किरात देश : भारतातील वन्य लोकसमूहांच्या प्राचीनतम वसाहती.  किरात, कीर, कैरात, चिरात, चिलात इ. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पर्वताश्रयी जमातींच्या विभिन्न प्रदेशांतील वसाहतीच ‘किरात देश’ या सामान्य नावाने प्रसिद्ध होत्या.  त्यांचे भौगोलिक दृष्टया ‘दक्षिणापथदेश’ व ‘उत्तरापथदेश’ असे दोन उपविभाग पडले होते. नेपाळातील दूध-कोसी व अरुण नद्यांमधील शारदा तीर्थापर्यंतचा प्रदेश ‘किरात-तंगण’ नावाने प्रसिद्ध होता.  येथील वन्य जमात स्वतःला ‘खस बंशीय’ समजत असून या प्रदेशाचा उल्लेख केदारपुराणात ‘खसमंडल’ आणि स्कंदपुराणात ‘किरातखंड’ नावाने आढळतो.  याशिवाय गंगा नदीच्या मुखासभोवतीचा ‘किर्‍हदिय’ देशातील किरात जवळच्या विक्रमपूर बाजारात तमालपत्राची विक्री करीत असत, असा उल्लेख आढळतो. रामटेकपासून रारगृहापर्यंतच्या डोंगरप्रदेशात किरातांच्या वसाहती असून वाल्मीकिरामायणात त्यांचा ‘प्राच्य किरात लोकसमूह’ असा उल्लेख आढळतो.  महाभारतकाली भीमाने याच प्रदेशातील किराताधिपतींना व इतर सात किरात राज्यांना जिंकल्याचे वर्णन आढळते.  सांची येथील शिलालेखातही किरातांचा उल्लेख आढळतो.

जोशी, चंद्रहास