ट्रान्सिल्व्हेनिया : (जंगलापलीकडील प्रदेश). रूमानियन प्रजासत्ताकाचा वायव्य व मध्य पठारी प्रदेश. सरासरी उंची सु. ३०० ते ५०० मी. क्षेत्रफळ ५५,१५८ चौ. किमी. लोकसंख्या पंचवीस लाखांहून अधिक. याच्या दक्षिणेस ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्सच्या पलीकडे वालेकिया, पूर्वेस कार्पेथियन पर्वतरांगेपलीकडे मॉल्डेव्हिया व बूकव्हीना, नैर्ऋत्येस बनात व पश्चिमेस क्रीशाना आणि मारामुरेश हे प्रदेश आहेत. हा कार्पेथियन डोंगराळ प्रदेशाचाच भाग आहे. येथील हवामान खंडांतर्गत, विषय असते. या प्रदेशातून मुरेश, ऑल्ट व सोमेश या प्रमुख नद्या वाहतात. आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या ट्रान्सिल्व्हेनिया हा रूमानियाचा सर्वांत पुढारलेला भाग समजला जातो.

झीऊ (झीऊल) नदीखोऱ्यातील लिग्नाइट कोळसा, मीथेन वायू, लोखंड, मँगॅनीज, मौल्यवान धातू, शिसे, गंधक, तांबे, सैंधव आणि खनिजयुक्त पाण्याचे अनेक झरे ही येथील नैसर्गिक संपत्ती होय. खाणकाम, कापड उद्योग, अन्नपदार्थप्रक्रिया, लाकूडतोड, पशुपालन, शेती व बागायती हे प्रमुख उद्योग आहेत. चारा, धान्ये, बटाटे, अंबाडी, साखरबीट, द्राक्षे, फळे यांचे उत्पादन होते. क्लूझ, स्टालिन अथवा ब्राशॉव्ह व सीबीऊ ही येथील प्रमुख शहरे आहेत. येथे वालेकियन म्हणजे रूमानियन, मग्यार व जर्मन लोक राहतात.

रोमन काळातील डेशीयाच्या या भागात अनेक टोळ्यांच्या आक्रमणांनंतर नवव्या शतकात सेक्लर, व्ह्‌लाक व सॅक्सन लोकांनी वसती केली. १००३ मध्ये हंगेरियनांनी तो जिंकला. तेराव्या शतकात मंगोलांच्या व तुर्कांच्या स्वाऱ्या झाल्या. तुर्कांच्या पाडावानंतर हॅप्सबर्ग घराण्याची सत्ता आली. १७६५ मध्ये तो ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात होता. येथे अनेक धार्मिक व वांक्षिक संघर्ष झाले. प्रॉटेस्टंटांचा हा बालेकिल्ला समजला जाई. १८४८ च्या क्रांतीत येथे जोराच्या चकमकी झाल्या. १८६७ मध्ये हा हंगेरीचा भाग बनला. १९१८ मध्ये तो रूमानियास जोडण्यात आला. उत्तर भाग १९४०–४५ मध्ये हंगेरीकडे होता परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर तो पुनः रूमानियाकडे आला.

लिमये, दि. ह.