पोर्टलॅन्ड : अमेरिकेच्या ऑरेगन राज्यातील प्रमुख शहर. मल्टनोमा परगण्याचे मुख्य ठिकाण व प्रवेश बंदर. लोकसंख्या ३,८२,००० (१९७६ अंदाज) उपनगरांसह ८,२४,९२६ (१९७०). हे कोलंबिया नदिखोऱ्यात कोलंबिया व विलेमिट नदीसंगमापासून ३० किमी., पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यापासून १८२ किमी. विलेमिट नदीकाठी वसले आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून येथे रस्ते व पाच लोहमार्ग केंद्रीत होतात. तसेच येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध असून अमेरिकेच्या प्रमुख बंदरांत याची गणना होते. १८४५ मध्ये वसविलेल्या या शहराची जागा पूर्वी ॲसा एल्. लव्हजॉय व विल्यम ओव्हरटन या दोन ब्रिटिशांच्या मालकीची होती परंतु ओव्हरटन याने आपला हिस्सा एफ्. डब्ल्यू. पेटिग्रोव्ह यास विकला. पेटिग्रोव्ह हा मेन राज्यातील पोर्टलंडचा रहिवासी व त्याच्या मूळच्या गावच्या नावावरूनच या शहरास पोर्टलंड हे नाव पडले. १८५१ मध्ये यास शहराचे स्वरूप प्राप्त झाले. बंदर म्हणून यास असणारे महत्त्व, व्यापार व कॅलिफोर्नियातील सोन्याचा शोध यांमुळे याचा विकास फार जलद झाला. पोर्टलंड हे ऑरेगनचे आर्थिक, व्यापारी व औद्योगिक केंद्र आहे. अन्नप्रक्रिया, सुती कापड, कातडी, प्लायवुड, कागद, रसायने, ॲल्युमिनियम, जहाजबांधणी, इलेक्ट्रॉनिक इ. उद्योगांचा येथे विकास झाला आहे. पोर्टलंड विद्यापीठ, पोर्टलंड स्टेट विद्यापीठ. रीड महाविद्यालय, लूइस अँड क्लार्क महाविद्यालय, पोर्टलंड कम्यूनिटी महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्था व ऑरेगन हिस्टॉरिकल सोसायटी, पोर्टलंड सिंफनी ऑर्केस्ट्रा, पोर्टलंड कला संग्रहालय, मल्टनोमा काउंटी लायब्ररी, ऑरेगन म्यूझीयम ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रीज इत्यादींमुळे पोर्टलंड हे शैक्षणिक व कला जीवनाचे केंद्र बनले आहे. येथून ऑरेगोनियमऑरेगन जर्नल ही वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. या सुंदर शहरास हूड पर्वत शिखर व सेंट हेलंझ, मौंट ॲडम्स या पर्वतांच्या शिखरांची उत्तम पार्श्वभूमी लाभली असून, येथील हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. फॉरेस्ट्री बिल्डिंग (लूइस व क्लार्क संशोधन मोहिमेच्या शतवार्षिकोत्सव समारंभप्रसंगी बांधण्यात आलेली जगातील सर्वांत मोठी लाकडाची खोली), वॉशिंग्टन व मौंट टाबोर ही उद्याने, मल्टनोमा हा १८९ मी. उंचीचा धबधबा, बॉनव्हिल धरण इ. गोष्टी पर्यटकांना आकर्षितात. येथे दरवर्षी होणारा आंतरराष्ट्रीय गुलाबपुष्पांचा उत्सव व जनावरांचे प्रदर्शन यांसाठीही पोर्टलंड प्रसिद्ध आहे.

उपाध्ये, मु. कृ.