बार्बेडोस : अटलांटिक महासागरातील वेस्ट इंडीज द्वीपसमूहापैकी एक स्वतंत्र देश. क्षेत्रफळ ४३० चौ. किमी., लोकसंख्या २,७०,२०० (१९७८ अंदाज). हे सार्वभौम बेट व्हेनेझुएलाच्या ईशान्येस सु. ४०० किमी. १३°२’ उ. ते १३°२०’ उ. अक्षांश व ५९°२५’ प. ते ५९°३९’ प. रेखांश यांदरम्यान वसलेले आहे. साधारणतः या त्रिकोणाकृती बेटाची दक्षिणोत्तर कमाल लांबी ३४ किमी. आणि पूर्व-पश्चिम कमाल रुंदी २३ किमी. आहे. ब्रिजटाउन (लोकसंख्या ८,८६८ – १९७०) ही या देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : वेस्ट इंडीजमधील इतर बेटांप्रमाणे येथील जमीन चुनखडी, प्रवाळ, वालुकाश्म, तांबडी माती यांनी बनलेली आहे. ज्वालामुखीचाही या बेटाच्या भूरचनेवर परिणाम झालेला दिसून येतो. बार्बेडोसचा बहुतेक भूभाग सपाट आहे. मध्यभागाकडे भूप्रदेशाची उंची किंचित वाढत जात असून उत्तर भागात हिलबी हे ३४० मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. बार्बेडोस उत्कृष्ट पुळणींसाठी प्रख्यात आहे. बेटाभोवती प्रवाळशैलभित्ती असून त्यांमुळे जहाजवाहतुकीस अडथळा येतो. सेंट जॉर्ज, कॉन्स्टिट्यूशन व ब्रूस व्हेल या देशातील प्रमुख नद्या होत.

हवामान : बार्बेडोसचे हवामान आल्हाददायक आहे. त्यावर व्यापारी वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसून येतो. डिसेंबर ते मेअखेर उन्हाळा असतो. जून ते नोव्हेंबर हा पर्जन्याचा काळ असून देशात सरासरी १५२ सेंमी. पाऊस पडतो. येथील वार्षिक सरासरी तपमान क्वचितच ३०° से. पेक्षा वाढते व २२° से. च्या खाली येते. हरिकेनच्या टापूत हे बेट असल्याने या वाऱ्यांमुळे त्याचे अधूनमधून नुकसान होते. १८३०, १८३१ व १९५५ मधील हरिकेनांमुळे बेटाची अतोनात हानी झाली होती.

येथील जंगलात विविध प्रकारचे पामवृक्ष, मॅहॉगनी, खडशेरणी (कॅझुॲरिना), चिंच, पॉइंकियाना इ. वनस्पती आढळतात. यांशिवाय लिली, रानगुलाब इ. फुलझाडेही आहेत. प्राणिजीवन मात्र मर्यादित आहे. माकड, ससा, रॅकून, मुंगूस इ. प्राणी तर चिमणी, हमिंग, बदक, मुस्टाश इ. पक्षी  आढळतात. येथील सागरी भागात डॉल्फिन, हेरिंग, स्प्रॅट इ. मासे सापडतात.

इतिहास : प्राचीन काळी या बेटावर आरावाक इंडियनांची व कॅरिब लोकांची वस्ती होती. स्पॅनिशांना त्यांच्या हिस्पॅनीओला बेटावरील वसाहतीत काम करण्यासाठी गुलाम हवे होते. त्यांच्या शोधार्थ फिरत असता ते या बेटावर आले (१५१८). तेव्हापासून या बेटाचा यूरोपशी संबंध आला. १५३६ मध्ये पोर्तुगीज नाविक येथे आले असता त्यांना दाढीप्रमाणे लोंबती वाढ झालेली अंजिरासारखी झाडे दिसल्याने ते या बेटास ‘लोण बार्बेडोस’ म्हणू लागले. यानंतर बराच काळ या बेटाकडे कोणीही फिरकले नाही.

या बेटाशी ब्रिटिशांचा संबंध सु. १६०५ पासून आला असावा. सायमन गॉर्डन हा या बेटास भेट देणारा पहिला ब्रिटिश नागरिक होय. त्याने टॉमस वॉर्नरच्या नेतृत्वाखाली यास भेट दिली असावी. १६२० -२४ व १६२४ -२५ दरम्यान अनुक्रमे सर टॉमस वॉर्नर व जॉन पोएल यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश जहाजांनी या बेटास भेट दिली. हेन्री पोएल या जॉनच्या धाकट्या भावाच्या नेतृत्वाखाली १६२७ पासून येथे ब्रिटिश वसाहतीस प्रारंभ झाला. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल् सने (१६०० -४९) हे बेट इनाम म्हणून प्रथम ढ्यूक ऑफ मॉर्लबर यास व नंतर अर्ल ऑफ कार्लाइल यास दिल्याने या दोघांत तंटा निर्माण झाला. त्याचा निर्णय होण्यापूर्वीच हे बेट अर्ल ऑफ पेंब्रुक यास इनाम म्हणून देण्यात आले.

यादवी युद्धाच्या वेळी येथील कारभार कार्लाइलचा वारसदार फ्रान्सिस लॉर्ड विलोबी पाहत होता. युद्धकाळात तो राजाच्या बाजूने राहिला. त्यामुळे अनेक राजनिष्ठ लोकांनी बार्बेडोसचा आश्रय घेतला परंतु १६५२ मध्ये क्रॉमवेलने ॲडमिरल सर जॉर्ज ॲस्क्यू याच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवून विलोबीचा पराभव केला.

इनामी पद्धत १६५२ मध्ये बंद होऊन येथील कारभार ब्रिटिश गव्हर्नरकडे सोपविण्यात आला. या बेटातून निर्यात होणाऱ्या मालावरील करातील साडेचार टक्के रक्कम कार्लाइलच्या वारसदारांना देण्याचे ठरले. ही पद्धत १८३८ पर्यंत चालू होती.

वसाहतकाळात पूर्व- कॅरिबियन बेटांचे स्वायत्त राज्य स्थापण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. बार्बेडोस येथे १८७६ मध्ये उठावही झाला. १९३० च्या सुमारास जागतिक मंदीची लाट व देशातील लोकसंख्येची वाढ यांमुळे १९३७ च्या सुमारास लोकांतील असंतोष वाढून मोठ्या प्रमाणात उठाव झाला. परिणामतःब्रिटिश सरकारने हा असंतोष दूर करण्यासाठी मॉइन आयोगाची नेमणूक केली. त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट ॲड वेल्फेअर ऑर्गनायझेशन फॉर द वेस्ट इंडीज याचे मुख्यालय बार्बेडोस येथे करण्यात आले. या संस्थेमार्फत देशाच्या प्रगतीसाठी योजना आखल्या गेल्या.

बार्बेडोस १९५८ मध्ये वेस्ट इंडियन संघराज्यात समाविष्ट झाले व मजूर पक्षाचा नेता सर ग्रांटली ॲडम्स हा संघराज्याचा पंतप्रधान झाला. या संघराज्याचे १९६२ मध्ये विसर्जन होऊन ३० नोव्हेंबर १९६६ रोजी बार्बेडोस स्वतंत्र झाला व सर ग्रांटली ॲडम्स हा देशाचा पहिला पंतप्रधान बनला. १९७८ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने जे. एम्. जी. एम्. ॲडम्सच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवून सत्ता संपादन केली.

राज्यव्यवस्था : येथील राज्यकारभार १९६६ च्या संविधानानुसार चालतो. ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरल आपल्या कार्यकारी मंडळाच्या साहाय्याने येथील कारभार पाहतो. या देशाची संसद द्विसदनी आहे. सीनेटचे २१ सदस्य असून ते गव्हर्नर जनरल आणि हाउस ऑफ असेंब्लीमार्फत निवडले जातात. हाउस ऑफ असेंब्लीचे २४ सदस्य असून ते पाच वर्षांसाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाने निवडले जातात. देशात डेमॉक्रॅटिक लेबर व बार्बेडोस लेबर हे दोन राजकीय पक्ष आहेत. जिल्हा न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांमार्फत न्यायदानाचे काम पाहिले जाते.आर्थिक स्थिती : वसाहतकाळात बार्बेडोसमध्ये तंबाखू हे प्रमुख व्यापारी पीक घेतले जात होते. परंतु त्यानंतर मात्र देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने साखर-उद्योग व पर्यटन व्यवसाय यांवर अवलंबून आहे. १९७० नंतर इतरही उद्योगधंद्यांचा विकास करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणल्या जात आहेत.

देशातील शेतीयोग्य जमिनीपैकी जास्तीत जास्त क्षेत्र उसाखाली आहे. कृषिव्यवसायात सुधारणा होऊन उत्पादनवाढ व्हावी, यासाठी शेतीविकास महामंडळाची १९७४ मध्ये स्थापना करण्यात आली. शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जात असून दर हेक्टरी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उसाच्या क्षेत्रात व दर हेक्टरी उत्पादनात वाढ व्हावी या हेतूने १९७५ पासून साखरनिर्यात वसुली अधिनियम अंमलात आला. उसाशिवाय भुईमूग, कांदे, कापूस इ. पिकेही घेतली जातात. त्याचप्रमाणे पशुपालन व्यवसायाचाही विकास करण्यात येत आहे. १९७६ मध्ये देशात २३,००० गुरे २,४९,००० मेंढ्या ३७,००० डुकरे व ३,७५,००० कोंबड्या होत्या. बार्बेडोसमध्ये साखरउद्योग हाच प्रमुख आहे. याच्यावर आधारित असे इतर व्यवसायही वाढत आहेत. साखरेच्या किंमती उतरल्याने १९७२ मध्ये साखरउत्पादनात घट झाली होती परंतु नंतर किंमती स्थिर राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. साखरउद्योगावरील निर्भरता कमी करण्यासाठी इतरही व्यवसायांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने १९७७ मध्ये एक पंचवार्षिक उद्योग-विकास योजना तयार करण्यात आली. या योजनेनुसार औषधनिर्मिती, इलेक्ट्रॉनिकीय यंत्रसामग्री, प्लॅस्टिके, अन्नप्रक्रिया, काच, तेलशुद्धीकरण इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. क्राइस्टचर्च येथे इलेक्ट्रॉनिक कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे.

खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या शोधामुळे या बाबतीत हा देश स्वयंपूर्ण होण्याची शक्यता आहे. १९७८ मध्ये प्रतिदिवशी १,००० ते १,२०० पिंपे खनिज तेल काढले जात होते.

पर्यटनव्यवसाय हा विकसनशील आहे. १९७७मध्ये २, ६९, ३१४ पर्यटकांनी देशास भेट दिली. मासेमारी व्यवसायात आधुनिक तंत्राचा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे. १९७६ मध्ये २,२४० टन मासे पकडण्यात आले.

बार्बेडोस डॉलर हे अधिकृत चलन नोव्हेंबर १९७३ पासून वापरात असून १, ५, १०, २५ डॉलरची नाणी व १, ५, १०, २०, १०० डॉलरच्या नोटा चलनात आहेत. ऑक्टोबर १९७८ मध्ये १०० बार्बेडोस डॉलर =२३.६९ पौंड = ४५.७२ अमेरिकी डॉलर असा विनिमय दर होता.

आयात-निर्यात व्यापार हा प्रामुख्याने ग्रेट ब्रिटन, गुयाना, कॅनडा, अ. सं. सं. या देशांशी चालतो. निर्यातीत साखर, मद्ये, रसायने इत्यादींचा ,तर आयातीत यंत्रसामग्री, अन्नधान्ये खनिजे इत्यादींचा समावेश होतो. १९७८ मधील आयात-निर्यात अनुक्रमे ५४५१.१० लक्ष आणि १९३०.०४ लक्ष बार्बेडोस डॉलरची होती. बार्बेडोस हा ‘कॅरेबियन कॉमन मार्केट’चा सदस्य आहे.

‘सेंट्रल बँक ऑफ बार्बेडोस’ ही देशातील प्रमुख बँक आहे. बार्बेडोस डेव्हलपमेंट बँक, बार्बेडोस नॅशनल बँक या देशी बँकांशिवाय रॉयल बँक ऑफ कॅनडा, कॅनडियन इंपीरीयल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ अमेरिका इ. परदेशी बँकशाखाही येथे आहेत. तसेच कॅरिबियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय बार्बेडोसमध्येच आहे. देशातील विमा व्यवसायही प्रगत आहे.

दळणवळण : रस्ते, हवाई मार्ग व जलमार्ग यांच्या सुविधा देशात सर्वत्र आहेत. देशात एकूण १, ६४१.५ किमी. लांबीचे रस्ते आहेत. ब्रिजटाउनपासून सु. १७किमी. ग्रांटली ॲडम्स हा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कॅरिबियन एअरवेज, कॅरिब वेस्ट एअरवेज लि. या देशी व काही परदेशी विमान कंपन्यांमार्फत हवाई वाहतूक चालते. बहुतेक जलवाहतूक ब्रिजटाउन बंदरातून चालते. विमानतळ व बंदर सुविधांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न चालू आहेत.  ब्रिजटाउन येथे प्रधान डाकघर असून देशात त्याच्या १३ शाखा आहेत. रेडिओ व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम ‘कॅरिबियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ मार्फत प्रसारित केले जातात. १९७७ मध्ये देशात १,११,००० रेडिओ व ४८,००० दूरचित्रवाणी संच होते.

लोक व समाजजीवन : देशातील १९७० च्या लोकसंख्येपैकी ९०% निग्रो, ४ % यूरोपियन व ६% मिश्र वंशाचे होते. लोकसंख्येच्या उच्च घनतेबाबत बार्बेडोस ख्यात असून १९७६ मध्ये दर चौ. किमी. ची सरासरी घनता ५६८ होती. याच वर्षी देशात दर हजारी जननप्रमाण व मृत्यूप्रमाण अनुक्रमे १८.६ व ९.२ होते. जननप्रमाण कमी होण्यासाठी कुटुंबनियोजनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. धार्मिक दृष्टीने पाहता १९७८ च्या अंदाजानुसार सु. ५३ % लोक ॲग्लिकन, ९ % मेथडिस्ट, ४ % रोमन कॅथलिक, २ % मोराव्हियन, ३२% इतर पंथीय होते.

सामाजिक सुरक्षा योजना १९६७ पासून लागू करण्यात आलेली आहे. देशात पाच आरोग्य केंद्रे, ११ सरकारी रुग्णालये व १६० डॉक्टर होते (१९७३).

देशात साक्षरतेचे प्रमाण ९७ % असून सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांतून शिक्षण मोफत आहे. १९७५-७६ मध्ये ११६ प्राथमिक शाळांत ३५,७१० विद्यार्थी २० माध्यमिक शाळांत १९,४०२ विद्यार्थी एका तांत्रिक शाळेत १,२७८ विद्यार्थी व एका शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात २४१ विद्यार्थी होते. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंडीज (स्था. १९६३) ब्रिजटाउन येथे असून तेथे १३५ शिक्षक व १,१४४ विद्यार्थी होते. इंग्रजी ही राजभाषा असून जॉर्ज लेमिंग हा बार्बेडोसचा प्रसिद्ध उल्लेखनीय कादंबरीकार आहे. देशात ॲडव्होकेट न्यूज हे प्रमुख दैनिक असून त्याचा दररोजचा खप २०,४६३ आहे. याशिवाय काही साप्ताहिके व मासिके येथून प्रकाशित होतात.

देशात चांगल्या प्रकारची संग्रहालये व सार्वजनिक वाचनालये आहेत. ब्रिजटाउन येथील ग्रंथालय मोठे आहे. क्रिकेट हा येथील लोकप्रिय खेळ असून गॅरी सोबर्स व फ्रँक वॉरेल हे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू येथीलच होत.

येथील हवामान व निसर्गसौंदर्य यांमुळे या देशास प्रवासी मोठ्या संख्येने भेट देतात. ब्रिजटाउन हे राजधानीचे शहर प्रसिद्ध असून बॅथशीया हे उत्कृष्ट आरोग्यकेंद्र म्हणून विख्यात आहे.

गाडे, ना. स.