स्टॉकहोम : स्वीडन या देशाची राजधानी व देशातील दुसर्‍या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या ८,६४,३२४ ( २०११ अंदाज ). हे स्वीडनच्या पूर्व किनार्‍यावर, फिनलंड आखातासमोर, मेलारन सरोवर बाल्टिक समुद्रास मिळते तेथे वसलेले आहे. हे शहर मुख्य भूमिसोबतच १४ लहानलहान बेटांवर वसलेले आहे. विशिष्ट स्थान आणि प्राप्त निसर्गसौंदर्य यांमुळे या शहरास जगातील सर्वोत्कृष्ट राजधानीचे शहर म्हणून संबोधण्यात येते. सु. ५० लहानलहान पुलांनी शहराचे विविध भाग जोडलेले आहेत. त्यामुळे यास ‘ सिटी बिट्विन द ब्रिजेस ’ आणि येथील जलमार्गामुळे ‘ व्हेनिस ऑफ नॉर्थ ’ असेही म्हणतात. हे देशातील प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र असून दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते, लोहमार्ग, हवाई व जलवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथील ॲरलँड विमानतळावरून आंतरराष्ट्रीय व ब्रोमा विमानतळावरून आंतरदेशीय हवाई वाहतूक चालते.

स्टॉकहोम शहराचे एक दृश्य.

हे शहर १२५० च्या सुमारास वसविलेले असावे. १२५२ मध्ये स्वीडिश योद्धा बिर्यर यार्ल याने या शहराचा विकास केला. येथे त्याने किल्ला बांधला होता. जर्मनीतील ल्युबेक या शहराशी व्यापारी करार केल्यानंतर व्यापारवाढीमुळे या शहराची आर्थिक भरभराट झाली. १४३६ मध्ये ही स्वीडनची अधिकृत राजधानी करण्यात आली. डेन व स्वीडिश यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पहिला गस्टाव्हस व्हासा याच्या प्रयत्नाने हे शहर डॅनिश सत्तेतून मुक्त झाले (१५२३). सतराव्या शतकात देशाच्या विकासाबरोबरच शहरही विकसित झाले. केंद्र सरकारची अनेक कार्यालये येथे सुरू झाली. जुने शहर हे प्रामुख्याने स्टडस्, हेल्गेअँडस्, रिडार या बेटांवर वसलेले आहे. या परिसरातील इमारती प्रामुख्याने सोळाव्या शतकातील आहेत. अठराव्या शतकात आगीमुळे शहराची हानी झाली होती तद्नंतर येथे दगडी इमारती बांधण्यात आल्या. एकोणिसाव्या शतकात औद्योगिक विकासाबरोबरच शहरात बागबगीचे, रूंद रस्ते, चौक, शाळा, संग्रहालये, ग्रंथालये, रुग्णालये इ. सुविधा निर्माण झाल्या.

शहरात यंत्रसामग्री निर्मिती, कागद व छपाई, रसायने, अन्नप्रक्रिया, इ. उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. येथे अनेक बँका व विमा कंपन्यांची मुख्यालये आहेत. शैक्षणिक दृष्ट्याही या शहरास महत्त्व असून येथे स्टॉकहोम विद्यापीठ (१८७७), रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१८२७), कॅरोलाईन मेडिकल इन्स्टिट्यूट इ. उच्च शिक्षण संस्था आहेत. सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांत रॉयल थिएटर, स्टॉकहोम फिलार्मानिक् ऑर्केस्ट्रा, रॉयल ड्रमॅटिक् थिएटर प्रमुख आहेत.

येथील स्टडस् बेटावरील रॉयल पॅलेस (१६९७—१७५४), सेंट निकोलस चर्च, शेअर बाजार, रिडार बेटावरील रिडारहोल्म चर्च, हेल्गेअँडस् बेटावरील संसदभवन, नॅशनल बँक, कुंग बेटावरील नगरभवन, जुर्गर्डेन बेटावरील स्कान्सेन खुले संग्रहालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.