भेडा: पाकिस्तानच्या शहापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १७,९९२ (१९६१). हे लाहोरच्या वायव्येस सु. १६९ किमी. अंतरावर झेलम नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे. एक व्यापारी शहर म्हणून हे प्रसिद्ध असून रस्ते, लोहमार्ग इ. सुविधांनी युक्त आहे. झेलम नदीच्या उजव्या तीरावर याच नावाचे जुने शहर होते. हे शहर प्रथम अकराव्या शतकात गझनीच्या महमूदाने, तर तेराव्या शतकात चंगीझखानाच्या सैन्याने लुटले. १५१९ मध्ये बाबरास हे शहर खंडणी म्हणून मिळाले पण अल्प काळातच डोंगरी टोळ्यांनी हे शहर उद्ध्वस्त केले. त्यानंतर नवीन शहर सु. १५४० मध्ये वसविले गेले. अकबराच्या कारकीर्दीत शहराचा विकास झपाट्याने झाला. अहमदशाह अबदालीचा सेनापती नुरुद्दीन याने हे शहर १७५७ मध्ये लुटले, पुढे भंगी संधाच्या शीख नायकाने शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. ब्रिटीश अंमलाखाली भेडाचा विशेषत्वाने विकास झालेला आढळतो.

येथे १८६७ पासून नगरपालिका आहे. येथून काबूल, सक्कर, कराची यांसारख्या शहरांशी व्यापार चालतो. येथे जीनच्या कापडाचा उद्योग विशेष विकसित झालेला आहे. कटलरी उद्योग तसेच लाकडावरील व हरितमण्यांच्या नक्षीकामासाठी हे विशेष प्रसिद्ध आहे. यास एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही महत्त्व आहे. येथील मशीद व महमूद संताची कबर उल्लेखनीय आहे.

गाडे, ना. स.