पुष्करावती : पुष्कलावती. प्राचीन गांधार देशाची राजधानी व बौद्ध अवशेषांचे एक केंद्र. पाकिस्तानातील पेशावरच्या उत्तरेस सु. २९ किमी.वरील चारसद्द म्हणजेच पुष्करावती, असे अनेक विद्वानांचे मत आहे. उत्पलवती नावानेही ते प्रसिद्ध होते.

रामाचा भाऊ भरत याने शैलूष या गंधर्व देशाच्या राजाचा पराभव करून देशाची गंधर्व व गांधार अशी दोन राज्ये केली आणि त्यांवर अनुक्रमे तक्ष व पुष्कल हे आपले पुत्र राजे म्हणून बसविले आणि त्यांच्या राजधान्यांना तक्षशिला व पुष्कलावती ही नावे दिली, असा उल्लेख रामायणात मिळतो. पुष्करावती येथेच बुद्धाने पूर्वजन्मी ब्रह्मप्रभा भिक्षूच्या रूपात वाघिणीने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या पिलांना खाऊ नये म्हणून स्वतःचा देह अर्पण केला होता, असी दंतकथा आहे. प्राचीन काळी हे व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असावे कारण यूआन च्वांगने आपल्या प्रवासवृत्तात याचा एक समृद्ध नगर म्हणून उल्लेख केलेला आढळतो. बंगालच्या उपसागरावरील पूर्वीचे ताम्रलिप्ती बंदर आणि पुष्करावती यांना जोडणारा उत्तरापथ हा महत्त्वाचा व्यापारमार्ग म्हणून प्रसिद्ध होता. या मार्गावर तक्षशिला, शाकल, हस्तिनापूर, कान्यकुब्ज, प्रयाग, वैशाली, राजगृह, पाटलिपुत्र अशी अनेक महत्त्वपूर्ण नगरे होती. १९०३ ते १९१२ यांदरम्यान चारसद्द येथे झालेल्या विस्तृत उत्खननात बौद्धकालीन अवशेष मिळाले आहेत.

चौंडे, मा. ल