पठाणपुरा प्रवेशद्वार, चंद्रपूर.

चंद्रपूर शहर : पूर्वीचे चांदा. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ७४,९९४ (१९७१). हे एराई व झरपट नद्यांच्या संगमाजवळ, वर्धा-काझीपेट लोहमार्गावर वर्ध्यापासून ११८ किमी. आग्नेयीस आहे. दिल्ली-मद्रास लोहमार्गही चंद्रपूरवरून जातो तसेच उत्तम सडकांनी हे नागपूर, गडचिरोली, वरोडा व इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. शहरात तेल गिरणी, काच कारखाना असून कापूस पिंजणे, रेशमी आणि सूती विणकाम, रंगकाम, विटा, कौले, बांबूकाम, कातडीकाम, सोन्याचांदीचे दागिने बनविणे इ. उद्योग आहेत.चंद्रपूर परिसरात कोळसा, लोखंड, बेरियम सल्फेट, चिनीमाती इ. खनिजे मिळतात. तसेच जंगलाचे प्रमाणही मोठे असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना चंद्रपूर हेच मध्यवर्ती ठिकाण पडते. १९७५ साली येथून पाच किमी. अंतरावर एक पोलाद कारखाना निघाला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरपासून ४५ किमी. उत्तरेस आहे. प्राचीन भद्रावती (भांडक) ही वाकाटकांची व त्यानंतर गोडांची राजधानी चंद्रपूरजवळच होती. त्यामुळे चंद्रपूरजवळ किल्ला, तट तसेच अंकलेश्वर, महाकाली, मुरलीधर इ. मंदिरे व इतर अवशेष आढळतात.

जोशी, चंद्रहास