तैवान : चीनच्या मुख्य भूमीपासून सु. १६० किमी. वरील बेट. याला पोर्तुगीज फॉर्मोसा (फर्मास = सुंदर) म्हणत. याच्या जवळची १३ लहान बेटे, तसेच पंगहू किंवा पेस्कदोरझमधील ६४ बेटे, किमॉय गटातील ४ बेटे आणि माद्‍झू बेटे तैवानमध्ये समाविष्ट होतात. पैकी एकट्या तैवान बेटाचे क्षेत्रफळ ३५,७६३ चौ. किमी., पेस्कदोरझ बेटांचे सु. १२७ चौ. किमी., सर्व बेटांसह तैवानचे क्षेत्रफळ ३५,९८१ चौ. किमी. आहे. लोकसंख्या १,५५,७०,००० (१९७३ अंदाज). ही सर्व बेटे ११८° २३ पूर्व ते १२२° २५पूर्व व २१° ४५ २५ उत्तर ते २६° उत्तर यांदरम्यान पसरली आहेत. फक्त तैवान बेट २१° ५४ उ. ते २५° १८ उ. यांत असून त्याची दक्षिण–उत्तर लांबी सु. ३७६ किमी. व पूर्व–पश्चिम रूंदी सु. १४४ किमी. आहे. त्याच्या जवळजवळ मध्यातून  कर्कवृत्त जाते.

सध्या तैवान ‘राष्ट्रीय चीन’, ‘नॅशनॅलिस्ट चायना’ किंवा ‘रिपब्‍लिक ऑफ चायना’ म्हणून ओळखले जाते परंतू हे शासन संपूर्ण चीनवरच हक्क सांगते. चीनच्या मुख्य भूमीवरील कम्युनिस्ट शासनही तैवानसह संपूर्ण चीनवरच हक्क सांगते.

तैवान


भूवर्णन : टर्शरी कालखंडानंतरच्या वलीकरणाच्या काळात हे बेट पश्चिमेकडे तीव्रतेने कलले. यामुळे पूर्वेकडे तीव्र उतारांचे समुद्रकडे असून पूर्व किनाऱ्यावर सखल प्रदेश फारसा नाही परंतु पूर्व किनाऱ्यावर काही नद्यांची मुखे आहेत. प्रस्तरभंगामुळे आणि नंतर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे जुंग यांग शानमो पर्वताच्या रांगा तयार झालेल्या आहेत. त्यांची जास्तीत जास्त उंची ‘मौंट मॉरिसन’ किंवा ‘यू शान’ येथे ३,९९७ मी. आहे. ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीची पुष्कळ शिखरे आहेत. पर्वत स्लेट व शिस्टयुक्त आहेत. एकुण क्षेत्रफळापैकी ३८% भूमी संपूर्णपणे डोंगराळ म्हणूनच ओळखली जाते. २५% जमीन ही डोंगरउतरणीची आहे. डोंगराळ प्रदेशाभोवती सु. १,५०० मी. उंचीच्या कित्येक अलग टेकड्या आहेत. पश्चिमेकडील प्रदेश सौम्य उताराचा असून पश्चिम किनारी प्रदेश जलोढ मैदानी आहे. डोंगराळ भागात नद्यांचे प्रवाह वेगवान असून सखल प्रदेशात त्यांचा वेग बराच कमी झालेला आढळतो. त्यामुळे सुपीक खोरी बरीच आढळतात. टर्शरी कालखंडात तयार झालेले खडक तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात असून जांभा (लॅटेराइट)आणि लाव्हांचे खडकही डोंगराळ भागात आढळून येतात. या प्रदेशात वारंवार भूकंपाचे लहान धक्के बसतात. जॉश्‍वे नदी १८२ किमी. लांब असून सर्वांत मोठी हीच आहे. बहुतेक नद्या लहान व उथळ असून त्यांस पावसाळ्यात पूर येतात एरवी त्या कोरड्याही पडतात. त्या नौसुलभ नाहीत. उत्तरेकडील दानश्‍वे मात्र तैपे राजधानीपर्यंत नौसुलभ आहे.

मृदा : बेटाच्या २५% भूप्रदेशावर म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर व नद्यांच्या खोऱ्यांत सुपीक जलोढ मृदा आहेत. बाकीच्या उंच प्रदेशात अती क्षरणामुळे मृदा अपक्षालित, आम्‍ल व नापीक आहेत.

खजिन संपत्ती : अलोहित धातूंपैकी तांबे, सोने व चांदी तैवानमध्ये थोडी आढळतात. बॉक्साइट, गंधक व मीठ यांचेही साठे येथे असून वायव्य तैवानमध्ये थोडे खजिन तेल व नैसर्गिक वायू सापडताे. तेल व नैसर्गिक वायू नळांच्या साहाय्याने औद्याेगिक केंद्रांना पुरवला जातो. कीलुंग व तैपे येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. संगमरवर, चुनखडक, डोलोमाइट पूर्व किनाऱ्यावर मिळतात. फॉस्फरस, लोहधातुक, मँगॅनीज, ॲसबेस्टॉस, संगजिरे, काच–वाळू व इतर काही खनिजे अल्प प्रमाणात आहेत. समुद्रातून मीठ मिळते. बरेच खनिज पदार्थ जपानला निर्यात केले जातात.

हवामान : हे बेट मोसमी हवामानाच्या प्रदेशात मोडते. कर्कवृत्तावर हे बेट असल्याने उन्हाळे बेताचे उष्ण आहेत. जून ते सप्टेंबर उन्हाळी तपमान किनाऱ्यावर सु. ३०° से. असून अंतर्गत भागात उंचीनुसार ते कमी होत जाते. जानेवारीत तपमान १५° से. च्या आसपास असते. प्रदेश समुद्रवलयांकित असल्याने व जवळून कुरोसिवो हा उबदार प्रवाह वाहत असल्याने एकूण हवामान सौम्य आणि हिवाळे उबदार आढळतात. तथापि हिवाळ्यात मध्यवर्ती पर्वतांच्या माथ्यावर हिम असते. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मे ते सप्टेंबर महिन्यांत किनाऱ्यावर १५० सेंमी.पासून अंतर्गत भागांत ३०० सेंमी.पर्यंत पाऊस पडतो. पर्वतीय भागात ७२२·५ सेंमी.पर्यंत पाऊस पडल्याची नोंद आहे. ईशान्य तैवानमध्ये पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हिवाळ्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होते. हंगामकाल वर्षभर असून मे व नोव्हेंबरनंतर विशेषतः जुलै ते सप्टेबरपर्यंत तुफानांचा त्रास होतो. दोन्ही मोसमी वारे जोरदार असतात.

वनस्पती : तैवानमध्ये सदाहरित व मोसमी प्रदेशातील पानझडी वृक्षराजी आढळते. उष्ण व दमट हवा, सूर्यप्रकाश व योग्य तो पाऊस यांमुळे ४८% भूमीवर नैसर्गिक वनस्पतीचे आच्छादन असून २३ लाख हेक्टरमध्ये जंगल, कापूर, ओक व चेस्टनट फिकुआ, पंडानू, सायप्रस हे वृक्ष आढळतात. तैवान जगातील नैसर्गिक कापूर व कापूर तेलांचा अग्रेसर उत्पादक असून तेथील जंगलात ओक व सायप्रस वृक्षांचे एकजिनसी विभाग लांबवर पसरलेले आढळतात. वनसंपत्तीचा विकास फक्त डोंगराळ भागाच्या कडेकडेने मर्यादित आढळतो. अंतर्गत भागातील निबीड अरण्यात मात्र अजून मानव–स्पर्शविरहित वृक्ष आहेत. सखल भागात बांबू, ताड व उष्ण प्रदेशीय सदाहरित वृक्ष आढळतात. १,८०० ते २,४०० मी. उंचीवर सीडार, सायप्रस, ज्युनिपर, ऱ्‍होडोडेंड्रॉन, मॅपल, जपानी सीडार इ. समशीतोष्ण कटिबंधीय रुंदपर्णी सदाहरित वृक्ष आणि २,५०० मी. च्या वर सूचीपर्णी वृक्ष आढळतात. कापराची झाडे ६०० ते १,८०० मी. उंचीवर असतात.

प्राणी : माकडे, हरिण, रानडुकरे, अस्वले, रानशेळ्या, रानमांजरे, चित्ते इ. वन्य पशू व महोका, माशीपकड्या, किंगफिशर, लार्क, इ. पक्षी येथे दिसून येतात. किनाऱ्याजवळ मासे भरपूर आहेत.

इतिहास : येथील मूळचे लोक मलाया किंवा इंडोनेशियातून आलेले असावेत. इसवी सनाच्या सातव्या शतकात काही चिनी वसाहतवाले फॉर्मोसात आले. त्यानंतर सु. १० शतकांनी मांचुंनी चीनवर स्वारी केल्यानंतर फूक्येन–ग्‍वांगटुंग प्रांतातून आलेल्या चिनी लोकांनी फॉर्मोसात वसाहती केल्या. १५९० मध्ये पोर्तुगीजांनी व त्यानंतर स्पॅनिश व डचांनी व्यापाराच्या निमित्ताने आपल्या वखारी फॉर्मोसात ठेवल्या होत्या परंतु त्यांना सतराव्या शतकात मांचुंनी हुसकावून लावले. नंतर १८५८ मध्ये कीलुंग व गाउश्युंग ही दोन बंदरे परकीयांना व्यापाराकरिता उपलब्ध झाली. चीनच्या मध्यवर्ती सरकारने या बेटांकडे दुर्लक्षच केले होते व चिनी–जपानी युद्धानंतर १८९५ मध्ये हे बेट जपान्यांच्या ताब्यात गेले. जपानने तैवानचे मोक्याचे स्थान व आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन शिमोनोसेकीचा करार केला होता पण जपानी व्यापारी व तंत्रज्ञ सोडल्यास येथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या नाहीत. जपानव्याप्त तैवानमध्ये रेल्वेची सुरुवात होऊन नवीन शहरे वसविली गेली व तैवानच्या अर्थकारणाचा आधुनिक पाया घातला गेला. दुसऱ्या महायुद्धात तैवानवर अमेरिकन विमानांनी भयंकर बाँबवर्षाव केला व १९४३ च्या कैरो परिषदेनुसार व १९४५ च्या पॉट्‌सडॅम करारानुसार तैवान हा चीनचाच एक प्रांत म्हणून चीनला परत करण्यात आला. १९४९ साली चीनमध्ये सर्वत्र साम्‍यवादी राजवट आल्यानंतर चँगकै–शेक याच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चीनचे सरकार येथे हलविण्यात आले. १९५० साली लाल चीनने तैवानवर स्वारीचा बेत आखलेला होता परंतु अमेरिकेचे अध्यक्ष ट्रूमन यांनी फॉर्मोसाच्या खाडीत सज्ज राहण्याचा इशारा अमेरिकेच्या सातव्या आरमारास दिल्यानंतर पुढील संघर्ष टळला. १९५३ पर्यंत तैवानच्या खाडीत अमेरिकेचे सातवे आरमार गस्त घालीत होते. परंतु १९५५ मध्ये चीनने सतत तोफगोळे टाकायला सुरुवात केल्यानंतर अध्यक्ष आयझन हौअर यांनी सेनानी चँग कै–शेकबरोबर तैवान व पेस्कदोरझ यांच्या संरक्षणाचा करार केला पण काही बेटे मात्र खाली केली. १९५९ आणि १९६२ मध्ये परत लाल चीनने किनाऱ्यावरून किमॉय माद्‌झूवर तोफा डागल्या. परंतु यावेळीही अध्यक्ष केनेडी यांनी फॉर्मोसाच्या संरक्षणाचा निर्धार व्यक्त केला. थोडक्यात युद्धजन्य परिस्थिती ही तैवानमध्ये कायम चालू आहे. परंतु फॉर्मोसाचे रक्षण हे अमेरिकेवर बंधनकारक नाही.


राज्यव्यवस्था : अध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असून उपाध्यक्ष आणि पंतप्रधान त्याचे साहाय्यक असतात. तैवानमधील राष्ट्रीय आमसभेत त्याची ६ वर्षांपुरती नेमणूक झालेली असते. पाच नियामक मंडळांकडून राज्यकारभार केला जातो. या नियामक मंडळांना युआन असे म्हणतात. राज्यकारभाराकरिता देशाची विभागणी पाच शहरे व १६ परगण्यांत केलेली आहे. कायदेनियंत्रक युआन हे सर्वांत प्रमुख असून राज्यकारभार करणारे, न्यायनिवडा व परीक्षा घेणारी इतर युआन आहेत. २१ वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना मताधिकार असून ते युआनमधील सभासदांची नेमणूक करतात. कायद्याने १९ वर्षावरील सर्व धडधाकट नागरिकांना २ वर्षे सेनादलात अगर ३ वर्षे वायुदलात अथवा नौदलात सक्तीने काम करावेच लागते. सर्वोच्च अधिकारी असल्यास अध्यक्षाकडे वटहुकूम काढणे, कायदेमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देणे, सेनाप्रमुखत्वाची जबाबदारी सांभाळणे आणि परराष्ट्रीय धोरण आखणे इ. प्रमुख कामे आहेत. रिपब्‍लिक ऑफ चायनाची १,४३५ सदस्यांची राष्ट्रीय सभा १९४७ मध्ये निवडण्यात आली. १९४८ मध्ये निवडलेले सर्वोच्च विधिमंडळ ४४२ सदस्यांचे होते. या मंडळाची सभासदसंख्या १९७२ मध्ये अनुक्रमे ५३ आणि ५१ नी वाढविण्यात आली. त्यांची मुदत बेमुदत वाढविण्यात आली आहे. २३ डिसेंबर १९७२ रोजी नवीन राष्ट्रीय सभा निवडली गेली. तिच्यात क्वोमिंतांगला ३८ जागा मिळाल्या. त्याच दिवशी निवडलेल्या  प्रांतिक सभेच्या ७३ पैकी ५९ जागा क्वोमिंतांगला मिळाल्या.

संरक्षण : तैवानमध्ये अद्ययावत पद्धतीचे पायदळ, विमानदळ आणि नौदल आहे. सर्व आधुनिक शस्त्रास्त्रे अमेरिकेने मोफत पुरवली आहेत. तसेच तैवानी सैनिकांना गनिमी कावा व घातपातांचे खास शिक्षण देण्यात येते. सध्या तैवानचे सु. ८०,००० खडे सैन्य असून दोन चिलखती, १२ पायदळी व ६ इतर विभाग आहेत. तसेच नौदलामध्ये १९७५ साली ३८,००० नौअधिकारी व खलाशी ३४,००० आरमारी अधिकारी व इतर होते. सध्या नौदलात १९ विनाशिका, १४ फ्रिगेट्‍स, ३ पहारा करणाऱ्या नौका, १३ सुरूंगकाढ्या, १ सुरूंग पेरणारी, ६ पाणतीर, २ विमानवाहू जहाजे, २ दुरुस्ती करणारी जहाजे, ३ सर्वेक्षण करणारी जहाजे व ९ तेलवाहू जहाजे आहेत. विमानदलात ८०,००० सैनिक असून २०० लढाऊ विमाने आहेत. तसेच निरनिराळ्या प्रकारची बाँबफेकी विमानांची एकूण ११ स्क्वाड्रॅन्स आहेत.

आर्थिक स्थिती : तैवान हा कृषिप्रधान देश आहे. येथे पश्चिमेकडे लाव्हा रसापासून तयार झालेल्या जमिनी, तर नद्यांच्या खोऱ्यात गाळाच्या जमिनी असून १५० सेंमी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभा दगडापासून तयार झालेल्या जमिनी आढळतात. परंतु लागवडीखालील मर्यादित जमिनींतून वाढत्या लोकसंख्येकरिता जास्तीत जास्त पीक काढावे लागते. देशात ६ लाख शेतकरी कुटुंबे आहेत. सखल प्रदेशातून गहू, तांदूळ, तंबाखू, ताग व सोयाबीन ही पिके काढतात. वर्षभर पाणीपुरवठा असलेल्या प्रदेशातून उसाचे पीक घेतले जाते, तर डोंगरउतरणीवर मळ्यातील पिके म्हणजे चहा, केळी, मोसंबी, अननस ही पिके घेतात. तैवानमधील उलाँग चहा प्रसिद्ध आहे. तांदूळ हे मुख्य अन्न असून भातशेतीखाली ६०% जमीन आढळते. पिकांच्या दोन रोपट्यांमधून लहान झाडे अगर भाजीपाला लावलेला असतो. शेतांच्या बांधांवरील जागाही झाडाझुडपांनी व्यापलेली असून प्रत्येक शेतावर खताचा थर असतो. शक्य तेथे पायऱ्यापायऱ्यांची  शेती केली जात असून डोंगराच्या वरच्या पायऱ्यांवर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ओहोळांतील गाळ आणून टाकला जातो.

एकूण लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी जवळजवळ ६०% जमीन जलसिंचनाच्या वेगवेगळ्या योजनांखाली आहे. बांबूच्या नळ्यांतून पाणी शेतांना पुरविले जाते. शक्य तेथून तांदळाची दोन पिके घेतली जातात. तांदळाचे वाटप योग्य रीतीने होत असल्याने प्रतिवर्षी २ लाख टनांपर्यंत तांदूळ निर्यात करून परदेशी चलन मिळविणे तैवानला शक्य होते. ऊस, तंबाखू व ताग ही तैवानमधील नगदी पिके असून यांच्या खरेदी–विक्रीत सरकारची खूपच मदत होते. डुकरे, कोंबड्या यांचीही पैदास तैवानात होत असून कवक हवाबंद डब्यातून निर्यात केली जातात. अननस हवाबंद डब्यात भरणे, कापूर व कापराचे तेल तयार करणे हे ग्रामीण उद्योगधंदे आहेत. कवक शेती हे एक तैवानच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी सु. २५ लाख डबे पाश्चिमात्य देशांस निर्यात होतात.

कसेल त्याची जमीन’ हा कायदा सरकारने केला असून साडेसात एकरांपेक्षा जास्त जमिनी कुळांना खंडाने देता येत नाहीत. सरकारी मालकीची जमीन कुळांना खंडाने देण्यात आलेली असून तीच त्यांना हप्त्याने विकत घेण्याचीही तरतूद केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असलेले शेतांचे तुकडे जोडल्याने शेतीची कार्यक्षमता व उत्पादन वाढलेले आहे. ‘शेतकरी संघा’ तर्फे सरकारी मदत शेतकऱ्याला पोहोचविली जात असून या संघटनेमार्फत त्याला कर्जपुरवठा, मालविक्री, रासायनिक खतपुरवठा व बी बियाणे, शेतीची अवजारे, जंतुनाशके व पाणीपुरवठा या बाबतीत साहाय्य केले जाते. शेती सुधारकांचे यशस्वी ठरलेले प्रयोग शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे दाखविले जातात व त्यांना त्यांचे शिक्षणही दिले जाते. १९७३ मध्ये तांदूळ २२,५५,००० टन, चहा २,८६,००० टन, केळी ४२,२६,००० टन, अननस ३,२८,००० टन, ऊस ७४,७४,००० टन, रताळी ३२,०४,००० टन, गहू ९,००० टन, सोयाबीन ६,०६,००० टन, वाटाणा ९,७९,००० टन, कापूस १२,००० टन व ताग ८,००० टन एवढे उत्पादन झाले. मासेमारी हा शेतीस पूरक व्यवसाय असून १९७२ सालचे उत्पादन ६ लाख ९४ हजार टन होते.

उद्योग व शक्तिसाधने : १९५० नंतर चतुर्थ वार्षिक योजनांवर भर देण्यात आलेला आहे. पहिल्या योजनेत वीजनिर्मिती, तेलशुद्धीकरण व कोळसा उत्खनन यांच्यावर भर देण्यात आलेला होता. लघु प्रकल्पावर जास्त भर असून साधारणपणे आखूड पण शीघ्रवाहिनी नद्यांवर वीजनिर्मिती करण्यात येते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे २३७ मी. उंचीचे ताश्येन या बहुद्देशीय धरणाची उत्पादन क्षमता ३,६०,००० किवॉ. आहे. १९७३ मध्ये १९,८०५ दशलक्ष किवॉ. तास वीज उत्पादन झाले. तैवानमध्ये एक अणुशक्ती केंद्रही उभारण्यात आले आहे. वायव्य तैवानमध्ये तेलाच्या खाणी असून नळांच्या साहाय्याने तेल व नैसर्गिक वायूंचा पुरवठा औद्योगिक केंद्रांना केला जातो. कीलुंग व तैपेजवळ दगडी कोळसा सापडतो. विकास योजनेत ॲल्युमिनियम प्रक्रिया करणे, औद्योगिक रसायननिर्मिती यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. तैवानच्या उद्योगधंद्यात कृषी–अधिष्ठित उद्योगांचा वाटा मोठा असून उन्हाळ्यात अननस व नोव्हेंबर ते मार्चपर्यंत कवक डबाबंद केले जातात. शेतीला लागणारी खते, रासायनिक द्रव्ये, यांत्रिक नांगर व उपकरणे तसेच मच्छीमारीकरिता लागणारी जाळी व यांत्रिक बोटी या उद्योगांना तैवानमध्ये जोराची चालना मिळालेली आहे. निर्यात व्यापारात कापडाच्या वेगवेगळ्या वस्तूंचा प्रथम क्रमांक असून ग्राहकांच्या दैनंदिन गरजा भागविणारे उद्योगधंदेही निर्माण झालेले आहेत. साखर व संबंधित अन्य वस्तू, भात सडणे, लाकूड कापणे, सिमेंट, काचसामान, कागद व लगदा तयार करणे हे इतर उद्योगधंदे आहेत. तैपेजवळ अमेरिकन मदतीने रासायनिक खतांच्या निर्मितीचा कारखाना चालू झालेला आहे. सागरी संपत्तीकडेही तैवानने लक्ष पुरविले असून मत्स्योद्योगाला आज अंतर्गत गरज व निर्यात व्यापारामुळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तैपेच्या खालोखाल गाउश्युंग येथे खास औद्योगिक परिसर निर्माण केलेला आहे आणि तैवानचा औद्योगिक विकासाचा वार्षिक वेग २० टक्क्यांपर्यंत आहे.


कारखानदारीत खासगी मालकीच्या उद्योगधंद्यांचे प्रमाण जास्त आहे. लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त व प्राथमिक तांत्रिक शिक्षण उच्च दर्जाचे असल्याने उद्योगधंद्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. निर्यात व्यापारामुळे कारखानदारी तेजीत असल्याने आणि लोक देशाभिमानी असल्याने, मजुरांना सर्व सुखसोयी उपलब्ध असल्याने संप, चळवळी किंवा घेरावासारखे औद्योगिक कलह क्वचितच उद्‌भवतात. १९६५ पर्यंत संयुक्त संस्थानांनी ६·९ कोटी डॉलर मदत केली पण त्यानंतर तैवानची अर्थव्यवस्था सुधारल्याने आर्थिक मदत बंद करण्यात आली. उद्योगधंद्यात साखर, सुती कापड, रेयॉन, शिवणयंत्रे, विद्युत् उपकरणे, कागद, सिमेंट, जहाजबांधणी, लोह व पोलाद इ. उद्योगधंदे महत्त्वाचे आहेत. १९७३ मध्ये १०,५८,७८२ मे. टन पोलाद, १,४९,७७६ मे. टन लोखंड, ३५,३११ मे. टन ॲल्युमिनियम, सिमेंट ६ दशलक्ष मे. टन, कागद ४,३२,३६६ मे. टन, ५९३ दशलक्ष मी. कापड एवढे उत्पादन झाले.

व्यापार : विदेश व्यापार हा तैवानी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून तैवान मुख्यतः शेतमालाची निर्यात करून त्याच्या बदली  कारखान्यास लागणारा कच्चा माल व पक्का माल आयात करतो. साखर, सुती व रेशमी कपडे, तांदूळ, चहा व डबाबंद फळे हे निर्यातीचे प्रमुख पदार्थ असून कापूर व कापूर तेलाकरिता तैवान मशहूर आहे. यांत्रिक सामग्री व लष्कराकरिता लागणारे धातुसामान आणि आयुधे यांची आयात मोठ्या प्रमाणावर होते. तसेच कापूस, यंत्रे, वाहनांचे सुटे भाग, इंधने, रसायने, औषधे, गहू , पीठ, धान्ये यांचीही आयात होते. व्यापार मुख्यतः जपान, अमेरिका, प.जर्मनी, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, फिलिपीन्स, ग्रेट ब्रिटन या देशांशी चालतो. १९७३ साली ३,७९२ दशलक्ष अमेरिकी डॉलरची आयात व ४,४८३ दशलक्ष अमेरिकी डॉलरची निर्यात झाली. एप्रिल १९७४ मध्ये १ स्टर्लिंग पौंड = ८९·७३ नवे तैवान डॉलर व १ अमेरिकी डॉलर = ३८ नवे तैवान डॉलर असा विनिमय दर होता. १०, २०, ५० सेंटची नाणी व १, ५, १०, ५० व १०० (न.तै.) डॉलरच्या नोटा असतात.

दळणवळण : तैवानमधील अंतर्गत व बाह्य दळणवळणाच्या सोयी चांगल्या विकास पावलेल्या आहेत. १९७३ मध्ये रुंद व अरुंदमापी असे एकूण ४,३०० किमी. लांबीचे लोहमार्ग होते. याच वर्षी विद्युतीकरण करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तसेच १९७३ साली ३५·८ दशलक्ष टन मालवाहतूक व १४६ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक झाली.

तैवानमधील पश्चिम किनाऱ्यावरून जाणारा कीलुंग–गाउश्युंग लोहमार्ग मुख्य असून या लोहमार्गामुळे मुख्य बंदरे, औद्योगिक केंद्रे आणि महत्त्वाची शहरे जोडली गेली आहेत. लोहमार्ग पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील हुआलिएन व ताइडुंग यांना जोडतो.

जलवाहतूक हे तैवानमधील मुख्य दळणवळणाचे साधन आहे. उत्तरेकडील कीलुंग व नैर्ऋत्येकडील गाउश्युंग ही तैवानची अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक बंदरे आहेत. तसेच पूर्व किनाऱ्यावरील हुआलिएन हे तैवानचे तिसऱ्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. १९७३ मध्ये एकूण ६,८३० जहाजे होती. त्यांपैकी २० पेक्षा जास्त जहाजे स्थूलभार टनाची होती. तसेच प्रवासी वाहतूक २३ जहाजे व मालवाहू ३८२ जहाजे होती.

तैवानचा आंतरराष्ट्रीय विमानतळ तैपेच्या सुंगशान या उपनगरात असून तैवान, मागुंग आणि पिंगडुंग येथील विमानतळांचा आणीबाणीच्या वेळी उपयोग केला जातो. सर्व मुख्य शहरे विमानमार्गांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. ‘सिव्हिल एअर ट्रान्सपोर्ट’ या कंपनीद्वारे अंतर्गत हवाई वाहतूक चालत असून मानिला, बँकॉक, टोकिओ, हाँगकाँग व सेऊल यांदरम्यानही हवाई वाहतूक होते. काही परदेशी विमान कंपन्यांचीही येथे कार्यालये आहेत.

१९७३ मध्ये एकूण १५,८९२ किमी. रस्ते असून त्यांपैकी ८,१०७ किमी. रस्ते पक्के आहेत. यात याच वर्षी तैवानमध्ये नोंद झालेली १३,६१,१२३ वाहने होती. त्यात ९५,११३ प्रवासी मोटारगाड्या, १०,२६५ बसगाड्या, ६८,३५३ ट्रक आणि ११,७३,०१५ मोटारसायकली होत्या.

दूरध्वनी सेवा सरकारच्या मालकीची असून तैवानमधील आकाशवाणी केंद्रे दळणवळण खात्याच्या देखरेखीखाली असतात. जुलै १९७३ मध्ये रेडिओ संच १४,६९,४७४, दूरचित्रवाणी संच ८,९०,३९६, दूरध्वनी यंत्रे ४,३६,९३८ असून डाकघरे ८,८५९ होती.


लोक व समाजजीवन : मूळ लोक मलायी वंशाचे असून ते आपली संस्कृती टिकविण्याकरिता पूर्वेकडील जंगल भागांत राहतात. त्यांची संख्या १० लाख आहे. ७०–८० लाख लोक द. चीनमधून आलेले आणि स्थलांतरित लोकांचे वंशज असून १९४९ मध्ये सैनिक, शासकीय अधिकारी व राजकीय आश्रित असे २० ते २५ लाख लोक आले. तैवानची लोकसंख्या १९७३ मध्ये १ कोटी  ५५ लाख असून लोकांवर द. चीनमधील चालीरीतींचा पूर्ण पगडा आढळून येतो. बहुसंख्य जनता बौद्ध व ताओप्रणीत देवतांची उपासना करते. स्थानिक टोळ्यांच्या वेगवेगळ्या देवता असतात. ख्रिस्ती लोकांची संख्याही ६ लाख आहे. १९७३ मध्ये हजारी जन्मप्रमाण २५·६ व मृत्युप्रमाण ४·८ आहे. एकूण लोकसंख्येपैकी ६५ लाख लोक १८ वर्षांखालचे असून अमेरिकन शिक्षण पद्धतींचा यांच्यावर चांगलाच पगडा दिसून येतो. या नव्या पिढीत चीनच्या भूमीवर परतण्याची इच्छा विशेष दिसत नाही. १९५० नंतर आलेल्या लोकांत स्त्रियांची संख्या बरीच कमी होती त्यामुळे नंतर मिश्र विवाहांना सुरुवात झाली. सुरुवातीस अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले होते. नवीन पिढीत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्यात येत असून विकास कार्यात व शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठा वाटा उचललेला आहे. सरकारने कामगार संरक्षण व हिवताप निर्मूलनसारख्या अनेक योजना आखलेल्या असून चीनमधून आलेली अफू व कोकेन सेवनाची राष्ट्रघातक सवय कायद्याने बंद केलेली आहे. मजूर लोकांना अपघात व मृत्यू यांपासून विम्याने संरक्षित केलेले आहे. १९७३ मध्ये १२,७९५ डॉक्टर, २,३१६ दंतवैद्य आणि ३,०९५ वैदू (हर्ब डॉक्टर) असून १,१०९ सार्वजनिक वैद्यकीय संस्था, ३४ दवाखाने, ६०८ आरोग्य केंद्रे आणि ४१३ फिरती दवाखाना पथके होती. वाढती लोकसंख्या व नागरी विकास लक्षात घेऊन तैवान सरकार नवीन घरे बांधीत असून ती लोकांना दीर्घमुदतीने व कमी व्याजाच्या दराने देते. गरीब लोकांना मोफत घरे दिली जातात.

भाषा व साहित्य : तैवानमध्ये मँडरीन ही मुख्य भाषा असून काही ॲमॉय, स्वॅटो, टाक्का या बोली भाषासुद्धा बोलल्या जातात. मँडरीन भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून ती शासकीय कार्यालये, न्यायालये, व्यापार व प्रशासनात मुख्यत्वे असते. त्याच भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली असून तैवानमधील शाळांत ती शिकवली जाते. जपानी भाषाही मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. येथील काही जपानीत मलाय–पॉलिनीशियन कुलातील बाोली बोलली जाते.

शिक्षण : तैवानमधील ६ वर्षे वयावरील ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या साक्षर आहे. राष्ट्रीय (प्राथमिक) शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण अशा तीन पद्धतींमध्ये शिक्षणाची विभागणी केली असून बालोद्यान व सामाजिक शिक्षण (प्रौढ शिक्षण) यांच्याही सोयी तैवानमध्ये आहेत. सप्टेंबर १९६८ पासून ६ ते १५ वर्षे वयाच्या मुलांना ९ वर्षांचे राष्ट्रीय शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. या काळात सुधारित विज्ञानाच्या अभ्यासावर भर असून कन्फ्यूशस मतप्रणालीचे शिक्षण दिले जाते. १९७३-७४ मध्ये २,३०७ प्राथमिक शाळांतून ६०,९४५ शिक्षक व २४,१४,८५२ विद्यार्थी होते. ९४८ माध्यमिक शाळांतून ५३,६२० शिक्षक व १३,६६,५४५ विद्यार्थी होते. तैवानमध्ये ९९ उच्च शिक्षणसंस्था असून ८ विद्यापीठांत १२,६७८ शिक्षक व २,७०,८९५ विद्यार्थी आहेत. तैपै येथील राष्ट्रीय तैवान विद्यापीठ (१९२८) व तायचुंग येथील राष्ट्रीय जुंगशान विद्यापीठ (१९६१) ही तैवानमधील सर्वांत मोठी दोन विद्यापीठे आहेत. येथील विद्यापीठांत परदेशी विद्यार्थ्यांचीही संख्या बरीच आहे.

तैवानमध्ये ३१ दैनिके (पैकी दोन इंग्‍लिश) आणि १,५२८ नियतकालिके प्रकाशित होतात (१९७३). १६ दैनिके तैपेहून प्रकाशित होत असून इतर दैनिके मुख्य शहरांतून प्रकाशित होतात. फुटबॉल हा तैवानी लोकांचा आवडता खेळ असून त्यात त्यांनी बरेच प्रावीण्य संपादन केले आहे. तसेच तैवानमधील कला–क्रिडा, संगीत, नृत्य, ललितकला इत्यादींवर चिनी संस्कृतीचा पूर्ण पगडा दिसून येतो. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ येथे लोकप्रिय आहे.

महत्त्वाची स्थळे : तैपे हे राजधानीचे ठिकाण असून तैवानचे औद्योगिक, शैक्षणिक व शासकिय केंद्र आहे. येथे तैवान राष्ट्रीय विद्यापीठ (१९२८) व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तसेच सौम्य हवामानामुळे वर्षभर दिसणारे हिरवेगार सृष्टिसौंदर्य आणि जगातील सर्वांत मोठा संग्रह असलेले नॅशनल पॅलेस म्यूझीयम प्रेक्षणीय आहे. तायचुंग हे पश्चिम किनाऱ्यावरील कृषिमालाचे व व्यापाराचे मुख्य केंद्र असून येथे राष्ट्रीय जुंगशान विद्यापीठ (१९६१) आहे. उत्तर किनाऱ्यावरील ३०० मी. लांबीचा धक्का बांधलेला कीलुंग हे महत्त्वाचे नैसर्गिक बंदर आहे. गाउश्युंग हे तैवातमधील एक महत्त्वाचे औद्योगिक ठिकाण असून दक्षिण किनाऱ्यावरील एक अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक बंदरही आहे. तसेच पूर्व किनाऱ्यावरील हुआलिएन हे तैवानचे तिसऱ्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय बंदर आहे.

संदर्भ : 1. Goddard, W. G. Formosa, London, 1966.

           2. Hsieh, C.M. Taiwan – liha Formosa, London, 1964.

भागवत, अ. वी.