शिंगणापूर : महाराष्ट्रात या नावाची शिखर शिंगणापूर (जि. सातारा) व  शनी शिंगणापूर (जि. अहमदनगर) अशी दोन धार्मिक क्षेत्रे आहेत.

शिखर शिंगणापूर : सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील एक स्वयंभू शिवस्थान. हे फलटणपासून अग्नेयीस सु. ३७ किमी. अंतरावर महादेव डोंगररांगेत सस. पासून १,०५० मी. उंचीवर आहे. शिंगणापूर (पूर्वीचे सिंघणपूर) गाव डोंगराच्या पायथ्याशी असून ते देवगिरीच्या सिंघल यादवाने वसविलेले असावे. डोंगरावरील शिवमंदिरही त्यानेच बांधले असावे. गावाची लोकसंख्या ३, २७३ (२००१) होती.

शिवमंदिर, शिंगणापूर.टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखरावरील तटबंदीयुक्त शिवमंदिराला चार दरवाजे आहेत. आवारात अनेक दीपमाळा, मुख्य मंडपात पाच दगडी नंदी, भागाऱ्यात शिवशक्तीची प्रतीके मानलेली दोन स्वयंभू लिंगे आहेत. मंदिरपरिसरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे बली महादेवाचे, म्हणजेच अमृतेश्वर हे हेमाडपंती मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून दहा दिवस महादेवाचा मोठा उत्सव चालतो. नवस बोलणारे भक्त अभिषेकासाठी पाण्याच्या कावडी, पाथ्यापासून अवघड वाटेने आणतात. ही ‘भुत्या तेल्याची कावड’ म्हणजे दोन मोठे रांजणच असतात. या उत्सवासाठी मराठवाड्यातील भातंगडी गावातून १२ मी. लांबीची काठी आणली जाते. चैत्र शुद्ध अष्टमीला शिवपार्वतीचा प्रतीकात्मक विवाहसोहळा संपन्न होतो. मंदिराच्या दक्षिणेकडे शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या घराण्यातील इतरांच्या प्रतीकात्मक समाध्या आहेत. ऐतिहासिक तलाव, विहिरींचे अवशेष तसेच लिंगायत कवी शांतिलिंग यांचा येथे मठ आहे. गावात प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, डाकघर आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत होते. मंदिर– परिसरात धर्मशाळा, पर्यटक निवास, स्नानगृहे, बगीचे इ. सुविधा उपलब्ध करण्याची व येथील पुष्कर तलावाच्या दुरुस्तीची योजना आहे. महाराष्ट्र शासनाने मंदिराचा विकास आराखडा मंजूर केला आहे.

स्वयंभू काळा पाषाण, शनी शिंगणापूरशनी शिंगणापूर : अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यातील हे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र सोनई गावापासून सु. ५ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या सु. ३,००० आहे. येथे शनीचा स्वयंभू काळा पाषाण आहे. वर्षप्रतिपदेस आणि श्रावणातील चारही शनिवारी येथे मोठी यात्रा भरते. स्त्रियांना शनीची पूजा करता येत नाही. शनीचे जाज्ज्वल्य देवस्थान असल्यामुळे गावात चोरी होत नाही, या श्रद्धेपोटी येथील घरांच्या दारांना कड्या-कुलपे लावली जात नाहीत. येथे चोरी करणाऱ्याला अंधत्व येते, अशीही समजूत प्रचलित आहे.

अवचट, प्र. श्री.