दारेसलाम : टांझानियाची पूर्वीची राजधानी व हिंदी महासागरावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,९६,७०० (१९७२ अंदाज). समुद्रसान्निध्य आणि विषुववृत्ताला जवळ असल्याने येथील हवामान उष्ण व दमट असून वार्षिक पर्जन्य सु. २०२ सेंमी. पडतो. मार्च ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असा वर्षातून दोनदा पावसाळा तर जून ते सप्टेंबर हिवाळा असतो. अरबी लोकांनी दारेसलाम हे नाव दिले असून अरबीमध्ये दारेसलाम म्हणजे शांतिगृह किंवा शांतिस्थान. १८६२ मध्ये झांझिबारच्या सुलतानाने हे शहर वसविण्याचे ठरविले होते परंतु १८७१ मधील त्याच्या मृत्यूने जर्मन पूर्व आफ्रिका कंपनी येईपर्यंत (१८८५) हे एक लहान बंदरच राहिले. दारेसलाम ही १८९१–१९१६ पर्यंत जर्मन पूर्व आफ्रिकेची राजधानी होती परंतु १९१६ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळी दारेसलाम ब्रिटिशांनी काबीज केले.

दुसऱ्या महायुद्धानंतर शहराचा जास्तीत जास्त विकास होत गेला. टांझानियातील बहुतेक आयात–निर्यात ह्या बंदरातूनच होत असून निर्यातीत मुख्यतः तंबाखू, चहा, कॉफी, हाडे, कातडी, खनिज पदार्थ (हिरे, सोने, अभ्रक, कथिल), लाकडी वस्तू इत्यादींचा समावेश होतो. सर्व प्रकारच्या दळणवळणाचे हे महत्त्वाचे केंद्र असून टांगानिका सरोवराच्या पूर्व काठावर सु. १,२५५ किमी. वर असलेले किगोमा दारेसलामशी लोहमार्गाने जोडलेले आहे. दारेसलाम हे महत्त्वाचे प्रशासकीय, औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिक केंद्र आहे. येथे १९७० पासून दारेसलाम विद्यापीठ सुरू झाले असून शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, संशोधन संस्था, दवाखाने वगैरेंच्या चांगल्या सोयी आहेत. येथे असलेले राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय महत्त्वाचे असून त्यात १९५९ मध्ये एल्. एस्. बी. लीकीयाला ओल्डूवायी गॉर्जमध्ये सापडलेल्या १७ लाख वर्षांपूर्वीच्या ‘झिंजॅनथ्रपस बॉयसेयी’ या मानवाच्या अश्मीभूत नावाच्या कवटीचा समावेश आहे. येथे सेंट जोसेफ कॅथीड्रल, ल्यूथरन चर्च व एक सुंदर वनस्पति–उद्यान प्रेक्षणीय आहे. साबण, रंग, सिगारेट, काच आणि धातुसामान, कापड, पादत्राणे हे येथील स्थानिक उद्योगधंदे होत. सध्या टांझानियाची राजधानी दारेसलामऐवजी डोडोमा ही करण्यात आली आहे.

लिमये, दि. ह. चौधरी, वसंत