व्हॅन : (वान). तुर्कस्तानातील एक शहर व याच नावाचे, खाऱ्या पाण्याचे, देशातील सर्वांत मोठे सरोवर. हे देशाच्या पूर्व भागात असून, शहराची लोकसंख्या २,१९,३१९ (१९९७ अंदाज) होती. व्हॅन प्रांताचे हे मुख्य ठिकाण असून धान्य, भाजीपाला व फळांच्या, तसेच कातडीच्या व्यापाराचे केंद्र आहे. इ.स.पू. नवव्या शतकात प्राचीन व्हॅन शहर ऊरार्तू किंवा अरारात या व्हॅनिक राजांच्या राजधानीचे ठिकाण होते. डोंगराच्या सोंडेवर उंच (१,७५० मी.) ठिकाणी वसल्यामुळे ॲसिरियनांच्या अनेक स्वाऱ्या होऊनही हे शहर शाबूत राहू शकले. परंतु इ.स.पू. सातव्या शतकानंतर राज्याला उतरती कळा लागली. तेव्हापासून हे शहर आर्मेनियन, मीड व त्यानंतर पर्शियनांच्या दबावाखाली आले. प्राचीन उरार्तियन व पर्शियन शिलालेख येथे आढळतात. इ.स.पू. पहिल्या शतकात राजा पहिला टायग्रेनीझ याने स्थापन केलेल्या राज्यात व्हॅनचा समावेश करण्यात आला. इ.स. १०७१ मध्ये हे सेल्जुक तुर्कांच्या आधिपत्याखाली आले. चौदाव्या शतकात तैमूर (तैमूरलंग) याने व्हॅन शहराचा जवळजवळ पूर्णपणे विध्वंस केला. १५४३ मध्ये ते ऑटोमन साम्राज्याला जोडण्यात आले. पहिल्या महायुद्धकाळात रशियनांनी हे आपल्या ताब्यात घेतले (१९१५ ते १९१७). येथील तॉप्राक्काले टेकडीवर प्राचीन शहराचे अनेक अवशेष आढळतात. सध्याचे शहर दक्षिणेस गढीच्या पायथ्याशी मरुद्यानात विस्तारले आहे. शहरातील वस्तुसंग्राहालयात उरार्तियन लेख व भांडी पहावयास मिळतात.

इराणच्या सरहद्दीजवळ ॲनातोलिया प्रदेशात असलेले व्हॅन सरोवर साधारणपणे त्रिकोणी आहे. त्याचे क्षेत्रफळ ३,७१३ चौ.किमी. असून ते स.स.पासून १,६०० मी. उंचीवर आहे. सरोवराची कमाल लांबी १३० किमी. तर दक्षिण भागात कमाल रुंदी ६४ किमी. आहे. सरोवराच्या दक्षिणेस उंच पर्वत, पूर्वेस पठार व पर्वत, तर पश्चिमेस ज्वालामुखी शंकूचा जटिल प्रदेश आहे. अशा भूमिस्वरूपांनी हे वेढलेले असल्याने याला बहिर्द्वार नाही. याचे काठ तीव्र उताराचे आहेत. याचे दोन भाग झालेले असून, उत्तरेकडील भाग उथळ तर दक्षिण भाग अधिक खोल आहे. दक्षिण किनाऱ्याजवळ याची सर्वाधिक खोली (१०० मी.) आहे. गदीर, कारपानक, अक्तमार व आत्रेक ही बेटे सरोवरात आहेत. पर्जन्य, सभोवतालच्या पर्वतावरील वितळलेले बर्फ व बेंडीमही, झीलान, कारास्यू, मिसिंगर या नद्यांपासून याला पाणीपुरवठा होतो. सरोवराचे पाणलोट क्षेत्र १५,००० चौ.किमी. आहे. हिवाळ्यात पाण्याची पातळी कमी असते, तर जुलैमध्ये सर्वाधिक असते.

ग्रीक भूगोलज्ञ याला थॉस्पाइटस म्हणून ओळखतात. त्याचे तुर्की नाव व्हॅन गलू आहे. प्राचीन व्हॅन किंवा चौआन या राजधानीच्या शहरावरून सरोवराला व्हॅन असे नाव देण्यात आले आहे. सरोवरातील पाण्यात दर लिटरमागे २२·६ ग्रॅम खनिज पदार्थ आढळतात. या पाण्यात क्षारयुक्त पदार्थांपेक्षा अल्कलीयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त आहे. पाण्याची चव कडवट असल्यामुळे ते पिण्यासाठी किंवा जलसिंचनासाठीही उपयुक्त नाही. क्लोरीन, गंधकाम्ल व कार्बनयुक्त पदार्थांचे प्रमाण यात अधिक आहे. पाण्यात मोठ्या प्रमाणावर टाकणखार आढळतो. बाष्पीभवन होऊन उरलेल्या पदार्थाला पेरेक या स्थानिक नावाने ओळखले जाते. त्याचा उपयोग धुण्याची पावडर म्हणून करतात. डारेख हे हेरिंग जातीचे मासे यात मिळतात. इतर कोणतेही जलचर पाण्यात आढळत नाहीत. हिवाळ्यात उत्तरेकडील भागातून प्रवासी बोट-वाहतूक केली जाते. उथळ भागातील पाणी लवकर थंड होते. काही वेळा तेथील पाणी गोठतेदेखील. सरोवराकाठी पर्यटन व्यवसाय वाढत आहे.

चौधरी, वसंत