क्रिमिया : यूरोपीय रशियाच्या युक्रेन सोशॅलिस्ट सोव्हिएट रिपब्लिकचे काळ्या समुद्रावरील द्वीपकल्प व ‘ओब्लास्ट’. क्षेत्रफळ सु. २६,००० चौ. किमी. लोकसंख्या १८,१४,००० (१९७०). याचा उत्तरेकडील ७५% भाग मैदानी निमओसाड स्टेप्सचा असून पूर्वेस ६०० ते १,५०० मी. उंचीचे डोंगर आहेत. ते केर्च द्वीपकल्पात गेले आहेत. दक्षिण भाग रशियन रिव्हिएरा म्हणून प्रसिद्ध आहे. एकूण हवामान सौम्य आहे. उत्तरेकडे सुपीक चर्नोझम मृदा आहे. नद्या पुष्कळ परंतु उथळ व उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या आहेत. सलगीर ही एकच महत्त्वाची नदी आहे. उत्तरेकडील भाग स्टेप गवताचा, डोंगराळ भाग पानझडी अरण्यांचा व दक्षिण भाग भूमध्य सागरी वनस्पतींचा आहे. स्टेप प्रदेशात गहू, सोयाबीन, बार्ली, सूर्यफूल व भाजीपाला यांचे मोठे उत्पन्न येते. कापसाचे उत्पन्न पाणीपुरवठ्यामुळे वाढत आहे. डोंगराळ प्रदेशात लोक मेंढ्या पाळतात. किनारी प्रदेशात द्राक्षे, सफरचंद, पेअर, चेरी, जर्दाळू, पीच, बदाम, अक्रोड आणि तंबाखूही होतो. किनाऱ्यावर मासेमारी सर्वत्र होते. केर्च विभागात लोखंड सापडते. मिठापासून ब्रोमीन, मॅग्नेशियम वगैरे रासायनिक व्यवसायांस उपयुक्त पदार्थ मिळतात. खनिज तेल आणि चुनखडीही सापडते. लोक मुख्यतः रशियन व त्याखोलखाल तार्तार, युक्रेनियन, बल्गेरियन व आर्मेनियन आहेत. सींफ्यिरॉपल हे कारभाराचे व सर्वांत मोठे औद्योगिक शहर आहे. सेव्हॅस्टोपोल येथे रशियाचा काळ्या समुद्रावरील मोठा आरमारी तळ आहे. ख्रि. पू. सातव्या शतकापासून १४७७ पर्यंत सिथियन, ग्रीक, गॉथ, हूण, खाझार, रोमन, किपचाक, मंगोल आणि तुर्क यांच्या सत्ता येथे आल्या व गेल्या. १७८३ पासून क्रिमिया रशियाच्या ताब्यात आहे. १८५४ ते ५६ च्या क्रिमियन युद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात ते इंग्रजांनी, फ्रेंचांनी आणि जर्मनांनी घेण्याचा प्रयत्न केला होता. १९४५ मध्ये चर्चिल, रूझवेल्ट व स्टालिन यांची ऐतिहासिक भेट क्रिमियातील याल्टा येथे झाली.

कुमठेकर, ज. ब.