येमेन :  येमेन अरब रिपब्लिक. अरबस्तान द्वीपकल्पांच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात १२° ४१’ ते १७° ७२ उ. व ४२° ८ ते ४६° १९ पू. यांदरम्यान विस्तारलेला हा देश उत्तर येमेन या नावानेही ओळखला जातो. इतर अरब राष्ट्रांच्या मानाने भरपूर पाणी व फळांचा प्रदेश म्हणून रोमनांनी याला ‘अरेबिया फेलिक्स’ (‘फेलिक्स’ म्हणजे आनंददायक किंवा सुखद) असे नाव दिले. क्षेत्रफळ १,९५,००० चौ. किमी. लोकसंख्या ७७,००,००० (१९८१). याच्या पश्चिमेस तांबडा समुद्र, तर उत्तरेस सौदी अरेबिया, पूर्व व दक्षिणेस द. येमेन हे देश आहेत. दक्षिणोत्तर लांबी ५४० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ४१८ किमी. असून देशाला सु. १,६६१ किमी. लांबीची सरहद्द आहे. साना (लोकसंख्या २,७७,८१७– १९८१) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन :  भौगोलिक रचनेच्या दृष्टीने उंच डोंगराळ प्रदेश आणि अरुंद, चिंचोळा सखल किनारी प्रदेश असे देशाचे दोन भाग पडतात. देशाचा बहुतेक भाग तुटकतुटक उंच डोंगरांनी व पठारांनी व्यापलेला असून या डोंगररांगा म्हणजे उत्तरेकडील सौदी अरेबियातील असीर पर्वतरांगे चे पुढे विस्तारलेले भाग आहेत. बहुतेक डोंगररांगा देशाच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर असून उत्तर-दक्षिण दिशेने पसरल्या आहेत. डोंगरांदरम्यानचे पठारी भाग सुपीक व सस.पासून १,२०० ते ३,००० मी. उंचीचे आहेत. याच डोंगराळ भागात जबल हदूर हे देशातील सर्वोच्च शिखर (सु. ३,७६० मी.) साना राजधानीच्या नैऋत्येस आहे. डोंगररांगांच्या पूर्वेकडील सपाट पठारी भागाची सस.पासून सरासरी उंची २ , ४०० मी. आढळते. त्यांतील काही शिखरे सु. ३,००० मी. उंचीची आहेत. देशाच्या उत्तर सीमेवर सौदी अरेबियातील रब अल्‌ खली हे वाळवंट पसरलेले असून देशाच्या पूर्व भागातही त्याचा विस्तार आहे. देशाची पश्चिम किनारपट्टी टिहामट-एश्‌-शाम या नावाने ओळखली जाते. ती ३२ ते ४८ किमी. रुंदीची असून फारशी सुपीक नाही. या भागात काही मरूद्याने असून त्यांच्या आसपास शेती केली जाते. या किनारपट्टीचा बहुतेक प्रदेश उष्ण, आर्द्र व नापीक आहे. येमेनमधील बहुतेक नद्या मध्यवर्ती डोंगररांगांच्या पश्चिम उतारावर उगम पावून पश्चिमेस तांबड्या समुद्राला जाऊन मिळतात. यांत मुख्यत्वे वाडी (नदी) झेबीड, सिहँम, सुरदुद इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या उत्तर भागातून नेज्रान हा प्रवाह ईशान्य दिशेने सौदी अरेबियात वाहत जातो. ईशान्य भागातील छोट्या खावलान डोंगररांगेत उगम पावणारे काही प्रवाह पूर्वेस वहात जाऊन रब अल् खली  वाटवंटाच्या विस्तारित भागात लुप्त होतात. यांत मुख्यत्वे खब्ब ,  अल जाउफ, अब्राद इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आग्नेय भागात उगम पावून द. येमेनमध्ये वाहत जाणाऱ्या नद्यांमध्ये बॅनॅ, तिबॅन इ. मुख्य आहेत. पूर्वेकडील बहुतेक भाग ओसाड ,  वाळवंटी असून त्या भागात प्रवाह अथवा सरोवरे नाहीत.

हवामान : येथील हवामान सामान्यपणे उष्ण, वाळवंटी प्रकारचे असून स्थलपरत्वे त्यात थोडाफार फरक दिसून येतो. देशातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. असते, तर उंच प्रदेशातील हवामान सौम्य असते. जून सर्वांत उष्ण तापमानाचा असून या महिन्यात सर्वसाधारणपणे तापमान २१·७° से. असते, तर जानेवारीत ते १३·९° से. असते. उन्हाळ्यात वायव्येकडून व हिवाळ्यात नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थोडाफार पाऊस पडतो. या वाऱ्यांमुळे अत्यंत हानिकारक वादळे निर्माण होतात. देशात एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४० ते ६४ सेंमी. असते. नैर्ऋत्य भागात पावसाचे प्रमाण थोडे जास्त असते, तर साना या मध्यवर्ती शहराच्या भागात ते ४० सेंमी. असते. येथील उन्हाळे सौम्य, तर हिवाळे थंड असतात. हिवाळ्यात थोडेफार हिमतुषार पडतात.

देशातील उंच डोंगराळ प्रदेशात व नद्यांकाठी वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे. किनारी प्रदेशात दलदली वनस्पति-प्रकार आढळतात. बाभूळ व तत्सक काटेरी वनस्पती ,  खारीक-खजूर आणि इतर अनेक प्रकारची फळझाडे बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. सीताफळ, यूफेर्बिया इ. वनस्पती तुरळक ठिकाणी सापडतात. देशातील फुलझाडांच्या सु. ६०० प्रकारांपैकी अल्पाइन रोज, तेरडा, तुळस, रानटी एल्डर, जुडास इ. प्रकार प्रमुख आहेत. उंच डोंगराळ भागात दाट जंगलांमध्ये बॅबून, कुरंग, चित्ता, ससे हे जंगली प्राणी दिसून येतात  तर विंचू ,  मिलिपीड हे सर्वत्र आढळतात. देशात सर्पांचे प्रमाण कमी आहे. माळढोक, ससाणा, गिधाड, द्रोणकावळा, पोपट, धनेश, हनीसकर, वीव्हर, फिंच इ. अनेक पक्षी तसेच २७,००० प्रकारचे कीटक दिसून येतात.

इतिहास व राजकीय स्थिती : प्राचीन भूगोलवेत्त्यांनी ‘अरेबिया फेलिक्स’ या नावाने ज्याचा निर्देश केला आहे, त्या नैर्ऋत्य अरबस्तानातील इतिहासप्रसिद्ध प्रदेशात हा देश मोडतो. जागतिक व्यापारात अग्रेसर असलेल्या या प्रदेशातच सबांचे राज्य होते (इ. स. पू. १०००– ००). सुगंधी द्रव्ये व मसाल्याचे पदार्थ यांच्या व्यापारावर सबा राज्याची संपन्नता अवलंबून होती. पुढे नवे व्यापारी मार्ग उपलब्ध झाले आणि वाढत्या व्यापारी स्पर्धेमुळे सबांच्या वैभवास उतरती कळा लागली. इ. स. पू. दुसरे ते  इ. स. सहावे शतक हा हिम्यराइट राजघराण्याचा कालखंड होय. इ. स. ५२५ मध्ये ख्रि स्ती इथिओपियन आक्रमकांनी हा प्रदेश जिंकला. नंतरच्या इराणी आक्रमकांनी ५७५ मध्ये त्यांना या प्रदेशातून हुसकावून लावले. इस्लाम धर्माचा प्रसार सातव्या शतकातच होऊन वेगवेगळ्या इस्लामी पंथांतील संघर्ष येमेनच्या भूमीवर सतत होत राहिले. शिया आणि सुन्नी अशा दोन्ही पंथांचे पुरस्कर्ते या संघर्षात सामील झाले .  नवव्या शतकात येथे इमामपीठाची स्थापना झाली. याह्या अल्‌ हदी इलाल हक्क या झैदी राज्यकर्त्याने स्थापलेले हे इमामपीठ विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात होते. या देशाचा मध्ययुगीन इतिहास म्हणजे स्थानिक इमामांच्या स्पर्धा आणि कलहांचा मोठा गुंतागुंतीचा इतिहास आहे. ईजिप्त (अकरावे शतक), रसूल राजवंश (सु. १२३०, पंधरावे शतक) इत्यादींचा अंमल या प्रदेशावर कमीअधिक काळ टिकला. ईजिप्तच्या मामलूक सुलतानाने १५१६ मध्ये आपल्या देशात हा प्रदेश सामील करून घेतला. परंतु पुढील वर्षीच ऑटोमन तुर्कांच्या सैन्याने हा प्रदेश पादाक्रांत केला. कासीम द ग्रेट (कार. १५९७–१६२०) या झैदी इमामाने येमेनच्या अंतर्भागातून ऑटोमन तुर्कांची सत्ता नष्ट केली. फक्त सागरी किनाऱ्यावरच तुर्कांचे नियंत्रण टिकून राहिले. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी वहाबी मुस्लिमांनी येमेन ताब्यात घेतले. तथापि १८१८ मध्ये ईजिप्तच्या सुलतानाचा मुलगा इब्राहिम पाशा याच्या मदतीने वहाबींची हकालपट्टी करण्यात येऊन येमेनमध्ये पुन्हा झैदी इमामांची सत्ता प्रस्थापित झाली. १८४० पर्यंत येमेनच्या प्रमुख बंदरांत ईजिप्शियन सैन्याचे तळ होते. झैदी इमामांनी ऑटोमन सुलतानां ची  अधिसत्ता मान्य करून प्रतिवर्षी त्यांना खूप मोठी खंडणी देण्याची प्रथा सुरू केली. १८४० ते १८७२ हा कालखंड अराजकाचा होता. परिणामतः १८७२ साली ऑटोमन राज्यकर्त्यांनी साना शहर ताब्यात घेऊन देशात पुन्हा आपला जम बसविला. ऑटोमन सुलतानांचे मोठे सैन्य पहिल्या महायुद्धकाळामध्ये या देशात होते. महायुद्धाच्या समाप्तीनंतर (१९१८) ते काढून घेण्यात आले. ग्रेट ब्रिटनच्या मदतीने इद्रिसी जमातीने येमेनमध्ये सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. तथापि झैदी इमाम याह्या इब्‌ न  मुहंमद याने हा प्रयत्न १९२५ साली मोडून काढला. ब्रिटिशांकडून इद्रिसी लोकांकडे आलेले एल्‌. होदेद हे ठाणे ताब्यात घेऊन त्याने पश्चिम एडनचा ब्रिटिशसंरक्षित विभागही जिंकण्याचा प्रयत्न केला. इद्रिसी पक्षीयांना सौदी अरेबियाचा राजा इब्न सौद याने पाठिंबा दिला व १९३४ साली येमेन आणि सौदी अरेबिया यांच्यात युद्ध सुरू झाले. ताइफच्या तहाने हे युद्ध संपले  तथापि असीर प्रदेश सौदी अरेबियाला द्यावा लागला. सौदी अरेबिया व ग्रेट ब्रिटन यांनी येमेनच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. ब्रिटिशसंरक्षित एडन घेण्याचा प्रयत्न मात्र येमेनच्या इमाम याह्याने १९३७ पर्यंत चालू ठेवला. १९४५ साली येमेन अरब लीगचा सभासद झाला व १९५८ साली युनायटेड अरब स्टेट आणि युनायटेड अरब रिपब्लिक यांचा एक संघ स्थापन करण्यात आला. १९६२ साली इमाम मुहंमद अल्‌ बद्र यांची सत्ता उलथून टाकण्यात ब्रिगेडियर अब्दला अल्‌ सलाल यास यश मिळाले व तो येमेनचा राष्ट्राध्यक्ष आणि सर्वोच्च सेनाप्रमुख झाला व त्यानेच येमेन अरब प्रजासत्ताकाच्या स्थापनेची घोषणा केली. मार्च १९७० पर्यंत इमाम सत्तेचे पुरस्कर्ते व प्रजासत्ताकवादी यांच्यातील सशस्त्र यादवी लढे देशात होत राहिले. सौदी अरेबियाने इमामांची बाजू घेतली. जेद्दा येथील करारानुसार यादवी युद्ध संपले आणि येमेनची सत्ता प्रजासत्ताकवादी पक्षाच्याच ताब्यात राहिली. जून १९७४ मध्ये अब्द अर्‌-रहमान अल्‌ इरियाणी या राष्ट्राध्यक्षाने राजीनामा दिला. नंतर इब्राहीम मुहंमद हमदी या राष्ट्राध्यक्षाचा खून झाला (१९७७). त्यानंतरचा राष्ट्राध्यक्ष (अहं मद घशमी) बाँबस्फोटात ठार झाला. त्यानंतर लेफ्ट. कर्नल अली अब्दुल्ला सलेह हा राष्ट्राध्यक्ष बनला.

येमेन अरब प्रजासत्ताक आणि दक्षिण येमेन (पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ येमेन) यांच्या एकीकरणाचे प्रयत्न १९७२ पासून चालू आहेत. या देशाला १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले.

मुस्लिम विधी हाच १९७० च्या संविधानानुसार देशाच्या कायदेकानूंचा मुख्य पाया म्हणून मान्य करण्यात आला. एक सल्लागार समिती नेमून तीच देशातील सर्वोच्च एकसदनी विधिमंडळ म्हणून मान्य करण्यात आली. या सल्लागार समितीला देशाचा राष्ट्राध्यक्ष निवडण्याचा आणि देशाचे कार्यकारी मंडळ नेमण्याचा अधिकार होता. १९७१ साली देशात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका होऊन वरील सल्लागार समितीवर ११९ सदस्य निवडून देण्यात आले. यांशिवाय राष्ट्राध्यक्षातर्फे ४० सदस्यांची नियुक्ती त्या समितीवर करण्यात आली.

या  देशाचे हंगामी संविधान १९ जून १९७४ रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर ९९ सदस्यांची संविधान समिती ६ फेब्रुवारी १९७८ रोजी स्थापन करण्यात आली. या समीतीच्या स्थापनेनंतर ती नेमणारे कमांड कौन्सिल विसर्जित करण्यात आले (२२ एप्रिल १९७८). संविधान समितीतील सदस्यसंख्या १५९ करण्यात आली. ही समिती प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष निवडते. पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करतो. १९८२ साली जनरल पीपल्स काँग्रेसची बैठक झाली. या काँगेसमध्ये १ , ००० सदस्य असून त्यांपैकी ७०० सदस्य लोकनिर्वाचित होते. देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सलेह असून तो अनुक्रमे १९७८ आणि १९८३ साली राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला.

देशात ८ प्रांत असून त्यांवर एकेक राज्यपाल (अमीर) नियुक्त केलेला असतो. स्थानिक प्रशासनाच्या अगदी तळाशी बहुधा एकाच अरब जमातीचा ग्रामसमूह असतो. शेख हा अशा ग्रामसमूहाचा प्रमुख असतो. ग्रामसमूहाच्या नंतर महल्ला असा एक कुटुंबसमूहाचा गट असतो. परंपरेने चालत आलेल्या स्थानिक अरब जमात-प्रमुखांना काही प्रशासकीय अधिकार असले ,  तरी अंतिक अधिकार केंद्र सरकारचाच असतो. देशात राजकीय पक्षांना बंदी आहे. देशाच्या राजकारणात लोकांची जमातनिष्ठा प्रभावी ठरते.

संरक्षण : देशात तीन वर्षांचे सैनिकी शिक्षण सक्तीचे आहे. भूसेनेत पाच चिलखती, एक यांत्रिक, नऊ पायदळ, एक छत्रीधारी, तीन तोफखाना अशा ब्रिगेड असून केंद्रीय संरक्षक दल ,  विमानविरोधी तोफा विभाग आणि हवाई संरक्षण विभाग यांच्या अनुक्रमे एक, तीन व दोन बटालियन आहेत. भूसेनेत विविध प्रकारचा आधुनिक शस्त्रसंभार असून त्यांपैकी रणगाडे विशेष महत्त्वाचे आहेत. भूसेनाबल २०,००० होते (१९८५). देशाच्या नौसेनेत रशियन सामग्रीचा मोठा वाटा आहे. प्रक्षेपणास्त्रे, पाणतीर, सुरुंग-शोधक यांसारख्या विविध प्रकारच्या युद्धनौका नौसेनेत आहेत. नौसेनेत ६,००० अधिकारी आणि सैनिक होते (१९८५). या देशाच्या वायुसेना उभारणीत अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया या सर्वांकडून साहाय्य मिळाले. विशेषतः अद्ययावत्‌ प्रकारची हवाई युद्धसामग्री रशियाकडून या देशाला मिळाली आहे. विविध प्रकारची विमाने वायुसेनेत असून वायुसेनाबल १,५०० होते (१९८५).

आर्थिक स्थिती :  डोंगराळ प्रदेशातील शेती आणि तांबड्या समुद्राच्या किनारपट्टीवरून चालणारा व्यापार हे येथील लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत. सबंध अरब द्वीपकल्पात अत्यंत सुपीक जमीन या देशात असून ती कृषिउत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गहू ,  सातू ,  तीळ ,  अल्फाल्फा ,  तांदूळ ,  तंबाखू ही पिके आणि खजूर ,  द्राक्षे व तत्सम फळे यांचे उत्पादन देशात होते. साधारणपणे देशाच्या ईशान्य भागात नाचणी हे प्रमुख पीक घेतले जाते. कॉफी हे येथील प्रमुख पारंपरिक उत्पादन असले ,  तरी आता त्याऐवजी हळूहळू ‘क्वात ’  ह्या मादक वनस्पतीची पैदास करण्याकडे कल वाढला आहे. तिहामा या सागरकाठाच्या प्रदेशात कापसाचे पीक घेतली जाते. द्राक्षांच्या बागा विशेषतः साना जिल्ह्यात आहेत. कृषिउत्पादनविषयक १९८१ ची आकडेवारी पुढीलप्रमाणे ( टनांत)  :  ज्वारी –  ५· ८३ लक्ष  बटाटा – १· ८३ लक्ष  द्राक्षे – ६४ , ०००  खजूर – ९० , ०००  गहू – ७० , ०००  सातू – ५३ , ०००  मका – ५० , ०००.

देशातील पशुधनाची १९८३ ची आकडेवारी पुढीलप्रमाणे  :  गुरेढोरे – ९·५ लक्ष  उंट – १·०८ लक्ष  मेंढ्या – ३०·१५ लक्ष  बकऱ्या – ७०·०५ लक्ष कोंबड्या –  ४० लक्ष मत्स्यव्यवसायही देशात चालतो. १९८० चे मत्स्योत्पादन १७,००० टन होते. देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत पुरेसे संशोधन झालेले नाही. खनिज पदार्थांच्या संशोधनासाठी १९५३ साली एका इटालियन कंपनीशी व प. जर्मन कंपनी शी  करार करण्यात आले होते. तिहामाच्या परिसरात खनिज तेल संशोधनासाठी प. जर्मनी व अमेरिकी कंपन्यांनी प्रयत्न केले  तथापि तेथ तेल सापडले नाही. खनिजांपैकी फक्त मिठाचेच उत्पादन देशात होते. १९८१ साली हे उत्पादन ६४,००० टन होते. औद्योगिक दृष् ट्या  देश अविकसितच आहे. १९७० साली व सु. ६० उद्योगधंद्यांची नोंद झाली आणि त्यांतील कामगारांची संख्या ४,७५० होती. साना या राजधानीच्या शहरात कापडगिरणी व सिमेंटचा कारखाना आहे. देशात अन्नधान्ये, पशुधन, रसायने, खनिज तेल, यंत्रसामग्री यांची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. बिस्किटे, कातडी, कॉफी इत्यादींची देशातून निर्यात करण्यात येते. या देशाचा आयात-निर्यात व्यापार प्रामुख्याने सौदी अरेबिया, जपान, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी व इटली या देशांबरोबर चालतो.

देशात एकूण १९,२९३ किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी १,९२४ किमी. रस्ते पक्क्या बांधणीचे आहेत. देशात ३ आंतरराष्ट्रीय विमानतळ असून साना, तॅइझ, एल होदेद, मोचा, सेलीफ, लोहेया ह्या प्रमुख बंदरांतून देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.

देशातील दूरध्वनिसंचांची संख्या ९०,३५० होती (१९८१). दूरचित्रवाणी संच २५,००० व रेडिओ संच १·१० लक्ष (१९८३) होते.

रियाल हे येथील चलन आहे. १९८५ चा विनिमय दर ६·४५ रियाल  = १  अमे. डॉलर. शासनाने एक विकासयोजना (१९८२–८६) सुरू केली असून ती २७४ कोटी रियाल खर्चाची आहे.

लोक व समाजजीवन :  येमेन प्रजासत्ताकातील जवळजवळ सर्वच लोक मुस्लिम आहे. शफी (सुन्नी) आणि झैदी (शिया) अशा दोन्ही पंथांचे लोक देशात आहेत. भटक्या अरब जमाती येथे नाहीत. येथील बहुसंख्य लोक शिया पंथाचे परंतु झैदी परंपरेतील आहेत. सखल प्रदेशात सुन्नी पंथाचे लोक अधिक आढळतात. १९४८ मध्ये येथील सु. ५०,००० ज्यू इझ्राएलमध्ये गेले असावेत. सरंजामदारवर्ग ,  विविध अरबी जमाती आणि मिश्रवंशीय लोक असे समाजात सामान्यपणे तीन वर्ग आढळतात. मिश्रवंशीय लोक सामान्यपणे समुद्रकिनारी रहात असून त्यांच्यावर आफ्रिकी संस्कृतीचा ठसा मोठ्या प्रमाणात आढळतो. शुद्ध अरब तथा शुद्ध येमेनी ज्यू वंशाचे लोक याच प्रदेशात आढळतात, असा दावा करण्यात येतो. साक्षरतेचे प्रमाण अगदी कमी म्हणजे सु. १६ टक्के आहे (१९८२). मशिदी आणि त्यांनी चालविलेल्या मद्रसा यांतूनच पारंपरिक शिक्षण दिले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आधुनिक शिक्षणाची सोय देशात करण्यात आली असून शिक्षकवर्ग मुख्यतः पॅलेस्टिनियन व ईजिप्शियन आहे. तिहामा डोंगरपायथ्याच्या प्रदेशात आणि मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात लोकसंख्या दाट आहे. ९०% टक्के लोक ग्रामीण परिसरातील आहेत. १९८० च्या जनगणनेनुसार सु. १४ लक्ष येमेनी परदेशात होते.

वेगवेगळ्या अरब राष्ट्रांतून तसेच भारतीय उपखंड, इंडोनेशिया, सिंगापूर, एडन व विशेषतः सौदी अरेबिया आणि अखाती देश यांतून येमेनी लोक विखुरलेले आहेत. प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर (१९६२) परदेशांतील बरेच येमेनी मायदेशी परतले. येमेनी वळणाची अरबी भाषा येथे प्रचलित आहे. ग्रंथभाषा व व्यावहारिक भाषा यांत मात्र बराच फरक आढळतो. शासनातर्फे अनाथालये चालविण्यात येतात. त्याचप्रमाणे प्राथमिक स्वरूपाच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. रुग्ण, अपंग, बेकार, विधवा व अनाथ यांना वक्फ मंडळातर्फे मदत करण्यात येते. कुटुंबनियोजनाचे कार्यही सरकारतर्फे सुरू करण्यात आले आहे. स्त्रियांना मालमत्तेचा हक्क आहे. कुपोषण आणि रोगराई हे देशापुढील फार मोठे प्रश्न आहेत. पोटाचे विकार, देवी, हिवताप, क्षय यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव येथे मोठ्या प्रमाणात होतो. क्वात या मादक द्रव्याव्या व्यसनालाही अनेक लोक बळी पडल्याचे दिसतात. देशात ६० रुग्णालये व आरोग्यकेंद्रे असून त्यांत ४,००० खाटांची सोय आहे (१९८३). डॉक्टरांची संख्या ५१३ व शुश्रूषा सेवाकांची संख्या १,३७१ होती (१९७९). परदेशी मदतीतून अनेक परदेशी डॉक्टर देशात बोलविण्यात येतात.

साना येथील मशिदीत देशातील मोठे ग्रंथालय असून त्यात सु. १०,००० ग्रंथ आहेत. त्यांत मौलिक अरबी हस्तलिखिते व धार्मिक ग्रंथ आढळतात. साना येथे विद्यापीठ आहे (स्था. १९७४). प्राथमिक शाळा ,  माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा यांतून अनुक्रमे ४,१८,२६३;  २५,०३७ व ९,८९५ विद्यार्थी शिकत होते. तसेच शिक्षण-प्रशिक्षण संस्थांतून २ , ४५० विद्यार्थी होते (१९८०-८१). साना विद्यापीठातील विद्यार्थिसंख्या ६,७१९ होती (१९८२).

महत्त्वाची स्थळे :  साना ही देशाची राजधानी असून येथे चामडी, जडजवाहीर, भांडी इ. उद्योगधंदे चालतात. शहरात इतिहासप्रसिद्ध मशिदी असून त्यांभोवती इतिहासकालीन तटबंदी आहे. तॅइझ (लोकसंख्या १,१९,५७२–१९८१) ही देशाची प्रशासकीय राजधानी होती (१९४८–६२). ही शेतमालाची मोठी बाजारपेठ असून येथे अनेक शासकीय कार्यालये व मशिदी आढळतात. एल होदेद (लोकसंख्या १,२६,३८६–१९८१) हे देशातील प्रमुख सागरी बंदर असून तेथून कातडी, कॉफी, खजूर इत्यादींची निर्यात होते. १९६१ साली आगीमुळे शहराचे फार मोठे नुकसान झाले. मोचा हे दक्षिणेकडील सागरी बंदर कॉफीनिर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. इब हे सानाच्या दक्षिणेस १५२ किमी.वर असलेले शहर घोड्याच्या उत्तम जातींसाठी प्रसिद्ध आहे. खोगीर, रिकिब यांसारखी अश्वारोहणाच्या सामग्रीचे येथील उत्पादन प्रसिद्ध आहे. येरीम हे शहर कृषी आणि पशुपालन व्यवसायांसाठी प्रसिद्ध आहे. दॅमार हे देशातील मरू द्यानातील शहर जुन्या मुस्लिम विद्यापीठासाठी व जातिवंत घोड्याच्या पैदाशीसाठी प्रसिद्ध आहे. लोहेया हे दुय्यम प्रतीचे सागरी बंदर असून तेथे खनिजमिठाचे साठे मोठ्या प्रमाणावर सापडतात.

संदर्भ :

  • Bidwell,R.The Two Yemens, Boulder and London,1983.
  • Marechaux, Pascal, Arabia Felix: Images of Yemen and its People, Woodbury, 1980.
  • Peterson, J. E. Yemen: The Search for a Modern State, London, 1982.
  • Smith, G. R. The Yemen, Oxford and Santa Barbara, 1984.
  • Stookey R.W. Yemen: The Political of the Yemen Arab Republic, Boulder, 1978.
  • Wenner, M. W. North Yemen, Boulder, 1982.

 लेखक : जाधव, रा. ग.; चौंडे, मा. ल.

मारिब शहराजवळील अतिप्राचीन धरणाचे अवशेष, इ. स. पू. सु. ४ थे शतक.
‘साना’ राजधानीतील पारंपरिक शैलीतील वास्तू.
तॅइझ : येमेनमधील जुने व्यापारकेंंद्र.