बेरूत : लेबाननची राजधानी व भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ७,२०,००० (१९७८). येथे सेंट जॉर्ज  व ड्रॅगन

बाब इद्रिस : बेरूत शहराचा गजबजलेला भाग

यांची लढाई झाल्याचे व तीत ड्रॅगन मारला गेल्याची दंतकथा आहे. फीनिशियन काळात इ.स.पू. १५०० च्या सुमारास व्यापाराचे केंद्र म्हणून त्याचा उदय झाला आणि मग रोमन काळात भरभराट झाली. रोमन लोकांची वसाहत आणि रोमन कायद्याचे पीठ म्हणून बंरूतला महत्त्व आले. बेरूतच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाच्या सर्व खुणा इ.स.५५१ च्या भूकंपात नष्ट झाल्या. अरबांनी ६३५ मध्ये बेरूत जिंकले. धर्मयुद्धात ११०० मध्ये ख्रिश्चनांनी हे जिंकल्यानंतर १२९१ पर्यंत ते जरूसलेमच्या लॅटिन साम्राज्यात होते. ड्रूसस अमिरांनी १५१७ मध्ये याचा ताबा मिळलविला. ईजिप्तच्या इब्राहिम पाशाने १८३० मध्ये बेरूत जिंकले पण १० वर्षांनी संयुक्त इंग्रजी व फ्रेंच फौजोनी त्याचा पाडाव करून पुन्हा तुर्कांच्या ताब्यात शहर दिले. पहिल्या महायुद्धात फ्रेंच सैन्याने या शहरावर ताबा मिळविला. फ्रेंच महादेशाने, १९२० साली स्थापन झालेल्या बृहन्‌ लेबानन प्रदेशाची ही राजधानी करण्यात आली. १ जानेवारी १९४५ रोजी लेबाननला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा राजधानी बेरूतच राहिली. लेबाननच्या स्वातंत्र्योत्तर काळात अरब-इझ्राएल युद्धापेक्षा तेथील ख्रिश्चन-मुसलमान संघर्षामुळे पेटलेल्या यादवी युद्धामुळे बेरूतची फार हानी झाली. परराष्ट्रांनी लेबाननमध्ये हस्तक्षेप केला व १९७६ मध्ये बेरूतचा काही भाग सिरियन फौजांनी व्यापला. जून १९८२ मधील इझ्रायली आक्रमणाने येथे अस्थिर वातावरण निर्माण झाले.

शहरात अनेक प्रकारचे उद्योगधंदे असून तेथील रेशमी-सुती वस्त्रे, सोन्या-चांदीची भांडी प्रसिद्ध आहेत. अन्नप्रक्रिया हासुद्धा मोठा उद्योधंदा आहे. ऑलिव्ह तेल, लाकूड, तीळ यांची निर्यात तेथून होते. बेरूत दमास्कसशी आंतरराष्ट्रीय महामार्गाने व लोहमार्गाने जोडलेले आहे. ॲन नाकूरॉ-बेरूत-ट्रिपोली या अरुंद मापी रेल्वेने देखील काही वाहतूक चालते. भूमध्य समुद्राचा किनारा व लेबाननमधीलच बालाबाक येथील रोमन अवशेष यांमुळे बेरूतला पर्यटकांची गर्दी होते. पूर्व-पश्चिम हवाई मार्गावरील मध्यपूर्वेतील हे एक महत्त्वाचे स्थान आहे पण यादवी युद्धामुळे उद्योगधंदे, व्यापार व पर्यटन व्यवसाय यांवर अनिष्ट परिणाम झाला आहे. उदा., उद्योगधंद्यात एकूण क्षमतेच्या फक्त ६०% उत्पादन झाले असून येथील विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे व प्रवाशांची संख्या ही दोन्ही निम्याने घटली आहेत.

प्राचीन काळी बेरूत ख्रिश्चन धर्माचे व रोमन ज्ञानपरंपरेचे महत्त्वाचे केंद्र होते. येथील ‘अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बेरूत’, ‘लेबानीज युनिर्व्हर्सटी’ व ‘सेंट जोसेफ युनिव्हर्सिटी’ ही विद्यापीठे उल्लेखनीय आहेत. अरबी साहित्याच्या अभ्यासाचे पुनरुज्जीवन करण्यात सेंट जोसेफ विद्यापीठ अग्रेसर आहे.

 पंडित, अविनाश