बांगी : मध्य आफ्रिका प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ३,००,००० (१९७७ अंदाज). हे ब्रॅझाव्हीलच्या ईशान्येस १,०३० किमी. ऊबांगी नदीच्या पश्चिम काठावर वसलेले असून देशातील एक महत्त्वाचे नदीबंदर आहे. काँगो-ऊबांगी नद्यांतून होणाऱ्‍या जलवाहतुकीचे हे उत्तरेकडील अंतिम स्थानक आहे. रेल्वेने ते कॅमेरूनशी जोडलेले असून कॅमेरून व चॅड या देशांना जोडणाऱ्‍या आंतरराष्ट्रिय महामार्गावरील व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे स्थानक आहे.

 

साव्हॉर्‌न्यां द ब्राझा या फ्रेंच समन्वेषकाच्या (१८५२–१९०५) साहाय्यकाने १८८९ मध्ये हे शहर प्रथम वसविले. दुसऱ्‍या महायुद्धोत्तर काळात यास प्रशासकीय व व्यापारी महत्त्व प्राप्त झाल्याने त्याचा विकास घडून आला. आसमंतातील शेतमालाची ही एक मोठी बाजारपेठ आहे. शहरात खाद्य तेलनिर्मितीच्या मोठ्या गिरण्या असून अन्नप्रक्रिया, पादत्राणे, साबण सुती कापड इ. उद्योग विकसित झाले आहेत. या बंदरातून कापूस, कॉफी, लाकूड इ. वस्तूंची निर्यात केली जाते. शहरात ‘झां बेदेल बोकासा विद्यापीठ’(स्था. १९७०) आहे.

लिमये, दि. ह.