पेंच : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतून उत्तर-दक्षिण वाहणारी कन्हान नदीची उपनदी. ही सातपुडा पर्वतरांगेत, मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाड्याजवळ उगम पावून नागपूर जिल्ह्यातील घाट रोहना येथे कन्हान नदीस मिळते. मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सहकार्याने पूर्ण होणाऱ्या ‘पेंच प्रकल्पा’ मुळे या नदीस महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकल्पाद्वारे पेंच नदीवर नागपूर जिल्ह्यात तोतलाडोह व कामठी खैरी अशा दोन ठिकाणी धरणे बांधण्याचे ठरविण्यात आले असून, त्यांद्वारा अनुक्रमे विद्युत्‌निर्मिती व पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पाचे काम १९८४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून एकूण अंदाजे खर्च ७० कोटी रू. येईल. तोतलाडोह येथे चिरेबंदी धरण व विद्युत्‌निर्मितीसाठी भूमिगत विद्युत्-गृह बांधले जात आहे. या धरणाचा खर्च (सु. २,८२८ लाख रू.) व निर्माण होणारी वीज (१६० मेवॉ.) यांचे वाटप दोन्ही राज्यांत ६६ : ३३ या प्रमाणात करण्याचे ठरले आहे. वीजनिर्मितीनंतरचे पाणी ८ किमी. लांबीच्या अवजल बोगद्यातून नदीच्या पात्रात पुन्हा सोडण्यात येणार आहे. हे पाणी नागपूरच्या ईशान्येस ६५ किमी. वरील कामठी खैरी येथील मातीच्या धरणात साठवून ते दोन कालव्यांद्वारा शेती, कोराडी औष्णिक वीज केंद्र, नागपूर शहर इत्यादींना देण्यात येईल. या पाण्याचा फायदा नागपूर व भंडारा या जिल्ह्यांतील शेतीला मोठ्या प्रमाणात होणार आहे. या धरणाची लांबी २,०१३ मी., उंची २३ मी. व पाणी साठविण्याची क्षमता २२२ द. ल. घ. मी. आहे. याच्या उजव्या (लांबी ४८.४ किमी.) व डाव्या (३३ किमी.) कालव्यांद्वारा एकूण १,०२,३०० हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. धरणाचे व उजव्या कालव्याचे काम १९६८-६९ मध्ये .सुरू होऊन १९७७ मध्ये पूर्ण झाले आहे.

चौंडे. सा. ल.