जयपूर : भारताची सुरेख आणि सुंदर रचनेची गुलाबी नगरी म्हणून सुप्रसिद्ध असलेली राजस्थान राज्याची राजधानी. लोकसंख्या ६,१५,२५८ (१९७१), संगनेर (११,६१७) व अंबेर (९,८९१) यांसह ६,३६,७६८. हे दिल्लीच्या नैर्ऋत्येस ३०७ किमी. व मुंबईच्या ईशान्येस लोहमार्गाने १,११४ किमी. आणि समुद्रसपाटीपासून ४३१ मी. उंचीवर आहे. उत्कृष्ट आलीव व रेखीव रचना, ३४ मी. रुंदीचे समांतर स्वच्छ रस्ते, प्रशस्त चौक, गावाभोवती सु. ६ मी. उंच आणि २.७५ मी. रुंदीचा तट व त्यांमधील आठ प्रशस्त वेशी आणि मुख्य म्हणजे इमारतींचा दर्शनी भागाचा सुंदर गुलाबी रंग, यांमुळे पाहणाऱ्याचे मन एकदम प्रसन्न होऊन जाते. नगरीचे हे वैशिष्ट्य कायम रहावे म्हणून नगरपालिका सदैव दक्ष असते. भोवतीच्या टेकड्यांवरील किल्ले आणि मनोरे यांमुळे नगरीच्या मध्ययुगीन वातावरणात भरच पडते. जवळच्या रामगढ तलावातून नगरीस पाणीपुरवठा होतो.

हवामहल, जयपूर.

महाराजा सवाई जयसिंग दुसरा याने कल्पकतेने १७२८ मध्ये ही नगरी वसविली आणि सु. ११ किमी. वरील अंबेरहून राजधानी येथे भाणली. त्याच्या नावावरूनच नगरीस जयपूर हे नाव मिळाले. हातमागावर कापड विणणे, हस्तिदंतांवरील कोरीवकाम, जडावाचे काम, संगमरवरावरील जडावकाम, बांधणीची वस्त्रे – विशेषतः साड्या इ. कला- कौशल्याच्या कामांसाठी जयपूर प्रसिद्ध आहे. येथील मीन्याचे काम तर भारतात पहिल्या प्रतीचे समबले जाते. अशा कलांचे शिक्षण देणारी एक शाळाही येथे आहे. राज्यातील व्यापाराचेही ते केंद्र आहे.

येथील जुना राजवाडा हा दोनशे वर्षांपूर्वीचा मोगल- राजपूत शिल्पाचा उत्तम नमुना आहे. पाचमजली चंद्रमहाल व कोरीवकामासाठी प्रसिद्ध असलेला मुबारक महाल, वास्तुकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रतापसिंहाने बांधलेला हवामहल, जुने लेख, चित्रे, शस्त्रे यांचा संग्रह, जंतरमंतर ही उघड्यावरील वेधशाळा, सार्वजनिक उद्यान व तेथील प्राणिसंग्रहालय, नाहरगढ टेकडीजवळच्या पूर्वीच्या महाराजांच्या छत्र्या, टेकडीवरील सूर्यमंदिर, गोविंदजीचे मंदिर इ. ठिकाणे पाहण्यासाठी प्रवाशांची रीघ असते. अंवेर आणि संगनेर येथील देवालये आणि तेथून दिसणारा नयनरम्य देखावा पाहण्यासाठीही लोक जात असतात. १९४७ मध्ये राजस्थान विद्यापीठ स्थापन झाले.

पश्चिम रेल्वेच्या दिल्ली-अहमदाबाद मार्गावर जयपूर हे स्थानक आहे. सु. १३ किमी. वर संगनेर येथे विमानतळ आहे व राज्यातील आणि बाहेरच्या महत्त्वाच्या ठिकाणांस जोडणारे चांगले रस्ते आहेत.

दातार, नीला