बूखारा : रशियाच्या उझबेकिस्तान प्रजासत्ताकातील बूखारा विभागाची राजधानी व इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या १,८८,००० (१९८०). हे शहर समरकंदच्या पश्चिमेस २२८ किमी झेरफ्शान नदीखोऱ्यात वसलेले आहे. मध्यआशियातील एक प्रमुख व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून हे इतिहास काळात प्रसिद्ध होते. चीनमधून भारत व मध्यपूर्वेकडील देशांत फार पूर्वी रेशीम निर्यात होई आणि रेशमाच्या व्यापाराचा मार्ग ‘रेशीम मार्ग’ या नावाने ओळखला जाई. बूखारा शहर याच मार्गावर असून पूर्वीपासूनच ते लोकर व कापड उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.

या जुन्याशहराचा पहिला इतिहास अज्ञात असला, तरी याचा प्रथम उल्लेख इ.स. पाचव्या शतकातील चिनी इतिवृत्तांतून आढळतो. आठव्या शतकात मुस्लिम धर्मप्रसारासाठी निघालेलया अरबांनी या शहरात प्रवेश केला, तेव्हा ते भरभराटीला आलेले शहर होते. त्यांनतर हे शहर अरब खिलाफतीच्या ताब्यात आले व याच काळात ते मुस्लिम धर्मशिक्षणाचे प्रमुख केंद्र बनले. नवव्या व दहाव्या शतकांत इराणच्या सामानिड घराण्याच्या अंमलात बूखारा हे राजधानीचे ठिकाण बनले. १२२० मध्ये चंगीझखानाने हे शहर लुटले. पुढेही १२७३ व १२७६ मध्ये अशाच आपत्तींना हे शहर बळी पडले. त्यानंतर येथे सोळाव्या शतकापर्यंत तिमुरिड घराण्याचा (तैमूरलंगाने स्थापन केलेले) अंमल येथे होता. १५०६ मध्ये हे शहर उझबेकी लोकांच्या आधिपत्याखाली आले. उझबेक खान शेबानी याने बूखारा अमिरातीची स्थापना केली. पुढे १५५५ मध्ये बुखारा हीच तिची राजधानी करण्यात आली. शेबानीच्या कारकीर्दीत हे शहर वैभवाच्या शिखरावर पोहोचले. १७४० मध्ये हे शहर पुन्हा इराणी राजवटीत आले. याच काळात सागरी मार्गाची सोय उपलब्ध झाल्याने या शहराचा ऱ्हास होऊ लागला. येथील अमिराने रशियाचे वर्चस्व मान्य केले (१८६८). रशियाने १९२० मध्ये येथील अमिरात नष्ट करून शहर आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर हे शहर बूखारा प्रजासत्ताकाचे (१९२०-२४) मुख्य ठिकाण करण्यात आले. १९२४ नंतर याचा उझबेकीस्तानमध्ये समावेश करण्यात आला.  

 

शहराच्या परिसरात १९५० मध्ये लागलेल्या नैसर्गिक वायूच्या शोधामुळे शहराच्या प्रगतीला चालना मिळाली. जलसिंचनाच्या सुविधेमुळे कापूस उत्पादनात याचा परिसर अग्रेसर ठरल्याने येथे अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या. ‘काराकुल’ कातडीवरील प्रक्रियेचा रशियातील सर्वांत मोठा कारखाना येथे आहे. यांशिवाय शहरात दागदागिने, लोकरी कपडे बनविणे इ. व्यवसायही चालतात. सोव्हिएट राजवटीखाली स्ताराइया (जुन्या) बूखाराचे आधुनिकीकरण झाले पण बाजार, मशिदी इ. मध्ययुगीन गोष्टी टिकून राहिल्या येथील बहुतांशी धार्मिक विद्यालये बंद पडली आहेत. उझबेकी, अरब, अफगाण अशी संमिश्र वस्ती असून बहुतेक उझबेकी लोक ताजिक ही फार्सीची पोटभाषा बोलतात. येथील इस्माइल सामानिडची (८९२ – ९०७) कबर, कल्यन मशिद व गुन्हेगारांना जेथून फेकून दिले जाई तो तिचा उंच मनोरा (११२७), मिर – इ – अरब (१५३५-३६) ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

 

चौंडे, मा. ल.