फुश, व्हिव्हियन अर्नेस्ट: (११ फेब्रु. १९०८-  ). ब्रिटिश भूशास्त्रज्ञ व अंटार्क्टिका खंड ओलांडणारा (१९५७-५८) पहिला समन्वेषक. जन्म आइल ऑफ वाइटमधील फ्रेशवॉटर गावी. केंब्रिज विद्यापीठाचा एम्. ए. (१९२९). या विद्यापीठाच्या पूर्व ग्रीनलंड संशोधनमोहिमेत व त्यानंतर १९३०-३८ मध्ये आफ्रिकेच्या मोहिमेत भूशास्त्रज्ञ म्हणून त्याने भाग घेतला. दुसऱ्या महायुद्धकाळात तो पूर्व आफ्रिका व यूरोपमध्ये सैनिकी सेवेत होता. महायुद्धानंतर १९४७ साली फॉकलंड बेटांच्या सर्वेक्षणाचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले. यासाठी त्याने अंटार्क्टिक प्रदेशात दोन हिवाळे काढले. १९५० मध्ये फॉकलंड बेटांच्या शास्त्रीय संशोधन विभागाचा संचालक झाल्यानंतर त्याने वेडेल समुद्र ते रॉस समुद्र यांदरम्यानचा अंटार्क्टिका खंडाचा अज्ञात प्रदेश पार करण्याचे ठरविले. या मोहिमेत बारा व्यक्ती होत्या व त्यांत ‘कॉमनवेल्थ ट्रान्स-अंटार्क्टिका मोहिमे’चे काही सदस्यही होते.

वेडेल समुद्रावरील शॅकल्टन तळावरून २४ नोव्हेंबर १९५७ रोजी तो आपल्या अनुयायांसह निघाला. याच मोहिमेवर, पण दुसऱ्या बाजूने शॅकल्टनने योजिलेल्या मार्गाने गेलेला न्यूझीलंडचा प्रसिद्ध समन्वेषक एडमंड हिलरी यास नाताळपर्यंत द. ध्रुवावर भेटावे, अशी त्याची इच्छा होती. परंतु प्रतिकूल हवामानामुळे तो वेळेवर पोहोचू शकला नाही. द. ध्रुव ओलांडून पुढे तो रॉस समुद्रावरील स्कॉट तळावर २ मार्च १९५८ रोजी पोहोचला. हे ३,५०० किमी. अंतर त्याने ९९ दिवसांत पार केले. या त्याच्या कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यास ‘सर’ हा किताब दिला. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीतर्फे ‘हबर्ड मेडल’ हे सर्वोच्च पारितोषिकही त्यास देण्यात आले (१९५९). यांशिवाय ‘पोलर मेडल’ (१९५३) तसेच अनेक देशांमधील प्रसिद्ध भौगोलिक संस्थांतर्फे त्यास सुवर्णपदके देण्यात आली आहेत. एडिंबरो, बर्मिंगहॅम विद्यापीठांनी त्यास सन्माननीय एल्‌एल्‌. डी. पदवी देऊन तर इतर काही विद्यापीठांनी डी. एस्‌सी. पदवी देऊन त्याचा गौरव केला. वरील मोहिमेनंतर ‘ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणा’चा मुख्य अधिकारी म्हणून त्याची नेमणूक झाली (१९६२). याच पदावरून १९७३ मध्ये तो सेवानिवृत्त झाला. भूभौतिकीय सर्वेक्षणांच्या आधारे तो व एडमंड हिलरी या दोघांनी मिळून द क्रॉसिंग ऑफ अंटार्क्टिका हा ग्रंथ लिहिला (१९५८) असून अंटार्क्टिका ॲडव्हेंचर (१९५९) या पुस्तकाचाही तो लेखक आहे. ग्रेट एक्स्प्लोअरर्स, द फोर्सेस ऑफ नेचर (१९७६) या ग्रंथांचे त्याने संपादन केले आहे.

कुलकर्णी, जयश्री