नागपूर शहर : महाराष्ट्र राज्याच्या नागपूर (विदर्भ) विभागाचे व नागपूर जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आणि महाराष्ट्राची दुसरी राजधानी. लोकसंख्या ८,६६,०७६ (१९७१). या शहराची स्थापना अठराव्या शतकाच्या सुरुवातीस, गोंड राजा बख्त बुलंद याने छोट्याशा नाग नदीकाठी केली व त्यावरूनच याला नागपूर हे नाव मिळाले. पेंढाऱ्यांनी हे जाळले होते. पेशव्यांच्या अमदानीत ते नागपूरकर भोसल्यांची राजधानी होते. १८१८ मध्ये पेशवाई बुडाल्यानंतर तेथे ब्रिटिश सत्तेचा प्रभाव पडण्यास सुरुवात झाली आणि १८५३ मध्ये ते सर्वस्वी ब्रिटिश अधिसत्तेच्या अंकित होऊन, १८६१ मध्ये तेव्हाच्या मध्य प्रांताची राजधानी बनले. १८६७ मध्ये येथे रेल्वे आली व नागपूरच्या भरभराटीस आरंभ झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर १९५६ ची राज्यपुनर्रचना होईपर्यंत, येथे मध्य प्रदेशाची राजधानी होती. नंतर हे शहर द्विभाषिक मुंबई राज्यात समाविष्ट झाले आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात आले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे वर्षातील हिवाळी अधिवेशन या ठिकाणी भरते म्हणून त्याला महाराष्ट्राची दुसरी राजधानी समजण्यात येते. महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे काही कामकाजही येथून चालते. भारतातील याच्या मध्यवर्ती भौगोलिक स्थानामुळे हवाई, लोह, रस्ते इ. वाहतूक मार्गांचे तसेच संदेशवहनाचे ते प्रस्थानक बनले. त्यामुळे ते व्यापारी केंद्रही झाले आहे. नागपूरच्या आसपासचे विस्तृत क्षेत्र, कापसाच्या उत्पादनासाठी व संत्र्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हातमाग, कापड व सूतगिरण्या, लाकूड कापणे वगैरेंचे कित्येक कारखाने येथे आहेत. येथील हातमागावरील पातळे व कापड आणि संत्राबाजार प्रसिद्ध आहे. नागपुरात औद्योगिक वसाहती असून येथील लहानमोठ्या कारखान्यांतून लोखंड, मंगल व इतर धातूंच्या विविध वस्तू, वाहतूक साधने, तेल, बर्फ, विड्या इत्यादींचे उत्पादन व छपाईचे काम होत असते. नागपूरजवळचे कामठी औद्योगिक क्षेत्रही महत्त्वाचे आहे. जवळच्या खापरखेडा व कोराडी औष्णिक विद्युत्  उत्पादनकेंद्राची वीज येथील उद्योगधंद्यांस पुरविली जाते. औद्योगिकीकरणामुळे शहरात गलिच्छ वस्त्याही वाढल्या आहेत. त्यांची सुधारणा व निर्मूलन यांचे उपक्रम कार्यान्वित आहेत. नागपूरला शासकीय दूध-पुरवठा योजना आहे. शहराला कन्हान नदी, अंबाझरी आणि गोरेवाडा तलाव येथून पाणीपुरवठा होतो. येथे नागपूर विद्यापीठाची १९२३ मध्ये स्थापना झाली. येथे लक्ष्मीनारायण तंत्रमहाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, अनेक रुग्णालये, मनोरुग्णालय, कारागृह, ग्रंथालय, विदर्भ साहित्य संघाचे कार्यालय आणि अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आहेत. नागपूरला आकाशवाणीकेंद्र आहे. महानगरपालिका, स्थायी समिती व महानगरपालिका आयुक्त यांमार्फत शहाराचा कारभार चालतो. डॉ. आंबेडकरांचा सामुदायिक बौद्धधर्मस्वीकार (१४ ऑक्टो. १९५६) तसेच अखिल भारतीय काँग्रेसची दोन अधिवेशनेही येथे झाली. नागपूर टाइम्स हितवाद ही इंग्रजी, तरुण भारत, महाराष्ट्रलोकमत ही मराठी, युगधर्म व इतर दोन ही हिंदी वृत्तपत्रे तसेच मराठी व हिंदी भाषांतून निघणारे उद्यम मासिक, ऑल इंडिया रिपोर्टर हे कायदाविषयक मासिक ही येथून प्रसिद्ध होतात. तेलंखेडी तलाव व बगीचा, शुक्रवारी तलाव, अंबाझरी बगीचा, महाराज बाग, वस्तुसंग्रहालय, शहराच्या मध्यभागी असलेल्या जोड टेकडीवरील सीताबर्डीचा किल्ला, सचिवालय, महानगरपालिका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादींच्या भव्य इमारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे स्मारक, गांधी बाग आणि पोहण्याचा तलाव, गीतामंदिर तसेच झांशीची राणी, क्रांतिवीर शंकर इत्यादींचे पुतळे, अनेक धर्मीय पूजास्थाने वगैरे येथील प्रेक्षणीय स्थळे होत.

(चित्रपत्र २८).

देसाई. दा. सी. कुमठेकर. ज. ब.

गीतामंदिर वस्तूसंग्रहालय

नागपूरमधील एका सुत गिरणीचे अंतर्गत दृश्य

जुने मंत्रालय , नागपूर अंबाझरीचे दृश्य

पवित्र दीक्षाभूमी. डॉ. आंबेडकरांचा पुतळा व स्मारक समितीचे महाविद्यालय

शहीद शंकर माहले स्मारक नागपूर विद्यापीठाचे बाह्य दृश्य