व्हीस्यूव्हिअस : इटलीतील एक प्रसिद्ध जागृत ज्वालामुखी. युरोपच्या मुख्य भूमीवरील हा एकमेव जागृत ज्वालामुखी होय. दक्षिण इटलीतील कँपेन्या मैदानात नेपल्स उपसागराच्या पूर्व किनाऱ्यावर, नेपल्स शहराच्या आग्नेयेस ११ किमी.वर हा ज्वालामुखी पर्वत आहे. उपसागरी किनाऱ्यापासूनच हा ज्वालामुखी पर्वत उंचावत गेलेला आहे. व्हीस्यूव्हिअसची उंची प्रत्येक उद्रेकाच्या वेळी बदलत गेली. १९००मध्ये त्याच्या शंकूची उंची १,३०३ मी., तर १९८० मध्ये ती १.२५० मी. होती. याच्या ज्वालामुखी कुंडाचा व्यास २·४ किमी. असला, तरी प्रत्यक्षात त्याचा शंकू बराचसा लहान आहे. प्राचीन शंकूचा विस्तार उत्तरेस मौंट सोमापर्यंत (माँती सोमा), तर पूर्वेस सु. १६किमी.पर्यंत होता. मौंट सोमा हे इ. स. ७९ मधील उद्रेकात पर्वताचा माथा उखडून निर्माण झालेले एक मोठे ज्वालामुखी कुंड आहे. कुंडाचा आकार अर्धवर्तुळाकार असून त्याची कडा सु. ६०० मी. उंचीवर आहे. या ज्वालामुखीचे पूर्वीचे उद्रेक-केंद्र सध्याच्या मुखाच्या उत्तरेस ४०० मी. अंतरावर होते. शंकूच्या माथ्यावर ३०५ मी. खोलीचे व ६१० मी. व्यासाचे कुंड आहे. त्याची निर्मिती १९४४च्या उद्रेकात झाली आहे. या जागृत ज्वालामुखी शंकूच्या माथ्यावर कपाच्या आकाराचे कुंड असून त्याचा व्यास १५ ते १२० मी. आहे. वस्तुतः ‘मौंट सोमा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या बाह्य शंकूच्या आतील जागृत कुंडाचे नाव व्हीस्यूव्हिअस आहे, परंतु सामान्यपणे या संपूर्ण पर्वतालाच व्हीस्यूव्हिअस असे संबोधले जाते.

व्हीस्यूव्हिअसची निर्मिती प्लाइस्टोसीन काळाच्या अखेरच्या टप्प्यात, म्हणजेच साधारणपणे दोन लाख वर्षांपूर्वी झाली असावी. रोमन दंतकथेनुसार देवांनी एकदा आपली युद्धभूमी म्हणून या पर्वताचा वापर केला होता. २४ ऑगस्ट ७९ च्या प्रचंड उद्रेकापूर्वी काही शतके हा ज्वालामुखी निद्रिस्त होता. त्या उद्रेकापूर्वी १६ वर्षे भूकंपाचे धक्के परिसरातील लोकांना जाणवत होते. ख्रिस्तपूर्व ७३मध्ये पब्लिस क्लॉडीअस पुल्चर या अधिकाऱ्याने मौंट सोमा शिखराच्या प्रदेशातच स्पार्टाकस या योद्ध्याला वेढा घातला होता. त्या वेळी हे शिखर बरेच विस्तृत होते. तेथील खळगा सपाट होता. ओबडधोबड खडकांच्या रांगांनी हा खळगा वेढलेला होता व खडकांच्या रांगांवर जंगली द्राक्षवेलींच्या माळा निर्माण झाल्या होत्या. रोमन लेखक धाकटा प्लिनी याने अल्पशा पाहिलेल्या इ. स. ७३ च्या प्रचंड उद्रेकात त्याचा चुलता थोरला प्लिनी याचा बळी गेला होता. प्लिनीच्या वृत्तान्तानुसार २४ ऑगस्ट ७९ रोजी सकाळी सात वाजता या पर्वत-शिखरावर उंच व बराच फुगीर असा पाइन वृक्षासारखार एक ढग दिसू लागला. त्याचप्रमाणे आगीचे प्रचंड लोळ व रात्रीपेक्षाही घनदाट काळोख असे रूप या ज्वालामुखी-उद्रेकाने धारण केले. उद्रेकातून बाहेर फेकल्या गेलेल्या लाव्हा रस, चिखल व राख यांच्या खाली हर्क्यूलॅनिअम, पाँपेई व स्येबीई ही नगरे जमिनीत ४·६ मी. खोल गाडली गेली. इ. स. ७९ च्या उद्रेकापूर्वी दिसत असलेल्या पर्वताची रंगीत चित्रे पाँपेई व हर्क्यूलॅनिअम येथे आढळली आहेत.

इ. स. ७९ ते १६३१ या काळात पुढीलप्रमाणे ज्वालामुखी-उद्रेक घडून आले. इ. स. २०३, ४७२, ५१२, ६८५, ७८७, ९६८, ९९१, ९९३, ९९९, १००७, १०३६, ११३९, १५०० व १६३१. यांपैकी काही उद्रेकांच्या नोंदी मात्र काहीशा गोंधळात टाकणाऱ्या आहेत. इ.स. ५१२मधील उद्रेक विशेष तीव्र होता. त्या उद्रेकातील सूक्ष्म राख वाऱ्याबरोबर कॉन्स्टँटिनोपलपर्यंत (इस्तंबूल) पसरली होती. १६३१ पूर्वीच्या काही शतकांच्या कालावधीत या पर्वतावर, तसेच ज्वालामुखी-कुंडातही जंगल निर्माण झाले होते. तसेच तेथे तीन सरोवरे तयार झाली होती. चरायला सोडलेली गुरे या सरोवरांतील पाणी पीत असत. मात्र १६ डिसेंबर १६३१ रोजी पुन्हा जबरदस्त ज्वालामुखी-उद्रेक घडून आला. त्या वेळी लाव्हा व उकळत्या पाण्याचे प्रवाह पर्वताच्या पायथ्यालगतच्या काही खेड्यांत तसेच समुद्रापर्यंत पोहोचले होते. त्यात सु. १८,००० लोक मरण पावल्याचे सांगितले जाते. येथील वनस्पतिजीवनही नष्ट झाले. काही दिवस आकाश अंधारलेले होते. उद्रेकापूर्वी सहा महिने येथे सतत भूकंपाचे धक्के बसत होते.  

इ. स. १६२१ नंतर मात्र उद्रेकांचे स्वरूप बदलले. वारंवार उद्रेक होऊ लागले. शांततेचा काही काळ व उद्रेकांचा काळ असे चक्र सुरू झाले. १६६० ते १९४४ या काळात उद्रेकांच्या १९ चक्रीय अवस्था आढळून आल्या. उद्रेकांच्या अवस्थेचा कालावधी सहा महिन्यांपासून ते तीस वर्षे नऊ महिन्यांपर्यंतचा, तर उद्रेकमुक्त शांततेचा काळ १८ मनिन्यांपासून ते साडेसात वर्षांपर्यंतचा असा वेगवेगळा अनुभवास आला. या कालखंडातील महत्त्वाची उद्रेकवर्षे पुढीलप्रमाणे आहेत : इ.स. १६६०, १६८२, १६९४, १६९८, १७०७, १७३७, १७६०, १७६७, १७७९, १७९४, १८२२, १८३४, १८३९, १८५०, १८५५, १८६१, १८६८, १८७२, १८८०, १८९५, १९०६, १९२९, व १९४४.

यांपैकी एप्रिल १९०६ मध्ये झालेल्या उद्रेकाचे सविस्तर वर्णन फ्रँक ए. पेरे यांनी आपल्या दि व्हीस्यूव्हिअस इरप्शन ऑफ १९०६ (१९२४) या प्रबंधात केलेले आहे. त्यांच्या वर्णनाप्रमाणे ४ एप्रिल १९०६ रोजी सकाळीच ज्वालामुखी, वायू व वाफ यांमुळे प्रचंड आकाराचा पांढरा मेघ निर्माण झाला आणि प्रचंड प्रमाणात काळी राख बाहेर फेकली गेली. ११ किमी. अंतरावरील नेपल्सच्या रहिवाशांना ज्वालामुखीच्या वालुका-वर्षावापासून बचाव करण्यासाठी छत्र्यांचा वापर करावा लागला. मध्यरात्रीच्या वेळी मूळ शंकूच्या दक्षिणेकडील कमी उंचीवरील नव्या विवरातून वेगाने लाव्हा रस बाहेर फेकला जाऊ लागला. ६ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शंकूच्या आग्नेयेस सस.पासून ५५० मी. उंचीवर नवेच ज्वालामुख उघडले गेले. या मुखातून कारंज्यासारख्या बाहेर फेकल्या जाणाऱ्या पातळ लाव्हा रसाचा प्रचंड पूर वाहू लागला. बॉसकोत्रकाझपर्यंत हा लाव्हा रस वाहत गेला. पेरे याच्या मतानुसार वाफेच्या प्रचंड दाबामुळे हे ज्वालामुख म्हणजे एक प्रचंड आकाराचे जणू बाष्पित्रच (बॉयलर) बनले होते. त्या वेळी हा ज्वालामुखी जोराने आवाज करीत थरथरत व खदखदत होता. त्याबरोबरच भूकंपाचे प्रमाण व ज्वालामुखी कुंडातील स्फोटांची संख्याही वाढली होती. राखयुक्त मेघांमधील विद्युत्-प्रवाहमानही बरेच अधिक होते.

या उद्रेकानंतर पर्वताच्या उतारावर जंगलाची लागवड करण्यात आली. सुपीक मातीमुळे येथे वनस्पतींची वाढही वेगाने होत गेली. व्हीस्यूव्हिअसच्या या चक्रीय उद्रेक क्रियेतील दीर्घकालीन निद्रावस्थेच्या काळात त्याची ऊर्जा साठत जाते व शेवटी अशी साठवलेली प्रचंड ऊर्जा अल्पकालीन उद्रेकातून मोकळी होते. त्यामुळे उद्रेकाचे स्वरूप सर्वांगांनी भयंकर विध्वंसक ठरते.

इ. स. १९१३ मध्ये याची ज्वालामुखी नळी पुन्हा उघडली जाऊन नेहमीच्या पद्धतीने उद्रेकास सुरुवात झाली. ३ जून १९२९ रोजी महाभयंकर स्फोट होऊन जो ज्वालामुखी-उद्रेक झाला, त्यामुळे ज्वालामुखी-पदार्थांचे ढीग हवेत जोराने फेकले गेले ज्वालामुखीचा मध्यभागातील शंकू फुटून कोसळून पडला. त्यामुळे कुंडाच्या ईशान्येकडे तेर्झीग्नी नगरापर्यंत लाव्हा रस वाहत गेला व वस्तीपासून ३६५ मी. अंतरावर थांबला. मार्च १९४४ मध्ये व्हीस्यूव्हिअसचा पुन्हा उद्रेक झाला. या उद्रेकापूर्वी काही दिवस भूकंपी क्रिया चालू होत्या. १८ मार्च रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी ज्वालामुखीतून लाव्हा वाहू लागला. २० मार्च रोजी सायंकाळी ५·३० वाजता ज्वालामुखी-स्फोटाला सुरुवात झाली. त्यामुळे पाँपेईच्या अवशेषांवर पुन्हा साधारण एक फूट जाडीचा राखेचा थर साचला. तसेच सॅन सेबॅस्टिॲनो खेड्याचा विनाश झाला. त्या वेळी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनी लोकांना फार मोठी मदत केली.

या उद्रेकापूर्वी दर वर्षी हजारो लोक व्हीस्यूव्हिअसला भेट देत. ते येथील ज्वालामुखी कुंडात काही अंतरापर्यंत जात आणि ज्वालामुखी शंकूतून बाहेर येणारी किरमिजी रंगाची लाव्हा रसाची वाफ व मुखाजवळच तिचे थंड दगडात होणाऱ्या रूपांतराचे निरीक्षण करीत. ज्वालामुखी कुंडाच्या काठावर १३७ मी.पर्यंत येण्यासाठी केबल रेल्वेची सोय करण्यात आली होती, परंतु या उद्रेकात तिचा नाश झाला. व्हीस्यूव्हिअस पर्वताच्या उतारांवर, तसेच पायथ्यालगतच्या मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती असून सु. वीस लाखांपेक्षा अधिक लोक तेथे राहतात. तसेच नेपल्स उपसागर-किनाऱ्यावर औद्योगिक नगरेही आहेत. पर्वतांच्या परिसरात अतिशय सुपीक ज्वालामुखी मृदा असून हा प्रदेश द्राक्षांच्या मळ्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील द्राक्षांपासून तयार केली जाणारी दारू लॅक्रिन क्रिस्ती नावाने ओळखली जाते. प्राचीन पाँपेईमधील मद्यपात्रावर व्हीस्यूव्हिनम ही अक्षरे असत. या पर्वतपरिसरात ज्वालामुखी निद्रावस्थेच्या काळात वृक्षवनस्पती उगवतात. विशेषतः कमी उंचीच्या उतारांवर ओक, चेस्टनट इ. वृक्षांचे प्रमाण जास्त आढळते. उत्तरेकडील मौंट सोमाच्या उतारावर शिखरापर्यंत झाडी आढळते. मात्र त्याचा अंतर्गत उतार ओसाड आहे. पायथ्याकडील प्रदेश मात्र सुपीक असून तेथे भाजीपाला व फळांच्या बागा आणि द्राक्षमळे आढळतात.

इ. स. १८४४ मध्ये या पर्वताच्या उत्तरेकडील उतारावर ६०० मी. उंचीवर ‘रॉयल ऑब्झर्व्हेटरी’ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून शास्त्रज्ञ सतत या ज्वालामुखीचे निरीक्षण करीत आले आहेत. विसाव्या शतकात ज्वालामुखी क्रियेच्या मोजमापासाठी वेगवेगळ्या उंचींवर काही नोंदणी केंद्रे उभारली आहेत. तसेच भूकंप–भारात्मक मोजमापासाठी एक मोठी प्रयोगशाळा व खोल बोगदाही निर्माण करण्यात आला आहे.

पहा : ज्वालामुखी–२ पाँपेई भूकंप 

चौधरी, वसंत