व्हालेन्सिएंझ : फ्रान्सच्या नॉर्ड विभागातील एक नगर. लोकसंख्या ३९,२७६ नगरसमूह ३,३८,३९२ (१९९०). उत्तर फ्रान्समध्ये बेल्जियम सरहद्दीजवळ एस्को (स्केल्ट) नदीच्या काठावर हे नगर वसले आहे. व्हॅलंटिनिअन या रोमन साम्राज्यावरून किंवा व्हाल देस सिग्नेस (व्हॅली ऑफ द स्वॅन्स) यावरून हे नाव आले असावे. सम्राट शार्लमेनच्या राजवटीत (इ.स. आठवे-नववे शतक) हे एक महत्त्वाचे नगर होते. इ.स. १३२८ मध्ये हेनोच्या फिलिपाचा इंग्लंडच्या तिसऱ्या एडवर्डशी येथे विवाह झाल. पंधराव्या शतकात बर्गंडीच्या ड्यूकच्या ताब्यात हे नगर गेले. पुढील काळात हे नगर आलटून पालटून स्पॅनिश व फ्रेंच अमलांखाली राहिले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत नगराची बरीच हानी झाली. त्यानंतर नगराची पुनर्रचना करण्यात आली. फ्लेमिश व फ्रेंच शैलीतील नावीन्यपूर्ण कलाकृती येथील ललितकला संग्रहालयात जतन केलेल्या आहेत. त्यांत रूबेन्स व व्हातो यांच्या चित्रांचाही समावेश आहे.

औद्योगिक, व्यापारी तसेच वाहतुकीच्या दृष्टीने हे शहर महत्त्वाचे आहे. एके काळी हे उत्तम प्रतीच्या लेस-उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. एकोणिसाव्या शतकातील पीछेहाटीनंतर पुढे या उद्योगाचे काही प्रमाणात पुनरुज्जीवन करण्यात आले. समृद्ध कोळसा-क्षेत्रात हे वसलेले असल्याने विविध उद्योगांना पुरेसा ऊर्जापुरवठा होऊ शकतो. खनिज तेल शुद्धीकरण, अन्नप्रक्रिया, रसायने, वस्त्रोद्योग, धातुकर्म, यंत्रनिर्मिती, मोटारगाड्यांची जुळणी, प्लॅस्टिक निर्मिती, मृत्तिका शिल्प इत्यादींचे उद्योगधंदे येथे चालतात. उत्तर समुद्र किनाऱ्यावरील डंकर्कपासून अंतर्गत भागात येणारा कालवा येथून जात असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने हे नगर महत्त्वाचे आहे.

चौधरी, वसंत