स्कॉट, रॉबर्ट फॉल्कन : (६ जून १८६८ — २९ मार्च १९१२). ब्रिटिश नौदल अधिकारी व अंटार्क्टिकाचा समन्वेषक. त्याचा जन्म इंग्लंडमधील डेव्हन परगण्यातील डेव्हनपोर्ट येथे झाला. तो १८८० मध्ये रॉयल नेव्हीमध्ये दाखल झाला व १८९७ मध्ये त्यास प्रथम लेफ्टनंट हे पद प्राप्त झाले. स्कॉटने दक्षिण ध्रुव समन्वेषणासाठी आपले जीवन समर्पित केलेले होते. प्रथम लेफ्टनंट पदावर काम करताना स्कॉटने विशेष प्राविण्य मिळविले होते. याचा भविष्यातील योजनांसाठी त्याला फायदा झाला. तसेच ॲल्बर्ट एच्. मार्कम व क्लेमंट्स रॉबर्ट मार्कम यांचे स्कॉटला समन्वेषणात विशेष सहकार्य लाभले होते. १९०० मध्ये रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी व रॉयल सोसायटी यांनी रॉस समुद्राच्या सभोवतीच्या भागाच्या समन्वेषणासाठी आयोजित केलेल्या नॅशनल अंटार्क्टिका मोहिमेत एचएमएस डिस्कव्हरीचा स्कॉट समादेशक होता. या मोहिमेत एडवर्ड ए. विल्सन व लेफ्टनंट अर्नेस्ट एच्. शॅकल्टन यांसह स्कॉट ८२° १७’ अक्षांशापर्यंत पोहोचला होता. येथे त्यांना ग्रेट आइस बॅरिअर ( बर्फाची भिंत ) निदर्शनास आली. या मोहिमेवरून परतत असतानाच स्कॉटला कॅप्टन म्हणून पदोन्नत करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे स्कॉटने आपल्याकडे सक्षम शास्त्रीय अन्वेषकाचे व नेतृत्वाचे गुण असल्याचे सिद्ध केले होते. त्याने द व्हॉयेज ऑफ द डिस्कव्हरी (१९०५) मध्ये या मोहिमेचे अनुभव लिहिलेले आहेत.

स्कॉटने ब्रिटिश व डोमिनियन प्रशासनाच्या साहाय्याने रॉस समुद्राचा अभ्यास करणे व दक्षिण ध्रुवावर पोहोचणे या ध्येयाने दुसर्‍या अंटार्क्टिका मोहिमेचे नियोजन केले होते. न्यूझीलंडमधील केप एव्हन्झ येथून टेरानोव्हा जहाजातून स्कॉट दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेवर निघाला होता (२४ ऑक्टोबर १९११). या मोहिमेत त्याने कुत्री, मोटर स्लेज (बर्फावरून घसरत जाणारी बिनचाकाची गाडी), तट्टू इ. साहित्य बरोबर घेतले होते. त्याने या मोहिमेत दक्षिण ध्रुवाच्या मार्गावर वन टन डेपो नावाचा तळ उभारला होता. ई. ए. विल्सन, एच्. आर. बाउअर्स, लेफ्टनंट ई. जी. ओेट्स, एडगर एव्हन्झ या सहकार्‍यांसह स्कॉट दक्षिण ध्रुवावर १८ जानेवारी १९१२ रोजी पोहोचला होता मात्र त्याच्या अगोदरच नॉर्वेजियन समन्वेषक रोआल आमुनसेन हा दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे हे समजल्यावर त्यांचा अपेक्षाभंग झाला.

मोहिमेतून परतताना हवामान अत्यंत खराब असल्याने स्कॉटला व त्याच्या सहकार्‍यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले होते.त्यातच स्कॉटचे सहकारी दिवंगत झाल्याचे व स्कॉट २९ मार्च १९१२ रोजी मृत झाल्याचे त्याच्या दैनंदिनीतील नोंदीन्वये निदर्शनास येते.त्यांच्या शोधार्थ गेलेल्या बचाव चमूला १२ नोव्हेंबर १९१२ रोजी तळावरील तंबूत स्कॉटचा मृतदेह व त्याची दैनंदिनी आढळली होती. स्कॉटच्या दैनंदिनीतील नोंदीन्वये बिअर्डमोर येथील भूगर्भशास्त्रीय नमुन्यांची व मोहिमेची माहिती मिळते.

स्कॉटच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने त्याच्या धाडस व देशभक्ती यांबद्दल त्याला नॅशनल हीरो म्हणून गौरविले.

गाडे, ना. स.