चितोडगढ

चितोडगढ  :  राजपुतांची वीरभूमी म्हणून ओळखला जाणारा, राजस्थानच्या मेवाड भागातील प्रसिद्ध गड. दुसरा पांडव भीम याने हा दुर्ग प्रथम बांधला, अशी आख्यायिका आहे. गडावर भीमलत्ताकुंड नावाचे ठिकाण आहे. तेथे भीमाने लाथ मारून पाताळातील पाणी आणले, अशी दंतकथा आहे. इतिहासकाळात हा किल्ला कोणी आणि केव्हा बांधला, याची निश्चित माहिती नाही. याचे जुने नाव चित्रकोट. हे सातव्या शतकातील मोरी राजपूत राजा चित्रांगद याच्यावरून पडले आणि त्यावरूनच चित्तोड हे नाव पडले असावे. चित्रांगदाच्या राजवाड्याचे व तलावाचे अवशेष गडावर दक्षिण भागात आहेत. बाप्पा रावळ याने ७३४ मध्ये हा गड घेतला. महाराणा जैत्रसिंगाने येथे राजधानी आणली. अलाउद्दीन खल्‌जीने १३०३ मध्ये, गुजरातच्या बहादुरशाह याने १५३४ मध्ये व अकबराने १५६७ मध्ये हा गड जिंकून घेतला. १३०३ मध्ये रतनसिंग रावळ याची सौंदर्यवती पत्नी पद्मिनी हिने अनेक राजपूत स्त्रियांसह, १५३४ मध्ये महाराणा संग्रामसिंह याची पत्नी कर्मवती हिने त्याचप्रमाणे १५६७ मध्ये महाराणा प्रतापसिंहाच्या वेळीही अनेक राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या शीलाचे रक्षण केले. ती ठिकाणे गडावर पहावयास मिळतात.

कीर्तिस्तंभ व जैन मंदिर, चितोडगढ

पश्चिम रेल्वेच्या उदयपूर-चितोडगढ व रतलाम-अजमीर फाट्यांवरील प्रस्थानक चितोडगढपासून पूर्वेस गंभीरी नदीपलीकडे सु. ३ किमी.वर चितोड या गावी आहे. त्याच्या पूर्वेस सु. ५ किमी.वर थेट दक्षिणोत्तर गेलेल्या सु. ५ किमी. लांबीच्या, ०·८ किमी. रुदीच्या, माथ्यावर सु. २०० हे. क्षेत्रफळ असलेल्या व सु. १५२ मी. उंचीच्या टेकडीवर हा किल्ला आहे. चितोड गावाकडून रामपोळ मार्गाने सात दरवाजे ओलांडून वरपर्यंत चांगला रस्ता आहे. वाटेत सेनापती जयमल्ल, फत्ता आणि कल्ला यांच्या छत्र्या लागतात. गडावर जाण्यास पूर्वेकडून सूरजपोळ व उत्तरेकडून लाखोटा बारी असे अन्य मार्ग आहेत.

बाराव्या शतकातील महाजन जिजा याने तीर्थंकर आदिनाथाचा म्हणून बांधलेला २४·४ मी. उंचीचा किर्तिस्तंभ जैन वास्तुकलेचा नमुना होय. पंधराव्या शतकात राणा कुंभ याने माळवा आणि गुजरात येथील सुलतानांच्या सैन्यांवर एकाच वेळी मिळविलेल्या विजयानिमित्त उभारलेला ३६·६ मी. उंचीचा नऊ मजली विजयस्तंभ हा हिंदूंच्या पुराणकथा व देवदेवता यांचे शिल्प नावांसह जतन करून ठेवणारा म्हणून प्रेक्षणीय आहे. यांशिवाय पद्मिनीमहाल, मीराबाईचे मंदिर, मूळचे सूर्यमंदिर परंतु आताचे कालिकामंदिर, समिद्धेश्वर, सिंगारचौरी इ. गडावरील ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

दातार, नीला