हिमगर्त : हिमनदीद्वारे खडकातील द्रव्य खणून काढले जाते व ते द्रव्य हिमनदी इतरत्र निक्षेपित करते. अशा निक्षेपित प्लवराशीत तीव्र उताराच्या बाजू असणारा वाडग्याच्या आकाराचा खोलगट भाग तयार होतो, त्याला हिमगर्त म्हणतात. माघार घेत असलेल्या हिमनदीतील तुटून मागे राहिलेला व प्लवराशीत अंशतः वा पूर्णपणे गाडला गेलेला बर्फ सावकाशपणे वितळून असा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार खोलगट भाग तयार होतो. हिमनदीच्या अनियमित आकाराच्या अंतिम भागाच्या माथ्यावर बर्फाच्या पाण्याने वाहून आणलेली वाळू व रेती सावकाशपणे साचतजाते. याच्या परिणामी अशा हिमराशींच्या घटना घडतात, असे मानले जाते. हिमगर्तांचा व्यास ५ मी.पासून १३ किमी.पर्यंत असू शकतो आणि त्यांची खोली ४५ मी.पर्यंत असू शकते. पाण्याने भरलेल्या हिमगर्तांना हिमगर्त सरोवरे म्हणतात. बहुतेक हिमगर्तांचा आकार वर्तुळाकार असतो. कारण बर्फाच्या वितळणाऱ्या खंडांची प्रवृत्ती गोलाकार धारण करण्याची असते. अतिशय अनियमित अशा बर्फाच्या राशींपासून शाखायुक्त किंवा विकृत आकाराचे खोलगट भाग तयार होऊ शकतात. 

 

पुढील दोन प्रकारचे हिमगर्त माहीत आहेत. एक तर अंशतः गाडल्या गेलेल्या बर्फाच्या राशीपासून बर्फाच्या वितळण्याने मागे राहिलेल्या मोकळ्या जागेत आधारहीन अवसाद (गाळ) सरकून अथवा घसरून खोलगट भाग तयार होतो. दुसऱ्या प्रकारात पूर्णपणे गाडल्या गेलेल्या बर्फाच्या राशीपासून तिच्यावर असलेला अवसाद ढासळून वा कोसळून खोलगट भाग तयार होतो. या दोन्ही प्रक्रियांद्वारे हिमनदी माघार घेताना मागे न राहिलेल्या तर बर्फ वितळण्याने बनलेल्या पाण्याच्या उथळ प्रवाहांनी तेथे तरंगत आणलेल्या बर्फाच्या खंडांपासून वा ठोकळ्यांपासून लहान हिमगर्त तयार होऊ शकतात. हिमगर्त एकेकटे किंवा गटागटाने आढळू शकतात. जेव्हा अनेक हिमगर्त एकत्र आढळतात, तेव्हा तेथील भूप्रदेश टेकाडे (उंचवटे) व द्रोणी (खोलगट भाग) असल्यासारखा दिसतो आणि त्याला गर्त व कंकतगिरी भूमिस्वरूप म्हणतात. कंकतगिरी हे बुटके, लांबट असे प्लवराशीचे टेकाड असते आणि त्यात वाळू व रेती यांचे स्तर असून वितळणाऱ्या हिमनदीच्या अंतिम सीमेलगत जलोढीय व्यजनाच्या (पंख्याच्या) किंवा त्रिभुज प्रदेशाच्या रूपात ते निक्षेपित झालेले असते. 

 

पुष्कळदा आधीच्या खड्ड्यांत हिमनदीद्वारे अवसाद साचून तेथे हिमगर्त तयार होऊ शकतो. उन्हाळ्यात हिमनदीच्या पृष्ठावरील बर्फ वितळून ते उतारावरून वाहू लागते. काही पाणी खडकांमधील भेगांत शिरते. ते गोठल्यावर बर्फाचे आकारमान पाण्यापेक्षा जास्त झाल्याने भेगा रुंद होतात. बर्फाचे वितळणे व हिमनिर्मिती सतत चालू असल्याने तेथील खडकफुटून त्यांचे तुकडे हिमनदीच्या पात्रात पडतात. या तुकड्यांच्या घर्षणाने पात्र खोल होत जाते व तेथे हिमगर्त निर्माण होतो. हिमनदीच्या अशाघर्षणाने हिमगर्त विस्तृत होतात. हिमनदीचा अंत झाल्यावर यांत पाणी साचून हिमगर्त सरोवरे तयार होतात. हिमनदीच्या मध्यभागी अशी सरोवरे अधिक प्रमाणात तयार होतात. उदा., कॅनडातील असे सर्वांत मोठे आँटॅरिओ सरोवर १६० हे. क्षेत्रफळावर पसरले असून त्याची खोली १० मी. झाली आहे. अमेरिकेतील हिमगर्तांचा कमाल व्यास १० किमी. आहे. वनस्पतींनी व्यापलेल्या हिमगर्ताला हिमगर्तवन म्हणतात. उन्हाळ्यात काही हिमगर्त कोरडेही होतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा व सायबीरियात सर्वाधिक हिमगर्त आढळतात. उत्तर सायबीरियातील काही हिमगर्तांमधील पाणी गरम असल्याचे दिसून येते. हिमगर्त सरोवरातील पाण्याची खोली मोजण्यासाठी व तेथील पर्यावरण जाणून घेण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचाउपयोग करतात. 

 

पहा : हिमनदी व हिमस्तर हिमानी क्रिया. 

गोडसे, एम्. व्ही.