इराणचे आखात : पर्शियन गल्फ. अरबी समुद्राचा इराण व अरबस्तान ह्यांमधील फाटा. क्षेत्रफळ १,४४,८४० चौ. किमी., एकूण किनारा ३,२१९ किमी. प्राचीन नाव सायनस पार्सिकस फार्सी  खलिज-इ-फार्स आणि अरबी खलिज-अल्-अजम. टायग्रिस-युफ्रेटीस संगमानंतर बनलेल्या शट-अल्-अरब प्रवाहाच्या मुखापासून हॉर्मझ सामुद्रधुनीपर्यंत ह्याची लांबी ८०५ किमी. व रुंदी २२५–३३४ किमी. आहे. हॉर्मझ सामुद्रधुनी सु. ८० किमी. रुंद असल्याने तिच्या आग्‍नेयीकडील सु. ५४४ किमी. लांबीच्या व ३६८ किमी. रुंदीच्या ओमानच्या आखाताचा समावेश बर्‍याच वेळा इराणच्या आखातातच करतात. इराणच्या आखाताची सर्वसाधारण खोली ९१ मी. असून अरबस्तान किनार्‍याजवळ ती ९ मी. आहे. तेथे मोती सापडतात. उष्णता (सरासरी ३८ से.) व दमटपणा (सापेक्ष आर्द्रता ८०%) यांकरिता आखात प्रसिद्ध आहे. पाऊस १२–२१ सेंमी. पडतो. ह्याचा इराणकिनारा अरुंद व डोंगराळ असून छोट्या नद्यांची दलदली मुखे, नैसर्गिक परंतु असुरक्षित बंदरे व बरीच लहान बेटे यांनी युक्त आहे. हॉर्मझ सामुद्रधुनीच्या उत्तरेस मुख्य भूमीपासून खुरान सामुद्रधुनीने वेगळे झालेले १०८ किमी. लांबीचे किश्म हेच एक मोठे बेट आहे. अरबस्तानकडील किनारा सखल असून वाळवंट, कच्छवनश्री, लहान लहान खाड्या व बहरीन वगळता अनेक लहान बेटे यांनी युक्त आहे. ही बेटे मोती, मासे व चाचेगिरी यांकरिता प्रसिद्ध आहेत. शट-अल्-अरब मुखाजवळील ६४ किमी. किनारा टायग्रिस, युफ्रेटीस, कारून, जाराही इ. नद्यांच्या गाळांनी बनलेला दलदली त्रिभुजप्रदेश आहे. एकेकाळी भरभराटीस असलेली बंदरे गाळ साचल्यामुळे आज किनार्‍यापासून दूर अंतर्भागात आढळतात. सुमेरिया-बॅबिलोनियाचे एरिडू १९२ किमी., बसरा १२० किमी., तर आबादान हे किनार्‍यापासून ६४ किमी. आत आहे. मध्य क्रिटेशस काळातील घडामोडींमध्ये या आखाताची निर्मिती झाली व टायग्रिस-युफ्रेटीस द्रोणाचीच हा भाग होय, असे मानले जाते. इराक-अरबस्तानामधील तेलखाणींपेक्षा येथील खाणी जुन्या खडकांत सापडल्या आहेत. ओमानमध्ये हलक्या प्रतीचा कोळसा व तांबे सापडत असले, तरी इराण आखाताजवळचा प्रदेश प्रामुख्याने खनिजतेलाने समृद्ध आहे. जगातील ५०–७५% तेलसाठा या भागात असून तेलयुक्त देशांमध्ये कुवेतचा चौथा, इराणचा सहावा आणि इराकचा सातवा क्रमांक लागतो. आखाताच्या ईशान्येकडील, शट-अल्-अरबच्या पूर्वेकडील किनारा इराणच्या आधिपत्याखाली असून शट-अल्-अरबच्या पश्चिमेकडील ६४ किमी. इराककडे व बाकीचा कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, कॉटार, संयुक्त अरब अमीरराज्ये व ओमान यांच्या आधिपत्याखाली आहे. अरबस्तानातील २,८५० चौ.किमी. प्रदेश, कोणचीच सत्ता नसल्याने, तटस्थ प्रदेश मानला जातो. बंदर आब्बास, बूशीर, बदर शाहपूर, आबादान, खुर्रामशहर (इराण) बसरा(इराक) कुवेत, मीना-अल्-अहमदी, मीना-अब्द-अल्लाह  (कुवेत) सूद (तटस्थ प्रदेश) रास तनूरा, दम्मम, झाहरान (सौदी अरेबिया) मनामा (बहरीन) दोहा (कॉटार) शारजा, दुबाइ, अबू धाबी (संयुक्त अरब अमीरराज्ये) ही या आखातावरील महत्त्वाची बंदरे होत. आखातमध्ये निरनिराळे २०० प्रकारचे मासे सापडतात. मोत्यांची व खजुराची निर्यातही प्रामुख्याने येथूनच होते तथापि तेलामुळे आखाताचे महत्त्व वाढले. प्राचीन काळापासून हे आखात पौर्वात्य आणि पाश्चात्त्य देशांमधील दुवा आहे. बॅबिलोनियन काळापासून अरबांपर्यंत भारताशी व्यापार प्रामुख्याने या आखातातून झाल्याचे दाखले मिळतात. सोळाव्या शतकापासून दुसर्‍या महायुद्धापर्यंत या आखातावर पोर्तुगीज, डच व मुख्यत: इंग्रज यांचे प्रभुत्व होते. पाश्चात्त्यांचा प्रत्यक्ष राजकीय अंमल या भागातून आता निघाला असला, तरी खनिज संपत्तीकरिता ते अप्रत्यक्षत: प्रयत्‍नशील राहणार असल्याने हा भाग श्रीमंतीबरोबर नेहमीच स्फोटक परिस्थितीचा राहणार आहे.

शाह, र. रू.