शांघाय : चीनमधील सर्वांत मोठे शहर व महत्त्वाचे बंदर.शांघाय : चीनमधील सर्वांत मोठे महानगर, प्रमुख सागरी बंदर तसेच औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्येने जगातील मोठ्या शहरांपैकी ‘शांघाय’ हे एक आहे. चीनचे प्रवेशद्वार म्हणूनही ते ओळखले जाते. लोकसंख्या ८७,६०,००० (१९९३). पूर्व चिनी समुद्रकिनाऱ्यावर, उत्तरेस यांगत्सी नदीचे मुख व दक्षिणेस हांगजो व यूपान उपसागर यांच्या दरम्यास शांघाय वसलेले आहे. शांघायच्या उत्तरेस २३ किमी. वर वूसाँग येथे ह्वांगपू व यांगत्सी नद्यांचा संगम होतो.

प्राचीन सुंग राजवटीत (इ.स. ९६० ते १२७९) शांघायची स्थापना झाली. १८४२ मधील नानकिंग तहापासून त्याची झपाट्याने वाढ झाली. या तहानुसार विदेशी व्यापारासाठी खुल्या करण्यात आलेल्या पाच बंदरांपैकी शांघाय हे एक होते. फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका इत्यादींनी शांघायवर वर्चस्व प्रस्थापित करून तेथे व्यापारी संस्था व बॅंका स्थापन केल्या आणि घरे, चर्च व कार्यालयीन इमारती बांधल्या. ब्रिटन व अमेरिका यांच्या येथील वसाहतींच्या एकत्रीकरणातून आंतरराष्ट्रीय वसाहतीची स्थापना करण्यात आली व तिचे व्यवस्थापन शांघाय नगरपरिषदेकडे सोपविण्यात आले. १९२८ मध्ये चिनी प्रशासनाने शांघाय नगरपरिषदेकडे सोपविण्यात आले. १९२८ मध्ये चिनी प्रशासनाने चार जिल्ह्यांचे एकत्रीकरण करून `ग्रेटर शांघाय’ नगरपालिका स्थापन केली. येथील कामगार व विद्यार्थी संघटनांच्या स्थापनेनंतर शांघाय हे अनेक महत्त्वाच्या राजकीय चळवळींचे केंद्रस्थान बनले. चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना येथेच झाली. १९३१ मध्ये जपानी वस्तूंवर शांघायमध्ये बहिष्कार घालण्यात आला. त्यामुळे जपानने १९३२ मध्ये शांघायवर हल्ला केला. १९३६ मध्ये शांघाय हे चीनमधील महत्त्वाचे व्यापारी, वित्तीय व औद्योगिक केंद्र बनले. त्या वेळी देशातील ८० टक्के हलके वस्तु-उद्योग व २५ टक्के अवजड उद्योग शांघायमध्ये केंद्रित झाले होते. चीन – जपान युद्धकाळात (१९३७ –४५) शांघायचा ताबा जपानी सैन्याकडे होता. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४३मध्ये ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांनी, तर महायुद्धानंतर लगेचच फ्रान्सने या शहरावरील आपले विशेष हक्क व अधिकार सोडून दिले.

चीनमधील यादवी युद्धकाळात १९४९ मध्ये शांघायचा ताबा चिनी कम्युनिस्ट सैन्याने घेतला. शांघायचा विस्तार व महत्त्व कमी करण्याचे कम्युनिस्टांचे धोरण होते. त्यादृष्टीने १९५० नंतर कम्युनिस्टांनी शांघायमधील अनेक कारखाने तसेच कामगारवर्ग व इतरही लोकवस्ती अंतर्गत भागाकडे हलविली. परंतु याच दशकाच्या मध्यात हे धोरण मागे घेण्यात आले. कम्युनिस्ट राजवटीत सभोवतालच्या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश करून शांघाय नगरपालिकेचा विस्तार करण्यात आला. येथील महानगरपालिका केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. शांघाय महानगराचे क्षेत्रफळ ५,८००चौ.किमी. व लोकसंख्या १,४१,९०,००० (१९९६ अंदाज) होती. या महानगरपालिकेला प्रांताइतकाच राजकीय दर्जा देण्यात आला आहे.

शांघाय हे चीनमधील महत्त्वाचे औद्योगिक. व्यापारी व वित्तीय केंद्र आहे. वस्त्रोद्योग, लोह व पोलाद, बेअरिंग, जहाजबांधणी, यांत्रिक अवजारे, अवजड यंत्रे, ट्रक, ट्रॅक्टर, टायर, प्लॅस्टिक, औषधे, खते, रसायने व खनिज तेल रसायने, विद्युत व इलेक्ट्रॉनिकी साहित्य, घड्याळे, कॅमेरे, रेडिओ, काचेच्या वस्तू, चामडी – उत्पादने, स्टेशनरी, सिमेंट खाद्यपदार्थ-निर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. खनिज तेल शुद्धीकरण, लोहेतर धातुनिर्मिती व औष्णिक वीजनिर्मिती हे शांघायमधील औद्योगिक विकासाचे प्रमुख आधार आहेत. चीनमधील पॅसिफिक किनाऱ्यावरील हे एक अग्रेसर बंदर आहे. चीनची फार मोठी आयत-निर्यात या बंदरातून होते. शांघायची मध्य चीनशी होणारी वाहतूक प्रामुख्याने यांगत्सी नदीमार्गातून होते. तसेच उत्तरेकडील व दक्षिणेकडील प्रमुख शहरांशी हे लोहमार्गांनी जोडलेले आहे. शहराच्या नैर्ऋत्य भागात हुंग-चिआओ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून दक्षिण भागात लुंग्‌ह्वा हा देशांतर्गत हवाई वाहतुकीचा तळ आहे.

मूळ चिनी वस्ती असलेले, विदेशी वस्ती असलेले व या दोहोंच्या सभोवतालचे उपनगरीय वस्तीचे शांघाय असे या महानगराचे प्रमुख तीन विभाग पडतात. दक्षिणेकडील चिनी वस्तीच्या भागाला `चिन्यांचे शहर’ (चायनीज सिटी) असे संबोधले जाते. एकेकाळी या वस्तीभोवती तटबंदी होती. येथील वास्तू दाटीवाटीने बांधलेल्या आढळतात. या भागात निवासी व व्यापारी इमारती आहेत. या जुन्या शांघायच्या उत्तरेस विदेशी वसाहत आहे. यातच शहराचे मध्यवर्ती केंद्र येते. या विभागात गगनचुंबी इमारती, सार्वजनिक बागा, जहाजबांधणी उद्योग, गोद्या, दुकाने, उपहारगृहे, घोड्यांच्या शर्यतीचे मैदान इ. आढळतात. विदेशी लोकांच्या अनेक निवासी इमारती आता चिनी लोकांच्या वापरात आहेत. शांघायच्या उपनगरी भागात निवासी सदनिका, कारखाने, शाळा व दुकाने इ. आहेत.

शांघायमधील बहुतेक लोक चिनी आहेत. शहरात अनेक विद्यापीठे व संशोधन केंद्रे आहेत. शांघाय हे प्राधान्याने आधुनिक शहर असले, तरीही लाँगुआ पॅगोडा, चिंगन मठ, दा शिजिए नाट्यकला केंद्र, शांघाय ललितकला संग्रहालय इत्यादींसारख्या काही ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरागत वास्तू व स्थळे येथे पाहावयास मिळतात.

चौधरी, वसंत