आस्वान: ईजिप्तमधील शहर.लोकसंख्या २,०६,३०० (१९७० अंदाजे). नाईल नदीवरील पहिल्या प्रपाताजवळ, एलेफंटायनी बेटाशेजारी, नदीच्या पूर्व किनाऱ्यावर हे शहर असून कैरोहून दक्षिणेकडे लोहमार्गावर ८९३ किमी. आहे. साईनी अथवा सेव्हेने ही याची बायबलकालीन नावे. आस्वानजवळ उत्कृष्ट दगडाच्या खाणी असल्यामुळे शहराच्या आसमंतात ईजिप्तच्या राजांची भव्य थडगी आणि मंदिरे बांधली गेली. अबू सिंबेल हे जगप्रसिद्ध स्थळ त्यांपैकीच एक होय. हिवाळ्यात राहण्याकरिता येथे पूर्वीपासूनच प्रवासी येत. हल्ली येथे खतकारखाना, सुतीव गरम कापडाच्या गिरण्या असून कातडी कमविणे, पादत्राणे बनविणे वगैरे उद्योगधंदे चालतात. शहराच्या पाच किमी. उत्तरेस नाईलवर बांधण्यात आलेल्या आस्वान धरणामुळे हे शहर जगप्रसिद्ध झाले आहे.हे धरण सु. १११ मी. उंच, १,००० मी. लांब आणि धरणाने बनविलेला जलाशय ४९९ किमी. लांब आहे. हे धरण ईजिप्त व सूदान यांना वरदान ठरणारे असल्यामुळे आस्वानला फारच महत्त्व आहे.

शाह, . रू. जोशी, चंद्रहास