आहे. आल्थिंगच्या एकूण साठ सभासदांपैकी ४९ चार वर्षांसाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्व-पद्धतीने निवडले जातात. बाकीच्या अकरा जागा पक्षोपक्षांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात त्यांच्यात वाटण्यात येतात. हे साठ सभासद आपल्यातील /३ सभासदांची उच्चसदनाचे सभासद म्हणून निवड करतात. बाकीचे कनिष्ठ गृहाचे सभासद राहतात. सामान्य विधेयके कोणत्याही सभागृहात मांडता येतात. पण अर्थसंकल्प मात्र उभय सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनातच मांडावा लागतो. जून १९७१ च्या निवडणुकीत इंडिपेंडन्स पक्षाचे २२, प्रोग्रेसिव्ह १७, पीपल्स अलायन्स १०, सोशल डेमोक्रॅट्स ६, युनियन ऑफ लिबरल्स अँड लेफ्टिस्ट्स ५, असे प्रतिनिधी निवडून आले व प्रोग्रेसिव्ह, पीपल्स अलायन्स आणि युनियन पक्षांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारावर आले.

शासनाच्या सोईसाठी आइसलँडचे १६ प्रांत करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रांताचा कारभार लोकनियुक्त कौन्सिल व शासननियुक्त शेरीफ चालवितात. मोठ्या शहरांचा काभार नगरपालिकांकडे असतो.

आइसलँडला स्वत:ची संरक्षणदले नाहीत. फक्त किनारासंरक्षण आणि मच्छीमारीच्या संरक्षणासाठी हत्यारी पथके आहेत. नाटोचा सभासद म्हणून अमेरिकेचे सैन्य येथे आहे. त्यांनी येथे चार रडारकेंद्रे उभारली आहेत. प्रांतीय न्यायमंडळे व सर्वांवर देशाचे उच्चतम न्यायालय यांच्या आधीन देशाची न्यायव्यवस्था आहे. आइसलँडमध्ये मृत्युदंड नाही.

अर्थव्यवस्था : आइसलँडमध्ये खनिजे फारशी नाहीत. लिग्नाइट, गंधक आदी क्वचित असली, तरी आर्थिक द्दष्ट्या महत्त्वाची नाहीत. एकूण जमिनीपैकी फक्त अर्धा टक्का जमीन लागवडीखाली असून सु. वीस टक्के नागरिक कृषिव्यवसायात आहेत. आइसलँडमध्ये मोठ्या भूधारकांची संख्या जास्त असून प्रत्येकास सरासरी ५०६ हे. जमीन आहे. शेती यंत्रद्वारा केली जाते. बटाटे, सलगम व गवत हीच येथील प्रमुख पिके. गरम झऱ्यांच्या साहाय्याने, ‘हॉट-हाऊस’ कृषिपद्धतीने फळे, फुले व भाज्या यांचे उत्पन्न काढले जाते. पशुपालन बहुतेक शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय असल्याने गवताच्या लागवडीला येथे फार महत्त्व आहे. बहुतेक शेतकारी गाय, घोडा, कोंबड्या व फरसाठी विविध प्राणी पाळतात. दूध, मांस स्थानिक वापरातच खपते. १९७१ मध्ये देशात ३६,७०६ घोडे, ३५,८४० दुभत्या गाईंसह ५९,१९७ गुरे, ७,८६,२३४ मेंढ्या, ४,८०२ डुकरे व १,७८,४४२ कोंबड्या होत्या.

मोठ्या प्रमाणावर चालणारा येथील एकमेव व्यवसाय म्हणजे मच्छीमारी. देशाचा आकार व लोकसंख्येचा विचार करता प्रामाणत: आइसलँडचे लोक यूरोपीय देशांपेक्षा जास्त मासे पकडतात. आइसलँडने १९७० मध्ये ७,२९,२५४ मेट्रिक टन मासे पकडले. वर्षास सु. ४००—५०० देवमासे पकडतात. जवळच्या देशांना मासे ताजेच निर्यात करतात. दूरदूरच्या देशांना खारावून डबाबंद माल निर्यात होतो. एकंदरीत आइसलँडचा प्रमुख निर्यात व्यापार म्हणजे माशांचे विविध प्रकार. रशिया, अमेरिका, इंग्‍लंड ही या मालाची प्रमुख गिऱ्हाइके. १९७१ ची ३७% निर्यात अमेरिकेला, १३% ग्रेट ब्रिटनला, ८% रशियाला, ७% डेन्मार्कला, ६% पोर्तुगालला, ६% प. जर्मनीला झाली. त्यात ८४% मासे व त्यांचे पदार्थ ८% ॲल्युमिनियम होते.

कच्चा माल व यंत्रोत्पादित वस्तू यांच्या अभावी बहुतेक जीवनावश्यक पदार्थ आयातच करावे लागतात. अन्नधान्ये व इतर खाद्यपदार्थ, यंत्रे, वाहतूक-साधने, जळण आदी पदार्थ अमेरिका, ब्रिटन, रशिया व पूर्व जर्मनीतून आयात होतात. १९७१ ची आयात १६% प. जर्मनी, १४% ग्रेट ब्रिटन, १०% अमेरिका, १०% डेन्यार्क, ७% रशिया, ६% नेदर्लंड्स, ६% स्वीडन, ५% नॉर्वे यांजकाडून झाली. देशांतर्गत उपयोगासाठी कपडे, पादत्राणे, फर्निचर, साबण, रंग, मिठाई, प्लास्टिकच्या वस्तू, विजेची उपकरणे, इ. छोट्या उद्यागांत सु. ५५% कामकरी गुंतले आहेत. छपाई व प्रकाशनव्यवसायही वाढत आहे. बरेच व्यवहार सहकारी संस्थांमार्फत होतात.

देशातील धबधब्यांचा उपयोग करून येथे वीजनिर्मिती करण्यात आली आहे. ३,७४,०० किवॉ. वीज-उत्पादनापैकी २,८४,०० किवॉ. जलविद्युत् उत्पादन होऊ शकते. १९७१ मध्ये येथील वीज-उत्पादन १६०·२ कोटी किवॉ. तास होते. यावर रेक्याव्हीक येथे खत कारखाना व आक्रानेस येथे सिमेंट उद्योग काढले आहेत. बहुतेक खेड्यापाड्यांतूनही विजेचा उपयोग केला गेला आहे. १९६९ मध्ये स्ट्रॉम्सव्हिक येथे निघालेल्या ॲल्युमिनियम कारखान्याची वार्षिक उत्पादनक्षमता ६०,००० मे. टन आहे.

आइसलँडमध्ये रेल्वे नाहीत. ११,१३७ किमी. (१९७१) लांबीचे रस्ते आहेत. १९७१ अखेर ५२, ७६३ मोटारी होत्या. १९६८ पासून वाहतूक उजव्या बाजूने केली जाते. रेक्याव्हीक येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देशातील शहरांशी नियमित विमानवाहतूक आहे. मच्छीमारीच्या प्रगत धंद्यामुळे येथे जहाजवाहतूक व जहाजबांधणी-उद्योगास महत्त्व आहे. देशात १९७० मध्ये ७१,००० दूरध्वनियंत्रे, ६३,००० रेडिओ व ४१,००० दूरचित्रवाणी यंत्रे होती.

क्रोन (अनेककवचन क्रोनर) हे येथील चलन असून त्याची १०० ऑररमध्ये विभागणी केली आहे. एक अमेरिकन डॉलर=८८ क्रोनर व एक स्टर्लिंग=२११ क्रोनर, असा १९६९ मधील विनिमय-दर होता. देशात मेट्रिक वजनेमापे सक्तीची आहेत.


 लोक व समाजजीवन : आइसलँडचे नागरिक प्रामुख्याने स्कँडिनेव्हियन-वंशज आहेत. ते उंच, सशक्त व निळ्या डोळ्यांचे असतात. धर्माने आइसलँडचे ९६ टक्के नागरिक इव्हँजेलिकल ल्यूथरन पंथाचे आहेत. येथे १०० टक्के साक्षरता असून ७ ते १५ वयाच्या मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. १९६८-६९ मध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणासाठी एकूण विद्यार्थी ५०,२४२ व शिक्षक ३,३४३ होते. रेक्याव्हीकला विद्यापीठ असून देशात नौकानयन, कृषी, संगीत, नृत्य व नाट्य, शारीरिक शिक्षण, वाणिज्य व्यवसाय वगैरेंच्या शाळा आहेत. एके काळी क्षय व कुष्ठरोगाचे प्रमाण येथे जास्त होते परंतु ते आटोक्यात आले आहे. बालमृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. १९४७ पासून येथे राष्ट्रीय सुरक्षा-योजना अंमलात असून त्यानुसार बेकार, वृद्ध, अपंग व आजारी यांना मदत मिळते. लोकांत विषमता फारच कमी आहे. राष्ट्राध्यक्षही सामान्य माणसाप्रमाणे वावरताना आढळतो. लोक मोकळ्या मनाचे, उदार व आतिथ्यशील आहेत. लोकसंख्यावाढीचे स्वागत होते. कुमारी मातांचा प्रश्न गंभीर मानीत नाहीत. देशात १९७२ मध्ये दहा हजारांवर खप असलेली पाच दैनिके होती. अनेक नियतकालिकेही निघतात. रेक्याव्हीकच्या राष्ट्रीय ग्रंथालयात सु. तीन लाख व विद्यापीठाच्या ग्रंथालयात सु. दीड लाख ग्रंथ आहेत.

भाषा व साहित्य: आइसलँडची भाषा मूळ नॉर्स लोकांनी येथे आणली. प. नॉर्वेची ती पूर्वी एक बोली होती. आजही त्याच स्वरूपात ती टिकून आहे. आइसलँडचे साहित्य खूपच समृद्ध असून त्या भाषेतील प्राचीन ‘सागा’ प्रकाराचा यूरोपीय साहित्यावर मोठाच प्रभाव पडला आहे. आजही काव्य-कथा, नाटक, कादंबरी इ. क्षेत्रांत आइसलँडचे लेखक मैलिक भर घालत असून १९५५ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक कादंबरीकार ⇨हाल्डोर लाक्सनेस (१९०२–    ) याने मिळविले आहे.

क्रीडा, मनोरंजन व प्रसिद्ध स्थळे : कुस्ती हा येथील राष्ट्रीय खेळ होय. हँडबॉल, सॉकर, बास्केटबॉल, बर्फावरील खेळ आणि इतर व्यायामप्रकार येथे सर्वत्र आढळतात. सर्व मुलांना पोहता येणे येथील कायद्याने आवश्यक आहे. ऊन पाणी खेळवलेले तलाव गावोगाव आढळतात. बुद्धिबळाचा खेळ लोकप्रिय आहे. जगात गाजलेली फिशर– स्पास्की बुद्धिबळस्पर्धा रेक्याव्हीकलाच झाली. संगीत, नृत्य, नाट्य व विविध कलांवर यूरोपीय छाप आहे. एइनार योनसॉन (१८७४–१९५४) हा प्रसिद्ध शिल्पकार झाला. शास्त्रांच्या विविध शाखांमध्येही अनेक आइसलँडर्सनी नाव कमावले आहे. रेक्याव्हीक (७८,३९९) शिवाय आक्रानेस (४,१४८) हे औद्योगिक बंदर, आकूरेरी (९,६४२) हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर, हाफ्‍नारफ्यर्दर (८,१३५) ही शहरे आहेत. उष्णोदकाचे आकर्षक फवारे व झरे, हिमक्षेत्रावरील खेळ, मच्छीमारी यांकरिता येथे जगातील प्रवासी येतात.

ओक, द. ह.

४. आइसलँडमधील एक नमुनेदार प्रपात, ५. दर्यावर्दी संशोधक लेव्ह एरिकसनचा (११ वे शतक), ६. बर्फाच्छादित मैदानावरील मुलांचा सायंविहार, रेक्याव्हिक, ७. ओझीवाहक केल्टिक जातीची तट्टे, आइसलँड.