सॅन फ्रॅन्सिस्को : केबल कार.

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रमुख बंदर तसेच सांस्कृतिक, वित्त व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे शहर. लोकसंख्या ८,०५,२३५ (२०१० अंदाज). पश्चिमेस पॅसिफिक महासागर, उत्तरेस गोल्डन गेट सामुद्रधुनी व सॅन फ्रॅन्सिस्को उपसागर तसेच पूर्वेस असलेल्या सॅन फ्रॅन्सिस्को उपसागरामुळे सीमित झालेल्या द्वीपकल्पाच्या उत्तर टोकाशी सॅन फ्रॅन्सिस्को शहर वसले आहे. फ्रिस्को या टोपण नावाने हे शहर ओळखले जाते. शहराची भौगोलिक रचना टेकड्यांयुक्त प्रदेशात झालेली आहे. ट्वीन पीक्स, मौंट डेव्हिडसन व मौंट , सुट्रो ह्या येथील सर्वांत मोठ्या टेकड्या असून त्या सर्वांची उंची २८० मी. पेक्षा अधिक आहे. शहराचे क्षेत्र ११७ चौ. किमी. आहे. येथील हिवाळे व पावसाळे सौम्य, उन्हाळे धुकेयुक्त व शीत तर वसंत ऋतू सूर्यप्रकाशित आणि सौम्य असतो. वार्षिक सरासरी किमान व कमाल तपमान अनुक्रमे ११° व १७° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५३३ मिमी. असून पाऊस प्रामुख्याने नोव्हेंबर ते एप्रिल यांदरम्यान पडतो.

द्वीपकल्पाच्या या उत्तरेकडील भागात पूर्वी दाट धुक्यामुळे फारशी वस्ती नव्हती किंवा यूरोपियन समन्वेषकही इकडे फारसे फिरकले नाहीत. सोळाव्या शतकाच्या मध्यात वेगवेगळ्या समन्वेषकांनी कॅलिफोर्निया किनाऱ्याचे समन्वेषण केले परंतु त्यांपैकी कोणालाही येथील टेकड्यांच्या प्रदेशांतून अंतर्गत भागातील सॅन फ्रॅन्सिस्को उपसागरात प्रवेश करण्याजोगा अरुंद सामुद्रधुनीचा भाग आढळला नाही. त्यामुळे पुढे सु. दोनशे वर्षांपर्यंत हा उपसागर जगाला अपरिचितच राहिला.

बाजा कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर गॅस्पर द पोर्तोला याच्या नेतृत्वाखालील सफर १७६९ च्या उन्हाळ्यात सॅन डिएगोपर्यंत पोहोचली. तेथून त्यांनी आपला प्रवास तसाच पुढे चालू ठेवला. सॅन फ्रॅन्सिस्को द्वीपकल्पाच्या सखल भागात त्याने आपला मुक्काम ठोकला. पोर्तोलाने जोसे फ्रॅन्सिस्को ऑर्तेगा याच्या नेतृत्वाखाली एक गट पुढील प्रदेशाच्या समन्वेषणासाठी पाठविला. आपल्या सहकाऱ्यासह ऑर्तेगा येथील टेकड्यांयुक्त कटकच्या माथ्यावर पोहोचला तेव्हा तेथून त्याला एक मोठाजलाशय पसरलेला आढळला (२ नोव्हेंबर १७६९). तोच सॅन फ्रॅन्सिस्को उपसागर होय. त्यानंतर काही दिवसांतच इतर समन्वेषक गटांनी या भागात भेटी दिल्या. कॅप्टन पेद्रो फागेस याच्या नेतृत्वाखालील सफरीने मार्च १७७२ मध्ये या उपसागराच्या पूर्व भागाचे समन्वेषण केले. ऑगस्ट १७७५ मध्ये सॅन कार्लोस या पुरवठा जहाजाचा कप्तान जॉन मॅन्युएल द आयला याने आपले जहाज गोल्डन गेट सामुद्रधुनीतून सॅन फ्रॅन्सिस्को उपसागरात आणले. अशा प्रकारे या बंदरात आलेले हे पहिलेच जहाज असावे. त्यानंतर आठ महिन्यांनी जॉन बॉतिस्ता द अँझा काही सैनिक व वसाहतकऱ्यांसह या उपसागराच्या भागात कायमस्वरूपी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने उत्तर मेक्सिकोहून सॅन फ्रॅन्सिस्को या भावी शहराच्या जागेवर येऊन पोहोचला. २८ मार्च १७७६ रोजी त्याने मिशन व सैनिकी वसाहतीची इमारत (प्रेसिडिओ) बांधण्यासाठी या जागेची निवड केली.

या टेकड्यांच्या प्रदेशात वाढणाऱ्या सुवासिक झुडुपांवरून फादर हुनीपेरो सेरा याने या ठिकाणास येरबा ब्यूनेस हे नाव दिले (१७७७). मेक्सिकोला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर (१८२१) ते मेक्सिकोच्या आधिपत्याखाली आले. १८३० च्या दशकापासून येथे वर्दळ वाढू लागली. अमेरिकेने नाविक दलाच्या सामर्थ्यावर ते ९ जुलै १८४६ मध्ये हस्तगत केले आणि त्याचे सॅन फ्रॅन्सिस्को असे नामकरण केले (१८४७). १८४८ मध्ये त्याच्या परिसरात सोन्याचा शोध लागल्यानंतर वसाहतींची वाढ झाली. १८४८ मध्ये येथे केवळ ८०० लोकवस्ती होती. ती १८५० मध्ये ३५,००० पर्यंत वाढली. १८५० मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला. १८६९ मधील ट्रान्स-कॉन्टिनेन्टल लोहमार्गामुळे येथील बंदराचा एक औद्योगिक व मच्छिमारी केंद्र म्हणून विकास झाला. १८ एप्रिल १९०६ च्या तीव्र भूकंपात या शहराची प्रचंड वित्त व जीवितहानी झाली परंतु ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. दुसऱ्या महायुद्घानंतर संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या स्थापनेची पहिली बैठक याच शहरात एप्रिल- जून १९४५ मध्ये झाली. जपानबरोबरचा अमेरिका शांतता करार (१९५१) येथेच झाला. १७ ऑक्टोबर १९८९ रोजी पुन्हा या शहरास तीव्र भूकंपाचा तडाखा बसला. या भूकंपामुळे जीवितहानी कमी झाली परंतु वित्तहानी खूप झाली. विशेषतः मरिना डिस्ट्रिक्ट भागाचे प्रचंड नुकसान झाले.

सॅन फ्रॅन्सिस्कोची अर्थव्यवस्था प्रामुख्याने सेवा उद्योगावर अवलंबून असून त्यात पर्यटन व्यवसाय आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त व्यवसाय व उद्योगांचाही अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा आहे. शहरात अशोधित धातू शुद्घीकरण, जहाजबांधणी, वस्त्रोद्योग-विशेषतः तयार कपडे- रबर व प्लॅस्टिक वस्तू , संगणक, इलेक्ट्रिक उपकरणे, डबाबंद अन्न, अन्नप्रक्रिया इ. उद्योग चालतात. छपाई आणि प्रकाशन या बाबतींतही हे शहर देशात प्रसिद्घ आहे. बँक ऑफ अमेरिका, वेल्स फॉर्गो आणि क्रॉकर नॅशनल बँक या देशातील सर्वाधिक मोठ्या बँकांची प्रधान कार्यालये सॅन फ्रॅन्सिस्कोत आहेत. पॅसिफिक रोखे बाजाराचे हे मुख्यालय आहे.

सॅन फ्रॅन्सिस्को हे शहर विखुरलेल्या टेकड्यांतून त्यांच्या उतारांवर वसले असले, तरी शहरांतर्गत वाहतूक सुविधा अतिशय विकसित आहेत. बे एरिया रॅपिड ट्रान्झीट (बीएआर्टी) ही विजेवर चालणारी जलद सार्वजनिक लोहमार्ग वाहतूक सुविधा येथे १९७२ मध्ये सुरू झाली. १२० किमी. लांबीच्या बीएआर्टी मार्गाद्वारे हे शहर पूर्वेकडील ओकलँड व बर्कलीमधील उपसागर किनाऱ्यावरील शहरांशी जोडलेले आहे. सॅन फ्रॅन्सिस्को-ओकलँड यांदरम्यानची स्वयंचलित वाहनांद्वारे होणारी वाहतूक तेथील उपसागरात बांधण्यात आलेल्या ‘सॅन फ्रॅन्सिस्को-ओकलँड बे ब्रिज’ या ७.२ किमी. लांबीच्या पुलावरून चालते. १९८९ मध्ये झालेल्या भूकंपामुळे या पुलाचे बरेच नुकसान झाले होते. गोल्डन गेट सामुद्रधुनीतून बांधण्यात आलेल्या ‘गोल्डन गेट ब्रिज’ या पुलाने सॅन फ्रॅन्सिस्को उत्तरेकडील मरीन परगण्याशी जोडले आहे. येथील ‘रशियन हिल’ भागातील ‘लाँबर्ड स्ट्रीट’ या रस्त्याचा काही भाग त्याच्या आठ अवघड तीव्र वळणांनी बनलेला असून तो जगातील अत्यंत अवघड वळणाचा एकेरी मार्ग समजला जातो. पूर्वी स्थानिक वाहतुकीसाठी फेरीबोट व केबलकारचा उपयोग केला जाई. तो आता कमी झाला आहे. केबलकार ही अभिनव वाहनव्यवस्था सॅन फ्रॅन्सिस्कोची एक खास ऐतिहासिक बाब ठरली आहे. सॅन फ्रॅन्सिस्को उपसागराची लांबी ९७ किमी. व रुंदी ५ ते १९ किमी. असून जगातील अतिशय सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी हे एक सर्वाधिक कार्यक्षम बंदर आहे. शहराच्या हद्दीबाहेर दक्षिणेस ११ किमी.वर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या लोकसंख्येत सांस्कृतिक, वांशिक व सामाजिक भिन्नता प्रचंड आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येत५५ टक्के श्वेतवर्णी, ३० टक्के आशियाई व १५ टक्के कृष्णवर्णीय आहेत. त्यामुळे या शहराचा उल्लेख अमेरिकेतील ‘ मोस्ट एशियन सिटी ’ या शब्दात करतात. देशातील सर्व देशीय शहरांपैकी हे एक आहे. आशियन, इटालियन,कृष्णवर्णीय व हिस्पॅनिक्स अशा विविध वंशांचे लोक येथे आढळतात. शहरातील प्रत्येक रहिवाशाचा शेजारी अगदी वेगळ्या वंश-धर्म-संस्कृतीचा आढळतो. शहरात चायना टाऊन हा नागरी वस्तीचा भाग असून आशियाच्या बाहेर सर्वांत जास्त चिनी लोक चायना टाऊनमध्ये राहतात. त्यांची रंगीबेरंगी व वैशिष्ट्यपूर्णदुकाने व उपहारगृहे येथे आढळतात. चायना टाऊनच्या शेजारीच जपान टाऊन, फिल्मोअर डिस्ट्रिक्ट, रशियन हिल, मिशन डिस्ट्रिक्ट हे नागरी वस्तीचे भाग आहेत. यांतील मिशन डिस्ट्रिक्टमध्ये प्रामुख्याने मेक्सिको व मध्य अमेरिकेतून आलेले स्पॅनिश भाषिक राहतात. नॉब हिल, टेलिग्राफ हिल व रशियन हिल या टेकड्या निवासी क्षेत्रे म्हणून विशेष प्रसिद्घ आहेत. त्यांपैकी ‘नॉब हिल ’वर १८७० च्या दशकात बांधलेले उच्चभू लोकांचे भव्य प्रासाद आढळतात. रिचमंड डिस्ट्रिक्ट हासुद्घा विस्तीर्ण निवासी परिसर आहे.

शहरात उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक नामवंत संस्था आहेत. त्यांपैकी युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को (१८५५), युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (१८६४), स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, गोल्डन गेट युनिव्हर्सिटी (१९०१) व सॅन फ्रॅन्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटी (१९०१) ही प्रमुख विद्यापीठे असून सॅन फ्रॅन्सिस्को आर्ट इन्स्टिट्यूट (१८७४), कॅलिफोर्निया कॉलेज ऑफ पेडिॲट्रिक मेडिसीन (१९१४), सॅन फ्रॅन्सिस्को कॉन्झर्व्हेटरी ऑफ म्युझिक (१९१७) इ. विविध विषयांत ज्ञान देणाऱ्या संस्था आहेत. याशिवाय आरमारविषयक प्रशिक्षण देणारी लष्करी महाविद्यालये येथे आहेत. क्रॉनिकल आणि एक्झॅमिनर ही शहरातील दोन प्रमुख दैनिके आहेत. चिनी, जपानी, इटालियन, जर्मन, स्पॅनिश, रशियन आणि स्कँडिनेव्हियन आदी भाषांतील सु. डझनभर वृत्तपत्रे आणि साप्ताहिके शहरातून निघतात. ख्रिस्ती चर्चशिवाय अन्य धर्मांची स्वतंत्र धर्मस्थळे-धर्मवास्तू असून त्यांत चिनी लोकांच्या बौद्घ स्तूपांचे आधिक्य आहे. शहराच्या ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’ (सीबीडी) भागात गगनचुंबी इमारती आढळतात. त्यांपैकी बँक ऑफ अमेरिकेची इमारत ५२ मजली तर ट्रान्सअमेरिका कॉर्पोरेशनची इमारत ४८ मजली आहे.

टेकड्यांवर उभारलेल्या इमारती, तेथून चोहोबाजूंना दिसणारे जलाशयांचे विहंगम दृश्य, आल्हाददायक हवामान, सुंदर उद्याने, दुतर्फा हिरव्यागार वनस्पतींनी वेढलेले रस्ते व सरोवरे, करमणुकीची साधने, सर्व सुखसोयींची उपलब्धता, उच्च राहणीमान, सांस्कृतिक भिन्नता, ऐतिहासिक वास्तू इत्यादींमुळे सॅन फ्रॅन्सिस्को हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षक शहर बनले आहे. महासागराकडून वाहत येणाऱ्या नित्य पश्चिमी वाऱ्यामुळे सॅन फ्रॅन्सिस्कोचे वातावरण आल्हाददायक बनले आहे. सुमारे ४०० हे. क्षेत्रफळ व्यापलेले गोल्डन गेट पार्क हे पर्यटकांचे खास आकर्षण असून त्यात करमणुकीची अनेक साधने आहेत. पार्कमध्ये कला संग्रहालय, मत्स्यालय, वेधशाळा, सांगीतिक समुदाय (काँकर्न्स) व जपानी टी गार्डन आहे. याशिवाय विविध खेळांची क्रीडांगणे असून त्यांतील टेनिसकोर्ट प्रसिद्घ आहे. एम्. एच्. दे यंग मेमोरियल म्यूझीयम हे देशातील एक प्रसिद्घ संग्रहालय या पार्कमध्ये आहे. याशिवाय सॅन फ्रॅन्सिस्को आर्ट म्यूझीयम हे नागरी भागातील संग्रहालय आणि लिंकन पार्कमधील द पॅलेस ऑफ द लिजन ऑफ ऑनर ही वस्तुसंग्रहालयेही ख्यातनाम आहेत. प्रतिवर्षी सु. २५ लाख लोक या संग्रहालयांना भेट देतात. शिबंदी वा लष्कर यासाठी सु. ६०० हे. जमीन संरक्षित केली असून तीत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सहाव्या भूसेना पलटणीचे मुख्यालय आहे. त्यात सैनिकांचे व्यवस्थापन, प्रशिक्षण, आरोग्य सेवा वगैरेंची कार्यालये आहेत.

देशपांडे, सु. र.; चौधरी, वसंत