ॲडमिरॅल्टी बेटे : (१) पॅसिफिकमध्ये न्यू गिनीच्या उत्तरेस सु. ३२० किमी.वरील बिस्मार्क द्वीपसमूहातील लहानमोठ्या चाळीस ज्वालामुखी व प्रवाळ बेटांचा समुदाय. द. अक्षांश १ ते ३ व पू. रेखांश १४६ ते १४८. क्षेत्रफळ २,०७२ चौ. किमी., लोकसंख्या २१,५८८ (१९६९).

मानूस किंवा ग्रेट ॲडमिरॅल्टी हे मुख्य बेट (१,५५४ चौ. किमी.) असून त्यांशिवाय रांबूट्यो, लू, हॉर्नो, टोंगी, लोझ नेग्रोस, लॉस रीस, सॅन मिगुगेल, पाम बालुअन, पापीआलू, अलिम, सौवाई, जॉन्स्टन, पर्डी, मौक, सॅबेन, वेस्टर्न ही इतर वालुकामय लहान प्रवाळ बेटे आहेत.

मानूस बेट सर्वांत मोठे व महत्त्वाचे आहे. त्याची पूर्व-पश्चिम लांबी ८० किमी. व दक्षिणोत्तर रुंदी २७ किमी. आहे. तेथील मौंट ड्रेमसेल ह्या सर्वोच्च शिखराची उंची ७१८ मी. आहे. बरेच डोंगर ३०० मीटरपेक्षा जास्त उंच आहेत. १९५९ मध्ये तेथे ज्वालामुखी-उद्रेक झाला होता. या प्रमुख बेटाभोवती बरीच लहान प्रवाळद्वीपे आहेत. येथे सु. ३७५ सेंमी. पाऊस पडतो. सर्वत्र दाट जंगल व किनाऱ्यावर खारकच्छ वनश्री आहे. सीॲडलर हे चांगले नैसर्गिक बंदर असून लोरेगाऊ हे शासकीय केंद्र आहे. लोक मेलानीशियन लोकांसारखेच दिसतात. नारळीच्या बागा व तज्जन्य उत्पादन हा प्रमुख व्यवसाय आहे दुसऱ्या महायुद्धानंतर बागा कमी झाल्या. आता तारो, याम, केळी, अननस, साबुदाणा यांचे उत्पादन होते. मोती काढण्याचा व मासेमारीचा व्यवसायही चालतो.

डच नाविक व्हिलेम स्खाउटेन याने १६१६ मध्ये ही बेटे शोधली. १८८५ मध्ये जर्मनीने ही बेटे व्यापली व पहिल्या महायुद्धापर्यंत ती जर्मनीकडेच होती. १९१४ मध्ये ऑस्ट्रेलियाने ही व्यापली व १९२० मध्ये महादिष्ट प्रदेश म्हणून ऑस्ट्रेलियाकडेच होती. १९४२ साली ती जपानने व्यापली होती, ती १९४४ मध्ये मुक्त झाली. आज ही बेटे संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्ततेखाली ऑस्ट्रेलियाकडे आहेत.

(२) अलास्काच्या आग्नेयेस ॲलेक्झांडर द्वीपसमूहात ४,३१० चौ. किमी. क्षेत्रफळाचे एक बेट आहे. त्याची लांबी सु. १४५ किमी. व रुंदी ५६ किमी. आहे. सर्वोच्च उंची सु. १,४०० मी. आहे. मासेमारी व लाकूडतोड हे प्रमुख व्यवसाय आहेत. अँगून येथे मासे डबाबंद करण्याचा कारखाना आहे. ॲडमिरल जॉर्ज व्हॅनकूव्हर याने हे वेट १७९३ च्या सुमारास शोधले.

डिसूझा, आ. रे.